नवी दिल्ली : झारखंडचे नवे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे माजी अध्यक्ष रा
नवी दिल्ली : झारखंडचे नवे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे उपस्थित होते पण त्यांच्यासोबत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजदचे नेते तेजस्वी यादव, मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, द्रमुकचे नेते स्टालिन, डी. राजा, आम आदमी पार्टीसहित भाजपविरोधी काही पक्षांचे नेतेही उपस्थित होते.
राजधानी रांचीमधील मोरहाबादी मैदानावर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात मंचावर भाजपविरोधी, राष्ट्रीय व प्रादेशिक राजकारणात एकमेकांचे विरोधी व मित्र असलेल्या पक्षांचे नेते बसलेले दिसले. या कार्यक्रमात काँग्रेसचे दोन व आरजेडीच्या एका सदस्याला कॅबिनेटची शपथ देण्यात आली.
महाराष्ट्रात भाजपचा सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर तेथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते. या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीला काँग्रेस नेते राहुल गांधी, ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी यांच्यासारखे नेते उपस्थित नव्हते. पण हे सर्व नेते झारखंडमध्ये सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिलेले दिसले.
सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्याचे अनेकांना निमंत्रण देण्यात आले होते पण त्यापैकी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बसपाच्या अध्यक्ष मायावती, उ. प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे बडे नेते मात्र अनुपस्थित होते.
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हेमंत सोरेन यांनी २०१७-१८मध्ये पाथलगडी चळवळींतर्गत आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले आहेत. ही चळवळ छोटा नागपूर व संथाळ परगणा येथील भूमी हक्काच्या संदर्भात सुरू होती.
COMMENTS