हापूसच्या कलमाला निवडुंगाचे काटे!

हापूसच्या कलमाला निवडुंगाचे काटे!

ज्यांच्याकडे अडवाणींनी या रथाचा सारथी म्हणून पाहिले त्याने रथ मुक्कामाला पोचता पोचता त्यांनाच रथातून ढकलून दिले आणि स्वतःच रथात जाऊन बसला. हिंदुत्वाच्या फुग्यात हवा भरून अडवाणींचे गाल दुखले॰ परंतु त्याला लटकून सारथी दिल्लीत पोहोचला आणि हवेतल्या हवेत त्यानी अडवाणींच्या फुग्याला मात्र टाचणी मारली. गर्व आणि अभिमान या दोन शब्दांत गफलत करण्याची चूक, वागण्यात आणि व्यवहारात सतत करत आलेल्या भाजपने अखेर अडवाणींच्या ‘दोन्हीचे घर खाली’ केले.

लोकशाहीत हस्तक्षेपः काँग्रेसचे झुकरबर्गला पत्र
राज्यसभा निवडणुका : गुजरात काँग्रेस आमदारांची चौकशी शक्य
सत्यपाल सिंह यांचे डार्विनला पुन्हा आव्हान
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

ओरिजिनल पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहिला तेव्हाच डुप्लिकेट पोलादी पुरूषाचाही पुतळा करून टाकायचे निश्चित झाले असावे. एका म्यानात एकच तलवार राहू  शकते, तसं एका पक्षात एकच पोलादी पुरूष राहू शकतो. त्यामुळे अखेर लालकृष्ण अडवाणींना उपेक्षेच्या रथात बसवून विस्मरणाच्या यात्रेला पाठवून दिले गेले. इतिहासातले पोलाद उत्तम प्रतीचे होते त्यामुळे एवढी वर्षे जाऊनही त्याला गंज चढला नाही. वर्तमानातले पोलाद पोलादीपणाचा आव आणणारे होते त्यामुळे ते टिकू शकले नाही. भारतीय संस्कृतीच्या वगैरे बाता करणाऱ्या  अडवाणींना भीष्माचार्य वगैरेच्या उपाध्या देणाऱ्या पक्षाने, अखेर त्यांना  कटू वास्तवाच्या शरशय्येवर झोपण्यास भाग पाडले आहे. या वास्तवाचे कलम अडवाणींनी स्वतःच लावले होते, त्यामुळे आपण लावलेल्या हापूसच्या कलमाला निवडुंगाचे काटे कसे लगडून आले,  अशी तक्रार आता ते करू शकणार नाहीत.
वाजपेयी आणि अडवाणी ही दोन नावे एके काळी भारतीय जनता पक्षात अमेरिकन डॉलरसारखी चालायची. मोदींनी पक्षाच्या नेतृत्वाचेही डिमॉनिटायझेशन करून टाकले आणि जुने नेते बदलून नवे नेते आणले. बाद झालेल्या नोटा किमान बँकेत जाऊन तरी बदलता आल्या, बाद केलेल्या नेत्यांना मात्र त्यांनी ‘बादमे देखेंगे’ या कॅटेगरीत ढकलून दिले. वाजपेयींचे नशीब बलवत्तर म्हणून मोदींच्या काळात ते कार्यरत नव्हते. ते जर कार्यरत असते तर त्यांची स्थिती अडवणींपेक्षा वेगळी झाली नसती. अडवाणी हात जोडून उभे आहेत आणि मोदी त्यांच्याकडे न बघता तसेच पुढे निघून जात आहेत, हे जे दृष्य आपण गेले सहा-सात दिवस सतत टीव्हीवर पाहतो आहोत, त्या दृष्यात कदाचित आपल्याला वाजपेयी आणि अडवाणी दोघेही उभे असलेले पहायला मिळाले असते. एखाद्याला ‘ज्येष्ठ म्हणून निकालात काढायचे की म्हातारा म्हणून निरोपयोगी ठरवायचे’ यापैकी कोणताही पर्याय

व्यंगचित्रकार सुरेन्द्र आणि 'द हिंदू'च्या सौजन्याने साभार.

व्यंगचित्रकार सुरेन्द्र आणि ‘द हिंदू’च्या सौजन्याने साभार.

स्वीकारला तरी त्याचे पर्यवसान सारखेच होते. पण कदाचित अशी वेळ येण्याआधीच वाजपेयी आपल्या कवीच्या मूळ भूमिकेत शिरले असते आणि जगण्यातले काव्य अनुभवत राहिले असते, कारण आधीही वेळोवेळी त्यांनी आपण ‘अडवाणी नाही आहोत’ हे दाखवून दिले होतेच.
एकेकाळी भारतीय राजकारणात ‘मुखवटा आणि चेहरा’ ही फ्रेज फारच लोकप्रिय होती. त्यातला मुखवटा होते वाजपेयी आणि चेहरा होते आडवाणी. वाजपेयी मवाळ बोलायचे, समजूतीची भाषा करायचे तो मुखवटा. आडवाणी जहाल बोलायचे, आक्रमकतेची भाषा बोलायचे तो खरा चेहरा. आजच्या भाजपची हिंदुत्वाची भाषा ऐकली आणि तोंडाळ नेत्यांची वक्तव्ये पाहिली तर, अडवाणींचा चेहरा म्हणजे सुद्धा मुखवटाच वाटेल, सोंग वाटेल. त्या सोंगाने आक्रमकतेचा आणलेला आव, मोदींनी त्यांच्या ५६ इंची पट्टीने खरवडून काढला. दरम्यान भारतीय जनता पक्षाला मुखवट्याची गरजही राहिली नव्हती. पक्षाचा जो चेहरा तोवर देशाला, नागरिकांना लोकशाहीविरोधी, देशात रूजलेल्या सामाजिक मूल्यांच्या विरोधी वाटत होता, तोच आता अनेकांना आपलासा वाटू लागला आहे, हे मोदींच्या यशाने आणि शहांच्या पेशाने सांगून टाकले होते. पक्षाला आता मुखवटा आणि चेहरा वेगळा असण्याची गरज राहिली नव्हती. अडवाणींना हे तेंव्हाच कळायला हवे होते. परंतु आपण लावलेल्या कलमाला हापूस लागेल, अशा भ्रमात ते रसाळीची स्वप्ने पाहात राहिले.
अडवाणींना अडगळीत टाकले गेल्यावर आणि आता त्यांचा मतदारसंघही हिसकावून घेतल्यावर ना संघाने कुरबुर केली ना एखाद्या भाजप कार्यकर्त्याने ‘अरेरे’ म्हटले. १९९८ पासून अडवाणी सतत गांधीनगर मधून निवडून येत आले आहेत. आता वयाची नव्वदी ओलांडल्यावरही त्यांना पुन्हा उमेदवारी मिळावी असा हट्ट धरता येत नाही. परंतु तिथे त्यांच्या जागी अमित शहांची वर्णी लागणे हे वर्मी लागणेच आहे. उमेदवार बदलताना, उमेदवारी नाकारताना अडवाणींना ना विचारले गेले, ना सांगितले गेले! ‘वक्त’ या सिनेमासाठी साहिर लुधियानवीने लिहिलेल्या गाण्यातील ‘सोचता हू अपने घर को देखकर, हो न हो ये है मेरा देखा हुवा’ या ओळीत वर्णन केलेली स्थिती आज अडवाणींची झालेली आहे.

विसर्जनाला निघालो मी ! व्यंगचित्रकार मंजुल आणि सोशल मीडिया यांच्या सौजन्याने साभार

विसर्जनाला निघालो मी !
व्यंगचित्रकार मंजुल आणि सोशल मीडिया यांच्या सौजन्याने साभार

२००२ साली वाजपेयी नरेंद्र मोदींना त्यांच्या राजधर्माची आठवण करून देत होते तेव्हा अडवाणी मोदींच्या फुग्यात हिंदुत्वाची हवा भरत होते. अडवाणींच्या रथयात्रेलाही वाजपेयींनी पाठिंबा दिला नव्हता. वाजपेयी आणि अडवाणी यांच्यात मैत्री आहे की मैत्रीपूर्ण स्पर्धा आहे याच्या चर्चा सुरू असतानाच अडवाणींना हिंदुत्वाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे लक्षात आले होते. त्या भविष्याकडे जायचे तर धर्माभिमान, संस्कृती, देशाभिमान, परधर्मव्देष हे चार घोडे रथाला जोडले पाहिजेत हे त्यांना कळले होते. परंतु ज्यांच्याकडे त्यांनी या रथाचा सारथी म्हणून पाहिले त्याने रथ मुक्कामाला पोचता पोचता त्यांनाच रथातून ढकलून दिले आणि स्वतःच रथात जाऊन बसला. हिंदुत्वाच्या फुग्यात हवा भरून अडवाणींचे गाल दुखले परंतु त्याला लटकून मोदी दिल्लीत पोचले आणि हवेतल्या हवेत त्यांनी अडवाणींच्या फुग्याला मात्र टाचणी मारली. गर्व आणि अभिमान या दोन शब्दांत गफलत करण्याची चूक, वागण्यात आणि व्यवहारात सतत करत आलेल्या भाजपने अखेर अडवाणींच्या ‘दोन्हीचे घर खाली’ केले. पंतप्रधापदाची शक्यता संपली, राष्ट्रपतीपदाची संपवली गेली.
विरोधी पक्षात असताना, तरूण नेता म्हणून, सतत देवेंद्र फडणवीस यांना पुढे करणाऱ्या एकनाथ खडसेंना आणि मोदींची पाठराखण करणाऱ्या अडवाणींना आलेला  अनुभव जवळपास एकाच जातीचा आहे. या स्थितीत अडवाणींविषयी सहानुभूती असणारांची संख्याही हाताची बोटे जास्त होतील एवढीच आहे ही खरी शोकांतिका.
वाजपेयी असते आणि कविता करत राहिले असते तर त्यांनी अडवाणींसाठी काय लिहिले असते?

कुछभी नही है शाश्वत
एक यही सत्य है
तेरा जाना, उसका आना
स्थितियोंका अपत्य है

अगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून, लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0