द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा की ममता विरुद्ध सोनिया?

द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा की ममता विरुद्ध सोनिया?

काही आठवड्यांच्या संभ्रमानंतर आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. निकाल जवळपास निश्चित असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आता भारतीय जनता पक्षाच्या द्रौपद

हार्दिक पटेलः गुजरात काँग्रेसचा नवा आक्रमक चेहरा
नेहरु जयंतीला लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती, मंत्री अनुपस्थित
लोकशाही म्हणजे स्वगत नव्हे!

काही आठवड्यांच्या संभ्रमानंतर आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. निकाल जवळपास निश्चित असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आता भारतीय जनता पक्षाच्या द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा अशी लढत होणार आहे. एकत्रितअसणे अपेक्षित असलेल्या विरोधीपक्ष आपले सामूहिक वजन ज्याच्यासाठी लावू शकतील, असा उमेदवार शोधताना नरेंद्र मोदी सरकारशी झगडण्याऐवजी आपल्याच पक्षांतर्गत राजकारणांमध्ये विरोधीपक्ष गुंतलेले होते. भारताचा पुढील राष्ट्रपती एकमताने निवडण्यासाठी आवश्यक तेवढे संख्याबळ विरोधी पक्षांकडे नाही, कधीच नव्हते. मात्र, एक जागा होती. ती जागा होती विरोधी पक्षनेत्याची. संसदेत नव्हे तरी निदान राष्ट्रपती निवडणुकीसाठी आणि नंतर २०२४ साली होणाऱ्या  सार्वत्रिक निवडणुकीसाठी विरोधीपक्ष ही जागा भरून काढू शकत होते. सर्वांत मोठा विरोधीपक्ष आणि दुसऱ्या क्रमांकाचा विरोधीपक्ष यांच्यात सामना होऊ शकला असता. सोनिया गांधी व ममता बॅनर्जी यांच्यापैकी कोणाची तरी निवड होऊ शकत होती.

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनी ट्विट केले होते,  “राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व विरोधीपक्षांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने कोणी तरी पहिले पाऊल टाकणे आवश्यक होते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हेच केले आहे. अर्थात उमेदवार टीएमसीचा नसणारच आहे.”

काँग्रेसच्या सोनिया गांधीही उमेदवार ठरवण्यासाठी विरोधीपक्षांतील दिग्गजांशी चर्चा करत आहेत, असे काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.

सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी, शरद पवार, सीताराम येचुरी यांच्याशी चर्चा करून काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. मात्र, त्यानंतर त्या आजारी पडल्या, असे वेणूगोपाल म्हणाले होते.

त्यानंतर गोखले यांनी १५ जून रोजी ट्विट करून ममता यांनी पहिले पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे. आता ममता यांना प्रमुख विरोधीपक्ष नेत्या होण्याची घाई झाली आहे की काय, असा प्रश्न यातून निर्माण होतो. किंवा माजी तृणमूल नेते यशवंत सिन्हा हे नेहमीच उमेदवार क्रमांक एक होते? शरद पवार यांनी उमेदवारीचा प्रस्ताव नाकारण्यापूर्वीच सिन्हा यांच्या नावाची चर्चा तृणमूल काँग्रेसच्या वर्तुळात होती. त्यात पवार यांचे नाव प्रथम कोणी सुचवले हे सांगण्यास कोणीच तयार नव्हते. काँग्रेसने पवार यांचे नाव सुचवले नाही असे वेणूगोपाल यांनी स्पष्ट केले होते.

ममता यांनी निमंत्रित केलेल्या बैठकीत गोपाळकृष्ण गांधी व फारुख अब्दुल्ला ही नावेही आली होती. या बैठकीचे निमंत्रण २२ विरोधीपक्षांना होते व १६ पक्षांच्या नेत्यांनी बैठकीला हजेरी लावली होती.

ममता यांचा काँग्रेसला मुख्य विरोधीपक्षाच्या शर्यतीतूनही बाहेर काढण्याचा डाव होता हे तर स्पष्ट आहे. मात्र, मुळात ही कल्पना काँग्रेसनेच मांडली होती.

ममतादिदींनी आपले नाव सुचवल्याबद्दल त्यांचे आभार मानण्याखेरीज फारुख अब्दुल्ला यांना गत्यंतर नव्हते. गोपाळकृष्ण गांधी यांची प्रतिक्रिया मात्र विरोधीपक्षांना काही सुचवणारी होती. विरोधीपक्षांनी दिलेला उमेदवार हा राष्ट्रीय स्तरावर सहमती मिळवू शकेल असा असणे आवश्यक आहे व यासाठी माझ्याहून चांगले अनेक उमेदवार असतील, असे ते म्हणाले.

तर आता सामना एका भाजपानेता विरुद्ध माजी भाजपानेता असाच आहे.

यशवंत सिन्हा यांच्यासाठी ही एक नवीन राजकीय खेळी असू शकेल. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत, सिन्हा हे एकत्रित विरोधीपक्षांचे उमेदवार आहेत, तृणमूल काँग्रेसचे नव्हेत असे सांगण्यात आले.

विरोधीपक्षांचे संख्याबळ कमी असले तरी आम्ही समविचारी पक्षांशी चर्चा करत आहोत, असेही पवार यांनी सांगितले. यांमध्ये तेलंगण राष्ट्र समिती व आम आदमी पार्टी या पक्षांचा समावेश होतो.

मुख्य मुद्दा विरोधीपक्ष एकत्र येऊ शकतात का हा आहे. गोपालकृष्ण गांधी यांनी तोच मांडला होता. मात्र, एकंदर चित्र बघता, ममता यांनी घाईघाईने विरोधीपक्षांना एकत्र आणत सोनिया गांधी यांना बाजूला टाकलं. त्यानंतर त्यांनी प्रस्तावात वापरलेल्या शब्दांवर अनेक पक्षांनी आक्षेप घेतला. शिवसेनेच्या मते गांधी व अब्दुल्ला पुरेसे वजनदार नव्हते. टीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव व ममता यांच्यात नुकतेच सौहार्द निर्माण होऊनही टीआरएसने यात सहभागी होण्यासच नकार दिला, कारण, या पक्षांमध्ये काँग्रेस होता. आम आदमी पार्टी व अकाली दल काँग्रेससोबत कधीच जाणार नाहीत. एआयएमआयएमला निमंत्रण दिले असते, तर असादुद्दीन ओवैसींनी ते धुडकावलेच असते! कारण अर्थातच  काँग्रेस.

२०२४ साली होणाऱ्या निवडणुकीची तयारी दाखवण्याची संधी राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने विरोधीपक्षांना मिळाली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांना स्वत:चेच दर्शन या निमित्ताने घडले असावे. हे दर्शन वाऱ्याच्या पहिल्या झोतात गळून जाणाऱ्या घाबरट सैनिकांचेच होते.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0