‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार

‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार

नागपूर: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रमाणे नागपूर – गोवा एक्स्प्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिकल कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.

नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ (नरेडको) या संस्थेमार्फत नागपूर येथील ली -मेरिडियन हॉटेल येथे बांधकाम व्यावसायिक आणि विकासक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा विविध गटातील उपलब्धीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा पार पडला.

या वेळी फडणवीस म्हणाले, की नागपूर हे शहर ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून पुढे येणार आहे. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढील काळात मोठ्या प्रमाणात ‘लॉजिस्टिक सपोर्ट’ तयार होणार आहे. भारतातील प्रत्येक मोठ्या शहराला ८ ते १० तासात नागपूर जोडले जाणार आहे. त्यामुळे या शहरात बांधकाम व्यावसायिक व विकासक यांना फार मोठी संधी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये ५ हजार किलोमीटरचे ‘एक्स्प्रेस’ महामार्ग तयार करण्याचे सुतोवाच केले आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील सर्वात मोठा ‘इकॉनॉमिकल कॉरिडॉर’, म्हणून विकसित होणार आहे. या पाठोपाठ विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ते गोवा हा नवा ‘इकॉनॉमिकल कॉरिडॉर’ तयार होत आहे. या शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर- दिल्ली आणि नागपूर-हैदराबाद महामार्ग विकसित होणार आहे. त्यामुळे विदर्भात लवकरच नवे नागपूर, नवे वर्धा, नवे अमरावती अशी विस्तारित शहरे आकारास येणार आहेत. त्यामुळे हरितपट्ट्यांचा बचाव करत नवीन शहरे वसवली पाहिजे. याकडे बांधकाम व्यावसायिक व विकासकांनी लक्ष वेधावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

COMMENTS