अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या ‘कैफी आझमी - जीवन आणि शायरी’ या ‘लोकवाङ्मय’तर्फे प्रकाशित होणार्या पुस्तकातील संपादित केलेला एक भाग. कैफीचं हे भारतीय भाषांतलं पहिलं चरित्र आहे.
‘राह में टूट गये पांव तो मालूम हुआ
जुज़ मेरे और मेरा राहनुमा कोई नहीं!’
बालपणापासून आणि वारसा परंपरेने कैफी राष्ट्रप्रेमी होते. त्यामुळे कम्युनिस्ट पार्टीतील काही लोकांची व्यर्थ काथ्याकूट व शाब्दिक कसरत करत चीनने १९६२ साली भारतावर केलेल्या आक्रमाणाचा निषेध न करणं कैफिंना वेदना देऊन गेलं. त्यांना पी. सी. जोशींप्रमाणेच कॉंग्रेसचं ‘भारत छोडो’ आंदोलन व एकूणच स्वातंत्र्यलढा मान्य होता आणि संसदीय लोकशाही आणि द्वीराष्ट्रावादामुळे देशाची धार्मिक फाळणी होऊनही नेहरूंनी स्वीकारलेला सेक्युलॅरिझम, त्यांची आधुनिक वैज्ञानिक दृष्टी आणि समाजवादावरची आस्था मान्य होती. पण स्वातंत्र्यलढ्याला बुर्ज्वा मानीत त्याकडे ब्रिटिश साम्राज्यशाहीपेक्षा जर्मनीचा नाझीवाद अधिक धोकादायक आहे, म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात पाठ फिरवणे कैफींना जसं मान्य नव्हतं, तसंच चीन युद्धातली पार्टीच्या काही नेत्यांची चायना लाईन स्वीकारत चीनचा निषेध न करणं पण साफ नामंजूर होतं. या दोन्ही वेळी गरिबांचा पक्ष म्हणून ज्याच्याशी आपली जीवन निष्ठा वाहिली, त्या पक्षाचं राष्ट्रवादाशी असणारं वावडं त्यांना आत्मचिंतनास प्रवृत्त करून गेलं होतं!
या पार्श्वभूमीवर जेव्हा त्यांच्याकडे चेतन आनंद ‘हकिकत’साठी गीतं लिहावीत म्हणून प्रस्ताव घेऊन आले, तेव्हा चित्रपट हा चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांचं देशप्रेम व असीम बलिदानाची गाथा रूपेरी पडद्यावर मांडणारी आहे, त्यामुळे ज्या मानसिक व वैचारिक खळबळीतून कैफी जात होते, त्यामुळे कुठे तरी आपली देशभक्ती आणि चीन विरोध प्रभावीपणे प्रगट करता येईल, असं त्यांना वाटलं आणि त्या चित्रपटाला त्यांनी होकार दिला.
आज मागे वळून पाहाताना हे निशंकपणे सांगता येईल, की चेतन आनंदचा ‘हकिकत’ हा भारताचा आजवरचा सर्वश्रेष्ठ युद्धपट आहे. त्यानं पराभूत भारतीय मानसिकतेला उभारी दिली. या सिनेमातील कैफिंच्या लेखणीचं उत्तुंग कैलासलेणं म्हणजे चित्रपटाच्या शेवटी येणारं ‘कर चले हम ङ्गिदा’ हे अजोड गीत होय! हिंदी सिनेमात एवढं मानवी पातळीवरची देशभक्ती उजागर करणारं दुसरं गीत अजून लिहीलं गेलं नाही. अपवाद असेल तर केवळ कवी प्रदीप यांच्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या सेंटिमेंटल गीताचा.
‘हकिकत’ आणि त्यानंतरचा चेतन आनंदचा ‘हिंदुस्थान की कसम’ या वॉर फिल्मबाबत ‘द प्रिंट’ या इंग्रजी वेबपत्रिकेत २४ जुलै २०१८ रोजी अमित उपाध्याय यांनी कारगिल विजयाच्या निमित्ताने ‘हिंदुस्थान की कसम’, या चित्रपटाच्या अनुषंगानं एक महत्त्वपूर्ण विधान चेतन आनंदच्या संदर्भात केलं होतं, ते त्यांच्या इतकंच कैफिनाही लागू होतं,
‘After backing the British forces during World War Two, the Indian left was on the defensive in the first two decades after independence. Chetan Anand [and Kaifi two- my addition] a leading light of IPTA [Indian People Theatre Association] and a communist was, in a way, bridging the nationalism gap through these war movies.’
जेव्हा चेतन आनंद कैफिंकडे ‘हकिकत’ची ऑफर घेऊन आला, तेव्हा ते त्याला हसत म्हणाले, ‘अरे चेतन, माझ्यावर अपयशी गीतकाराचा शिक्का बसला आहे. का उगीच मला घेऊन सिनेमाच्या बॉक्स ऑफीसचं खोबरं करतोस?’ त्यावर तेवढ्याच मिस्कीलपणे चेतन म्हणाला, ‘यार, माझ्यावरही चारदोन अपयशी चित्रपटांचा शिक्का बसलेला आहे. जर आपण दोन अपयशी कलावंत एकत्र आलो तर एक यशस्वी सिनेमा निर्माण होईल. टु मायनेसेस कॅन टर्न टुबी वन बीग प्लस!’
त्या वेळी कैफींनी गीतं लिहावीत म्हणून त्यांचं मन वळविण्यासाठी चेतन जे सहज बोलून गेला, ते खरं ठरलं. हे दोघे आणि संगीतकार मदनमोहन या त्रिकुटांनी अक्षरश: एक इतिहास घडवला. देशाच्या सीमेवर लढणार्या व राष्ट्ररक्षणासाठी प्राणाचं बलिदान करणार्या जवानांची (व त्या निमित्ताने आम हिंदुस्तान्यांची) देशभक्ती प्रगट करणारा आणि त्यांच्या भावभावना, प्रेम, काळजी, विरह आणि ताटातूटीच्या मानवी भावनांना उजागर करण्यार्या आठ गीतांनी कैफींनी ‘हकिकत’ला ज्या उंचीवर नेले आहे, त्याला तोड नाही. आजही हा चित्रपट पाहाताना मन देशभक्तीनं भरून येतं.
देशभक्ती एक भावना असते. देशासाठी बलिदान करणार्या जवानांची देशभक्तीची भावना तीव्र असते, त्याशिवाय तो जीवावर उदार होत, प्राण देत नाहीत. मरताना देश आता तुमच्या हवाली करून जात आहोत, या जवानांचा विश्वास व भावनेला कैफींनी असं गीतातून व्यक्त केलं आहे,
कर चले हम फिदा जानो-तन साथियो
अब तुम्हारे हवाले वतन साथियो
सॉंस थमती गई, नब्ज़ जमती गई
फीर भी बढ़ते कदम को न रुकने दिया
कट गए सर हमारे तो कुछ गम नही
सर हिमालय का हमने न झुकने दिया
मरते मरते रहा बॉंकपन साथियो
अब तुम्हारे हवाले वतन साथिये
मुख्य म्हणजे आक्रमक व समाजवादाचं नाव घेत साम्राज्यवादी बनलेल्या चीनला कैफी रावणाची उपमा देतात व साथीदार वीर जवानांना तुम्हीच राम व तुम्हीच लक्ष्मण आहात, असं सांगत देशरूपी सीतामातेकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहाता कामा नये असं बजावत तिचं रक्षण करा, तिच्या दिशेनं वाईट हेतूनं पुढे येणारे हात कापून टाका, असं खणखणीतपणे सांगत कैफीनं जो देशप्रेमाचा पाठ दिला आहे, त्याला देशभक्तीपर गीतात तोड नाही.
युद्ध हे नेहमीच मानवतेला काळीमा फासणारे असते. कारण त्यात मृत्यूमुखी पडलेल्या वीर जवानांच्या घरावर जी आपदा कोसळते, त्याची भयानकता त्या घरांनाच समजते. त्यामुळे ‘युद्ध नको – शांती हवी’ अशीच काहीशी भावना कैफींनी खाली उद्धृत केलेल्या गीतामध्ये व्यक्त केली आहे. ती एक श्रेष्ठ दर्जाची प्रार्थना आहे.
दुनिया बनाने वाले, यही है मेरी इल्तिजा
कि हों न कभी अपने जुदा
घर के जो उजाले हैं, बचाना उन्हें
जाके अपने सीने से लगाना उन्हें
पहना है अँधेरों का ज़मीं ने कङ्गन
सूनी सी दुनिया है, सहमा-सा चमन
कॉंटे छू न पाएँ, ङ्गूलों का बदन
तेरे हवाले, बहारों के पाले, दुखी दिल की है यह दुआ
यही है मेरी इल्तिजा
१९६४ सालच्या ‘हकिकत’चे देशभक्तीपर गीत लिहिणारे कैफी यांना कम्युनिस्ट पक्ष फुटीचा मनस्वी खेद झाला, त्यावर विषण्ण मनानं ‘आवारा सजदे’ लिहून आपली व्यथाही त्यांनी व्यक्त केली. कारण त्यांना नेहरूंचे असलेले आकर्षण कायम होते. आणि मुख्य म्हणजे चीनही जरी स्वत:ला साम्यवादी देश म्हणवून घेत असला तरी तो देशही अस्ताला गेलेल्या ब्रिटिश साम्राज्याप्रमाणेच विस्तारवादी व साम्राज्यवादी आहे; याचं भान त्यांना लख्ख होतं. या दृष्टीने त्यांची ‘जागिये’ ही नज्म पाहण्याजोगी आहे. त्यात बॉम्ब स्फोट करणारा शेजारी देश नि:संशय चीन आहे, कैफींनी त्याचा भविष्यात भारताला असणारा धोका ओळखला होता. त्यांची ही नज्म म्हणजे त्यांची समस्त भारतीय माणसांना ‘जागे व्हा’ अशी दिलेली काव्यात्म समजावणी आहे.
दफअतन एक ऐसा भयानक धमाका हुआ
जो फरिश्ते ज़मीं पर उतर आये ते उड़ गए
यह सुलगती पिघलती ज़मीं छोड़ के
आस्मानों से इक बार फीर जुड़ गए
अस्र-ए-नौ के लिए जो सहीफ नया लाए थे
उसको अपने परों में छुपा भी लिया
अब सलामत किसी की है दुनिया न दीं
रूई की तरह धुनकी पड़ी है खुदा की ज़मीं
जिस्म-ए-इन्सॉं के टुकड़े दरख्तों में अटके हुए
चॉंद अँधेरे की सूली पे लटके हुए
टूटे तारों को धरती ने खा भी लिया
जागिए आप के दोस्त ने बम बना भी लिया
(अचानक एक धमाका झाला अन्
धरतीवर आलेले देवदूत उडून गेले
ही जळणारी वितळणारी जमीन सोडून
पुन्हा ते एकादा आकाशी मार्गस्थ झाले
नव्या युगासाठी त्यांनी ग्रंथ आणला होता
त्याला त्यांनी पुन्हा आपल्या पंखात लपवलं
आता जगाची नाही की धर्माी नाही खैर
कापसाप्रमाणे देवभूमी विरविरीत झालीय आता
माणसांचे देह वृक्षाला लटकले आहेत.
चंद्रमा अंध:काराच्या सुळीवर बळी गेला आहे
तुटून पडणार्या तार्यांना धरतीनं खाऊन टाकलं आहे
जागे व्हा, तुमच्या मित्रानं बॉंब बनवला आहे.)
इथे साम्यवादी तत्त्वज्ञानाचं प्रतिक फरिश्ते (देवदूत) आहे, ज्यांनी धरतीवर नव्या जगासाठी नवा ग्रंथ (दास कॅपिटल) आणला होता, ते भयानक धमाक्यानंतर परत घेऊन आकाशस्थ झाले आहेत, चीनमध्ये आता नावांलाही मार्क्स विचार राहिला नाही. हे खुबीनं कैफी अधोरेखित करतात आणि बॉम्बस्फोटाचा विध्वंस सांगताना वृक्षांना लटकलेले मानवी देह, अंध:काराच्या सुळी गेलेला चंद्रमा अशा समर्पक प्रतिमा वापरून बॉम्बस्फोटाने होणार्या संभाव्य हानीची व्यापकता अधोरेखीत करीत भारताला ते सावधतेचा इशारा देतात.
नेहरू हे त्या काळातील अनेकांचे हीरो होते. आणि कम्युनिस्ट त्यांना बुर्ज्वा – भांडवलशाहीचे हस्तक व जनशत्रू जरी मानत असले तरी कैफीसाठी नेहरू हे जननायकच होते. संविधानिक लोकशाही आणि लोककल्याणकारी राज्याकडे डाव्या विचारांची होता होईल तेवढी कास पकडीत नेहरू देशाला आधुनिक व विज्ञाननिष्ठ बनवण्यासाठी जीवाचं रान करत होते, हे कैफी कम्युनिस्ट विचारधारेचा चष्मा उतरवून पाहात होते. म्हणूनच त्यांची ‘नेहरू’ ही नज्म त्यांच्या विचार प्रवाहातली एक महत्त्वाच्या टप्प्यावरील त्यांच्या विचार व भावनांचं प्रतिबिंब स्वरूप आहे, असं माझं आकलन आहे.
मैंने तनहा कभी उसको देखा नहीं
फीर भी जब उसको देखा वो तन्हा मिला
फीक्र सदियों अकेली अकेली रही
जेह्न सदियों अकेला अकेला मिला
बोझ से अपनी उसकी कमर झुक गई
कद मगर और कुछ और बढ़ता रहा
खैर-ओ-शर की कोई जंग हो
जिन्दगी का हो कोई जिहाद
वो हमेशा हुआ सबसे पहले शहीद
सबसे पहले वो सूली पे चढ़ता रहा
जिन तकाजों ने उसको दिया था जनम
उनकी आगोश में ङ्गिर समाया न वो
(एकटं मी त्याला कधी पाहिलं नाही
पण तरीही जेव्हा पाहिलं तो एकाकी होता
शतकानुशतके विचार एकाकीच असतात
शतकानुशतके विवेक हा एकटाच असतो.
ओझ्यानं त्याची कंबर झुकली होती
पण त्याची उंची ही वाढतच गेली
चांगल्या – वाईटांच्या संघर्षात
किंवा कल्याण-उत्पाताच्या लढाईत
जीवनाचा प्रत्येक युद्धात
तो सर्वात प्रथम शहीद झाला
सर्वात आधी सुळीवर चढला
ज्या नियतीनं त्याला जन्म दिला होता
तिच्या बाहूत तो कधीच परत गेला नाही)
हे नेहरूंच्या कार्यकर्तृत्व, विचार आणि जीवनधारणेचं वर्णन कैफींनी किती प्रभावी काव्य प्रतिम वापरून किती नेमकं केलं आहे. त्या मिषाने कैफी जणू आपले मूळ समाजवादी श्रद्धा कायम ठेवून नवी विस्तारीत ध्येयधोरणाची वाच्यता करीत होते!
नेहरू हे गांधींचे शिष्य व राजकीय वारसदार होते, म्हणून नेहरूंचा आवाज हा प्रेमाचा, भाईचाऱ्याचा आवाज होता. ‘नैनिहाल’ सिनेमा कैफीनं त्यांची आता आयडेंटिटी बनलेलं गीत लिहिलं,
मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो
मैने इक फूल जो सीने पे सजा रखा था
उसके परदे में तुम्हें दिल से लगा रखा था
था जुदा सबसे मेरे इश्क का अंदाज़ सुनो
मेरी आवाज सुनो, प्यार का राज़ सुनो
मन व विचार खुले ठेवीत ते भावसमृद्ध होत गेले. कम्युनिस्ट पक्षाचा समाजवाद आणि गांधी-नेहरूंचा गरिबांचा अश्रू पुसणारा अंत्योदय, ही दोन्ही मानवतावादी तत्त्वज्ञानं आहेत व त्यात काही द्वैत नाही, असेल तर साध्य करणार्यासाठी वापरणार्या साधनांचा व मार्गाचा आहे, हे कैफींनी ओळखलं आणि त्यांची सिग्निचर बनलेला शेर जन्मास आला,
‘प्यार का जश्न नई तरह मनाना होगा
गम किसी दिलों मे हो, गम को मिटाना होगा’
ही त्यांच्या काव्यात्म जीवन दर्शनाची ‘हकिकत’ आहे.
COMMENTS