हिंदुकुश हिमालयातील दोन तृतियांश हिमनद्या २१०० सालापर्यंत वितळून जाऊ शकतील

हिंदुकुश हिमालयातील दोन तृतियांश हिमनद्या २१०० सालापर्यंत वितळून जाऊ शकतील

सुमारे १५% हिमनद्या अगोदरच नाहीशा झाल्या आहेत.

जी२० देशांना औष्णिक वीजनिर्मितीसाठी सवलती
भारतातील पर्जन्यात वाढ होण्याची शक्यता!
अंटार्क्टिकावरील एका तळाचे तापमान १८.३ अंश सेल्सियस

एका नवीन अहवालामध्ये केलेल्या दाव्यानुसार, पर्यावरणीय बदलांमुळे २१०० सालापर्यंत हिंदुकुश हिमालय पर्वतरांगांमधील (एचकेएच) किमान एक तृतियांश हिमनद्या वितळून जातील. त्यामुळे त्यांच्यामधून उगम पावणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये राहणाऱ्या १.६५ अब्ज लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेच्या साधनांवर त्याचा विपरित परिणाम होईल. जेव्हा जागतिक पातळीवरील वायूप्रदूषण कमी केले जाईल आणि जागतिक तापमानवाढ औद्योगिकीकरणाच्या आधीच्या पातळ्यांपेक्षा १.५ अंश सेल्सियस इतकीच मर्यादित ठेवली जाईल तर ती सर्वात चांगली परिस्थिती असेल. २०१५ च्या पॅरिस करारातील हे सर्वाधिक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे.

मात्र जर वायूप्रदूषण कमी केले नाही आणि जागतिक तापमानवाढीचा आलेख असाच चढता राहिला तर हे शतक संपताना एचकेएच मधील दोन तृतियांश हिमनद्या वितळलेल्या असतील. सुमारे १५% हिमनद्या आत्ताच नाहीशा झाल्या आहेत.

एचकेएच प्रदेशातील प्रतिव्यक्ती कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन जागतिक सरासरीच्या केवळ एक षष्ठांश इतकेच आहे, पण त्याला भोगावा लागणारा परिणाम मात्र खूपच अधिक असेल.

“या पर्यावरण संकटाबद्दल तुम्ही कधी ऐकलेही नसेल,” अहवालाचे प्रमुख लेखक आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटन डेव्हलपमेंट मधील अभ्यासक फिलिप्पस वेस्टर म्हणतात. “आठ देशांमधून पसरलेल्याअतिथंड हिमाच्छादित पर्वतशिखरांचे रुपांतर जागतिक तापमानवाढीमुळे एका शतकाहून कमी काळात उजाड खडकाळ प्रदेशात होऊ शकते.”

हिमनद्यांच्या वितळण्यामुळे बर्फाची सरोवरेही निर्माण होऊ शकतात – हाही एक संभाव्य धोकाच आहे. या सरोवरांच्या फुटण्यामुळे जे पूर येतील त्यामुळेही प्रचंड प्रमाणात जीवित आणि  वित्त हानी होऊ शकते. एचकेएचमध्ये जवळजवळ ९,००० बर्फाची सरोवरे आहेत, ज्यापैकी २०३ धोकादायक आहेत.

एचकेएच मूल्यांकन अहवाल हे २२ देशांमधील अनेक संशोधक आणि धोरणतज्ञांनी एकत्रितपणे केलेले काम आहे आणि ते काठमांडू येथे असलेल्या आयसीआयएमओडी या संस्थेने संकलित केले आहे.

द वायरने २०१७ मध्ये आयसीआयएमओडी तसेच इतर संस्थांमधील संशोधकांनी काढलेल्या अशाच निष्कर्षांबाबत यापूर्वी लिहिलेहोते.

२०१८ साली द वायरला दिलेल्या मुलाखतीच्या वेळीआयसीआयएमओडी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि अहवालाचे एक लेखक अरुणभक्त श्रेष्ठा म्हणाले होते की एचकेएचचा विचार एकत्रितपणे करणे महत्त्वाचे आहे कारण ते खरोखरीच एकच आहे.“तुम्ही हा प्रदेश छोट्या उप-प्रदेशांमध्ये विभाजित करू शकता पण मूलतः तो संपूर्ण प्रदेश दक्षिण आणि मध्य आशियामध्ये घडलेल्या एकाच प्रक्रियेतून तयार झाला आहे. त्यामुळे त्यामध्ये अनेक गोष्टी सामायिक आहेत आणि त्याला घडविणाऱ्या गोष्टीही बऱ्याच अंशी समान आहेत, ज्यात पर्यावरणही आले,” असेही श्रेष्ठा म्हणाले होते.

एचकेएच हे पश्चिमेतील अफगाणिस्तानपासून पूर्वेकडील म्यानमारपर्यंत ३,५०० किमीमध्ये पसरले आहे. या प्रदेशात २५ कोटी लोक राहतात आणि १.६५ अब्ज लोकांचे जीवन इथून उगम पावणाऱ्या नद्यांवर अवलंबून आहे. एचकेएचला अनेकदा जगाचा ‘तिसरा ध्रुव’ म्हटले जाते, कारण अंटार्क्टिक आणि आर्क्टिक प्रदेशांखेरीज याच भागात सर्वाधिक बर्फ आहे.

“हिंदुकुश हिमालय प्रदेशाचा प्रचंड आकार आणि जागतिक महत्त्व याबाबत कुणाचेच दुमत असू शकत नाही, तरीही या प्रदेशातील अब्जावधी जनतेच्या हिताच्या दृष्टीने या प्रदेशाचे असलेले महत्त्व आणि त्याच्यावर ओढवू घातलेले संकट, विशेषतः पर्यावरण बदलाच्या बाबतीत, या गोष्टी इतक्या तपशीलवार अभ्यासणारा हा पहिला अहवाल आहे,” असे आयसीआयएमओडीचे डायरेक्टर जनरल डेव्हिड मोल्डन यांनी सांगितले.

या अहवालात असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे, की दोन्ही ध्रुवांप्रमाणेच, एचकेएचच्या तापमानामध्ये जागतिक सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढ होत आहे. “जरी जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सियस इतकी मर्यादित असेल तरीही एचकेएचमध्ये ही वाढ किमान ०.३ अंश सेल्सियसने जास्त असेल आणि उत्तरपश्चिम हिमालय आणि काराकोरम येथे ती किमान ०.७ अंश सेल्सियसने जास्त असेल.”

या प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचा प्राथमिक स्त्रोत असलेल्या पश्चिमी वादळांमध्ये सतत बदल होत राहणे हे वाढण्याची शक्यता तापमानवाढीमुळे आहे. डब्ल्यूडीमुळे होणारा वर्षाव हा पाकिस्तान आणि उत्तर पश्चिम भारतातील गव्हासारख्या हिवाळी पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.

पर्यावरण बदलामुळे या प्रदेशातील पाण्याच्या उपलब्धतेवरही परिणाम होऊ शकेल. अहवाल असा अंदाज देतो की २०५० पर्यंत सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या पात्रातील प्रवाहामध्ये वाढ होईल. त्यानंतर पूर्वमोसमी प्रवाहामध्ये घट होत जाईल.

झरे हे पर्वतराजीमधील महत्त्वाचे संसाधन आहे कारण लोक त्याच्यावर थेट अवलंबून असतात. हे झरेही धोक्यात येत चालले आहेत. हिमनद्या मागे हटत जाण्याबरोबरच, जमिनीच्या वापरातील बदलांपासून ते मातीची धूप होण्यापर्यंत अनेक बाबतीतील मानवी हस्तक्षेपामुळे झरे कोरडे होत चालले आहेत. मागच्या वर्षी नीती आयोगाने एका अहवालातसांगितले की भारतातील हिमालयाच्या भागात ३०% झरे कोरडे झाले आहेत.

एचकेएच प्रदेश हा मोसमी पावसाच्या प्रणालीचेही नियंत्रण करत असल्यामुळेही फार महत्त्वाचा आहे. कारण दक्षिण आशियाई प्रदेश पावसासाठी पूर्णपणे त्यावरच विसंबून असते. श्रेष्ठा यांनी डिसेंबरमध्ये आम्हाला मोसमी पावसाकरिता एचकेएच प्रदेशाचे काय महत्त्व आहे ते स्पष्ट करून सांगितले, “पर्वत इतक्या लक्षणीय प्रमाणात उष्ण होतात की – एखाद्या पंपसारखे – ते सागरातून ओलावा शोषतात आणि त्यालाच आपण मोसमी पाऊस म्हणतो.”

अहवालाच्या अनुसार, मोसमी पावसाचे वेळापत्रक बदलण्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्षाव होतील ज्यामुळे पूर, भूस्खलन आणि जमिनीची धूप यांचा धोका वाढेल.

पर्यावरण बदलामुळे होणाऱ्या इतर बदलांमुळे गरीब जनताच अधिकाधिक प्रभावित होणार आहे, असे अहवालात म्हटले आहे.

“एचकेएच पर्वतात राहणाऱ्या २५ कोटी लोकांपैकी सुमारे एक-तृतियांश लोक दिवसाला $१.९० पेक्षा कमी पैशांमध्ये जगतात; प्रदेशातील ३०% पेक्षा कमी लोकांकडे पुरेसे खायला नाही, ५०% जनता कुठल्या ना कुठल्या कुपोषणाची बळी आहे, आणि त्यात स्त्रिया आणि मुलांचा वाटा मोठा आहे.”

एचकेएच ज्या प्रदेशात आहे, तिथल्या आठ देशांना असलेला धोका पाहता अधिक मोठ्या प्रमाणात सहकार्य झाले पाहिजे असे आयसीआयएमओडी म्हणते.

“कारण अनेकयेणारी संकटे आणि अचानक होणारे बदल हे देशाच्या सीमा ओलांडणारे असतील, त्यामुळे या प्रदेशातील देशांमधल्या संघर्षांचा सहज उद्रेक होऊ शकतो. पण जर सर्व देशांच्या सरकारांनी एकत्रित काम करून वितळत्या हिमनद्यांना आणि त्यांच्या भयानक परिणामांना थोपवले तर भविष्य इतके भीषण नसेल,” आयसीआयएमओडीचे डेप्युटी डायरेक्टर जनरल एकलब्य शर्मा म्हणाले.

हा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

अनुवाद- अनघा लेले

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0