‘अत्याचार रोखण्यासाठी मुलींनीच खबरदारी घ्यावी’

‘अत्याचार रोखण्यासाठी मुलींनीच खबरदारी घ्यावी’

नवी दिल्लीः लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी मुलींनीच स्वतःच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतली पाहिजे, त्यांनीच लैंगिक अत्याचारापासून स्वतःला वाचवण्यासाठी स्त्री-पुरुष रेघ आखली पाहिजे, असे सर्क्युलर जवाहर लाल नेहरू विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समितीने जारी केले आहे.

या समितीच्या एक महिला अधिकारी पूनम कुमारी यांनी या सर्क्युलरला पाठिंबा दिला आहे. विद्यापीठात विद्यार्थींनींकडून लैंगिक अत्याचाऱ्याचा अनेक तक्रारी आल्यानंतर समितीचे हे मत बनल्याचे कुमारी यांचे म्हणणे आहे. महिलांच्या जवळ असलेल्या पुरुष मित्रांकडून लैंगिक अत्याचार होत असतात. हे एकमेकांना स्पर्श करत असतात, एकमेकांना आलिंगन देतात. जर महिलांना असे स्पर्श अनुचित वाटत असतील तर तसा इशारा त्यांनी आपल्या पुरुष मित्रांना वेळीच दिलाच पाहिजे. मुलगा व मुलीमध्ये एक स्पष्ट रेघ असली पाहिजे. जर एखादी परिस्थिती आपल्या हातातून गेल्याचे मुलींना वाटत असेल, आलिंगन, स्पर्शातून त्यांना अवघडलेपण जाणवत असेल तर त्यांनी पुढच्यांना तसा स्पष्ट इशारा दिला पाहिजे. असा इशारा दिला नाहीतर पुढच्यांना तुमचे म्हणणे कसे कळेल, असा सवाल पूनम कुमारी यांनी उपस्थित केला आहे.

जेएनयूच्या या समितीकडून येत्या १७ जानेवारी रोजी लैंगिक अत्याचारासंदर्भात एक समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले असून हे सत्र दर महिन्याला विद्यापीठात आयोजित करण्यात येणार आहे.

समितीने जारी केलेल्या सर्क्युलरचे उपशीर्षक समुपदेशनाची गरज का आहे? असून विद्यार्थ्यांना वेळीच जागे करणे व त्यांचे प्रबोधन करणे हा या सत्राचा हेतू असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

दरम्यान या सर्क्युलरवरून जेएनयूत वाद निर्माण झाला आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आईशी घोष यांनी या सर्क्युलरमध्ये पीडित महिलाच दोषी असल्याचे प्रतीत होते असा आरोप केला आहे. हे सर्क्युलर प्रतिगामी विचारसरणीचे आहे. त्यातून महिलाच अधिक असुरक्षित राहत असल्याचे घोष यांचे म्हणणे आहे.

जेएनयूच्या या सर्क्युलरवर राष्ट्रीय महिला आयोगानेही नाराजी व्यक्त करत हे सर्क्युलर त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी हे सर्क्युलर महिलाविरोधी असल्याचाही आरोप केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS