पुण्यात गोली मारो गँग – तुषार गांधी

पुण्यात गोली मारो गँग – तुषार गांधी

महात्मा गांधी यांच्यावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानातून तुषार गांधी यांच्या नावाला हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्षेप घेऊन धमकी दिल्याने चर्चासत्र रद्द करणायत आले आहे.

कोरोना आणि तृतीयपंथी समुदाय
फादर स्टेन स्वामी यांना अखेर स्ट्रॉ, सीपर मिळाले
दि मद्रास कब !

महात्मा गांधीं यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पुण्यात मॉडर्न महाविद्यालयात आयोजित करणायत आलेले चर्चासत्र अचानक रद्द करण्यात आले आहे. ‘रिव्हिजिटिंग गांधी’ हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. त्यामध्ये तुषार गांधी यांचे व्याख्यान होणार होते. मात्र ऐनवेळी कोणतंही कारण न देता, हे चर्चासत्र रद्द करण्यात आलं. आयोजकांना धमकी मिळत असल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचा तुषार गांधी यांनी एका व्हॉटसअप पोस्टमध्ये म्हंटले आहे.

तुषार गांधी यांच्याच बरोबर ‘गांधी भवन’चे विश्वस्त आणि ज्येष्ठ कार्यकर्ते अन्वर राजन यांनाही व्याख्यानासाठी बोलावण्यात आले होते. “हिंदुत्ववादी संघटनेच्या दबावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे,” असा आरोप अन्वर राजन यांनी केला आहे.

प्रोग्रेसिव्ह इज्युकेशन (पीई) सोसायटीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातून ही राष्ट्रीय स्तरावरील ‘रिव्हिजिटिंग गांधी’ हे चर्चासत्र आयोजित केले होते. ७ आणि ८ फेब्रुवारीला हे चर्चासत्र होणार होते. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. मात्र गुरुवारी अचानक त्यांना निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा निरोप देण्यात आला.

तुषार गांधी यांनी कार्यक्रम रद्द करण्यात आल्यानंतर ट्विट केले असून, एक मोठी व्हॉटसअप पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात, “मला निमंत्रित केल्यामुळे मॉडर्न कॉलेजला गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडण्यात आलं आहे. पतीतपावन संघटनेने जर मी हजर राहिलो तर कार्यक्रम बंद पाडू अशी धमकी देण्यात आली. गोली मारो गँग पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये आली आहे”.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांनी पत्रकाद्वारे या कृत्याचा निषेध केला आहे. काही संघटनांच्या दबावातून तुषार गांधी यांना देण्यात आलेले निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा आरोप, त्यांनी केला.

प्रॉग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी मात्र विद्यापीठाच्या सूचनेनुसार वक्ते बदलण्यात आल्याचे एका वृत्तपत्राला सांगितले. या चर्चासत्रासाठी विद्यापीठाने अर्थसहाय्य केले आहे. त्यांच्या सूचनेनुसार वक्ते बदलण्यात आले. मात्र आम्ही आमच्या खर्चाने तुषार गांधी यांचे व्याख्यान पुन्हा ठेऊ असे ते म्हणाले.

“गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत विद्यापीठाकडे महाविद्यालये प्रस्ताव पाठवतात. त्यामध्ये चर्चासत्रांचेही प्रस्ताव येतात. कोणते चर्चासत्र मंजूर करायचे, हे ठरविण्यासाठी विद्यापीठाची एक समिती आहे. ती समिती प्रस्ताव मंजूर करते. त्या नंतर विद्यापीठ अशा चर्चासत्रांना निधी मंजूर करते. मात्र त्याचे आयोजन करणे, हा पूर्णपणे त्या त्या महाविद्यालयाचा भाग असतो. आयोजन कसे करायचे, कोणाला बोलवायचे, तारखा वगैरे भाग हा महाविद्यालयाचा आहे, विद्यापीठाचा नाही, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू एन. एस. उमराणी यांनी ‘ड वायर मराठी’शी बोलताना सांगितले. वक्ते बदला, अशी सूचना आम्ही देण्याचा प्रश्नच नाही,  असे उमराणी म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0