नाटक – जगण्याची समृद्ध अडगळ

नाटक – जगण्याची समृद्ध अडगळ

विचार स्वातंत्र्य असेल तर समृद्ध अडगळ जमा होते. विचार स्वातंत्र्य नसेल तर नुसती कचकडी अडगळ साचते. या दोन्ही अडगळीतली कुठली अडगळ हवी याचं भान मात्र त्या घरातील लोकांना असणं तितकंच महत्त्वाचं! ही घरातील लोकं म्हणजेच समाज! स्वातंत्र्यची आच जितकी कलाकाराला हवी तितकीच आस समाजालाही हवी. यासाठी अर्थातच समाज जिवंत आणि निरोगी हवा.

बजरंग दलाच्या विरोधामुळे इप्टाचा नाट्य महोत्सव रद्द
नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान ताबडतोब द्याः उपमुख्यमंत्री
‘बाईच्या जाती’ची जखम आणि ‘देवबाभळी’ची चिंधी

सर्वप्रथम नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष लेखक प्रेमानंद गज्वी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सुरुवात करण्यापूर्वी अभिषेक मुजुमदार या आपल्या रंगकर्मीवर आणि त्याच्या ‘ईदगाह के जिन्नत’ या नाटकावर जयपूर येथे हिंदुत्ववादी संघटनेकडून झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. विचार करू न पाहणाऱ्या कुठल्याही गटासाठी अशी नाटके म्हणजे अडगळ असतात आणि विचार करू पाहणाऱ्या कुठल्याही गटासाठी अशी नाटके ‘समृद्ध अडगळ’ असतात.
समृद्ध अडगळम्हणजे काय? सर्वसाधारणपणे ‘अडगळ’ हा शब्द नको असलेल्या वस्तूंसाठी वापरतात. ही अडगळ दोन प्रकारची असते. बिनउपयुक्त आणि उपयुक्त अशी. दोन्ही अडगळी माळ्यावर असतात. वर्षानुवर्षे त्या साचत जातात. मग कधीतरी कोणी तरी ते माळे उपसतं. नको असलेली अडगळ भंगारात जाते आणि हवी असलेली अडगळ घरात स्थिरावते. ही स्थिरावणारी आणि उपयुक्त वाटणारी अडगळ म्हणजेच ‘समृद्ध अडगळ’ ! या समृद्ध अडगळीशी आपलं ममत्वाचं नातं जुळतं. ती माळ्यावरून मनात विराजमान होते. लक्षात घ्या इथे ‘समृद्ध’ हा शब्द अडगळीच्या आधी वापरला आहे. ‘समृद्ध’ आणि ‘संपन्न’ हे दोन शब्द जवळचे आहेत. पण ‘संपन्न’ हा शब्द आर्थिक श्रीमंती या अर्थाने वापरतात. तर ‘समृद्ध’ शब्दाच्या अर्थामध्ये सांस्कृतिक विकास गृहीत धरलेला असतो. विकासाची माझी आवडती व्याख्या म्हणजे ‘वि – का – स म्हणजे विवेकाची कास धरलेली समृद्धी!’ अशी आहे. विवेकशील समृद्धी उपयुक्त असते. अशा प्रकारची समृद्धी समाजात रुजते. या समृद्ध अडगळीला आपण घबाड, ऐवज, संचित, परंपरा किंवा ठेवा अशाही नावांनी ओळखतो. अशी समृद्ध अडगळ समजावून घेताना भूतकाळाचे अर्थपूर्ण संदर्भ लागतात. वर्तमानाशी नाळ जुळते आणि जगण्यातले प्रवाह सलग दिसू लागतात. ही अशी समृद्ध अडगळ संगीत, नृत्य, साहित्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला अशा प्रत्येक क्षेत्रात असते. नाटक नावाची कला अशीच जगणं समृद्ध करणारी अडगळ आहे.

सर्वत्र दिसणारा रंगमंच

सर्वत्र दिसणारा रंगमंच

या समृद्ध अडगळीची तीन वैशिष्ट्ये असतात. पहिलं वैशिष्टय म्हणजे, समृद्ध अडगळ असताना त्रास देते आणि नसताना घास अडवते. दुसरा विशेष म्हणजे, समृद्ध अडगळ माणसांना मूल्य प्रदान करते. तिसरे विशेषत्व म्हणजे, समृद्ध अडगळ हा जगण्याचा ‘संदर्भ बिंदू’ असते. या बिंदूमुळे तुलनेचे परिमाण मिळते. उंच आणि सखल, प्रवाही आणि संकुचित, खोल आणि उथळ, सार्वकालिक आणि तात्कालिक यातील फरक कळतो. थोडक्यात ‘समृद्ध अडगळ’ स्वभान, समाजभान आणि सर्जनभान देते. मी आज नाटकात आणि जगण्यातही बोलत असलेला शब्द, उच्चार आणि कृती ही या समृद्ध अडगळीचं देणं असतं. ‘नक्षत्रांचे देणे’ ते हेच! या नक्षत्रांचा वेध घेतच आपण आपल्या सर्जनशील कामांच्या दिशा पक्क्या करू शकतो असा माझा अनुभव. मी नाटकातील अशा समृद्ध अडगळ याबाबत कृतज्ञ आहे.
नाटकातील ‘समृद्ध अडगळ’ ही अशी भक्कम परंपरा असते की जिच्या खांद्यावर आपण उभे असतो. ‘आजचा मी’ हा या ‘कालच्या साऱ्यां’ मुळे आहे ही नम्र जाणीव मनात विलसते. अर्थात या करता आपल्या नाट्यपरंपरा माहित असायला हव्यात. व्याकरण माहीत असलं तर ते तोडता येते. ‘परंपरा’ माहित असल्या तरच नाटकात ‘नवता’ आणता येते. ही नवता आणताना जुन्या आणि चुकीच्या परंपरांना छेद देण्याचं स्वातंत्र्य समाजाने त्या बंडखोर कलाकाराला बहाल केलेलं असतं. काही प्रतिगामी उपटसुंभ या प्रवासात सामोरे येऊन धाक-दहशत दाखवतात. प्रसंगी मारूनही टाकतात. पण आपली मुळे जर या मातीत घट्ट रुतलेली असतील तर बंडखोर कलाकाराला कशाचीही क्षिती नसते आणि तमाही! त्याला मारल्याने बंडखोर अडगळीत जाईल अशी अटकळ, मारणारे बांधतात खरे, पण ती अटकळ फुटकळ ठरते! महात्मा फुले, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मामा वरेरकर, अण्णा भाऊ साठे, विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, दादू इंदुरीकर, निळू फुले, सत्यदेव दुबे, भास्कर चंदावरकर, कमलाकर सारंग, लालन सारंग, सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे अशी विवेकशील परंपरेची लोकं म्हणजे मला मराठी नाट्यविश्वातील समृद्ध अडगळ वाटते. यातील कोणाचंही नाटक काढा, वाचा. आपल्या या आईबापांनी तयार केलेल्या पायवाटा लख्ख दिसतील, गोंधळ दूर होतील आणि हमरस्त्यांचा शोध लागेल.
अशा अडगळीनं होतं काय? ‘तृतीय रत्न’ हे महात्मा जोतिबा फुले यांचं १८५५ सालचं नाटक. जोतिरावांनी ‘गुलामगिरी’ पुस्तकात म्हटल्याप्रमाणे ते ‘भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे दक्षिणा प्राईस कमिटीने नाकारलं’. कमिटीने बासनात गुंडाळून या नाटकाची ‘चोपडी’ नापसंत करून ‘सेन्सॉर’ केलं. ते नाटक प्रकाशित होण्याकरता थेट १९७९ साल उजाडावे लागले. म्हणजे १२४ वर्षं ते माळ्यावर होतं. बहुमताला न जुमानता लिहिलेलं ते नाटक अडगळीत गेले असे राज्यकर्त्यांना वाटलं खरं. पण वस्तुस्थिती काय होती ? तर ते नाटक समृद्ध अडगळीत होतं. ते जरी छापलं गेलं नाही किंवा त्याचा प्रयोग झाला नाही तरी ते बीज या आपल्या समाजात रुजलं होतं. माळ्यावर ते बीज पडूनही त्या नाटकाने इतरांना मूळ घट्ट करायला जमीन दिली. त्यामुळे राजकीय – सामाजिक भान असलेले नाटक लिहिता येतं याची समग्र जाण नंतरच्या पिढ्यांना आली. त्या जाणिवेतूनच अनेक प्रखर राजकीय- सामाजिक नाटके झाली. या नाटकांनी समाजमन ढवळून निघालं. यामुळे मराठी नाटकच नव्हे तर भारतातील विविध भाषांतील नाटकांना जीवनदृष्टी मिळाली. बंगालचे बादल सरकार, उत्पल दत्त आणि शंभू मित्र, दिल्लीचे सफदर हाश्मी, मणिपूरचे कन्हैयालाल, मध्यप्रदेशचे हबीब तन्वीर, कर्नाटकचे बी. व्ही. कारंथ, सुबण्णा आणि प्रसन्ना ही सारी नाटकवाली याच समृद्ध अडगळीची पाईक झालेली आहेत. आता मी जरी इथे राजकीय-सामाजिक नाटकांचा प्रामुख्याने उल्लेख केला तरी मानवी जीवनातील अनेक अंगांवर भाष्य करणारी नाटकही याच समृद्ध अडगळीचा भाग आहेत. तसंच मी जरी इथे या अडगळीत नाटक शोधत असलो तरी मला इतर क्षेत्रातही समृद्ध अडगळ ही समांतरपणे महत्त्वाची जाणवत असते. अशी विविध क्षेत्रातली अडगळ एकमेकांना समृद्ध करत असते. समृद्ध अडगळीचा परिणाम अंतिमतः सामूहिक शहाणपणातच होतो. ‘माझिया जातीचे मज भेटो कोणी – आवडीचे धणी फेडावया’ असे होऊन जाते. इथं ‘माझिया जातीचे’ म्हणजे कोकणस्थ वगैरे नव्हे. तर समविचाराचे आणि सहभावाचे सहोदर असा अर्थ आहे. या सहप्रवासात मग साऱ्या सीमा पुसल्या जातात. देशी-विदेशी सारे एकत्र येतं. म्हणून विंदा करंदीकरांना शेक्सपियर तुकारामाचा शेजारी वाटतो.

मराठी रंगभूमीवरील पहिला रंगमंचीय आविष्कार - सीतास्वयंवरचा प्रयोग १८७०

मराठी रंगभूमीवरील पहिला रंगमंचीय आविष्कार – सीतास्वयंवरचा प्रयोग १८७०

अशी अडगळ समृद्धकशी होते? कुठलीही अडगळ इतक्या सहजासहजी समृद्ध मात्र होत नाही. त्याकरता समृद्ध अडगळीला मोठी किम्मत मोजावी लागते. तिची कठोर परीक्षा होते. ज्या माळ्यावर अशी अडगळ जमा होते ते माळे उपसले, तपासले आणि खुपसले जाऊ लागतात. तिथे कॅमेरे पेरलेले असतात. प्रत्येक गोष्टीचे स्कॅनिंग होते. ‘ज्याच्या हाती सत्ता त्याचा न्याय’ होऊ लागतो. माणसे पाहू लागली, ऐकू लागली, विचार करु लागली आणि प्रश्न करू लागली की कुठल्याही राज्यव्यवस्थेला त्रास होतो. कलेतून शहाणपण म्हणजे ‘Wisdom’ मिळते ते राज्यव्यवस्थेला ‘भितीदायक’ म्हणजे ‘Dangerous’ वाटतं. ‘सेन्सॉरबोर्ड’ नावाचं हत्यार सरकार मग कलाकारांवर उगारतं. गाण्यावर, लिहिल्यावर, बोलल्यावर आणि अभिव्यक्त होण्यावर निर्बंध येतात. लोकांना विचार करता येत नाही या गृहितकावर ‘काही’ लोकं विचार करतात. ते ‘काही लोक’ अनेक लोकांनी काय पहावं आणि पाहू नये ते ठरवतात. या सरकारी सेन्सॉरबोर्डाबरोबर प्रत्येक जाती- धर्माची सेन्सॉरबोर्ड जागृत होतात. भावना हुळहुळया होणं वा कधी भडकणं तर कधी अस्मितांना ठेच लागणं असले प्रकार फोफावतात. त्याला सत्ताधीश खतपाणी घालतात. सामाजिक स्तरावरची सेन्सॉरशिप व्यक्तिगत स्तरावर सुरू होते. लिहित्या लेखकाचे हात आखडू लागतात आणि गाणारे गळे मर्यादित गाऊ लागतात. विचार स्वातंत्र्य असेल तर समृद्ध अडगळ जमा होते. पण विचार स्वातंत्र्य नसेल तर नुसती कचकडी अडगळ साचते. या दोन्ही अडगळीतली कुठली अडगळ हवी याचं भान मात्र त्या घरातील लोकांना असणं तितकंच महत्त्वाचं! ही घरातील लोकं म्हणजेच समाज! स्वातंत्र्यची आच जितकी कलाकाराला हवी तितकीच आस समाजालाही हवी. यासाठी अर्थातच समाज जिवंत आणि निरोगी हवा. निरोगी समाजाची पाचही इंद्रिय शाबूत असावी लागतात. असा निरोगी समाजच नाटक करू शकतो आणि पाहू इच्छितो.
ध्वनी भडीमाराच्या आवर्तात आपण सारे आज गरगरत आहोत. नाटक करताना आपण शांतता गमावली आहे याचा प्रखर प्रत्यय येतो. म्हणून तर तिसऱ्या घंटेसोबत आपण मोबाईल फोन बंद करायची चौथी घंटा वाजवतो. रंगमंचावरचा माइक ओठांजवळ असण्याची गरज त्यातूनच तयार झाली आहे. सारे काही दणदणीत ऐकू आलं पाहिजे ही प्रेक्षकांना रोगट सवय लागली आहे. शिवाय गावागावातून नाटक हद्दपार झालेलं आहे, रंगमंदिरांना अवकळा आलेली आहे, नाटकाचे लेखक क्षीण झालेले आहेत, दिग्दर्शक शक्ती गमावू लागलेत आणि अभिनेते सीरियलच्या नादी लागले आहेत. नाटक ही कला आज तरी समाजाला नको असलेली अडगळ वाटू लागली आहे. पण हा आजार बरा होऊ शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे. हे सावट आहे. आपल्या समृद्ध अडगळीत नीट डोकावून पाहिलं की लक्षात येतं की असे आवर्तन विविध काळात येते आणि जाते. मात्र त्याकरिता सर्वांनी मन लावून प्रयत्न करायला हवेत. आज गंभीरपणे नाटक करणाऱ्या युवा प्रतिभेला आपण जपलं पाहिजे. पोषक वातावरण तयार केले पाहिजे. नव्या व्यापक जीवनदृष्टी लाभलेल्या रंगभाषेचा शोध घेतला पाहिजे.
नाटक कुठल्याही काळात असो वा कोणत्याही देशात! नेहमीच्या अडचणींचे डोंगर सदासर्वकाळ सर्वत्र असतातच. मात्र ते डोंगर खोदणारी एकेकटी माणसेही त्या त्या समाजात असतात, बिहारच्या दशरथ मांझी सारखी! समृद्ध अडगळ नीट पाहताना अशी समाजातील माणसं आणि त्यांची मूल्यवान कामं दिसत राहतात. नाटक करण्या आधी रक्त आटतं पण नाटक केल्याक्षणी दुपटीने ते वाढते असा माझा अनुभव. नाटक ही गंमत आहे, खेळ आहे, वैताग आहे, त्रास आहे, नकोसेपण आहे, हवेसेपण आहे, खाज आहे, कंड आहे, वेड आहे, टाईमपास आहे, फालतूपणा आहे, तडफड आहे… काहीही आहे पण नाटक आहे! जोपर्यंत ‘समृद्ध अडगळ’ आहे तोपर्यंत नाटक आपल्या सर्वांच्या जगण्यात होतं, आहे आणि राहील याची खात्री आहे!
नाटक चिरायू होवो ! Long Live Theatre !

(फेब्रुवारी २०१९ रोजी नागपूर येथील नाट्यसंमेलनात, परिसंवादात केलेल्या भाषणाचा संक्षिप्त भाग)

अतुल पेठे हे सच्चे रंगकर्मी असून, समाज प्रबोधनासाठी सामाजिक आशयाची मांडणी करणारे नाटकाचे वेगवेगळे प्रयोग, ते सातत्याने करत असतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0