नवी दिल्लीः केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)चे नवे अध्यक्ष मनोज सोनी यांचे केंद्रातील भाजप पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अत्यंत निकटचे संबंध आहेत.
नवी दिल्लीः केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)चे नवे अध्यक्ष मनोज सोनी यांचे केंद्रातील भाजप पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अत्यंत निकटचे संबंध आहेत. त्यांचा गुजरातमधील एका हिंदू पंथाशीही अनेक वर्ष संबंध आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नरेंद्र मोदी असताना मोदींची भाषणे लिहिण्याचे प्रमुख काम मनोज सोनी यांच्याकडे होते. त्या मुळे मनोज सोनी यांना छोटे मोदी असे म्हटले जायचे.
यूपीएससीचे अध्यक्ष होण्याआधी मनोज सोनी हे बडोद्यातील एम एस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहात होते. त्यांच्या कुलगुरुपदाच्या काळात आरएसएस व भाजपच्या अनेक जणांकडून विद्यापीठातील कारभारावर निर्णय घेतले जात आहे. मनोज सोनी यांनी इन सर्च ऑफ अ थर्ड स्पेस या पुस्तकात २००२च्या गुजरात दंगलीचे विपर्यास्त वर्णन केल्याची काही वृत्ते पूर्वी प्रसिद्ध झाली होती.
लहानपणापासून मनोज सोनी हे गुजरातमधील स्वामीनारायण पंथाशी जोडले गेलेले आहेत. २०२०मध्ये त्यांना निष्कर्म कर्मयोगी म्हणून संबोधले जाऊ लागले. अत्यंत हलाखीच्या परिस्थिती सोनी यांचे बालपण गेले. उदबत्त्यांची विक्री करत सोनी यांनी शिक्षण घेत एका विद्यापीठाचे कुलगुरूपर्यंत मजल मारली असे टाइम्स ऑफ इंडियाचे म्हणणे आहे.
मनोज सोनी यांचे पदवीशिक्षण राज्यशास्त्र या विषयात झाले असून पुढे पोस्ट कोल्ड वॉर इंटरनॅशनल सिस्टिमिक ट्रान्सिशन अँड इंडो-युएस रिलेशन्स या विषयात पीएचडी मिळवली आहे. पीएचडी मिळवल्यानंतर सोनी यांनी सरदार पटेल विद्यापीठात अध्यापनास सुरूवात केली. त्यांचे पूर्ण शिक्षण अनुपम मिशन या संस्थेद्वारे झाले आहे.
सोनी यांच्या नियुक्तीवरच्या प्रतिक्रिया
यूपीएससीच्या अध्यक्षपदी मनोज सोनी यांच्या नियुक्तीचे पडसाद उमटू लागले आहेत. दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक व स्तंभलेखक अपूर्वानंद यांनी द वायरला सांगितले की, यूपीएससी सारख्या संस्थेच्या अध्यक्षपदी अशा व्यक्तीची नियुक्ती झाल्याने राजकीय दबावाला ही संस्था बळी प़डण्याची शक्यता अधिक आहे. यूपीएससीसारखी संस्था ही राजकीय विचारधारापासून दूर असायला हवी व ती निष्पक्ष-तटस्थ असणे अभिप्रेत आहे. आता सोनी यांच्या नियुक्तीमुळे स्पष्ट झालंय की यूपीएससीअंतर्गत होणाऱ्या नियुक्त्या या राजकीय रंग पाहून केल्या जातील.
अपूर्वानंद यांनी ट्विटरवर, उजवी विचारसरणी आयएएस, आयपीएस आपल्या दावणीला बांधत असल्याचा आरोप केला. बडोद्यातील महाराज सयाजीराव विद्यापीठाच्या कुलगुरूपदी मनोज सोनी असताना विद्यापीठाचा दर्जा कमालीचा ढासळला होता. विद्यापीठातील कला शाखा सोनी यांच्या नेतृत्त्वामुळे पूर्ण लयास गेली असे अपूर्वानंद यांचे आरोप आहेत.
माजी आयएएस अधिकारी व तृणमूलचे खासदार जवाहर सिरकार यांनीही सोनी यांच्या नियुक्तीबद्दल चिंता व्यक्त केली. कट्टर हिंदुत्ववादी साधू मनोज सोनी यांच्या यूपीएससीवरच्या नियुक्तीमुळे आता देशाला देवच वाचवू शकतो अशी खत त्यांनी व्यक्त केली आहे.
यूपीएससीतील स्थित्यंतर
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. या संस्थेची धुरा बाळगणाऱ्यांमध्ये नेहमीच अकादमीक व माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश होतो.
ब्रिटिश आमदनीत १९२६ ते १९३२ या काळात यूपीएससीचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान सर रॉस बार्कर यांना मिळाला होता. बार्कर हे प्रख्यात अकादमीक होते व ते इंग्लंडमधील रॉयल सोसायटी ऑफ टिचर्सचे अध्यक्षही होते.
यूपीए सरकारच्या दुसऱ्या काळात यूपीएससीचे अध्यक्ष डी. पी. अगरवाल होते. अगरवाल हे अलिगड विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीधारक होते. नंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एम टेक व आयआयटी दिल्लीतून पीएचडी मिळवली. अगरवाल हे जागतिक बँकेच्या नॅशनल प्रोजेक्टचे संचालकही होते. त्यांच्या देखरेखीखाली १००हून अधिक प्रोजेक्टची कामे झाली आहेत. त्याच बरोबर २० विद्यार्थ्याना त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडीही मिळाल्या आहेत.
अगरवाल यांचे टर्बोमशिनरी, फ्लुइड डायनॅमिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉल़ॉजी, मॅनेजमेंट, ई-गव्हर्नन्स या क्षेत्रांत दीडशेहून अधिक संशोधन प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत.
२०१४ साली नरेंद्र मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर यूपीएससीचे अध्यक्ष रजनी राजदान यांच्याकडे आले होते. राजदान या आयएएस अधिकारी होत्या व त्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रारनिवारण खात्यातून निवृत्त झाल्या होत्या. राजदान यांच्या निवृत्तीनंतर यूपीएससीचे अध्यक्षपद डेव्हिड सेइमलिह यांनी भूषवले. सेइमलिह यांनी नॉर्थइस्टर्न हिल विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषवले होते, नंतर ते इटानगर येथील राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरूही होते. इतिहास या विषयातून मूळ पदवी घेतलेल्या सेइमलिह यांनी नॉर्थइस्टर्न हिल विद्यापीठातून इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतले. नंतर त्यांनी एमफील व पीएचडी मिळवली. भांडवलशाही व साम्राज्यवाद हे त्यांच्या अध्यापनाचे विषय होते. तसेच आधुनिक भारत व ईशान्य भारतातील ख्रिश्चन धर्माचा प्रसार हेही विषय त्यांच्या अध्यापनाचे होते.
सेइमलिह यांच्या निवृत्तीनंतर सरकारने विनय मित्तल यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. मित्तल यांची यूपीएससीच्या इतिहासातील वेगळी अशी नियुक्ती होती. कारण ते रेल्वे बोर्डाचे माजी संचालक होते व त्यांनी भारतीय रेल्वेत विविध विभागात काम केले.
मित्तल यांच्या निवृत्तीनंतर भारतीय डाकखात्यातील निवृत्त संचालक अरविंद सक्सेना यांना यूपीएससीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. सक्सेना यांनी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली व पुढे त्यांनी आयआयटी दिल्लीमधून सिस्टिम मॅनेजमेंट या विषयात एमटेक केले होते.
मूळ बातमी
COMMENTS