‘हिंदू मन’ हॅक केले जात आहे!

‘हिंदू मन’ हॅक केले जात आहे!

मोदींच्या केदारनाथ यात्रेसारखी तद्दन उथळ गोष्ट धार्मिक मोहीम म्हणून खपून जाऊ शकते इतके हिंदू मन आध्यात्मिक बाबतीत पोकळ झाले आहे का?

अफगाणिस्तानात सर्वच धर्मांची होरपळ – हमीद करझाई
सगळं बदलेल पण भारत हिंदू राष्ट्रच – सरसंघचालक
‘मी अजून जिवंत आहे याची मला लाज वाटते…’

निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर इव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार केल्याचे आरोप केले जात आहेत. इव्हीएम यंत्रांसोबत छेडछाड केली गेली का नाही माहिती नाही, पण यंत्रांपेक्षा हिंदू मनांवर अधिक प्रभावीपणे ताबा मिळवला जात आहे याबाबत अजिबात संदेह नाही.

नरेंद्र मोदींनी आपला आध्यात्मिक प्रवास  कॅमेऱ्यांच्या गराड्यात सुरू केला आणि आपल्या ‘एकांत साधनेचे’ प्रक्षेपण लाखो-करोडो हिंदू घरांत केले, याचे प्रयोजन काय होते? अशाप्रकारच्या उथळ प्रयत्नाला हिंदू जनता ‘एक प्रामाणिक धार्मिक संस्कार’ मानेल, हे वाटण्याएवढा आत्मविश्वास त्यांच्यात कुठून आला? हिंदू मनांवर इतका परिणाम झाला आहे की अशाप्रकारचा उथळपणा सहज एक धार्मिक उपचार म्हणून खपून जाऊ शकतो, याबद्दलही मोदींना भरवसा आहे.

प्रस्तुत लेखकावर ‘हिंदू मन’ ह्या संकल्पनेचे सरसकटीकरण केल्याबद्दल विखारी टीका होऊ शकते. त्याला सांगितले जाईल की अशी हिंदू मनाची ‘एकमेव’ व्याख्या करता नाही. हिंदू-पण म्हणजे विविधता; ते अरबी-यहुदी धर्मांपेक्षा वेगळे आहे; त्यात उदार सर्वसमावेशकता आहे जी या धर्माला वेगवेगळे आयाम देते आणि त्यामुळे नवे विचार समजून घेण्यासाठी सहिष्णू असा हा धर्म आहे. या पृथ्वीतलावरच्या सगळ्या धर्मांतील सगळ्यात सर्जनशील आणि माणुसकी जपणारा असा हा श्रेष्ठ धर्म आहे…. हे सारे त्याला ठसवून सांगितले जाईल.

सद्गुरु जग्गी वासुदेव इशा फौंडेशनमध्ये पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे स्वागत करताना, कोईमतूर २०१७. सौजन्य: PTI

सद्गुरु जग्गी वासुदेव इशा फौंडेशनमध्ये पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे स्वागत करताना, कोईमतूर २०१७. सौजन्य: PTI

हे विश्लेषण वस्तुस्थितीपासून कितीतरी दूर आहे, तसेच हिंदू धर्मामध्ये गेल्या शतकात किंवा त्याही आधीपासून जे बदल झालेले आहेत त्याकडे डोळेझाक करणारे आहे. आत्ताच्या काळात आपण मोरारी बापू, आसाराम बापू, बाबा रामदेव आणि सद्गुरु जग्गी अशांसारख्या अनेकानेक गुरूंचा उदय पाहिला आहे. हिंदूंनी घडवलेले आणि मान्य केलेले असे हे आजचे आध्यात्मिक नेतृत्व आहे.

खरे तर त्याही आधी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या निर्मितीमुळे हिंदूंनी सावध व्हायला हवे होते. जे लोक विहिंपचा एक भाग आहेत किंवा तिच्याशी निगडित संस्थांशी जोडलेले आहेत त्यांना ‘संत’ म्हटले जाऊ लागले. या शब्दाचा अर्थच त्यामुळे बदलला गेला. विहिंप ही एक राजकीय संस्था आहे, परंतु तिला धार्मिक संस्था म्हणून अधिष्ठान दिले गेले. एक अशी संस्था जी सगळ्या हिंदू धर्मीय लोकांचे प्रतिनिधित्व करते!!

संत म्हणजे ‘वैराग्य’ पत्करणारे- सामाजिक, भौतिक आणि ऐहिक सुखाचा त्याग करणारे असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. इथे मात्र गोसंरक्षणासाठी संतमंडळी संसदेला घेराव घालतात, त्यांना माहीत असते की ही धार्मिक नव्हे तर राजकीय कृती आहे. ते ‘चळवळी’ उभ्या करतात आणि त्यांचे नेतृत्व करतात. या चळवळी मुस्लिमांना लक्ष्य करतात आणि आपल्या राजकीय पक्षासाठी-भाजपसाठी-काम करतात.

विहिंप, बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी हिंदू भावनांवर नेहमीच प्रभाव पाडला, हिंदूंनीच ते होऊ दिले. धर्माचे महत्त्वाचे मूल्य म्हणजे तो अतिशय वैयक्तिक आणि शांतताप्रिय असतो. परंतु आता मात्र सगळ्याला वारेमाप प्रसिद्धी दिली जाते आणि सोहळे केले जातात. हजयात्रेसाठी शासन जे अनुदान देते त्याचा हिंदू द्वेष करतात. हे करताना त्यांना दिसत नाही की त्यांच्या स्वतःच्या तीर्थयात्रा बाजारू झाल्या आहेत आणि ते स्वतःही या सगळ्यासाठी शासनावर अवलंबून असतात. मानसरोवर यात्रा किंवा कुंभमेळा, बद्रीनाथ-केदारनाथ यात्रा ही त्याचीच उदाहरणे आहेत. या सर्व यात्रांना कुठल्या ना कुठल्याप्रकारे शासकीय अनुदान दिले जाते.

याव्यतिरिक्त हिंदूंनी आपले धार्मिक प्रसंगही राजकीय पक्षाला अर्पण केले आहेत. त्यामुळे समाजात एकसंधता आली आहे. जेव्हा मी कावडियांच्या हातात तिरंगा पाहिला तेव्हा मला वाटले की या देशाने शिवाला तीन्ही जगतांचा स्वामी या आपल्या स्थानावरून खाली उतरवले आहे. बिचारा शिव आता केवळ एकाच भौगोलिक प्रदेशापुरता मर्यादित राहिला आहे. बंगालमधील रामनवमीच्या मिरवणुकाही  धार्मिक नव्हत्या आणि हिंदूंना ते माहीत होते. ते एका विशिष्ट राजकीय पक्षाचे राजकीय आक्रमण होते, परंतु ते हिंदू धर्माच्या नावाखाली सहन केले गेले. आजकाल कोणत्याही धार्मिक प्रसंगामागे पक्षाचे बळ वाढवणे हे एकमेव उपयुक्ततावादी ध्येय असते – मग ते बंगालमध्ये असो, उत्तर प्रदेशात असो !

हिंदूंनी याचा कोणत्याही प्रकारे प्रतिकार केला नाही.

हिंदू धर्माचे राष्ट्रीयीकरण आणि भौगोलिकीकरण झाल्याने हिंदू जनता आपली वैश्विक दृष्टी गमावत आहे. त्यांचा दृष्टिकोन संकुचित झाला आहे. गांधींनंतरचा गेल्या ७० वर्षांचा काळ पाहिला, तर हिंदू धर्माच्या अंतर्गत कुठलाही महत्त्वाचा वादविवाद घडून आलेला दिसत नाही. भीमराव आंबेडकरांनी उठवलेले प्रश्न त्यात विरून गेले. गांधी आणि विनोबा भावेंनी गीता आणि हिंदू धर्माचा नव्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यानंतर हिंदूंकडून असे धर्मचिकित्सेचे प्रयत्न झाले नाहीत.

दिल्लीमध्ये घरात पूजा करताना एका हिंदू स्त्रीने लावलेली उदबत्ती. सौजन्य- राऊटर्स/अदनान अबीदी

दिल्लीमध्ये घरात पूजा करताना एका हिंदू स्त्रीने लावलेली उदबत्ती. सौजन्य- राऊटर्स/अदनान अबीदी

हिंदू धर्माचा भाग असलेले परंतु धर्माचा अर्थ लावण्याची संधी न मिळालेले असे आवाज जेव्हा आव्हान ठरु लागले, तेव्हा हिंदू धर्माने स्वतःला त्याचा बळी मानले. हजारीप्रसाद द्विवेदींनी म्हणून ठेवले आहे की इस्लामने समतेचे तत्त्व आणले जे हिंदूंना परिचित नव्हते आणि ख्रिस्तधर्माने सेवाभाव आणि शेजारधर्म आणला – तोही हिंदू धर्मियांना नवीनच होता. परंतु याला प्रतिसाद देण्याऐवजी हिंदू धर्म स्वतःच्या कोषात गेला.

हिंदू धर्माच्या विविध परंपरांवर महत्त्वाचे असे तात्त्विक चिंतन झालेले नाही, पोथ्यांचा नव्याने अर्थ लावला गेला नाही, त्याच्या विविध प्रवाहांशी सर्जक संवाद झालेला नाही. हिंदू धर्म त्यामुळे आपल्या जुन्याच वैभवावर टिकून आहे. त्यामुळे आजकाल तो निर्माण करत असलेल्या तत्त्वचिंतकांची मजल जास्तीत जास्त सद्गुरू जग्गी, ओशो इथपर्यंतच जाऊ शकते. थोडक्यात, हिंदू धर्मातील आध्यत्मिक जिगिषा आणि बळ लोप पावले आहे. वेदांनी जर सगळी उत्तरे दिलेली असतील तर आपण गतवैभवाची भुते वाहणारे य:कश्चित भोई आहोत. पूर्वजांची भुते आपल्या खांद्यावर घेऊन चालणे हेच आपले प्राक्तन आहे.

तीन चार वर्षांपूर्वी मला विश्व ब्राम्हण सभेच्या प्रतिनिधीकडून दूरध्वनी यायला सुरुवात झाली. जे लोक वेद शिकू इच्छितात त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांमुळे ते व्यथित झाले होते. यावर मात करण्यासाठी त्यांनी वेदांच्या नावाने ‘रन फॉर द वेदाज्’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. मी त्यांना विचारले की अडथळे निर्माण करणारी मंडळी कोण आहेत? ते म्हणाले रोमिला थापर. आता मी विचार करू लागलो, रोमिला थापर ही व्यक्ती वेद शिकू पाहणाऱ्यांच्या मार्गातील अडथळा कशी काय असू शकते? दुसरे म्हणजे, धावण्यामुळे आपण वेदांच्या जवळ कसे काय जाऊ शकतो? मी त्यांना सल्ला दिला की धावण्याऐवजी त्यांनी पाच-दहा विद्वानांना बोलवून त्यांना त्यांच्या वेदांतील संशोधनावर बोलायला सांगावे. त्यांनी मला हे करण्याचे आश्वासन दिले आणि कधीही फोन केला नाही.

हजारी प्रसाद द्विवेदींनी मध्ययुगीन काळास बंदिस्त किंवा निस्तब्ध विद्वत्तेचे युग असे संबोधले आहे. या काळात मूलभूत विचार केला गेला नाही असे ते खेदाने नमूद करतात. रामचंद्र शुक्ला आणि इतरांनी हिंदू धर्माच्या धोक्यात येण्याला इस्लामी आक्रमक कारणीभूत आहे असे म्हटले. परंतु हा काळ अभिनवतेचा, सर्जनशीलतेचाही होता. साहित्य, कला-स्थापत्य इ. त्याचे साक्षीदार आहेत.

आजच्या काळात हिंदू धर्मापुढे अनेक आव्हाने आहेत. राजकारणापुढे तो स्वतःची स्वायत्तता टिकवू शकेल का? राजकारणामुळे त्याची अवनती होईल काय? आणि भविष्यात योगी आदित्यनाथ, प्रज्ञा ठाकूर आणि नरेंद्र मोदी हेच त्याचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जातील का? हिंदूंनीच आता या प्रभावाचा विचार करण्याची आणि  त्यातून मुक्त कसे होता येईल हे पाहण्याची वेळ आली आहे.

अपूर्वानंद, दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0