गीतांजली श्री, ‘रेत समाधि’ आणि बुकर

गीतांजली श्री, ‘रेत समाधि’ आणि बुकर

गीतांजली श्री यांच्या याच ‘रेत समाधि’ या मूळ हिंदी कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुकर साहित्य पुरस्काराचा दुर्मीळ बहुमान प्राप्त झाला आहे. या सन्मानाने संपूर्ण भारतीय उपखंडातील वाचकविश्व रोमांचित झाले आहे. हा सन्मान केवळ हिंदी या भाषेचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय साहित्याचाच हा सन्मान असल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसची राष्ट्रवादाची हाक
भुरा: ज्ञानलालसेचं एक संपृक्त द्रावण
प्रश्न ‘कोविड विधवांचे’

ऐंशी वर्षांची एक वृद्धा आहे. ‘रेत समाधि’ कादंबरीत तिचा उल्लेख आल्यानंतर बर्‍याच वेळाने वाचकांना माहिती होते की तिचे पूर्ण नाव तर चंद्रप्रभा देवी आहे. कथानकात बहुतेकवेळा ती वृद्धा अम्मा याच संबोधनाने उल्लेखली जाते. तर या अम्माने आपल्या पतीच्या निधनानंतर अनेक वर्षांपासून पलंग धरला आहे. घरातील सर्व सदस्यांना वाटते की, अम्माने पलंग सोडावा, थोडेफार इकडेतिकडे फिरावे, पण नाही अम्माने जणू घोर प्रतिज्ञाच केलीय जणू, पलंग न सोडण्याची. त्यामुळे अम्माचा मुलगा, सून, मुलगी, नातवंडे सगळीजणं म्हणतायत, ‘अम्मा उठ.’ पण अम्मा मात्र तशीच पडून राहाते.

मग अचानक एक दिवस घरातल्या कुणीही कधी कल्पना केली नसेल ते घडते. अम्मा चक्क उठते आणि तेही कुणालाही न सांगता एका काठीच्या आधारे घरातून बाहेर पडते. संपूर्ण कुटुंब हवालदिल. शोधाशोध झाल्यानंतर अम्मा भेटते एका पोलिस ठाण्यात. मग अम्मा घरी परतते आणि त्यानंतर ती लेकीजवळ राहायला जाते. तिची लेक जी विवाहित नाहीये पण कुणासोबत तरी तिचं सहजीवन सुरू असतं. त्यानंतर अम्मामध्ये बदल होण्यास सुरूवात होतो, त्याचे कारण ठरते रोझी नावाची तृतीयपंथी. रोझी वेष बदलून अधून मधून रझा मास्टर बनत असते. दोन वेषभूषेत एकच व्यक्ती! रोझीच्या सान्निध्यात अम्मामध्ये तिच्या पेहरावापासून ते रोजच्या दिनचर्येपर्यंत मोठा बदल घडतो. तिच्यात प्रचंड ऊर्जा भरलेली जाणवायला लागते. अम्माच्या मनात नवनव्या आकांक्षा पल्लवीत होत जातात. आत्मविश्वासपूर्ण अम्माचे हे रूपडे पाहून लेकीलाही धास्ती लागून राहाते. त्यानंतर जे घडते ते सर्वांच्याच कल्पनेपल्याडचे असते.

अम्मा लेकीसोबत पाकिस्तानात जाते अधिकृत व्हिसा-पासपोर्टसह. सून आणि नातवंडे यासाठी सहमत असतात पण त्यांनाही ठाऊक नसते अम्माच्या मनात नेमके चाललेय तरी काय? पाकिस्तानात गेल्यानंतर हे रहस्य उलगडते. अम्माचा म्हणजेच चंद्रप्रभादेवीचा भूतकाळ म्हणजे ती कधी चंदा होती आणि अन्वर नावाच्या मुस्लिम व्यक्तीबरोबर तिचा विवाह त्यावेळच्या फाळणीपूर्व भारतात झालेला होता. अम्मा म्हणजेच चंदाचा जन्म पाकिस्तानातील एका हिंदू कुटुंबात झाला होता परंतु फाळणीनंतर उसळलेल्या अराजकात कैक अन्य हिंदू महिलांसोबत ती सुद्धा सीमापार करून भारतात आलेली असते. इकडे येऊन चंदा ही चंद्रप्रभादेवी नावाने नवे आयुष्य सुरू करते.

पण का जाते, अम्मा ऊर्फ चंद्रप्रभादेवी ऊर्फ चंदा या वयात पाकिस्तानात? हळुहळू रहस्य उलगडत जाते की ती आपल्या पहिल्या पतीच्या शोधार्थ तिकडे जाते आणि तिथेच मरण्यासाठीसुद्धा, तेही विशिष्ट पद्धतीने मरण्यासाठी!

तर असा हा दोन देशातील सामाजिक-राजकीय-मानसिक आंदोलनाचा, तत्कालिन विचित्र परिस्थितीचा विशालपट लेखिकेने ‘रेत समाधि’ या कादंबरीसाठी निवडला आहे. गीतांजली श्री यांनी ही कादंबरी निव्वळ लिहिलेली नाहीये तर अक्षरशः विणलेली आहे असे प्रामाणिक मत हिंदीतील काही समीक्षकांनी मांडले आहे. त्याची प्रचिती मूळ हिंदी कादंबरी वाचताना पदोपदी येत राहाते. मानवी मन हे एक न सुटणारे कोडे आहे ते सुटता सुटत नाही. त्यामुळे ही कथा एकट्या अम्माची राहात नाही. ती फाळणीची दीर्घ शोकांतिका भोगलेल्या दोन्ही देशांमधल्या हजारो पीडितांची जिवंत कहाणीच ठरते. जगात जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे अशी भौगोलिक फाळणी घडते ती मानवीय संबंधाशिवाय घडत असते, याच मुख्य मुद्यावर ‘रेत समाधि’ ही कादंबरी बेतली आहे, जी गीतांजली श्री यांनी मानवी विशेषतः स्त्री भावभावनांची नाजूक गुंफण करत जरीकामाप्रमाणे तरलपणे वाचकांच्या पुढ्यात ठेवली आहे. एका अर्थाने ‘रेत समाधि’ ही कादंबरी विस्थापित जनतेची महागाथाच म्हणता येईल.

गीतांजली श्री यांच्या याच ‘रेत समाधि’ या मूळ हिंदी कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुकर साहित्य पुरस्काराचा दुर्मीळ बहुमान प्राप्त झाला आहे. या सन्मानाने संपूर्ण भारतीय उपखंडातील वाचकविश्व रोमांचित झाले आहे. हा सन्मान केवळ हिंदी या भाषेचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय साहित्याचाच हा सन्मान असल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. अमेरिकी लेखिका आणि चित्रकार डेझी रॉकवेल यांनी या श्रेष्ठ कादंबरीचा तितकाच समर्थ अनुवाद केलाय. भारतीय साहित्याच्या विश्वस्तरावरील उत्तम अनुवादाचे आणि उत्तम अनुवादकाचेही महत्त्व यानिमित्ताने अधोरेखीत झाले आहे.

कथा लेखिका-कादंबरीकार म्हणून हिंदी साहित्यक्षेत्राला परिचीत असलेल्या गीतांजली श्री यांचा जन्म उत्तरप्रदेश राज्यातील मैनपुरी इथला. १२ जून १९५७ रोजी जन्मलेल्या गीतांजली श्री यांचे प्राथमिक शिक्षण भारतातील विविध शहरांमधून पार पडले. दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर ‘जेएनयू’तून त्यांनी इतिहासात एम.ए. पूर्ण केले. महाराजा सयाजीराजे विद्यापीठ, बडोदे येथून ‘प्रेमचंद आणि उत्तर भारतातील वसाहतवादी शिक्षित वर्ग’ या विषयावर आपले संशोधन कार्य पूर्ण केले. पुढे काही दिवस ‘जामिया मिलिया इस्लामिया’मध्ये अध्यापनाची सेवा बजावली. गुजरातमधील सुरत येथील ‘सेंटर फॉर सोशल स्टडीज’मध्ये सुद्धा आपले संशोधन कार्य केले. त्याच दरम्यान त्यांनी कथा लिहिण्यास आरंभ केला. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक राजेंद्र यादव यांच्या संपादनाखाली निघणार्‍या ‘हंस’ नियतकालिकामध्ये १९८७ साली त्यांची ‘बेलपत्र’ ही पहिली कथा प्रकाशित झाली. त्यानंतर लेखनक्षेत्रात स्थिरावलेल्या गीतांजली श्री यांच्या आजवर पाच कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या आहेत. ज्यात ‘माई’, ‘हमारा शहर उस बरस’, ‘तिरोहित’, ‘खाली जगह’ आणि सध्या चर्चेत असलेली ‘रेत समाधि’ यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर त्यांचे ‘अनुगूंज’, ‘वैराग्य’, ‘मार्च’, ‘मां और साकुरा’ आणि ‘यहां हाथी रहते थे’ हे पाच कथासंग्रह देखील वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यांचे साहित्य इंग्रजी भाषेशिवाय फ्रेंच, जर्मनी, जपानी, सर्बियन, कोरियन या विदेशी तर बंगाली, गुजराती आणि उर्दू इत्यादी भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.

गीतांजली पांडे हे गीतांजली श्री यांचे मूळ नाव. आईच्या नावाचे आद्याक्षर श्री म्हणून त्यांनी गीतांजली श्री हे नाव

स्वीकारून त्यांनी आपली लेखन कारकीर्द सुरू केली. त्यांचे वडिल शासकीय सेवेत कार्यरत होते. सुधीर हे त्यांच्या पतीचे नाव आहे. ९५ वर्षांची त्यांची आई अजूनही त्यांना सोबत करत आहे.

गीतांजली श्री सध्या नवी दिल्लीत राहात असल्यातरी त्यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील गोंडूर गावचे आहे.

‘माई’ या पहिल्या कादंबरीतून गीतांजली श्री यांनी उत्तर भारतातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्री-पुरूषांच्या तीन पिढ्यांचा वेध घेतला आहे. त्यांची दुसरी कादंबरी ‘हमारा शहर उस बरस’ बाबरी मशीद विध्वंस आणि धार्मिक कट्टरता या विषयावर आधारीत आहे. ‘तिरोहित’ ही त्यांची कादंबरी स्त्रीसमलैंगिता या विषयावर चर्चा करणारी हिंदीतील वैशिष्ठ्यपूर्ण कादंबरी मानली जाते.

बुकरचा सन्मान जाहीर झाल्यामुळे गीतांजली श्री आणि त्यांची ‘रेत समाधि’ ही कादंबरी आपोआपच चर्चेचा विषय बनले आहेत. यंदाच्या वर्षी बुकर पुरस्कारासाठी १३५ पुस्तकांची निवड चाचणी झाली. जी विक्रमी संख्या मानली जाते. बुकर पुरस्कारांचा १९६९ पासून एक स्वतंत्र इतिहास आहे. भारतामध्ये मात्र बुकर पुरस्कार पहिल्यांदा चर्चेत आला तो १९९३ सालात. जेव्हा तो सलमान रश्दी यांच्या ‘द मिडनाईटस चिल्ड्रेन’ या पुस्तकाला दिला गेला होता. १९९७ सालच्या बुकर विजेत्या लेखिका अरूंधती रॉय रातोरात जणू स्टारच बनल्या. अरविंद अडिगा आणि किरण देसाई विदेशात स्थायिक झालेले पण भारतीय मूळ असलेले बुकर विजेते इंग्रजी लेखक होत. बुकर पुरस्कारामागचा मुख्य उद्देश इंग्रजी भाषेतील कादंबर्‍यांना बिगर युरोपीय देशातील वाचकांपर्यंत पोहोचविणे, म्हणजेच विशिष्ट दृष्टीकोनातून ग्रंथबाजारपेठ वाढविणे हा असल्याचे अनेक नामवंतांनी नोंदवून ठेवले आहे. इंग्रजी साहित्य आता पाश्चात्य देशांपेक्षा अधिक भारतात वाचले जात आहे. मातृभाषेतले साहित्य वाचणे उच्चशिक्षित भारतीयांना अपमानास्पद वाटत असल्याचे धक्कादायक निरिक्षणही तज्ज्ञांकडून याबाबत नोंदवण्यात आले आहे. इंग्रजीमधून लिहिणार्‍या भारतीय लेखकांचे साहित्य हेच खरे भारतीय साहित्य असल्याची धारणा आजच्या पाश्चात्य जगातील वाचकांमध्ये आहे. गीतांजली श्री यांची ‘रेत समाधि’ आणि त्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद ‘Tomb of Sand’ मुळे या धारणा बदलत जातील असा आशावाद व्यक्त करायला हरकत नाही.

बुकर पुरस्काराच्या निमित्ताने हिंदी भाषेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलेला असताना, जगभरातील साहित्यविश्वात भारतीय भाषांचा गौरव वाढलेला असताना ‘रेत समाधि’च्या लेखिका गीतांजली श्री यांचे साधे अभिनंदन करण्याचाही उमदेपणा पावलोपावली भारतीय परंपरा, संस्कृती यांचा उदोउदो करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकारी मंत्रीगणांनी दाखवू नये, ही अतिशय खेदाची तसेच तितकीच संतापाची बाब आहे. तीच तर्‍हा सरकारच्या तालावर नाचणार्‍या मीडियाची आहे. गेल्या आठवडाभरापासून ज्ञानवापी मशिद आणि त्यासंबंधींच्या बातम्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वात आणलेल्या वृत्तवाहिन्यांनाही बुकर विजेत्या हिंदी साहित्यिकेचे कौतुक करावेसे वाटले नाही!

काय सांगावे त्यामुळे त्यांचा कोटी मोलाचा टीआरपी घसरला तर?

असो. या निमित्ताने धार्मिक सौहार्दाचा संदेश देणार्‍या साहित्यकृती आणि साहित्यिक यांच्याविषयी कट्टरतावादी मानसिकतेने ग्रासलेले नवभारतातील सत्ताधारी राज्यकर्ते व त्यांचे पाळीव सैन्य किती कोत्या मनोवृत्तीने पछाडलेले आहेत हेच सिद्ध होते.

बुकरचा सन्मान स्विकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना गीतांजली श्री म्हणाल्या आहेत की, ‘आपल्यासाठी ही मोठी संधी आहे. मी आश्चर्यमुग्ध आहे, प्रसन्न आहे. सन्मानित आहे. विनम्र आहे..!’

समस्त भारतीय वाचकांचीही बुकर पुरस्काराविषयी नेमकी हीच भावना असेल असे प्रांजळपणे वाटते. गीतांजली श्री यांच्या या जागतिक स्तरावरील सन्मानामुळे प्रत्येक साहित्यप्रेमी भारतीयाला स्वतःच सन्मानित झाल्यासारखे वाटत असणार हे नक्की.

भरत यादव, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0