परदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण

परदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण

अन्य देशांत राहणारे भारतीय दीर्घकाळ 'मॉडेल मायनॉरिटी’ म्हणजेच 'आदर्श अल्पसंख्याक’ म्हणून ओळखले जात होते, उच्चशिक्षित, चांगले सरासरी उत्पन्न व कार्यसंस

ट्रोलिंगपुढे गुडघे टेकून लष्कराने दिला दीर्घ परंपरेचा बळी
आखाती देशांतील दूतावासांचे दुही न पेरण्याचे आवाहन
देशाला आज आणखी अनेक नसिरुद्दीन शहांची गरज का आहे?

अन्य देशांत राहणारे भारतीय दीर्घकाळ ‘मॉडेल मायनॉरिटी’ म्हणजेच ‘आदर्श अल्पसंख्याक’ म्हणून ओळखले जात होते, उच्चशिक्षित, चांगले सरासरी उत्पन्न व कार्यसंस्कृती पाळणारे. ते कायद्याला धरून वागतात आणि मनापासून काम करतात. ते त्यांच्या मुलांमध्ये केवळ संस्कृती रुजवत नाहीत, तर चांगली मूल्ये बिंबवतात आणि शिक्षणाचे महत्त्व तर त्यांना पटलेले असतेच, स्पेलिंगच्या वगैरे परीक्षा ते सहज जिंकतात.

मात्र, या कल्पनेच्या साच्याला तडे जाऊ लागलेले दिसत आहेत, तेही अत्यंत उग्र पद्धतीने. परदेशांतील भारतीयांची आजपर्यंत कधीही न दिसलेली एक बाजू सार्वजनिक ठिकाणी उफाळून आली आहे आणि स्थानिक प्रसासन आणि राजकारण्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

इंग्लंडमधील लायसेस्टर येथे हिंदू-मुस्लिमांमध्ये हिंसक संघर्ष झाला, ऑस्ट्रेलियात हिंदू गटांनी शिखांवर हल्ला केला आणि वाढत्या विरोधामुळे न्यू जर्सी चर्चला साध्वी ऋतंभरा यांचे व्याख्यान रद्द करावे लागले. न्यू जर्सीमध्येच स्थानिक भारतीय समुदायांनी बुलडोझर्सवर योगी आदित्यनाथ व नरेंद्र मोदी यांची पोस्टर्स लावून काढलेल्या मोर्च्यावर स्थानिक राजकीय नेत्यांनी कडक टीका केली. टीका करणाऱ्यांमध्ये दोन सिनेटर्सचाही समावेश होता.

लायसेस्टरमधील हिंसाचारामुळे स्थानिकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. लायसेस्टर नेहमीच शांत शहर होते, येथे हिंदू व मुस्लिम कायमच एकोप्याने राहिले आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. हे प्रकार अन्यत्र पसरू शकतात, असा इशारा स्थानिक खासदार क्लॉडिया वेब यांनी दिला आहे. समाजातील हिंसेने प्रेरित ‘मूठभर लोक’ आणि  यूकेमध्ये डोके वर काढू लागलेल्या उजव्या विचारसरणी यांना त्यांनी जबाबदार धरले आहे.

आक्रमक हिंदुत्व केंद्रस्थानी असलेल्या भारतीय राजकारणाचा प्रादुर्भाव भारताबाहेरील भारतीयांनाही होऊ लागला आहे. स्थानिक अनिवासी भारतीयांमध्ये समुदाय व धर्माच्या आधारावर मतभेद कायमच होते पण सार्वजनिक हिंसाचारात पर्यवसान होईल एवढे तीव्र ते कधीच नव्हते. उजव्या विचारसरणीचे हिंदुत्ववादी गट प्रत्येक देशात आहेत आणि भारतातील संघटना स्थानिक निधीच्या जोरावर भारतीय संस्कृतीच्या प्रसाराच्या नावाखाली अनेक वर्षापासून लोकांच्या मनात जे विष पेरत आल्या आहेत, त्याची निष्पत्ती आता दिसू लागली आहे. परदेशस्थ भारतीयांना भारताशी जोडून घेण्याची इच्छा नेहमीच असते आणि मुलांना नृत्य-संगीताच्या क्लासेसना पाठवण्यात त्यांना आनंद मिळतो, याला धार्मिक प्रवचनांचीही जोड मिळते, हळूहळू ते सगळे विचारसरणीशी जोडले जाते. याला आता सोशल मीडियाची जोड मिळाली आहे. आपल्याला आपल्या घरात बसून जे द्वेषपूर्ण संदेश आणि खोट्यानाट्या बातम्या वाचालया मिळतात, त्या जगाच्या कानाकोपऱ्यातील भारतीयांपर्यंत पोहोचतात. हा मजकूर अर्थातच त्यांच्या गरजांनुसार तयार केलेला असतो. वेब यांनीही सोशल मीडियाच्या भूमिकेचा उल्लेख केला आहे आणि अनेक शिक्षणतज्ज्ञ व अभ्यासकांनीही याकडे लक्ष वेधले आहे. एका हिंदू मंदिराबाहेर झेंडा खाली खेचला जात असतानाचे व्हिडिओ प्रसृत होत आहेत आणि स्थानिक उच्चायुक्तालयानेही हिंदू प्रार्थनास्थळाची व प्रतिकांची मोडतोड झाल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे, असे वेब यांनी नमूद केले आहे.

परदेशांतील हिंदू गटांना भारताच्या राजनैतिक आस्थापनांद्वारे अधिकृत पालकत्व दिले जाणे हे यातील नवीन अंग आहे. अनिवासी भारतीयांमधील हिंदूंना झुकते माप देण्यात त्यांना कोणतीही लाज वाटत नाही. उच्चायुक्तालये व वकिलाती वेगवेगळ्या योगी आणि साध्वींचा पाहुणचार करत आहेत आणि स्थानिक भारतीयांना त्यांना भेटण्यासाठी आमंत्रित केले जात आहे.

हे सगळे मिश्रण ढवळले तर त्याचा परिणाम काय होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे सांप्रदायिक तणाव उकळत राहणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू गटांनी शिखांवर केलेल्या हल्ल्यामागील कारण शेतकरी आंदोलन हे होते. भारत सरकारविरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनात प्रामुख्याने शिखांचा समावेश असल्याने ऑस्ट्रेलियातील हिंदूधर्मीयांनी शिखांना लक्ष्य केले. लायसेस्टरमध्ये भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा हिंसेला तोंड फोडण्याचे कारण ठरला. लायसेस्टर पोलिसांनी अटक केलेल्या १८ जणांपैकी आठ जण ‘बाहेरून’ आलेले आहेत पण ते यूकेचे नागरिकही आहेत. ऑस्ट्रेलियातील हिंसाचारानंतर एका हिंदूधर्मीय व्यक्तीला हद्दपार करून भारतात पाठवण्यात आले आणि भारतात त्याचे जोरदार स्वागत झाले. बिलकिस बानोच्या बलात्काऱ्यांना तुरुंगातून सुटल्यानंतर गुजरातमध्ये हारतुरे घालण्यात आले होते, तसेच स्वागत त्याचेही झाले. आता याहून अधिक स्पष्ट करून काही सांगण्याची गरज उरली आहे का?

अनिवासी भारतीय आणि परदेशांतील भारतीय वंशाच्या व्यक्ती ही संघासाठी नेहमीच सुपीक जमीन राहिली आहे आणि नरेंद्र मोदी या समुदायांमध्ये कायमच लोकप्रिय आहेत.

२०१४ मध्ये प्रथम निवडून आल्यानंतर मोदी यांनी अमेरिका, ग्रेट ब्रिटन, कॅनडा आणि अन्य देशांतील स्पोर्ट्स स्टेडियम्समध्ये सार्वजनिक सभा घेतल्या होत्या. ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे त्यांचे जोरात स्वागत झाले. स्थानिक राजकीय नेत्यांनीही या सभांना हजेरी लावली. २०१४ साली न्यूयॉर्कमध्ये झालेली सभा याचे एक उदाहरण. भारतीय माध्यमांनी या कार्यक्रमांचे वार्तांकन करण्यासाठी प्रतिनिधी पाठवले.

हा उत्साह कालांतराने थंडावत गेला पण याचा अर्थ हिंदुत्ववाद्यांच्या कारवाया थांबल्या असा होत नाही. अनेक राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्थानिक हिंदुत्ववादी गट पाठिंबा तसेच निधी पुरवत आहेत असे अमेरिकेतील कार्यकर्ते दीर्घकाळापासून सांगत आहेत. याचा मोबदला म्हणून हिंदुत्ववादी अजेंडा राबवून घेतला जातो.

ही नव्याने दिसू लागलेली आक्रमकता अन्य समुदायांविरोधातील द्वेषापुरती मर्यादित नाही. भारतावर संशोधन करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांना नेहमीच धमक्या देऊन लक्ष्य केले जाते. बोस्टनमध्ये डिसमॅण्टलिंग ग्लोबल हिंदुत्व या विषयावर आयोजित परिषदेवर हिंदुत्ववादी गटांनी हल्ला चढवला व यात सहभागी होणाऱ्यांना गलिच्छ शिवीगाळ करण्यात आली. ऑस्ट्रिलियामध्ये भारतीय उच्चायुक्तालयाच्या हस्तक्षेपाचा निषेध म्हणून १३ शिक्षणतज्ज्ञांनी ऑस्ट्रेलिया इंडिया इन्स्टिट्यूटमधून राजीनामा दिला.

भारतात सध्या जे काही घडत आहे, त्याचेच प्रतिबिंब भारताबाहेरील भारतीयांच्या समुदायांमध्ये दिसू लागले आहे. तेच ध्रुवीकरण, सोशल मीडियावरील त्याच मोहिमा, तेच राजकीय व अधिकृत कृपाछत्र आणि तोच हिंसाचार. मतभेद, अगदी वेगळा दृष्टिकोनही सहन करून घेतला जात नाही. भारत सरकारचे समर्थन करणाऱ्या स्थानिक गटांकडूनही नाही आणि राजनैतिक आस्थापनांकडूनही नाही.

लायसेस्टरमधील हिंसाचार ही अशा आणखी काही तणावांची सुरुवात असू शकेल. केवळ ब्रिटनमध्येच नाही, तर सर्वत्र हिंदुत्ववादी गटांनी एक नवीन, विद्रुप स्वरूप धारण केले आहे. त्याचा प्रतिकारही नक्कीच होणार आहे आणि मग दुष्टचक्र सुरू होईल. हे प्रकार स्थानिक सरकारांनी ठामपणे हाताळणे गरजेचे आहे. केवळ बहुसांस्कृतिकवादाची सौम्य भूमिका घेऊन किंवा समुदायातील ज्येष्ठांना आवाहने करून चालणार नाही.

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0