दलित तरुणाने मूर्तीला हात लावल्याने कुटुंबाला साठ हजार रुपयांचा दंड

दलित तरुणाने मूर्तीला हात लावल्याने कुटुंबाला साठ हजार रुपयांचा दंड

या महिन्याच्या सुरुवातीला कोलार जिल्ह्यातील मालूर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. १५ वर्षांच्या मुलाने ग्रामदैवताच्या मिरवणुकीत मूर्तीला स्पर्श केल्यामुळे त्याच्या कुटुंबाला ६० हजार रुपये दंड भरण्यास सांगण्यात आले होते. दंड न भरल्यास गावातून हाकलून देण्याची धमकी देण्यात आली.

शबरीमला प्रवेश साजरा करायचे प्रयोजन काय ?
आर्थिक अटींवर १०% आरक्षण समानतेच्या तत्त्वाचा भंग ?
आनंद तेलतुंबडेंमुळे कोण भयभीत झाले आहे?

नवी दिल्ली: कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील एका दलित कुटुंबाला ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, कारण त्या कुटुंबातील एका १५ वर्षांच्या मुलाने मिरवणुकीत ग्रामदैवताच्या मूर्तीला जोडलेल्या खांबाला हात लावला होता.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, यानंतर गावातील ज्येष्ठ लोकांनी सांगितले की, ‘अस्पृश्य’ व्यक्तीच्या स्पर्शाने मूर्ती ‘अपवित्र’ झाली आहे.

८ सप्टेंबर रोजी, बंगळुरूपासून ६० किमी अंतरावर असलेल्या कोलार जिल्ह्यातील मालूर तालुक्यातील उल्राहल्ली येथे ग्रामस्थांनी भूतयम्मा जत्रेचे आयोजन केले होते. यामध्ये दलितांना सहभागी होण्यास आणि ग्रामदैवताच्या मंदिरात जाण्यास मनाई करण्यात आली होती. जत्रेचा भाग म्हणून, गावकऱ्यांनी गावातील प्रमुख देवता सिदिराण्णा यांची मिरवणूक काढली होती.

१५ वर्षीय तरुण मिरवणुकीच्या मार्गावर उपस्थित होता आणि त्याने देवतेच्या मूर्तीला जोडलेल्या खांबावर हात ठेवला होता. त्यानंतर व्यंकटेशप्पा या गावातील एका व्यक्तीने ते पाहिले आणि इतरांना याबद्दल सांगितले. यानंतर मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांना गावातील ज्येष्ठांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.

दुसर्‍या दिवशी ९ सप्टेंबर रोजी जेव्हा मुलगा त्याची आई शोभम्मासह गावातील ज्येष्ठांसमोर हजर झाला, तेव्हा त्यांना ६० हजार रुपये दंड भरण्यास सांगण्यात आले. ही रक्कम १ ऑक्टोबरपर्यंत भरण्याची मुदत त्यांना देण्यात आली आणि तसे न केल्यास गावाबाहेर हाकलून देण्याचे सांगण्यात आले होते.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावात सुमारे ७५-८० कुटुंबे आहेत आणि त्यापैकी बहुतेक वोक्कलिगा समुदायातील आहेत, ज्यांना कर्नाटकात ‘उच्च जात’ मानले जाते. शोभम्माचे कुटुंब गावाच्या सीमेवर राहणाऱ्या दहा अनुसूचित जातीतील कुटुंबांपैकी एक आहे. त्यांचा मुलगा जवळच्या टेकल गावात दहावीमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे.

शोभम्माचा नवरा बहुतेक वेळा आजारी असतो आणि ती कुटुंबात एकमेव कमावणारी आहे. बंगळुरूच्या व्हाईटफिल्डमध्ये हाउसकीपिंग स्टाफ म्हणून काम करून ती महिन्याला सुमारे १३ हजार रुपये कमावते.

“मी रोज सकाळी साडेपाच वाजता बेंगळुरूला जाण्यासाठी ट्रेन पकडते आणि व्हाईटफिल्डमधील एका अपार्टमेंटमध्ये हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून काम करते, त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता परत येते,” मला १३ हजार रुपये महिन्याला मिळतात आणि त्यातच आम्हाला घर चालवावे लागते. ६० हजार रुपयांचा दंड ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे,” तिने वृत्तपत्राला सांगितले.

त्याच्या कुटुंबाला लावण्यात आलेल्या दंडाबद्दल त्यांना काय वाटते, असे विचारले असता, त्या म्हणाल्या, की, गावातील ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार, दलित मुलाच्या स्पर्शाने मूर्ती ‘अपवित्र’ झाली आहे त्यांना ती ‘शुद्ध’ करायची होती आणि पुन्हा रंगविण्यासाठी पैसे लागणार आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, “जर देवाला आमचा स्पर्श आवडत नसेल किंवा लोकांना आम्हाला दूर ठेवायचे असेल, तर आमच्या प्रार्थनेला काय अर्थ राहिला? इतर व्यक्तींप्रमाणे मीही पैसा खर्च केला आहे, देवासाठी दान केले आहे. आजपासून मी असे काहीही करणार नाही आणि फक्त डॉ.बी.आर.आंबेडकरांची पूजा करेन.

ही घटना ८ सप्टेंबर रोजी घडली आणि ९ सप्टेंबर रोजी दंड ठोठावण्यात आला. मात्र दलित संघटनांच्या हस्तक्षेपामुळे १० दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली.

आंबेडकर सेवा समितीचे स्थानिक कार्यकर्ते संदेश यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. ते म्हणाले, “मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना पोलिसांत तक्रार दाखल करण्यास मदत केली. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही अशीच सामाजिक कुप्रथा सुरू राहिली, तर गरीब जनता कुठे जाणार?”

दरम्यान, कोलारचे उपायुक्त व्यंकट राजा यांनी या कुटुंबाची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिल्याचे सांगितले. ते म्हणाले, “आम्ही त्यांना घर बांधण्यासाठी भूखंड दिला असून काही पैसेही दिले आहेत. शोभम्माला समाजकल्याण वसतिगृहात नोकरीही देऊ केली आहे. मी पोलिसांना आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यास सांगितले असून ते त्यावर कारवाई करत आहेत.”

पोलिसांनी या घटनेबाबत अनेक गावकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून माजी ग्रामपंचायत सदस्य नारायणस्वामी, गावप्रमुखांचे पती व्यंकटेशप्पा, पंचायत उपाध्यक्ष आणि इतर काही जणांवर नागरी हक्क संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जातिभेदाच्या अशा घटना कर्नाटकात नवीन नाहीत. गेल्या वर्षी, कोप्पल जिल्ह्यातील मियापूर गावातील एका दलित कुटुंबाला त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाने गावातील मंदिरात प्रवेश केल्यामुळे २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

अशा वारंवार घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी कर्नाटक सरकारने राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये जातिभेद आणि अस्पृश्यतेविरोधात जनजागृती करण्यासाठी ‘विनय समरस्य योजना’ सुरू केली आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0