जॉर्ज फर्नांडिस आणि काश्मीर

जॉर्ज फर्नांडिस आणि काश्मीर

जॉर्जनी जगमोहन यांना फोन केला. चौकशी करण्यासाठी, आपण श्रीनगरला येतोय, हे सांगण्यासाठी. जगमोहन यांच्या ऑफिसने फोन घेतला नाही. काश्मीरची यंत्रणा आणि जॉर्ज यांच्यात संपर्क होत नव्हता. .. राजहंस प्रकाशनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निळू दामले यांच्या ‘सुसाट जॉर्ज’ या पुस्तकातील अंश.

विज्ञान कॉंग्रेसमधील मूर्खपणा
भाजप नेत्याच्या गोशाळेत शेकडो गायी मृत
भीमा-कोरेगाववरून केंद्र आणि राज्य आमने सामने

११ मार्च १९९० रोजी जॉर्ज काश्मीर मंत्री झाले. हे अडचणीचं खातं जॉर्जना राजीव गांधींच्या सांगण्यावरून देण्यात आलं. कसं असतं पहा. राजीव आणि व्हीपी हाडवैरी. एकमेकांची सरकारं पाडण्यात मग्न. तरी आतून त्यांचं आपसात कशा ना कशावर तरी बोलणं होत असे.

काश्मीरमधे फुटीर आणि दहशती कारवाया वाढल्या होत्या.

जॉर्ज फारूख अब्दुल्लांशी फोनवर बोलले, अनेक तास, अनेकवेळा. काश्मीरमधली स्थिती त्यांनी समजून घेतली.

जगमोहन यांना व्हीपी काश्मीरचे राज्यपाल करणार होते. भाजपला जगमोहन हवे होते. जगमोहनना पाठवलं की भाजपचा सरकार स्थिर करण्याला उपयोग होईल, असा व्हीपींचा डाव होता.

जगमोहन अरेरावीनं वागत. त्यांचा एकूण कल मुस्लिमविरोधाचा होता हे जॉर्जनी जाणलं. जॉर्जनी व्हीपींना फोन करून सांगितलं की जगमोहनना राज्यपाल करू नका. जॉर्जची अपेक्षा होती की ते काश्मीर मंत्री झाले असल्यानं त्याचं म्हणणं मान्य होईल. व्हीपींनी जॉर्जचं म्हणणं मान्य केलं.

दोनच दिवसांनी अब्दुल्ला यांचा फोन आला की जगमोहन रुजू झाले आहेत. जॉर्जनी व्हीपींना विचारलं की हा काय प्रकार आहे. त्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही, विषय टाळून तिसऱ्याच विषयावर बोलले.

श्रीनगरपासून ४ किमीवर चानपुरा गावात १५ मार्च १९९० रोजी सीआरपीएफ जवानांनी छापे घातले होते. गावापासून काही अंतरावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सीआरपीएफचे जवान काही घरांत घुसले. घरांची नासधूस केली. काही वृद्ध आणि तरूणांना पकडून नेलं आणि स्त्रियांवर बलात्कार केला. ही बातमी काश्मिरात आणि दिल्लीपर्यंत पसरली होती. खूप टीका झाली.  बलात्कार आणि अत्याचार झाले नाहीत, उगाच प्रकरण रंगवण्यात येतंय, असं सरकार म्हणत होतं. जॉर्ज काश्मीरमंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीत हा हल्ला झाला असं पसरवण्यात आलं.

जॉर्जनी जगमोहन यांना फोन केला. चौकशी करण्यासाठी, आपण श्रीनगरला येतोय, हे सांगण्यासाठी. जगमोहन यांच्या ऑफिसने फोन घेतला नाही. काश्मीरची यंत्रणा आणि जॉर्ज यांच्यात संपर्क होत नव्हता.

१६ मार्चला जॉर्ज रात्री श्रीनगरला पोचले. सोबत सेक्युरिटी नाही. टॅक्सी करून एकटेच गावात पोचले. रात्री पावणेबाराला मसूद हुसेन नावाच्या स्थानिक पत्रकाराच्या घराखाली टॅक्सी थांबली. मसूदना निरोप गेला की एक महत्त्वाची व्यक्ती त्यांना भेटायला आलीय. मसूद आश्चर्यचकित झाले, घाबरले. जिन्यानं खाली उतरले तर समोर जॉर्ज फर्नांडिस उभे.

निळू दामले

निळू दामले

श्रीनगर आणि चानपोरा गावात वातावरण तंग होतं. रस्ते निर्जन होते. रस्त्यावर नागरिक दिसले तर पोलीस गोळ्या घालत, पोलिस दिसले तर घराघरांतून त्यांच्यावर दगडफेक होई. मशिदीच्या लाऊड स्पीकरवरून पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जात. त्या विभागात फिरणं म्हणजे मरणच होतं.

जॉर्ज चानपुरात पोचले तेव्हां बाराचे ठोके वाजून बराच वेळ झाला होता.

स्त्रिया आणि मुलं गोळा झाली. पुरुष एकतर पकडले गेले होते किंवा गाव सोडून गेले होते. स्त्रिया जॉर्जशी बोलायला तयार नव्हत्या. घाबरल्या होत्या. केव्हाही पोलीस येतील आणि मारझोड करतील अशी भीती त्याना वाटत होती.

जॉर्ज त्यांना म्हणाले, “तुमच्या मुली मला माझ्या मुलीसारख्या आहेत, तुमची आई मला माझ्या आईसारखी आहे. तुम्हाला न्याय मिळेल, खात्री बाळगा.”

स्त्रियांनी आपल्यावर कसा बलात्कार झाला, याची कहाणी सांगितली. एक म्हाताऱ्या स्त्रीनं तिची कहाणी सांगितली. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला, तिनं पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानं ती वाचली होती. घटनेची सविस्तर माहिती तिनं दिली.

जॉर्ज रेकॉर्डरवर त्यांचं म्हणणं टेप करत होते. हातात वही होती, त्यात टिपणं घेत होते. रात्री एकचा सुमार. बायका मधे मधे काश्मिरी भाषेत बोलत. त्यावेळी जॉर्जना डुलकी लागत असे. मधेच जागे होत, टेप रेकॉर्डर सुरू आहे की नाही ते तपासत आणि पुन्हा डोळे चोळून बायकांचं म्हणणं ऐकत.

पहाटे जॉर्ज रेल्वे गेस्ट हाऊसवर पोचले.

तीन दिवस तेथे थांबले. बाहेर पोलिसांचा पहारा. जॉर्ज त्यातून निसटत. खासगी टॅक्सी पकडत आणि गावात जाऊन लोकांना भेटत. पोलिस आणि सैन्य यांनी शहराचा ताबा घेतला होता. काश्मिरी जनता आणि पोलिस यांच्यात पक्कं वितुष्ट होतं. दाट वस्तीच्या भागात पोलीस, सरकारी माणूस, जाऊ शकत नसे. पोलिस जात ते पुरता बंदोबस्त घेऊन, झडत्या घेण्यासाठी, मारझोड करण्यासाठी, अटक करण्यासाठी. जॉर्ज अशा वस्त्यात निःशस्त्र गेले.

दहशतवादी तरूण हातात बंदुका घेऊन जॉर्जना गेस्ट हाऊसवर भेटत. शस्त्रं जमिनीवर ठेवून जॉर्जना आपलं म्हणणं सांगत.

रेल्वेखातं सांभाळून जवळपास दर शनिवार-रविवारी जॉर्ज काश्मिरात जात.

एकदा जॉर्ज दोडा या ६ हजार वस्तीच्या गावात जायला निघाले. प्रशासनानं सांगितलं की तिथं जाणं धोक्याचं आहे.  सरकारनं संचारबंदी केली होती आणि गावकऱ्यांनी गावबंदी. गावकऱ्यांनी जॉर्जवरही  गावबंदी जाहीर केली. गाव आणि सरकार, दोघंही म्हणत होते की जॉर्जनी गावात जाऊ नये.

जॉर्ज हेलिकॉप्टरनं दोडाकडं पोचले. स्थानिक अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर उतरवू नका असा सल्ला दिला. सल्ला झुगारून जॉर्ज उतरले. गावातल्या मशिदीवरून भोंगे सांगत होते की जॉर्जनी गावात येऊ नये. जॉर्ज सर्किट हाऊसवर गेले. तिथं काही तरूण भेटायला आले. जॉर्ज म्हणाले की दहशतवादी झालेल्या युवकांना भेटायचं आहे, जामा मशिदीत मुलं आली तर बरं होईल.

गावात शब्द फिरला, जॉर्ज तरुणांना भेटू इच्छितात.

निरोप आला –  भेटायला या.

जॉर्ज जामा मशिदीत पोचले तर आवारात सारं गाव गोळा झालं होतं. मिनारावर, भिंतींवर स्त्रिया उभ्या. प्रचंड गर्दी झाली होती. मशिदीच्या दारात जॉर्ज उतरले. सोबत सिक्युरिटी नव्हती. लोकांनी जॉर्जना घेरलं. सोबतच्या अधिकाऱ्यानं जॉर्जना सांगितलं की परत जाऊ. लोक इजा करतील.

जॉर्ज शांत होते.

भोवती गोळा झालेले लोक जॉर्जचा हात हातात घ्यायचा प्रयत्न करत होते, सलगी साधत होते.

जॉर्जची अपेक्षा होती की तरूण मुलांशी एकान्तात बोलता येईल. प्रत्यक्षात हजारो लोकांची सभाच झाली. सभेतही लोक जॉर्जना प्रश्न विचारत होते. दूरवरून कोणाचा तरी प्रश्न यायचा. जॉर्ज थांबून तो प्रश्न ऐकायचे. भाषणाचा ओघ थांबवून उत्तर द्यायचे.

एक म्हणाला काश्मीरचा प्रश्न बेकारीचा आहे.

जॉर्ज म्हणाले, बेकारी हा साऱ्या भारताचा प्रश्न आहे. काश्मीरचा वेगळा प्रश्न नाही. साऱ्या देशालाच तो प्रश्न सोडवायला हवा.

एक म्हणाला इथे घोर भ्रष्टाचार आहे.

जॉर्ज म्हणाले भ्रष्टाचार भारतातच बोकाळला आहे. सर्वांनीच भ्रष्टाचाराला तोंड द्यायला हवं.

एक म्हणाला काश्मिरात निवडणुकीत बूथ ताब्यात घेतले जातात, लोकांना मतदानापासून परावृत्त केलं जातं.

जॉर्ज म्हणाले हीदेखील साऱ्या भारताची समस्या आहे. आपल्याला बिहारमधे बांकामधल्या निवडणुकीत पाडण्यासाठी काँग्रेसनं नाना उद्योग केले, मतदान केंद्रं लुटली, मतदान करू दिलं नाही, खोटा प्रचार केला.

काश्मीरचे प्रश्न हे भारताचे प्रश्न आहेत, आपल्या सर्वांना एकत्र येऊन प्रश्न सोडवावे लागतील, प्रश्न आणि अडचणी केवळ काश्मीरच्या आहेत असं समजू नका असं जॉर्जनी विविध आकडे देऊन सांगितलं.

जमलेले लोक शांत झाले. राग मावळला आणि लोक मोकळेपणानं बोलू लागले.

दरम्यान जॉर्ज अमेरिकेत गेले होते. तिथं हार्वर्ड विश्वशाळेत त्यांचं भाषण झालं. काश्मिरातले मुसलमान आणि पंडित त्या सभेत होते. पाकिस्तानी विद्यार्थीही होते. काश्मीर हा भाषणाचा विषय होता.

जॉर्जनी फाळणीपासून काश्मीरची कशी गोची झाली ते सविस्तर मांडलं. त्यांच्या वरील भाषणाची पुस्तिकाही नंतर प्रसिद्ध झाली. जॉर्जची भूमिका अशी होती.

हिंदू-मुस्लिम तणाव, हिंदू पंडित विरूद्ध मुसलमान असं या प्रश्नाचं रूप नाही. काश्मीरसारखीच स्थिती पंजाब आणि आसामात आहे. तिथंही हिंसा आणि शस्त्राचार आहे. काश्मीरमधल्या तणावाचं मूळ आर्थिक दुरवस्था, बेरोजगारी यात आहे. हे प्रश्न राजकीय पक्षांना, सरकारांना हाताळता आले नाहीत. सरकारं आणि राजकीय पक्ष यांची समजूत चूक होती, प्रशासन भ्रष्ट होतं. स्थिती सतत चिघळत गेली. मग भरकटलेले तरूण दहशतवादी झाले. फुटीरतावाद्यांनी या स्थितीचा फायदा घेतला. आर्थिक परिस्थिती सुधारणं, रोजगार निर्माण करणं आवश्यक आहे. पण त्यासाठी काश्मिरी लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हायला हवा. त्यासाठी संवाद करायला हवा, अगदी अतिरेक्यांशीही.

रेल्वेत जॉर्जनी काश्मिरी तरुणांना नोकऱ्या दिल्या. तिथली सफरचंदं शेतापासून कारखान्यापर्यंत नेणं, कारखान्यापासून ती देशभर पोचवणं यासाठी जॉर्जनी वाघिण्या दिल्या. जॉर्ज मंत्री झाले त्याआधी रेल्वे वाघिण्या ही रेल्वे अधिकारी आणि पुढारी यांची व्यक्तिगत मालमत्ता होती. कोणालाही मालाची वाहतूक करण्यासाठी वाघीण हवी असेल तर पैसे द्यावे लागत.

देशात एक हजार रेल्वे स्टेशनांवर जॉर्जनी सफरचंदाचं पेय विकण्याची व्यवस्था केली, ती दुकानं काश्मिरी लोकांना देऊ केली.

सफरचंदापासून शुद्ध पेयं करणं तसंच काश्मिरी हस्तकलेला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना जॉर्जच्या आग्रहावरुन सरकारनं सुरू केल्या.

काश्मिरी पेपरांनी जॉर्जच्या प्रयत्नांची दखल वारंवार घेतली.

एकेदिवशी जॉर्ज यांचं काश्मीरचं मंत्रिपद गेलं. जॉर्जनी त्यांचं म्हणणं मंत्रिमंडळात वारंवार मांडलं. पण सरकार भाजपच्या मदतीवर उभं होतं. भाजपनं अडवून धरल्यामुळं जॉर्ज यांचं काश्मीरचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं.

निळू दामले, हे लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0