गली बॉयचे संगीत स्ट्रीट रॅपिंगचे श्रेय हिरावून घेत नाही!

गली बॉयचे संगीत स्ट्रीट रॅपिंगचे श्रेय हिरावून घेत नाही!

चित्रपटनिर्मिती मध्ये राजकीय आणि नैतिक मुद्द्यांना बगल दिली असली तरी, झोया अख्तरच्या गली बॉयचा ‘ज्यूकबॉक्स’ अलीकडच्या बॉलीवूडच्या कलाकृतींमध्ये श्रेष्ठ ठरतो .

बॉलिवुडमधील उदयोन्मुख तारा – नरेंद्र मोदी
बॉलीवूडमध्ये दिसणारे छोट्या शहरातील नायक नेहमी उच्च-वर्णीयच का असतात?
भारतीय चित्रपट विश्वाचे वासे फिरले

अलीकडे बॉलीवुड थेट कॉपी न करता “यावर आधारित” म्हणून श्रेय द्यायला लागले आहे. ८०-९०च्या दशकात बप्पी लाहिरी सारख्या संगीत दिग्दर्शकांना संगीतचोरीसाठी तासले होते. २१वे शतक सुरु झाल्यानंतर, गाजलेल्या समकालीन संगीताचा योग्य सूर पकडल्याबद्दल, म्हणजे अगदी डान्सहॉल पासून डबस्टेप पर्यंत, सगळं काही वापरल्याबद्दल विशाल शेखर सारख्या संगीतकारांचे कौतुकच होत आलेले आहे.

गली बॉय काहीसा मुंबईचे रॅपर डिव्हाईन आणि नाईझी यांच्या जीवनावर आधारित आहे. योग्य साथीदारांसोबत केलेली वाटचाल हे या चित्रपटाचे सामर्थ्य आहे. चित्रपटाचे संगीत वितरक मात्र त्या वाटचालीतला अपवाद म्हणता येईल. एक्सेल एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेने आपले वितरणाचे अधिकार झी सारख्या गठ्ठ्याने काम करणाऱ्या संस्थेला विकले– यातली विसंगती बोलून दाखवायचीही गरज नाही.

यातल्या गाण्यांना संगीत दिग्दर्शक नाही, संगीत निर्देशक आहे- पॉप रॉक गायक – गीतकार आणि प्रासंगिक चित्रपट संगीतकार असलेला अंकुर तिवारी. तो रॅपर नसला तरी स्वतंत्र संगीताच्या क्षेत्रामध्ये चांगला मुरलेला आहे. चित्रपट निर्माते आणि तिवारी यांच्या दृष्टीने, हिप-हॉप स्टार व्हायची स्वप्ने बघणाऱ्या मुरादची मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या रणवीर सिंगला यमकं जुळणारी गाणी म्हणायला लावणे सोपे होते. पण त्यांनी तसे केले नाही याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत.

१५ पैकी पाचच गाणी रणवीर सिंगच्या वाट्याला आलेली आहेत. ती जबाबदारी त्याने उत्तम निभावली  आहे.  ज्या एका ट्रॅकने अनेक स्थानिक भारतीय कलाकारांना लिहायला आणि भारंभार यमके जुळवायला प्रेरित केले त्या एमिनेमच्या ‘एट माईल’ मधील “लूज युवरसेल्फ”चे भारतीय रूप म्हणजे संसर्गासारखे पसरलेले ‘अपना टाइम आयेगा’ हे गाणे ! यामध्ये रणवीर चांगला चमकला आहे.

तितक्याच ताकदीने त्याने कोवळ्या प्रेमाच्या विचारात गर्क असताना ‘कब से कब तक’ या गाण्यात जिभेला व्यायाम घडवणारे वेगवान शब्द (टंग ट्विस्टर) म्हणले आहेत.  ‘असली हिप-हॉप’ मधून मुरादचे हिपहॉप या प्रकाराविषयीचे इमान रणवीरने अत्यंत प्रामाणिकपणे दाखवले आहे. ‘दूरी’ मध्ये आर्थिक असमानतेवर भाष्य करतानाही त्याचा प्रामाणिक प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे.

२०१५चे बंडखोर गाणे ‘मेरी गलीमें’ मुळे, डिव्हाईन आणि नाईझीला एका रात्रीत स्टार बनवले आणि झोया अख्तरला हा चित्रपट बनवायला भाग पाडले. या गाण्यामध्ये रणवीरला नाईझीचा भाग म्हणायला लावणे फारसे जमलेले नाही. या गाण्याच्या नव्या अवतारात मूळ गाण्याइतका दम उरला नाहीय. डिव्हाईनच्या गीतामध्ये मूळ गाण्यातील स्फूर्ती देखील कमी झालेली जाणवते.  चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना नाइझी गायबच होता आणि मूळ म्युझिक ट्रॅकमधेही तो गैरहजर असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. (म्युझिक ट्रॅकच्या प्रदर्शनावेळी फक्त तो परत आला.)

दुसऱ्या बाजूला डिव्हाईन दोन म्युझिक ट्रॅक्स मध्ये दिसला. ते दोन्ही म्युझिक ट्रॅकस निर्विवादपणे त्याच्या आयुष्याच्या चौकटीत बसतात. ‘चेक युवरसेल्फ बिफोर यु व्रेक युवरसेल्फ’ ट्यून्सच्या तोफखान्यात भर घालून ‘शेर आया शेर’ तयार झालेले आहे. अनुभवी डी.जे. मेजर सीच्या सौजन्याने त्याला एक वेगळाच नाचण्या जोगा ठेका मिळाला आहे.

२०१६ च्या सुरवातीला, जे.एन.यू.च्या विद्यार्थी चळवळीची मोठी लाट असताना डब शर्मा या इलेक्ट्रॉनिक संगीत निर्मात्याने ध्वनिमुद्रित केलेल्या ‘आझादी’चेही त्याने रॅप केले आहे. मनुवाद, ब्राह्मणवाद, संघवाद आणि पुरुषसत्ता यांच्या दडपशाही बद्दलची वक्तव्ये टाळून, हा नवा अवतार ‘साफसुथरा’ केला आहे. तरीही त्यातले मर्म बऱ्यापैकी टिकले आहे ज्याचे श्रेय  डिव्हाईनने ज्या पद्धतीने राजकारण्यांचा लालचीपणा आपल्या शब्दातून दाखवून दिला आहे त्याला जाते!  “देश कैसा होगा साफ/ इनकी नीयतमें है डाग” या ओळीतून चालू सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा हलकासा संदर्भ येतो.

‘अपना टाइम आयेगा’चा ताल, डब शर्माकडून आलेला आहे आणि ‘जिंगोस्तान’ या अल्बममधील सर्वोत्तम गाण्यामध्ये देखील त्याचा वाटा आहे. घृणास्पद म्हणून वागवल्या गेलेल्यांचा आवाज बनून शर्मा लिहितो, ”पकडो, मारो, काटो, चीर दो / साफ सुथरे चामडीयोंपे / गेहरे गेहरे निल दो / धीरे धीरे सारे गदर खुदही मान जायेंगे”. आपल्या लोकशाहीमध्ये विरोध केल्याचे किती भयानक परिणाम होऊ शकतात हे तो त्यातून मांडतो.

त्यामानाने ”काम भारी” हे हलक्या मूडचे गाणे आहे. हे कांदिवलीच्या  नामांकित  रॅपरने केलेले आहे. अत्यंत वेगवान यमक असलेले हे गाणे, जॅक अँड जोन्स या कपड्यांच्या मोठ्या ब्रँडने भरवलेली एक स्पर्धा जिंकल्यानंतर या रॅपरची रणवीर सिंग सोबत जी चित्रफीत आली त्यातून अगोदरच भरपूर लोकप्रिय झाले  होते.

अल्बमच्या शेवटी असणारे विवेक राजगोपालनचे “इंडिया ९१” हे देखील लक्षवेधी आहे. या नाविन्यपूर्ण गाण्यामध्ये पाच रॅपर्स (एमसी) – अल्ताफ, १०० आर बी एच, महार्या, तोडफोड आणि नॉक्सिअस यांनी हिंदी, मराठी आणि पंजाबीमधेही रॅप केले आहे. त्याची चाल कर्नाटकी ढंगाची आहे आणि त्यामध्ये कोन्नाकल (दक्षिण भारतीय संगीतातील एक प्रकार) कोरसचा वापर केला आहे.

‘दूरी’ चे कवितेसारखे म्हणलेले गीत, “जिंगोस्तान” चे रिमिक्स, “एकही रास्ता” ही रणवीर सिंगने म्हणलेली जावेद अख्तर यांची कविता हे सोडून, गली बॉयमध्ये १५ गाणी आहेत. निर्मात्यांना सर्व रॅप ट्रॅक असलेला अल्बम प्रदर्शित करण्याची जोखीम कदाचित उचलायची नसल्याने इतरही काही ट्रॅक यामध्ये समाविष्ट केलेले आहेत.

सगळे म्युझिक ट्रॅक्स अगदी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच आहेत. रघु दीक्षित, कर्ष काळे आणि मिडीवल पंडित यांचे ‘ट्रेन सॉंग’ हे लोकसंगीताचे फ्युजन आहे जे छानपैकी चित्रपटात मिसळून जाते. जस्लीन रॉयलचे “जहाँ तू चला” हे अत्यंत मधुर, श्रवणीय लोकगीत आहे.  तिवारी आणि माईक मॅकक्लीअरीचे “जिने में आये मजा” हे गाणे यूकेले वर सादर केल्या जाणाऱ्या जुन्या वॉल्ट्झची आठवण करून देते. काका भानियावालाच्या ‘गोरीये’ वर प्रेम- हरदीपने केलेले गाणे ज्यामध्ये गायक अर्जुन आणि रॅपर ब्लिट्झ आणि देसी मा दिसतात ते पंजाबी क्लबच्या धाटणीचे झालेले आहे.

यामधले साऊंड ट्रॅक खूप नाविन्यपूर्ण नाहीत पण तरीही बॉलीवूडमध्ये अलीकडच्या काळात जे काही निर्माण होत आहे त्यात त्यांचा क्रमांक नक्कीच सर्वात वरचा आहे. खेदाची गोष्ट ही की यामध्ये महिला रॅपरने बनवलेले एकही गाणे नाही. रणवीर सिंगच्या प्रेयसीची भूमिका करणारी आलिया भट रॅपर नसते. पण ट्रेलर वरून असे वाटत होते की  तिच्या उद्धट आणि बंडखोर व्यक्तिमत्त्वामध्ये तिची म्हणून काही हिपहॉप थीम असू शकेल.

“आझादी”ची काटछाट केली गेली हे एक गालबोट होतेच, पण आणखी एक अशीच गोष्ट म्हणजे “मेरी गलीमें” चा निर्माता सेझ ऑन द बिट याचा रॉयल्टी मोबदला दिला गेला नव्हता. त्याने सोशल मेडियावरती आवाज उठवल्यानंतर श्रेय नामावलीमध्ये त्याचे नाव देण्यात आले.

गली बॉयच्या विक्रीतून झालेली कमाई ‘झी’च घशात घालेल हे पचवणे जरा जड आहे.  काही रॅपर्सच्या आयुष्यात या निर्मितीने जे काही चांगले बदल घडवले ही जाणीव त्यावरचा उतारा ठरतो.  रणवीर सिंगने रॅपर्स सोबत, त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी आणि काही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी, काही महिने त्यांच्या संगतीत घालवले. हे ही विशेष होते.

त्यातून रणवीर सिंगला जे मिळाले त्याची तो परतफेडही करत आहे. त्याने ‘काम भारी’ आणि स्पिटफायर (जे  ‘असली हिप हॉप’ चे गीतकार आणि संगीतकार आहेत) यांना गली बॉय मध्ये काम मिळवून दिले आणि आत्ता त्यांना काही व्यावसायिक कामेही मिळू लागली आहेत. भारतीय हिपहॉप हे, अशा चित्रपटातून आल्याने त्याची स्वतःची विक्री कमी होईल असा ओरडा होत असतानाच, या नव्या रॅपर्सना मिळालेल्या संधीचे महत्त्व कमी होत नाही.  गली बॉय आधार उसना घेतो हे खरंय पण जिथे तो देणं लागतो तिथे तो आधार सुद्धा देतो.

(छायाचित्र ओळी – गली बॉय. श्रेय: एक्सेल एंटरटेनमेंट/ टायगर बेबी )

हा मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे

अनुवाद : मृदगंधा दीक्षित

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0