द्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती

नवी दिल्लीः भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (६४) या देशाच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती झाल्या आहेत. येत्या २५ जुलैला त्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. मुर्मू यांनी ५० टक्क्याहून अधिक मते मिळवत विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मुर्मू यांना सध्या ५ लाख ७७ हजार ७७७ मते पडली असून ही मते जवळपास ५३ टक्के इतकी झाली आहेत, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे. अद्याप १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील मतांची मोजणी बाकी आहे.

मुर्मू यांनी प्रत्येक फेरीत दोन तृतीयांश पेक्षा अधिक मते मिळवली आहेत. त्यांना विरोधी पक्षांची १७ मतेही मिळाली आहेत. त्यामुळे त्यांनी यशवंत सिन्हा यांचा सहज पराभव केला.

द्रौपदी मुर्मू या मूळच्या ओदिशा राज्यातल्या आहेत. त्यांचा जन्म २० जून १९५८ मध्ये झाला. एका सरकारी खात्यात लेखनिक म्हणून त्या काम करत होत्या. नंतर त्यांनी नगरसेवक होत राजकारणात प्रवेश केला. ओदिशातील रायरंगपूर शहराचे उपनगराध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते. ओदिशातील मयूरभंज जिल्ह्यातल्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व त्या करतात. २००२ व २००९ मध्ये त्या भाजपच्या आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांनी ओदिशा भाजपमध्ये अनेक पदांवर कामही केले. नंतर त्या भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे काम पाहू लागल्या.

मुर्मू यांच्या विजयाचे सर्व पक्षांनी स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS