फक्त जैनांसाठी स्वच्छतागृहाचा प्रस्ताव मिरा-भाईंदर पालिकेकडून मागे

फक्त जैनांसाठी स्वच्छतागृहाचा प्रस्ताव मिरा-भाईंदर पालिकेकडून मागे

मुंबईः जैन समाजासाठी स्वतंत्र वेगळे स्वच्छतागृह बांधण्याचा मिरा-भाईंदर महानगर पालिकेचा वादग्रस्त प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्याने रद्द करावा लागला. हिंदुस्तान टाइम्सने या संदर्भात वृत्त दिले आहे.

गेल्या १२ ऑगस्टला महापालिकेने एक भाईंदर पश्चिमेकडील प्रभाग समिती ०१ मध्ये एका पुलाखाली फक्त जैन समाजासाठी स्वच्छतागृह बांधण्यासाठी एक जाहीर सूचना जारी केली होती. या स्वच्छतागृहाच्या बांधणीचा खर्च ८ लाख रु.पर्यंत ठरवण्यात आला होता व येत्या दोन महिन्यात हे स्वच्छतागृह बांधून तयार व्हायला हवी अशी अपेक्षा होती.

पालिकेच्या या प्रस्तावावर अनेक स्थानिक नेत्यांनी आक्षेप घेतला व पालिका आयुक्त दिलीप ढोले यांना तक्रारी केल्या. ढोले यांनी पहिल्यांदा या आक्षेपावर वाद घालण्यासारखे काही कारण नाही. हा मुद्दा अगदी किरकोळ असल्याचा पवित्रा घेतला. त्यांनी अशा प्रयत्नांना राजकीय रंग दिला जात असल्याचेही मत मांडले. स्वच्छतागृह हे सार्वजनिक आहे, जनतेने गरज व्यक्त केल्यानंतर त्यांच्या तक्रारीची दखल घ्यावी लागली अशी भूमिका ढोले यांची होती. पण नंतर बऱ्याच गदारोळानंतर त्यांनी पालिकेची ही नोटीस चुकीची असल्याचे मान्य करत ती रद्द करत असल्याचे आदेश दिले.

या प्रकरणासंदर्भात शहर अभियंता दीपक खांबित यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले की, हे स्वच्छतागृह जैन समाजाने स्वतःच्या सीएसआर फंडातून उभे करण्याचे ठरवले होते व त्यामुळे ते उभे करण्यासंदर्भात पालिका प्रशासनाने डोळेझाक केलेली नाही.

दरम्यान शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अरुण कदम यांनी पालिकेच्या प्रस्तावावर टीका करताना कोणीही विशिष्ट समुदायासाठी स्वच्छतागृह बांधू शकत नसल्याचे स्पष्ट केले. तसे झाल्यास त्याला आमचा विरोध असून पालिकेकडे अनेक स्वच्छतागृहांची कामे प्रलंबित आहेत, ती पालिकेने लवकर पूर्ण करावीत.

मिरा भाईंदर पालिकेच्या माजी महापौर, भाजपच्या नेत्या व आमदार गीता जैन यांनी हे स्वच्छतागृह जैन समुदायासाठी नसून ते फक्त जैन धर्मातील गुरूंसाठी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. हा विषय गैरसमजुतीतून वादग्रस्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS