त्यानं हीज रॉयल हायनेस या तीन शब्दांचा अलंकार काढून ठेवलाय, मिस्टर हॅरी म्हणून जगायचं त्यानं ठरवलंय. तो स्वतःचा धंदा सुरु करणारेय. ससेस्क रॉयल नावाचा स्वतःचा ब्रँड त्यानं रजिस्टर केलाय.
ब्रीटनचा राजपुत्र हॅरी, राजा होऊ शकणाऱ्या व्यक्तींच्या रांगेतला सहावा माणूस, त्याची पत्नी मेगन, राजवाड्याच्या बाहेर पडलेत. त्यांची आजी, राणी एलिझाबेथनं, राजघराण्याच्या जबाबदारीतून त्यांना मोकळं केलंय. त्याना यापुढं हीज रॉयल हायनेस आणि हर रॉयल हायनेस हे शब्द त्यांच्या नावामागं जोडता येणार नाहीत. तसंच त्यांचा खर्च इथून पुढं राजवाड्यातून होणार नाही.
१९३८ साली आठव्या एडवर्डनं एका घटस्फोटित महिलेशी लग्न करायचा निर्णय घेतल्यावर त्याला राजेपद सोडावं लागलं होतं. त्याच घटनेची एक वेगळी आवृत्ती निघतेय. फक्त यात वाद नाहीये, राजपुत्रानं स्वखुषीनं राजवाड्याच्या बाहेर निघायचं ठरवलंय, त्याला आजी राणीनं मान्यता दिलीय.
हॅरीला आता राजवाड्यातून पैसे मिळणार नाहीत पण त्याचे वडील (प्रिन्स चार्ल्स) आपल्या खाजगी संपत्तीतून त्याला पैसे देऊ शकतात.
लग्न झालं तेव्हां विंडसरमधे मिळालेल्या घराची रंगरंगोटी- दुरुस्ती करण्यावर हॅरीनं २५ लाख पाऊंड खर्च केले होते. हॅरी ते पैसे आता राजवाड्याला परत करणार आहे.
हॅरी आता ब्रीटनमधे, राजवाड्यात, रहाणार नाही. हॅरी सुरवातीला कॅनडात राहील आणि नंतर कदाचित अमेरिकेत स्थलांतरीत होईल. इतर कुठल्याही माणसाप्रमाणं दोघं काही तरी कामधंदा करून जगतील.
हॅरी-मेगन यांच्या खाजगी आयुष्यात ब्रिटीश प्रेस ढवळाढवळ करत असे. हॅरीचं बिघडलेलं मानसीक आरोग्य, हॅरीची व्यसनाधीनता, हॅरीचं पत्नीशी सहमत होऊन सामान्य माणसासारखं वागणं, हॅरीची पत्नी एक सामान्य अमेरिकन असणं, हॅरीची पत्नी स्वतः घटोस्फोटीत असणं, हॅरीच्या पत्नीचे वडील घटस्फोटित आणि व्यसनी असणं, हॅरीची आई आफ्रिकन असणं इत्यादी गोष्टींची चर्चा माध्यमं फार करत. जणू काही राजघराण्याच्या पावित्र्याची फार काळजी माध्यमांना वाटत होती. मेगनची आई आफ्रिकन असण्याचे आडून आडून तिरकस उल्लेख माध्यमं सतत करत असत.
हॅरी-मेगन जाम वैतागले होते.
हॅरीच्या वैतागण्याला आणखी एक गडद छटा होती. हॅरीची आई डायना हिला माध्यमांनी फार पछाडलं होतं. हॅरीचे वडील आणि आई डायना यांच्यात बेबनाव होता. हॅरीच्या वडिलांचं दुसऱ्या एका स्त्रीवर प्रेम होतं. प्राप्त स्थितीत म्हणा किवा इतर कोणत्याही कारणामुळं म्हणा डायनाला लग्नाबाहेरचे मित्र होते. माध्यमं या गोष्टी फार चवीन चघळत असत. या गोष्टीचा खोल परिणाम हॅरीवर झाला होता, त्याचं मानसीक आरोग्य बिघडलं होतं. हॅरीला मनासारखं वागू न देणाऱ्या माध्यमांवर हॅरी नाराज होता.
थोडक्यात असं की हॅरी काय किंवा त्याची आई काय, या लोकाना माध्यमं आणि जनता धडपणानं जगू देत नव्हते, त्यांच्यावर दुर्बिणी आणि सूक्ष्मदर्शक रोखत होते. हे सारं कशामुळं तर हॅरी-डायना राजघराण्यातले होते. तेव्हां या राजघराण्यातल्या झेंगटातून सुटायचं असं हॅरीनं ठरवलं.
राजघराणं हा ब्रिटीश जनतेत स्वतंत्रपणे वादाचा विषय आहे. फार माणसांचा राजाराणी संस्था-व्यवस्था यावर आक्षेप आहे. लोकशाही स्थापन झाल्यावर राजाराणीला भूमिका नाही असं अनेकांचं मत आहे. राणी हा एक फार तर फार अलंकार आहे, राणी-राजा ही माणसं असे सल्ले देतात जे पाळण्याचं बंधन सरकारवर नसतं. तेव्हा एकूणात शोभेची वस्तू असलेल्या चार दोन माणसांसाठी अनेक राजवाडे कां असावेत,किल्ले कां असावेत, हजारो एकरांची हिरवळ कां असावी, त्यांच्यावर जनतेच्या पैशातून अब्जावधी पाउंड खर्च कां करावेत असं फार लोकं विचारत असतात.
अशा मुळात फालतू गोष्टीसाठी आपल्याला कां त्रास असाही विचार हॅरीच्या मनात येत असावा.
मेगनची अमेरिका हा तसा इतिहासाच्या हिशोबात बाल्यावस्थेतला देश. गेल्या दोन तीनशे वर्षात जन्मलेला. थोर प्राचीन परंपरा वगैरे भानगड नाही. कपडे, दागिने, राजवाडे, चर्चेस, किल्ले इत्यादी गोष्टी अमेरिकेत नसतात. तिथं सगळं गेल्या शे दोनशे वर्षातलं असतं. तिथं राजा नाही. तिथले नियम जनता ठरवते. तिथं काळे आहेत, पिवळे आहेत, ब्राऊन आहेत, सर्वांना घटनेनं सारखंच मानलं आहे. तिथं प्रेसिडेंट सोडता कोणालाही सरकारी पैशातून निवासस्थान मिळत नाही, नोकर चाकर मिळत नाहीत. तिथं गाडीवर ड्रायव्हर ठेवणं म्हणजेही चैन असते, माणसं आपापल्या गाड्या चालवतात आणि खाणावळीत जाऊन पिझ्झे आणि बर्गर हाणतात. प्रिविलेज नावाची गोष्ट तिथं नाही. अध्यक्ष असो की न्यायाधीश की व्हाईस चान्सेलर, माध्यमं आणि सामान्य माणसं त्यांची पत्रास बाळगत नाहीत, बिनधास त्यांची धुलाई करतात. तिथं प्रेसिडेंट हा मिस्टर प्रेसिडेंट असतो, महामहीम माननीय अध्यक्ष महोदयजी वगैरे नसतो. अशा वातावरणात मेगन वाढली. ती मॉडेल होती, टीव्ही सिरियलमधे काम करत असे. हॅरीशी लग्न झाल्यावर राजवाडा, पारंपरीक प्रतिष्ठा, त्यावर आधारलेली सामाजिक उतरंड इत्यादी गोष्टी पाहिल्यावर मेगनला परग्रहावर गेल्यासारखंच वाटलं असणार. हज्जारो एकरावरच्या हिरवळीवर दोन माणसं हिंडताहेत, चार कुत्र्यांमागं पंचवीस नोकर फिरत आहेत हा प्रकार मेगनच्या पचनी पडणं कठीणच.
मेगन-हॅरीनी ठरवलं की राजवाडी लचांडातून बाहेर पडायचं. त्यानी हालचाली सुरु केल्या. कामधंदा शोधायला सुरवात केली.
एका पार्टीतली गंमत. पार्टीत चित्रपट, व्यापार, उद्योग या क्षेत्रातली मंडळी होती. हॅरी त्या पार्टीत मेगनसाठी काम शोधत होता. मेगनकडं व्हॉईस ओवरचं, अॅनिमेशन चित्रपटातल्या पात्रांचे संवाद म्हणण्याचं कसब आहे. ते काम करायचं मेगनच्या डोक्यात आहे. त्या दिवशी पार्टीमधे डिस्ने या अॅनिमेशनपट तयार करणाऱ्या कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. त्याना गाठून हॅरी सांगत होता की मेगनकडं असंअसं कसब आहे, तिला काम ध्या. त्या अधिकाऱ्याला मेगनचं कसब माहित नसावं, किंवा असलं तरी कोणी तरी तसा प्रस्ताव आणावा ही त्याच्या कामाची पद्धत असते. मेगन जोवर अमिताभ बच्चन किवा लता मंगेशकर नाही तोवर डिस्नेचा कार्यकारी अधिकारी आपणहून तिच्याकडं जाणार नाही. मेगनच्या वतीनं कोणी तरी त्या अधिकाऱ्याकडं पैरवी करायला हवी, पोर्टफोलियो द्यायला हवा, तिची थोरवी सांगायला हवी, मस्का मारायला हवा. मेगनचा नवरा म्हणून, डचेसचा नवरा ड्यूक म्हणून नव्हे, हॅरी तो उद्योग पार्टीत करत होता. उपस्थित लोकांना मौज वाटली.
मेगनला त्यात काही नवं नव्हतं पण हॅरीला मात्र ते नव्यानं शिकावं लागलं. हॅरीला ती सवय नव्हती. उदघाटनाच्या फिती कापणं, सेक्रेटरीनं लिहून दिलेली भाषणं करणं, सल्लागारांच्या ताफ्यानं तयार केलेला सल्ला पंतप्रधानाला देणं अशी त्याची कामं. प्रसंगानुसार कपड्यांचे अनेक लेयर्स वापरणं, प्रसंगानुसार वेगवेगळे बूट वापरणं, चेहऱ्याचा एक मुखवटा करून तो कष्टानं सतत टिकवणं हे कसब राजपुत्राला अंगी बाणवावं लागतं.
अर्थात हेही खरं की राजा आणि राणीचंही एक जग असतं. तिथंही एक झगडा असतोच. शेकडो वर्षांच्या परंपरा टिकवून धरणं, बदलत्या काळानुसार चाकोरी बदलायची की चाकोरीनुसार काळाला वळण द्यायचं या संघर्षात राजा राणी सतत अडकलेले असतात. आपलं व्यक्तिगत आयुष्य पेटीत बंद करून ठेवून सार्वजनिक जगायचं हाही फार जिकीरीचा झगडा असतो. एलिझाबेथ राणीच्या नवऱ्याला विमान चालवायचं होतं. तसा धोका त्यानं पत्करता कामा नये असं चाकोरी सांगत होती. राणीचा नवरा मन मारून विमान उडवण्याची हौस विसरून गेला, आतल्या आत धुमसत राहिला.
मेगनचा प्रश्नच नाही, ती अमेरिकन आहे.
प्रश्न आहे हॅरीचा.
दागिना घातला की तो घालणाऱ्या माणसाला आपोआप अधिकार प्राप्त होतो, मुकूट घातला की आपोआप सर्वाधिकार मिळतात, पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र अडकवलं की आपोआप एकतरफी दादागिरीचे अधिकार नवऱ्याला प्राप्त होतात, इत्यादी गोष्टींचा फोलपणा हॅरीला जाणवला असावा. त्याला चाकोरी सोडावी असं वाटत असावं. मेगनकडून तो शिकतोय.
म्हणून तर त्यानं हीज रॉयल हायनेस या तीन शब्दांचा अलंकार काढून ठेवलाय, मिस्टर हॅरी म्हणून जगायचं त्यानं ठरवलंय. तो स्वतःचा धंदा सुरु करणारेय. ससेस्क रॉयल नावाचा स्वतःचा ब्रँड त्यानं रजिस्टर केलाय. तो स्वतःची कंपनी काढेल. अॅमेझान या कंपनीत सल्लागार होईल किवा स्वतः कार्यक्रम करून अॅमेझॉनला विकेल, काहीही करेल. कोणाही बिझनेसमनसारखं जगायला तो तयार झालाय. राजवाडा सोडून तो बाजारात उतरलाय.
निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.
COMMENTS