जिओमधील ७.७ टक्के हिस्सेदारी गूगलकडे

जिओमधील ७.७ टक्के हिस्सेदारी गूगलकडे

नवी दिल्लीः अमेरिकेतील अल्फाबेट समूहातील गूगल कंपनीने आपल्या कंपनीतल्या डिजिटल युनिटमधील सुमारे ७.७ टक्के हिस्सेदारी ४.५ अब्ज डॉलरला विकत घेत असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रिजने बुधवारी दिली. गेल्या एप्रिल महिन्यात फेसबुकने रिलायन्स जिओतील काही हिस्सेदारी विकत घेतली होती, त्यानंतरचा हा दुसरा मोठा निर्णय आहे.

गूगलच्या या गुंतवणुकीमुळे गेल्या काही महिन्यात रिलायन्समध्ये सुमारे २०.२२ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.

गूगलची रिलायन्स जिओमधील एकूण गुंतवणूक आता ५८.०१ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. जिओची देशातील ग्राहकसंख्या ३८ कोटीहून अधिक आहे.

तीन दिवसांपूर्वी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारतामध्ये गूगल येत्या ५ ते ७ वर्षांत १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर रिलायन्सने ही घोषणा केली.

गूगलच्या या गुंतवणुकीमुळे रिलायन्सला त्यांच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना आपल्या ग्राहकांना देता येणार आहेत. रिलायन्स आपल्या ग्राहकांसाठी स्मार्ट होम योजना आणणार असून त्यात प्रत्येकाच्या घरात व्हॉइस असिस्टंट असेल, तो सर्व कामांची यादी करेल वा सूचवेल. तो ग्राहकाच्या कारला जोडलेला असेल, तसेच घर व कार्यालयाच्या अनेक सुरक्षा यंत्रणा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नियंत्रित केल्या जातील.

या महिन्यात रिलायन्सच्या जिओमध्ये क्वॉलकॉम व इंटेल या दोन चीप तयार करणार्या कंपन्यांनीही गुंतवणूक केली आहे. भारतात फाइव्ह जी लहरींचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. त्यात प्रमुख स्पर्धक म्हणून रिलायन्स जिओ असणार आहे.

मूळ बातमी

 

COMMENTS