रेषाकोश

रेषाकोश

प्रख्यात चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी यंदा पंचाहत्तराव्या वर्षांत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त त्यांच्या चित्रांतील रेषांचे अर्थ-अन्वयार्थ उलगडण्याचा प्रयत्न.

साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे
महाराष्ट्राची ‘कला’ का नाही?
महान चित्रकार पाब्लो पिकासो

रेषांची एक स्वतंत्र भूमिका असते. स्वभाव असतो. नेमकं रेखाटनाचं भावस्वरूपच नव्हे, तर आत्मस्वरूपाविषयीचे आत्मस्पंदनांचे हेलकावे टिपायचे असतात.

‘माणूस केवळ भाकरीवर जगत नाही’ या ख्रिस्तवचनाची दखल घेतली तर रेषा सर्वव्यापी होते. वास्तविक आनंदाची ओढ भाकरीशी जोडलेली असली, तरी चुलीतील ज्वाळांचे प्रश्न आणि रोजचा

श्रीधर अंभोरे

श्रीधर अंभोरे

व्यवहार हवामान खात्यासारखा सतत बदलत असतो. या बाबीकडे सर्वव्यापी बघणं ज्याला जमलं, त्याचं नाव ‘श्रीधर अंभोरे’ असं आहे. या रेषाधराची रेषा धुसर वाटत नाही. त्यातील अबोल आर्तसाद शक्यतापूर्वक रेषांच्या माध्यमांतून आपल्याशी बोलत असते. ते वरवरचं भाष्य नसतं. कारण त्यात रूपहीनता नसल्यामुळे ती आस्वादकाला आपली संपत्तीच वाटते. तिथे रेषांची परिपूर्णता भेटत जाते, भेटत असते. स्वाभाविक प्रवृत्तींना प्रामाण्य मानून प्रवृत्तीचाच आधार घेऊन आलेली रेखाटनं संवेदनांचा कळपच कळप घेऊन चालताना दिसतात. त्याविषयी खात्रीने आकाराला आलेली चित्रं अनोळखी कधीच वाटत नाहीत.

भुंकणाऱ्या कुत्र्यांची सबलता आणि दूर उभारून भुंकणं कानात भरून घेणाऱ्यांची सबलता याची बघणाऱ्यांना लसावी काढावी वाटते का नाही माहीत नाही. परंतु श्रीधर अंभोरे ती काढताना दिसतो, तीसुद्धा गुंतागुंत टाळून. कधीकधी पशुपक्ष्यांंच्या चांगुलपणातून, केवळ चित्कारातून, होणारं ते स्वभावदर्शन असत नाही. तो टिपलेला मुद्राभाव असतो. सर्वांत महत्त्वाची गोष्ट सांगायची तर तो विषयाला डोक्यात पूर्पपणे सामावून घेत असावा, मुरू देत असावा. त्या त्या विषयाची नवलाई समोर आली की, मांडणी जुळत असावी. प्रसन्न रेषा बागडत बागडत जवळ आली की, ती स्थिर झाल्यावरच रेषावर्माचा, चित्रकाराचा दर्जा आपल्याला कळून येतो. तिथे सजातीय रेषांचा ठसा मनावर उमटतो. वेगवेगळ्या रितीने हा मुद्दा आस्वादकांना समजून घ्यावा लागतो. निसर्ग स्वभावाचा अर्थ समजून घेण्यासाठी वरील मुद्दा नक्कीच उपयोगी पडेल. हळहळ, सहानुभूती आणि निष्ठुरता याचाही अंदाज घेणं सोपं होत जातं.

श्रीधर अंभोरे यांची रचना.

श्रीधर अंभोरे यांची रचना.

अर्थात चित्र काढणं ज्याच्या त्याच्या भावविश्वावर अवलंबून असतं. ऋतुरंग केवळ हिरव्या, पिवळ्या, पांढऱ्या इत्यादी सप्तरंगातून दाखवता येतात ही बाब श्रीधररने चक्क खोटी ठरवली आहे. हे काम तसं कोणीही जुजबी समजू नये. ते अभावानेच जुळून आलेलं असतं. चेहऱ्यावर काळ्या रंगात दिसणाऱ्या विविध रंगढंगाच्या स्मितरेषा, एखादी कधीच नसते. कोण जाणे असं का वाटत जातं माहीत नाही. कळत नाही.

करुणामय स्तिताच्या अंगाने काही चित्र जरुर बघा. ती कितीतरी हृदयं आहेतच. त्यांची टप्प्याटप्प्याने ओळख होते. ती मनात कायम राहते. उदास, सुंदरतेचा ठाव घेण्यासाटी आस्वादकांनी पुन्हापुन्हा चित्रं पाहिली पाहिजेत. रितेरितेच अपार रितेपणाची पोकळी नक्कीच भरून निघू शकते.

आकृती पाठमोरी असली तरी त्याच्या मागोमाग चालणारे मग्न डोळे विस्तीर्ण वाळवंटाच्या बरोबर कितीतरी पटीने डोळे त्या चित्रांच्या पुढे गेलेले असतात. एकांतातील मनाच्या प्रवासाची तिथे आपोआप जाणीव होत जाते. तळात खोल टाकलेल्या पाठमोऱ्या आकृतीच्या पावलांचा अर्थ कळतो. तोही श्रीधर अंभोरेच्या रेषांच्या संभाषणातून. त्याच्या रेषा पुन्हापुन्हा वेगवेगळा अनुवाद करीत राहतात.

झाडावर बांधलेल्या खोप्याचं उजेड गाणं. ते गाणं गात गात असतं, अंड्यातून पंख घेऊन बाहेर पडलेलं नवजात पिल्लू. हा आपल्या डोळ्यासमोर उभा राहिलेला सर्वांगी बदल अद्भूतरम्य वाटत जातो. ते कशामुळे तर खोप्यामागच्या पार्श्वभूमीमुळे. ती त्याची रेषाविषयक कामगिरीच असते. स्वतंत्रपणे आकाराला आलेली. मनाला प्रवासात फुटलेले धुमारे वेगवेगळ्या रूपातून जन्माला आलेले बघायला मिळतात. सुळसुळत्या बोटांची ती वेगळीच कहाणी असते. अपार एकाकीपणाची. अगदी अनपेक्षित.

मनात जाग्या झालेल्या यौवनापासून ते खाणकाम करणाऱ्या पोक्तबाईच्या स्वप्नवत अवस्थेपर्यंतच्या बऱ्याच भावना परस्परांना आलिंगन देत असतात, ते त्याच्या कल्पनेतून. नाजूक, रेखीव व्यक्तिमत्वांच्या गर्दीत अडकून पडायची नक्कीच इच्छा होते. ते चित्रकाराचं एकप्रकारचं मनोगतच आहे. हे सहजपणे कळतं. रेषांशी बोलत बोलत.

म्हणूनच ही सोन्यासारखी रेषा योग्य ठिकाणीच काही सांगते. तिची पाळमुळं यांचा पत्ता यांचा पत्ता सांगतात. पत्ता सांगितल्यावरही तिथपर्यंतचा प्रवास होईलच असं नाही.

हंड्या-झुंबरांचं, राजेरजवाड्यांचं, गळाबंद शेरवानीचं वेड नाही त्याला. नीटनेटक्या सुरांजवळ जातो तो. फुलाजवळही येतो तो. झाडांच्या विपुल सावल्यांत रमते त्याची रेषा. जुन्या, नव्या मानसिकतेची जोड घालणं त्याला जमतं. चाकरीतल्या माणसाच्या वेदनेला अर्थ देतो तो! त्याची रेषा तिथंच पुण्यशील होताना दिसते. अगदी स्वच्छपणे. कधी त्याची रेषा ज्ञानेश्वर होते, तर कधी तुकाराम. कधी विणीत बसते कबिराचा शेला! घट्टघट्ट. कधी ते दु:खार्द गाणं असतं. म्हणून तर त्याचं विश्व सतत सळसळत असतं. कान्होपात्रेचा रंगमंचीय खेळ करणाऱ्यांना जसं तिचं जळतं काळीज कळत नसतं, तसं श्रीधरचं नाही. रंगरंगोटीपेक्षा तो काळरेघ महत्त्वाची मानतो, असं चित्ररेखाटनं बघताना वाटतं. नक्षत्राच्या लख्ख देण्यासारखं. समोर येतं ताजंतवानं होऊन न्हालेल्या झाडासारखं. सामाजिक तत्त्वज्ञानाला पूरक! पावसात विसावलेल्या डोळ्यासारखं असतं सर्व काही! मला कळलं ते जेमतेम आणि इतकंच पण तेवढंच नीटनेटकं, उभं-आडवं आणि सरळ!

श्रीधर अंभोरे यांची रचना.

श्रीधर अंभोरे यांची रचना.

रेखाटनामागचं मन आणि मन:स्थितीचं प्रतिबिंब कोणत्या पातळीवर लक्षात येतं याचा अंदाज घेत घेत अनेक धागे जोडले जातात. ढगाळलेला एखादा दुसरा चेहरा त्याच्या चित्रात दिसला तर पाहणाऱ्याच्या मनातलं पाषाणयुग पाझरत राहील, हे खात्रीनं सांगता येईल. तेही विश्वासपूर्वक.   चेहरे उमगल्यानंतर. अगदी बारीकसारीक अनुभवांसह. त्याच्या चित्रचरित्राचा विचार केला तर श्रीधरची सर्वंकष वाटचाल सर्वहारा संस्कृतीकडे अधिक झुकलेली दिसते. ते त्याचं अढळस्थान आहे. त्यातील नितळता आस्वादकांना सरसकट पेलवली पाहिजे असं वाटतं. या गोष्टी विचारसाखळी विस्कटू देत नाहीत.

श्रीधर इतरतितर वेळ घालीत नसावा. त्यामुळे निश्चित गोष्टी आकाराला येत असाव्यात.  प्रत्येक चित्राला शास्त्रीय परिभाषा असतेच असते. ती समजून घ्यायला हरकत नसावी. रोजत्या जीवनातील धक्काधक्की झिरझिरत्या स्वरूपात का होईना- डोळ्यांना घेरून टाकते. ती आपली एक प्रकारची शोधयात्रा ठरते. प्रगल्भ जाणिवांची ती आगळीवेगळी यात्रा असते. प्रत्येकवेळी कल्पनाशक्तीचा वापर आणि त्याच्यासाठी केलेलं रेषांचं वीणकाम आपल्याच नजरेनं बघितलं तर वेगळा आनंद मिळतो.

‘निरखणं’ या शब्दापासून आस्वादक दूर जातोच जातो. कारण श्रीधरच्या चित्राविषयीचं ते शक्तिस्थळ असतं. ज्याला आपण आतून उमटणं म्हणतो, त्याची ओळख जर आपल्याला असेल तर चित्रांचं मूळ स्वरूप कळायला त्याची मदत होत जाते. तीसुद्धा कॅनव्हासशिवाय चित्रांकित केलेल्या विषयातून.

मोर जन्मत:च उनाड असतो. हा उनाडपणा संयमी व मोहक असतो. शानदार मानेतून व्यक्त होणारा जगण्याचा राजेशाही थाट निसर्गाच्या बेदर्दी रंगमंचावर वर्तन करतो तेव्हा पंखपसारा झडला तरी त्याची पावलं थयथय नाचत असतात. जे जाणं राजवर्खी असतं! ऐटबाज असतं! तुर्रेबाज असतं! हे दाखवताना उपयोगात आणलेल्या खानदानी रेषा जंगलझाडीच्या काळात आपल्या मेंदूत नाच करायला लागतात. पाणरेषांच्या वेगवती प्रवाहात ‘सर्पायण’ आणि त्याचे फुत्कार धव्नी जन्मनादासह वेगळं काहीतरी सांगताना दिसतात.

सजीव, निर्जीव या प्राणीजगताच्या दोन महत्त्वाच्या बाजू. चित्रकारालाच त्याची खरी ओळख असते. अस्ताव्यस्त पडलेल्या दगडात सजीवता वाहती ठेवण्यासाठी पाखरांच्या सचेतन मांदियाळीचा श्रीधरने केलेला वापर आडवाटेवर, डोंगरकपारीत दुर्लक्षित दगडातून प्रतिकात्मक प्रतिनिधित्व करतीत असतो. झोपी गेलेल्या स्पंदनांना जागं करीत राहतो. गुंजाएवढ्या पक्ष्याचं दगडावर बसणं संपूर्ण चित्रालाच वेगळा भावार्थ प्राप्त करून देतं. पाहिलेल्या दगडाची स्मृतीचित्रं पाहिली तर खडक, शिखामधील स्वभावाची चेहरेपट्टी कळते. दगडाविषयीचा मूळतत्त्वविचार मनात घोळत ठेवते. सामाजिक जातीय उतरंडीसारखं त्याचंही असतं. उच्चनीच श्रेणीचं स्मरण करून देते.

लिंगसदृष्य आकाश आणि अवकाशातील नाजूक राकट स्पंदनाचा विखळा मोहक अवयवांच्या माध्यमातून ‘युगलगाणं’ गायला लागतो, तेव्हा कुणाला सतारीच्या, कुणाला सरोदच्या तारा छेडण्याचा आनंद मिळू शकेल. एकमेकांच्या पायाचं सजोड गोत्रं भैरवीत उतरतं तेव्हा डोक्यापासून पायाच्या बोटात घातलेल्या जोडव्याचा आणि मासोळीचा झणझणाट हा अदृश्यपणे चित्रातून व्यक्त झालेला असतो. रेषावर्तित झाल्यावर त्यातील व्याकुळतेचा तळही दिसतो. ढळढळीत देहगाणं सांगणारा. कोरीव वेदनांना वाट करून देणारी ती रेषा श्रीधर अंभोरेच्या मनातली सखीच झालेली असते. हे चित्र बघताना चित्रकार जेवढा विरघळला नसेल, तेवढा आस्वादक त्यात विरघळून गेलेला असतो, चिंब झालेला असतो. ते चित्र आसक्तीच्या बहरलेल्या दिवसाचा मालकंसच असतो. ते चित्रकाराचं रितं होणंच असतं, मुक्त होणं असतं. देहातून वाहणाऱ्या मंदमंद वाऱ्याचं ते धुंद करणारं गाणं असतं! मनस्वी. देहाला जागवणारं. दोघांच्याही.  तरतमभाव एकट्याचा पेटता ठेवून चालत नाही. आतल्या आत दोघांनाही फेर धरावा लागतो. त्याचं प्रतीक चित्र म्हणजे झणझणाट.

प्रत्येकाच्या पडणाऱ्या पावलातून काय उगवतं? कसं उगवतं? हे आपल्या पावलांना तरी कुठं उमगत असतं? चाचपडणं असतं. असतं पळणंही. जगण्याची लय असते त्यात; आणि वेदनाही. ताण असतो. भूक असते पायात. त्या पायाचं मनोबल रेखाटणारी रेषा प्रत्येकाला आपलाच भावबंध वाटते आणि ते स्वाभाविकही असतं. आपला मनपरिसर सतत बदलत ठेवण्याची किमया हा चित्रकार सातत्याने करतो आहे. निष्ठापूर्वक. बेरीज वजाबाकी विसरून.

प्रश्न घेऊनच जी कला अस्तित्वात येते तिचे सामाजिकदृष्ट्या मोल अधिक असते. त्यात अधिक जिव्हाळा असेल तर ती कलाकृती अधिक लक्षात राहते. समग्रतेच्या पायावर टिकते. उपभोगवृत्तीचा शिडकावा त्यात अजिबात नसतो असं मी अजिबात म्हणणार नाही. तो सूचकपणे आलेला असतो, तो लक्षीतार्थी अंगाने आलेला असतो. रेषांची उपलब्धी चित्रकार त्याच्या त्याच्या स्वायत्ततेच्या अधिकारात निवडत असतो. कारण तो त्याचा शैलीकार असतो. चित्र संयोजकाच्या भूमिकेत असताना त्याची जी टेहळणी चालू असते, त्याचे निष्कर्ष चित्रातून उमटत असतात. त्यातला खरेपणा हेच त्याचं मूल्य असतं. ती फक्त कलाकाराची चित्रवही नसते तर तो त्याचा जीवनकोष असतो. त्यात जपलेला वस्तूनाम  प्रतिमांच्या आधाराने नव्हे, तर व्यवच्छेदक गुणाच्या आधारे समजून घेतला तर त्यातली सांकेतिक भाषा समजायला लागते. रेषांचं प्राचीन, अर्वाचिन स्वरूप नकळत आपल्या समोर येतं. अंतर्गत चित्रवाणी समजून घेता आली तर ते आपल्यासाठी निकटदृष्यच असतं.

श्रीधरचं मन एक शीतगृह आहे. त्यातून बाहेर पडणारी रेषा आचारसंहितेचा भंग होऊ देत नाही. कारण ती बोधनीय असते. झाडावरच्या पानांच्या मांडणीचा विचार करताना ते एकरंगी चित्रण असलं तरी सूर्याच्या तेजोमय किरणांचं प्रतिबिंब त्यात उतरलेलं बघावयास मिळतं. आशयाचा, विषयाचा परिणाम साधण्यासाठी त्याने केलेल्या तंतूमय रेषांच्या उपयोगाची प्रत आणि पत ध्यानी येत जाते. कच्ची प्रत, पक्की प्रत हा प्रकार त्यांच्याकडे नसल्याचा तो पुरावा आहे. चित्रचौकटीची आखणी निर्मितीच्या आधी चित्रकाराने मनात केलेली असते असं म्हटलं जातं. परंतु मुक्त आणि संतुलितपणा ग्राह्य धरला तर मनातलं दृऋ कायम करण्यासाठी अनेक कलावंत पेन्सिलचा वापर करीत असतात. तसा वापर हा चित्रकार करीत नाही. हे मी स्वानुभवातून सांगतो. आस्वादकांना मंत्रमुग्ध करण्याची शैली त्यांच्याकडे असल्याने हे घडत असावं.

श्रीधर अंभोरेच्या अनेकानेक चित्रातून अंतर्ग्रर्थित चित्रओळीतील एक प्रकारचं जीवनकाव्य अनुभवता येतं. तो एक प्रकारचा अप्रकट भागच असतो. त्यात प्रकट प्रतिमांचा शोध घेण्याची रसिकांना संधी असते. प्रागतिक आणि सढळ रेषांमधल्या अंतराचा अंदाजही येतो. त्याच्या रेषांची बोलीभाषा मूकनायकाची आहे हे स्पष्ट होतं. मग ते जीवसृष्टीच्या वास्तवापासून ते आकाशातल्या बहुतेक घटकांच्या विचारापर्यंत. अप्रगत, प्रगत या दोन्ही बाजू त्याच्या रेखाटनातून दिसतात (विशेषत: प्राण्यांची चित्रं). त्यांनी चितारलेल्या गोष्टीचं मूळ त्याच्या भ्रमणगतीतच सापडतं. त्याशिवाय संस्कृतीच्या उदयासंबंधीचा व्यक्त झालेला रेषाभाव आपणास कसा कळायचा?

दैनंदिन व्यवहाराच्या दरिद्री, असहाय्य, असफल आणि कंगालाच्या विश्वातलं जगणं, मरणं याकडे कलावंताचा तिसरा डोळा रोखून सजगतेने बघत असतो. एक प्रकारचं वेगळं समाजजीवन समजावून देण्याचं काम कलावंत करीत असतो. मी त्याला कलावंताने घेतलेली कर्तव्यसंधीच म्हणतो. आणि ती महत्त्वाची समजली पाहिजे असं श्रीधरच्या चित्रांचा अभ्यास केल्यानंतर वाटतं. हा चित्र अनुभवण्याचा भाग आहे आणि असतोही. दुबळ्या विफलतेला वाट काढून देण्याचा तो भाग नसतो. तर तो एक रेषा विचार असतो. ‘तो धीराने समजून घ्यावा’ या श्रेणीतला असल्याने ढोबळपणाने नव्हे, तर हळूवारपणे आपल्याला करावा लागतो.

महावीर जोंधळे, ज्येष्ठ लेखक आणि संपादक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0