है कली कली के लबपर…….

है कली कली के लबपर…….

खय्याम यांनी चित्रपटाचे बॅनर, कलाकार बघून कधीच संगीत दिले नाही. त्यामुळे त्यांचे संगीत नेहमीच उच्च दर्जाचे राहिले. चित्रपट भलेही यशस्वी नसेल पण त्यांचे संगीत नेहमीच उजवे राहिले.

बॉलिवुडमधील उदयोन्मुख तारा – नरेंद्र मोदी
चित्रीकरण परवानगीः एक खिडकी योजना राज्यात लागू
प्रकाशमय सणात रुपेरी पडदा अंधारातच

१९ ऑगस्ट २०१९, एका सांगीतिक युगाचा अंत. मोहंमद जहुर “खय्याम’ हाश्मी इतके मोठे नाव धारण करणाऱ्या खय्याम या संगीतकाराच्या जाण्याने चित्रपट संगीतातील हळुवारपण निश्चितच पोरके झाले. फिल्मी संगीतातील भाऊगर्दीत खय्यामच्या अभिजात संगीताचे वेगळेपण नेहमीच दृष्टीस पडत होते. कानाला सुखावत होते. सुरवातीला खय्याम यांच्यावर सांगीतिक संस्कार पंडित हुस्नलाल भगतराम व पंडित अमरनाथ यांनी केले. हे तिघेही ताकदीचे संगीतकार. नंतर चिस्तीबाबा यांच्याकडेही त्यांनी संगीताचे धडे घेतले. तिथेच त्यांची भेट बी. आर. चोप्रांशी झाली. त्यांना संगीतातून मिळालेली पहिली कमाई बी. आर. चोप्रांकडून मिळाली. शर्माजी-वर्माजी या नावाने त्यांनी काही चित्रपटांना संगीत सुद्धा दिले. “बीवी’ चित्रपटात त्यांच्या संगीत निदर्शनात मोहंमद रफी यांनी गायलेल्या “अकेलेमे वो घबराते तो होंगे’, या गीताने त्यांची फिल्मोद्योगात पहिली ओळख झाली. जद्दन बाई (अभिनेत्री नर्गिसची आई) व इस्मत चुगताई यांनीसुद्धा सुरवातीच्या काळात त्यांना संधी दिली. हा काळ त्यांच्यासाठी धकाधकीचा होता.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यांनी संगीतात कधीच तडजोड केली नाही. सदैव सर्वश्रेष्ठ संगीत देण्याची पराकाष्ठा केली आणि सर्वोत्तम संगीत दिले सुद्धा. खय्याम नावारूपास आले ते ‘फुटपाथ’ व ‘फिर सुबह होगी’, या चित्रपटातील संगीताने. ‘शामे गमकी कसम’, ‘चीनो अरब हमारा’, ‘वो सुबह कभी तो आयेगी’सारखी गीते खूप लोकप्रिय झाली.

आशा भोसले यांच्या आवाजावर त्यांचे विशेष प्रेम. रफी, तलत मेहमूद, मुकेश यांच्या आवाजाचा योग्य वापर त्यांनी केला. ‘फिर सुबह होगी’मध्ये राज कपूर नायक होते. त्या काळचे मोठे नाव. संगीताचे चांगले जाणकार असल्याने त्यांच्या परवानगीशिवाय संगीतकाराची निवड होत नसे. राज, शंकर जयकिशन, मुकेश, शैलेंद्र व हसरत हे समीकरण त्यावेळी प्रचलित होते. खय्याम हे नाव ऐकल्यावर त्यांनी गीतांच्या चाली ऐकण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यानुसार राज कपूर यांनी त्या ऐकल्या. पण कुठलीच प्रतिक्रिया न देता ते निघून गेले. खय्याम यांना मनोमन खात्री झाली की हा चित्रपट त्यांच्या हातून गेला.

पण प्रत्यक्षात राजला सगळ्या चाली खूप आवडल्या होत्या. वेगळ्या प्रकारच्या त्या चाली खूप लोकप्रिय झाल्या. ‘चीनो अरब हमारा’मधील विरोधाभास, ‘वो सुबह’मधील दुर्दम्य आशावाद खय्यामने मुकेशच्या गळ्यातून अचूक उमटविला आणि पडद्यावर समर्थपणे साकारला राज कपूरने. इथेच खय्यामच्या संगीताने कात टाकली. एक नवीन खय्याम श्रोत्यांच्या दृष्टिपथात आला.

दिलीपकुमार, मीनाकुमारी अभिनित ‘फूटपाथ’ चित्रपटातील ‘शामे गम की कसम’ सर्वतोमुखी झाले. आजही तलतने गायलेल्या गीतांमध्ये हे गीत अविस्मरणीय आहे. ‘लाला रुख’ चित्रपटातील “है कली कली के लबपर” हे दृतलयीचे गीत कोण बरे विसरू शकेल! रफीने हे गीत अजरामर केले.

खय्याम यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाची कथा, त्याकाळची सामाजिक परिस्थिती, नायक-नायिका, चित्रपटातील प्रसंग इत्यादी बाबींचा सखोल विचार करून ते चाली बांधत असत.

खय्यामची जमेची बाजू म्हणजे त्यांची जीवनसाथी जगजित कौर. जगजितने खय्यामला चांगल्या वाईट दिवसात समर्थपणे साथ दिली. जगजित स्वतः एक चांगली गायिका असूनसुद्धा तिने फार कमी गाणी गायली. ‘शगुन’ चित्रपटासाठी गायलेले “तुम अपना रंजो गम’ अविस्मरणीय. तिचे खय्यामच्या संगीतातील व यशात योगदान किती मोठे होते हे स्वतः खय्यामने प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये नमूद केले आहे.

खय्यामने चित्रपटाचे बॅनर, कलाकार बघून कधीच संगीत दिले नाही. त्यामुळे त्यांचे संगीत नेहमीच उच्च दर्जाचे राहिले. चित्रपट भलेही यशस्वी नसेल पण त्यांचे संगीत नेहमीच उजवे राहिले. ‘चम्बल की कसम’, ‘शंकर हुसैन’, ‘नूरी’, ‘शोला और शबनम’, ‘आखरी खत’ इत्यादी चित्रपट जरी तिकीटबारीवर फारसे यशस्वी नसले तरी खय्यामचे संगीत अपेक्षेप्रमाणे उत्तमच होते.

‘सिमटी हुई घडिया’, ‘आप युं फासलोसे गुजरते रहे’, ‘कही एक मासूम नाजुकसी लडकी’, ‘बहारो मेरा जीवन भी संवारो’, ‘जाने क्या ढुंडती रहती है आंखे मुझमे’, ‘लडी रे लडी’, ‘जीत ही लेंगे बाजी हम तुम’, अशी कितीतरी सुंदर गीते खय्यामने रसिकांना दिली. ‘आखरी खत’ चित्रपटात संवाद फार कमी होते, त्यामुळे पार्श्वसंगीत फार महत्त्वाचे होते. चेतन आनंद यांनी खय्यामशी याबाबत चर्चा केली. खय्यामने चित्रपटाचे पार्श्वसंगीत इतके अप्रतिम दिले की चित्रपटाची गती कुठेही कमी पडू दिली नाही.

‘आखरी खत’नंतर खय्यामने राजेश खन्नाच्या दोन चित्रपटासाठी संगीत दिले. ‘दर्द’ व थोडीसी बेवफाई’. ‘न जाने क्या हुवा’, ‘हजार राहें मुडके देखी’, ‘प्यारका दर्द है’ ….

‘बाजार’ चित्रपटाची गीते फारच अप्रतिम होती. ‘दिखाई दिये यूं के बेखुद किया’, ‘फिर छिडी बात पात फूलोकी’, ‘देखलो आज हमको जी भरके’ इत्यादी गीतांनी चित्रपट लोकप्रिय होण्यास मदत झाली. अर्थात नसीरुद्दीन शाह, फारूख शेख, सुप्रिया पाठक, स्मिता पाटील यांच्या अभिनयाचे योगदानसुद्धा विसरता येणार नाही. ‘फूटपाथ’ व ‘फिर सुबह होगी’चे यश वृद्धींगत होत होते. पण खय्यामच्या संगीत सफरीतले मैलाचे दगड बाकी होते.

यश चोप्रांनी ‘कभी-कभी’च्या माध्यमातून दोन पिढीच्या संघर्षाची व नाट्यमय प्रवासाची कथा मांडली. मोठे बॅनर, जबरदस्त कलाकार प्रथमच खय्यामला मिळाले. या संधीचे त्यांनी खऱ्या अर्थाने सोने केले. साहिर आणि खय्याम दोघेही आपल्या जीवनातील परमोच्च शिखरावर पोहचले. ‘कभी कभी मेरे दिलमे’, ‘मैं पल दो पलका शायर हूं’, ‘मेरे घर आयी एक नन्ही परी’, ‘तेरे चेहरेसे नजर नही हटती’, इत्यादी गीते तुफान लोकप्रिय झालीत. ‘कभी-कभी’ला संगीताचा ‘फिल्मफेअर’ (१९७७) पुरस्कार मिळाला.

‘उमराव जान’ ही खय्यामची सर्वोत्तम संगीत कलाकृती. खय्याम ‘उमराव जान’बद्दल नेहमीच भरभरून बोलले. ‘रझिया सुलतान’नंतर ही खय्यामची दुसरी Period Film किंवा Costume Drama. ‘रझिया सुलतान’मधील “ए दिले नादान’ हे लतादीदींनी गायलेले गीत अजरामर झाले. ‘उमराव जान’चे संगीत खूप अभ्यासपूर्ण होते. ‘उमराव जान’बद्दलची सर्व प्रकारची उपलब्ध असलेली माहिती खय्याम यांनी अभ्यासली. तिची गायकी समजून घेण्याचा प्रयत्न केला. सर्व गाणी आशा भोसलेकडून गाऊन घेतली. आशाने हे आव्हान समर्थपणे पेलले. पडद्यावर रेखाच्या अभिनयाने, आशाच्या स्वरांनी आणि खय्यामने दिलेल्या संगीताने ‘उमराव जान’ जिवंत केली. निर्विवादपणे ‘उमराव जान’ ही खय्यामची सर्वोत्तम कलाकृती ठरली. खय्याम यांनी १९८२चा राष्ट्रीय पुरस्कार व फिल्मफेअरसुद्धा पटकाविले. त्यांच्या सुरेल संगीत कारकिर्दीचा हा सर्वोच्च सन्मान होता. आशा भोसले व लता मंगेशकर या दोघीही त्यांच्या आवडत्या गायिका. आपल्या संगीत सफरीत त्यांनी मजरूह सुलतानपूरी, साहीर लुधियान्वी, जां निसार अख्तर, कैफी आझमीसारख्या गीतकारांसोबत काम केले व रसिकांची मने रिझविली.

खय्यामची कधीच कोणाशी स्पर्धा नव्हती. उच्चदर्जाच्या अभिरूचीमुळे व सादरीकरणामुळे खय्यामने फिल्मीसंगीतात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले व शेवटपर्यंत टिकवून ठेवले. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (२००७) आणि बहुमूल्य ‘पद्मभूषण’ (२०११) मध्ये दिले गेले.

खय्यामसारखे समर्पित कलाकार फिरून होणे शक्य नाही. त्यांच्या संगीत कारकिर्दीला सलाम. त्यांची आठवण करून देणारी त्यांनीच संगीतबद्ध केलेली शेकडो गीते हाच आपला ठेवा. खय्याम यांना भावपूर्ण आदरांजली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0