गांधी विचाराची विश्वव्यापकता

गांधी विचाराची विश्वव्यापकता

गांधी समजून घेताना - मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, डेस्मंड टूटू, अमेरिकन पर्यावरणवादी अल गोर, ब्रिटिश संगीतकार जॉन लेनन, शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन, दलाई लामा, ‘अॅपल’चा संस्थापक स्टीव्ह जॉब्स, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, पाकिस्तानची शांततेचा नोबेल पुरस्कारविजेती मलालापर्यंत सगळ्यांना गांधीविचार प्रेरणादायी आणि आकर्षक वाटतात.

गांधीजींची धर्मभावना
बापू @ 150
‘सत्याचे प्रयोग’ ही संजीवनी

कदाचित जगातील सर्वात जास्त चर्चिली जाणारी व्यक्ती! पण आजही तितकीच अभ्यासली जाणारी व्यक्ती.

मी गांधी विचारांकडे कसा वळलो किंवा मला गांधी विचार कसे पटायला लागले. याविषयी थोडेसे…

जसा बऱ्याच लोकांचा गांधी विचारापर्यंतचा प्रवास प्रथम गैरसमजातून आणि नंतर वाचनातून उलगडत गेलेल्या गांधी विचारपर्यंत होतो तसाच माझाही काही आहे.

तरुणाईत गांधी आवडणे तसे अवघडच, ‘जशास तसे’ किंवा ‘ईट का जवाब पत्थर से’ यावरच विश्वास वाटणारे वय. तरुणपणी गांधी विचार खूपच मिळमिळीत वाटतात. अहिंसेने कसे काय प्रश्न सुटत नसतात! अशी ठाम समजूत असणारे वय. पण वाचन चांगले असेल तर कदाचित गांधी समजायला उपयोगी पडते. कारण गांधी समजून घेण्यासाठी आधी गांधी वाचावा लागतो समजतो. तसे तर अमलात आणणे काही प्रमाणात कठीणच आहे.

मी तसा कधी जास्त कट्टरवादाकडे झुकलोच नव्हतो पण काही प्रमाणात गांधीजींबद्दल गैरसमज नक्कीच होते. पण लहानपणी वडिलांनी आणलेल्या गोष्टींच्या पुस्तकांमुळे वाचनाची आवड लागली होती. नंतर जेव्हा मोठ्या यशस्वी, प्रसिद्ध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींविषयी उत्सुकता असल्यामुळे मी काही चरित्रे वाचली जसे की साने गुरुजी (त्यांच्या ‘गोड गोष्टींचे ‘ पुस्तक लहानपणी वाचले होते) डॉ. प्रकाश आमटे, बाबा आमटे, डॉ. अभय बंग, अनुताई वाघ मग कळले की सामाजिक कार्यात यशस्वी झालेले गांधी विचारांनी प्रेरित झालेले आहेत.

या सगळ्यांची साधी राहणी, उच्चविचारसरणी, कामाविषयीचा समर्पित भाव, स्वतः उच्चशिक्षित असूनदेखील भौतिक गोष्टींकडे पाठ फिरवून, प्रसंगी जवळच्यांची नाराजी ओढवून, सामाजिक बंधने झुगारून समाजासाठी काम करण्याची वृत्ती खूप भावली आणि बरंच काही शिकवूनही गेली. पण हे वाचत असताना या सगळ्यांच्या विचारांमध्ये गांधी हा ‘कॉमन फॅक्टर’ वाटला. या सगळ्यांची सामाजिक नाळ कुठेतरी गांधी विचारांशी जुळते असे वाटायला लागले. नंतर काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तींविषयही वाचले त्यांनी केलेले ‘गांधीप्रयोग’ वाचले. यामुळे आणखीच उत्सुकता वाढत गेली.

नंतर गांधीजींचे ‘माझे सत्याचे प्रयोग’ही वाचले. आणि गांधी आणखीनच जवळचे वाटू लागले. वाचनातून त्यांच्या विषयीचे गैरसमजही दूर झाले. आणखी समजत गेले.

गांधीजींच्या सत्याग्रहाचे प्रयोग करून बऱ्याच मोठ्या लोकांनी आंदोलने केली आणि लोकांनाच सहभागी करून ती यशस्वीही केली आहेत.

म्हणून तर मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, डेस्मंड टूटू, अमेरिकन पर्यावरणवादी अल गोर, ब्रिटिश संगीतकार जॉन लेनन, शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन, दलाई लामा, ‘अॅपल’चा संस्थापक स्टीव्ह जॉब्स, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, पाकिस्तानची शांततेचा नोबेल पुरस्कारविजेती मलालापर्यंत सगळ्यांना गांधीविचार प्रेरणादायी आणि आकर्षक वाटतात. जगातील जवळ जवळ १८० देश गांधीची १५० वी जयंती साजरी करत आहे. यावरूनच गांधी विचाराची विश्वव्यापकता लक्षात येते.

शिवाय सध्या पर्यावरणाची जी हानी चालवली आहे. विकासासाठी नावाखाली किंवा भौतिक गोष्टींच्या हव्यासापोटी सध्या निसर्गाला ओरबाडणे चालू आहे त्यावर गांधी विचार हाच पर्याय वाटतो. आपल्या गरजा कमीतकमी ठेवणे, पर्यावरण पूरक जीवनशैली ठेवणे हे पर्याय निसर्ग टिकवण्यासाठी जास्त योग्य वाटतात. गांधीजींचे “या पृथ्वीवर प्रत्येकाच्या गरजे पुरते आहे पण कोणाच्या एकाच्या लोभापुरते नाही’ हे वाक्य  आजच्या काळातही जास्त समर्पक वाटते आणि पर्यावरणपुरकही.

शिवाय आजच्या महाग झालेल्या आणि गरीब श्रीमंत वर्गात विभागलेल्या शिक्षण पद्धतीवर गांधीजींची ‘नई तालीम’ शिक्षण पद्धत अधिक योग्य वाटते.

आजच्या शिक्षण व्यवस्थेत सामाजिक जाणिवा रुजवण्याचा प्रयत्न कमी वाटतो, श्रमप्रतिष्ठा कमी वाटते, मार्कांसाठी स्पर्धा जास्त वाटते. त्यामुळेच गांधीजींनी ‘नई तालीमी मध्ये समावेश केलेले स्वालंबन, आत्मसम्मान आणि श्रमप्रतिष्ठा हे गुण आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे वाटतात.  ‘नई तालीम’मध्ये गांधीजींनी व्यक्तिमत्व विकासातील बौद्धिक, आध्यात्मिक आणि शारीरिक या तीनही गोष्टींचा समावेश केलेला आहे. शिवाय त्यांचे शिक्षणविचार हे राष्ट्र जीवन आणि शिक्षण यांना जोडणारे आहेत.

गांधींवर कितीही टीका केली तरी गांधी काही मरत नाही. ते आजही जगाला प्रेरणाच देतात. आजच्या घडीला वाढत चाललेल्या आर्थिक विषमतेमुळे होत असलेल्या समस्यांवर, वाढत्या हिंसेवर, लोभापायी होणाऱ्या पर्यावरणाच्या समस्येवर गांधी विचार हाच पर्याय वाटतो.

गांधीजींच्या आयुष्याकडे पाहिल्यावर वाटते की त्यांच ‘माझं जीवन हाच माझा संदेश आहे.’ हे म्हणणे किती समर्पक आहे. प्रत्येक काम मग ते कितीही छोटे स्वयंपाकासाठी धान्य निवडणे असो वा बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध ‘चले जाव’ आंदोलन सुरू करण्याचा मोठा लढा असो. प्रत्येक गोष्ट त्यांनी जीव ओतून केली. गांधीजींचा स्वत:च्या चुकांची जाहीरपणे कबुली करण्याचा प्रामाणिकपणा बरेच काही शिकवून जातो. परिवर्तनाच्या नियमानुसार आपल्या विचारांमध्ये बदल घडवून आणण्याचा त्यांनी जाणीपूर्वक प्रयत्न केला.

अजूनही माझे गांधी विचार वाचनातून आणि विविध व्यक्तींना भेटून समजावून घेणे चालू आहे. काही प्रमाणात ते अवलंबण्याचाही प्रयत्न चालू आहे. स्वतःच्या गरजा कमी करण्याचा, शक्य तो पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे.

निलेश शिंगे सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0