अडानी मानहानीः परंजॉय गुहा ठाकुरतांविरोधात अटक वॉरंट

अडानी मानहानीः परंजॉय गुहा ठाकुरतांविरोधात अटक वॉरंट

अहमदाबादः देशातले बडे उद्योगपती अडानी यांची मानहानी केल्याप्रकरणात मंगळवारी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा येथील स्थानिक न्यायालयाने ज्येष्ठ पत्रकार परंजॉय गुहा ठाकुरता यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

२०१७मध्ये इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली (ईपीडब्लू) या नियतकालिकामध्ये ठाकुरता यांनी अडानी यांच्याविरोधात लेख लिहिले होते. या लेखात त्यांनी मोदी सरकारने ५०० कोटी रु.ची ‘बक्षिसी’ अडानी समुहाला दिल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या वृत्तावरून अडानी समुहाने ठाकुरता यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.

डिड द अडानी ग्रुप इव्हेड रूपीज 1000 करोड़ टैक्सेस’ व ‘मोदी गवर्नमेंट्स रूपीज़ 500 करोड़ बोनांजा टू अडानी ग्रुप’ असे दोन लेख प्रसिद्ध करण्यात आले होते. हे दोन्ही लेख मागे घ्यावेत व विनाशर्त माफी मागावी अशी मागणी अडानी समूहाच्या वकिलांनी केली होती. अन्यथा ईपीडब्लूचे संपादक ठाकुरता व कंपनीचे मालक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, अशी धमकी दिली होती. ईपीडब्लूमधील दोन्ही लेख अडानी यांची मानहानी करणारे व त्यांची प्रतिष्ठा कलंकित करणारे असल्याचा दावाही करण्यात आला होता. हे दोन लेख प्रसिद्ध झाल्यानंतर ईपीडब्लूच्या ट्रस्ट सदस्यांची बैठक होऊन त्यात हे दोन्ही लेख मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ठाकुरता यांनी आपला संपादकपदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान ठाकुरता यांच्याशी संपर्क केला असताना त्यांनी आपल्याला असे कोणतीही वॉरंट मिळाले नसल्याचे सांगितले. अडानी समूहाने ईपीडब्लूचे संपादक व संस्थेच्या विरोधातील तक्रार मागे घेतली होती पण आता त्यांची तक्रार फक्त पत्रकाराविरोधात आहे, असे ते म्हणाले. या लेखाच्या अन्य एका सहलेखकावरची तक्रार मागे घेण्यात आली आहे. पण ठाकुरता यांच्याविरोधात तक्रार मागे घेण्यास अडानी समूह तयार नसल्याचे ठाकुरता यांच्या वकिलांनी सांगितले.

अडानी समूहाच्या विरोधात ईपीडब्लूमध्ये आलेले लेख द वायरने त्याचवेळी पुनर्प्रकाशित केले होते. त्या लेखाची लिंक पुढील प्रमाणे – Did the Adani Group Evade Rs 1,000 Crore in Taxes?
मोदी सरकार ने अडानी समूह को 500 करोड़ का फ़ायदा पहुंचाया

मूळ बातमी

COMMENTS