गुजरातमध्ये  ६८ विद्यार्थींनींना नग्न केले

गुजरातमध्ये ६८ विद्यार्थींनींना नग्न केले

नवी दिल्ली : गुजरातेतील भूज येथील सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूटमधील मुलींच्या हॉस्टेलनजीक बगीच्यात सॅनिटरी नॅपकीन सापडल्यानंतर या संस्थेतील ६८ मुलींना मासिक पाळी आली आहे का हे तपासण्यासाठी संस्थेतल्या शिक्षकांनीच मुलींना नग्न करून तपासणी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गेल्या सोमवारी घडली. हा प्रकार आमचा मानसिक छळ असल्याची तक्रार एका मुलीने केली पण ही घटना घ़डून तीन दिवस उलटल्यानंतरही पोलिसांमध्ये तक्रार केली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. नंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कच्छ विद्यापीठाने या प्रकरणी पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे.

या समितीचे अध्यक्ष म्हणून प्रभारी कुलगुरू दर्शना ढोलकिया यांची नियुक्ती केली असून या घटनेची माहिती घेण्यासाठी सर्व विद्यार्थींनीशी संवाद साधून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी गुरुवारी दोन सदस्यांसह काही विद्यार्थींनीशी संवादही साधला.

हॉस्टेलचे नियम

या संस्थेतील विद्यार्थींनीनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी हॉस्टेलच्या वॉर्डनना बगीच्यात वापरलेले सॅनिटिरी नॅपकीन सापडले. याची माहिती वॉर्डननी संस्थेच्या प्राचार्या रिटा रंगीया यांना दिली. त्यानंतर रिटा रंगीया यांनी हॉस्टेलमधील ६८ मुलींना एकत्रितपणे आवारात बोलवले व त्यांच्यापुढे स्वामीनारायण मंदिर व्यवस्थापनाच्या नियमावलीसंदर्भात भाषण दिले. या भाषणानंतर दोन मुलींनी आपली चूक कबूल केली पण या मुलींच्या कबुलीनंतरही प्राचार्यांसह काही शिक्षकांचे समाधान झाले नाही. त्यांनी प्रत्येक विद्यार्थींनीला वॉशरुममध्ये जाऊन कपडे काढण्यास सांगितले.

या संस्थेच्या नियमांनुसार मासिक पाळी आलेल्या विद्यार्थींनीना मंदिर व स्वयंपाकघरात जाण्यास बंदी आहे. त्या विद्यार्थींनीना स्वत:च्या रुममध्येही बसण्यास मनाई आहे. मासिक पाळीच्या दिवसांत या मुलींनी वर्गात शेवटच्या बाकांवर बसणे बंधनकारक असून त्यांनी अन्य मुलींना स्पर्श करणे वा अन्य मुलींमध्ये मिसळण्यासही मनाई आहे.  या मुलींची राहण्याची सोय हॉस्टेलच्या तळघरात करण्यात येते.

जेव्हा या प्रकरणाबाबत काही मुलींनी कॉलेजचे ट्रस्टी प्रवीण पिंडोरिया यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी हा विषय विसरून जा असे सांगितले.

आपल्या संस्थेच्या नियमावलीच्या संदर्भात पिंडोरिया यांनी, या हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतानाच आम्ही मुलींच्या पालकांसमोर आमचे नियम ठेवतो. काही शिक्षक नियमांचे कठोर पालन करत असतील पण यासंदर्भात प्रशासकीय समितीची बैठक घेतली गेली असून या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.

मूळ बातमी

COMMENTS