ग्रामपंचायत निवडणूक: शिवसेना फायद्यात!

ग्रामपंचायत निवडणूक: शिवसेना फायद्यात!

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकांत सर्वच पक्षांनी आपणच सरस असा दावा केला असला तरी यावेळी मात्र भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांच्या तुलनेत शिवसेनेचे कामगिरी दणदणीत आहे.

मुस्लिमांना का वगळले – सुभाषबाबूंच्या नातवाचा सवाल
ईडीकडून चिदंबरम यांना अटक
केविलवाणा भाजप आणि राष्ट्रवादीची हवा

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तौलनिक दृष्ट्या सर्व पक्षांच्या परफॉर्मन्सचा विचार करता शिवसेनेला मिळालेले घवघवीत यश हे या पक्षाला बोनस मिळाल्याचे स्पष्ट होते. एके काळी शहरी तोंडवळा असलेल्या शिवसेनेने आता गावागावात सत्तेच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात काँग्रेसने आश्वासक यश मिळवून ‘हम भी कुछ कमी नहीं’ हे सिद्ध केले आहे. राष्ट्रवादी आणि भाजपने आपापल्या पट्ट्यात सरस कामगिरी केली असली तरी मनसेने पहिल्यांदा काही ठिकाणी यश मिळवून सर्वाना चकित केले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्ता समीकरणे बदलली. एकेकाळी कट्टर मित्र असलेला पक्ष अचानक दुष्मनीमध्ये बदलला तर शत्रू असलेले घट्ट मित्र झाले. आणि या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी निवडणूक म्हणून या ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जात होते. १४,२३४ ग्रामपंचायत निवडणुकांपैकी प्रत्यक्षात १२ हजार ७११ निवडणुकींसाठी मतदान झाले. पण त्यामध्येही स्थानिक आघाड्या आणि पक्षीय सरमिसळ मोठ्या प्रमाणात होती.

या संपूर्ण निवडणुकीत ३,२६३ जागा मिळवून भाजप जरी प्रथम क्रमांकावर दिसत असला तरी किमान २,८०० जागी शिवसेनेने भगवा फडकवला आहे आणि तो सुद्धा स्वबळावर. एके काळी शिवसेना ही मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या शहरापल्याड शिवसेनेची गावागावात ओळख होती पण ती केवळ शिवसेनेची त्या गावात असलेली शाखा आणि त्याचा लावलेला फलक यामध्येच. सत्ता आणि सत्ताकारण यापासून ती कोसो दूर होती. पण यावेळी शिवसेना सर्वत्र ताकदीने उतरली आणि त्यांनी गाव सत्तेत शिरकाव केला. जवळपास तीन हजार गावात शिवसेनेची सत्ता असणार आहे. याचा राजकीय अर्थ असा की गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत असलेले आणि मुख्यमंत्री पद भूषवित असलेले उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर ग्रामीण भागातील जनता संतुष्ट आहे. शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासात ग्रामपंचायत निवडणुकीत एवढे देदीप्यमान यश कधीही मिळवले नव्हते.

सेनेच्या यशाचा आढावा घेतला तर कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीतील दणदणीत यशाकडे पाहावे लागेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावातील ही प्रतिष्ठेची लढत होती. एकीकडे भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र असताना शिवसेनेने येथे एकहाती सत्ता आणली आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी यासाठी मेहनत घेतली. असाच एक चमत्कार नांदेडमध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्या गढीत शिवसेनेने केला आहे. बारड या ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता उलथवून सेनेने एकहाती ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे.  मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा मध्येही सेनेची कामगिरी पहिल्या पेक्षा जास्त सरस आहे. औरंगाबाद , नाशिक तसेच कोल्हापूरमधील काही भाग,  या सर्व ठिकाणी शिवसेना फायद्यात राहिली आहे. मात्र कोकणात काही ठिकाणी या यशाला गालबोट लागले असले तरी अन्यत्र बाणाने अनेकांची शिकार केली आहे. आकडेवारी बोलकी आहे.

या आधी शिवसेनेचे संपूर्ण राज्यात केवळ ४५१ ग्रामपंचायतीवर वर्चस्व होते. आता हा आकडा ३ हजारांवर पोचला आहे.

भाजपचा विचार केला तर त्यांना ना नफा ना तोटा असा अनुभव आला आहे. कारण काही ठिकाणी स्थानिक आघाडीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले होते. तर अनेक ठिकाणी तेथील राजकीय नेतृत्व कारणीभूत ठरले. आपापले गड शाबूत ठेवण्यात ही मंडळी यशस्वी ठरली, जी एकेकाळी काँग्रेस अथवा राष्ट्रवादीत होते. आता हे सर्व भाजपमध्ये आहेत. पण विदर्भात मात्र भाजपला अनेक ठिकाणी धक्का बसला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथेही भाजप अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. हीच अवस्था पश्चिम महाराष्ट्र मध्येही आहे. खान्देशात खडसे यांनी भाजपची सद्दी संपविली आहे. तर माजी मंत्री राम शिंदे यांच्या ताब्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायती राष्ट्रवादीने ताब्यात घेतल्या आहेत. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या ग्रामपंचायती यावेळी निसटल्या आहेत. थोडी समाधानाची बाब म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी अकलूज ग्रामपंचायत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या ताब्यात ठेवली तर कोकणात नारायण राणे यांनी वैभववाडी, कणकवली येथे आपले प्राबल्य कायम ठेवले आहे.

राष्ट्रवादीने गत निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. सर्वच दिग्गज नेत्यांनी आपल्या ताब्यातील ग्रामपंचायती कायम ठेवल्या आहेत. अपवाद केवळ मिरज तालुक्यातील म्हैशाळ ही ग्रामपंचायत माजी आमदार मोहनराव शिंदे गटाने गमावली. शिंदे हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे मेहुणे आहेत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र ,  मराठवाडा आणि खान्देशमध्ये राष्ट्रवादीची उत्तम कामगिरी आहे. राष्ट्रवादीने २,९९९ ग्रामपंचायतीमध्ये सत्ता स्थापनेत यश मिळविले आहे.

विशेष म्हणजे एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने अडचणीत आलेले सामाजिक कार्य खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील १३ पैकी ११ ग्रामपंचायती ताब्यात ठेवल्या आहेत. त्यामुळे परळीवासीयांनी मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांना महत्त्व दिले नाही.

काँग्रेसचा आलेख सुद्धा समाधानकारक आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशात चांगली कामगिरी करतानाच भाजपच्या विदर्भातील अभेद्य गडाला पाडण्याचे काम काँग्रेसने केले आहे. मरगळ आलेल्या या पक्षाला या निमित्ताने संजीवनी मिळाली आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता सर्व नेत्यांनी आपले किल्ले शाबूत ठेवले आहेत. कराड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मात देत भाजपच्या अतुल भोसले यांनी सत्ता मिळविली आहे. राज्यात काँग्रेसने २,१५१ ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आणल्या आहेत. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील या सर्वच नेत्यांनी पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले आहे.

दखल घेण्याजोगी बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या मनसेने ३८ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता हस्तगत केली आहे. हे यश दुर्लक्षित करून चालणार नाही. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील ग्रामपंचायत तसेच काही पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

हिवरे बाजार हे आदर्श गाव पोपटराव पवार यांनी आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले असून राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांना मानणाऱ्या गटाने वर्चस्व कायम ठेवले आहे. पण पेरे या औरंगाबाद येथील आदर्श गावात पेरे-पाटील यांची सत्ता संपुष्टात आली आहे. हे गाव आदर्श करण्यात पेरे-पाटील यांचा मोठा वाटा होता.

या निवडणुकीचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील यांचा विजय. ग्रामपंचायतमध्ये राज्यात पहिल्यांदा सदस्य म्हणून तृतीयपंथी काम करणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील वाभोल ग्रामपंचायतीत अंजली पाटील सदस्य म्हणून या पुढे काम करतील.

सर्वच पक्षांनी या निवडणुकीत आपणच सरस असा दावा केला असला तरी यावेळी मात्र भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांच्या तुलनेत शिवसेनेला राज्याच्या ग्रामीण भागात मिळालेले यश हे बोनस म्हणून समजले पाहिजे. महाविकास आघाडीचा विचार केला तर या तिन्ही पक्षांना या निवडणुकीचा चांगलाच फायदा झाला आहे.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0