इतिहासात वैश्विकदृष्टी मांडणारा अभ्यासक

इतिहासात वैश्विकदृष्टी मांडणारा अभ्यासक

गेल्या आठवड्यात ज्येष्ठ इतिहासकार डी. एन. झा यांचे निधन झाले. बाबरी मशीद मंदिर पाडून बांधली गेली असल्याचा कोणताही ठळक पुरावा नाही, आणि ही संपूर्ण संकल्पना संघ परिवाराने तयार केलेली आहे असे 'द वायर'ला दिलेल्या मुलाखतीत झा म्हणाले होते.

नवी दिल्ली: इतिहासकार द्विजेन्द्र नारायण झा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य भारतीय समाजातील तर्कशून्यता आणि अविवेक यांचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी खर्च केले. त्यांची पुस्तके, कित्येक संशोधन प्रबंध आणि राजकीय वादांसंबंधीच्या विद्वत्तापूर्ण टिप्पणी यामुळे त्यांना वैचारिक क्षेत्रात जितकी प्रशंसा मिळाली तितकाच उजव्या शक्तींच्या विषारी संतापाचाही सामना करावा लागला.

झा यांचे गेल्या आठवड्यात गुरुवारी वयाच्या ८१व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. २०१९ मध्ये अयोध्या येथील वादग्रस्त जमीन हिंदू पक्षांना बहाल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या काही काळापूर्वी झा यांनी द वायरला त्यांची शेवटची मुलाखत दिली होती. काही वर्षांपूर्वीच त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता आणि त्यांची ऐकण्याची क्षमता खूपच कमी झाली होती, तरीही त्यांनी ही मुलाखत दिली.

या मुलाखतीत त्यांनी त्यांचे अनुमान पुन्हा एकदा ठामपणे सांगितले, की बाबरी मशीद ही मंदिर पाडून त्यावर बांधण्यात आली हे सिद्ध करणारा कोणताही ठळक पुरावा नाही, आणि ही संकल्पना संघ परिवाराने त्यांच्या स्वतःच्या राजकीय हितसंबंधांसाठीच निर्माण केली आहे.

त्यांनी पहिल्यांदा अयोध्या येथील वादग्रस्त स्थळाबद्दलचे त्यांचा हा निष्कर्ष त्यांच्या सुप्रसिद्ध Ramjanmabhoomi-Baburi Masjid: A Historians’ Report to the Nation, या ग्रंथात मांडला. हा ग्रंथ त्यांनी मे १९९१ साली, उजव्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या एक वर्ष आधी, सूरज भान, अथर अली आणि आर. एस. शर्मा या सहलेखकांबरोबर लिहिला होता. सर्व उपलब्ध साहित्य आणि पुरातात्त्विक पुरावे यांची छाननी केल्यानंतर इतिहासकारांच्या या स्वतंत्र चमूने हा अहवाल लिहिला होता.

त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये त्यांनी सातत्याने एएसआयचे माजी सरसंचालक बी. बी. लाल यांच्यावर टीका केली. लाल यांनी १९९० साली मशिदीच्या खाली मंदिर असण्याच्या शक्यतेबद्दलची त्यांची भूमिका बदलली होती, ज्यामुळे मशीद उद्ध्वस्त होण्यापूर्वीच्या काळात संघ परिवाराच्या राम जन्मभूमी चळवळ वाढवण्याच्या प्रयत्नांना मदत झाली होती.

मात्र, झा यांचे आयुष्य म्हणजे केवळ उजव्या हिंदुत्ववादी शक्तींबरोबरची, ज्या भारताला अनेक युगे मागे घेऊन चालल्या आहेत असा त्यांचा विश्वास होता, लढाई नव्हती. ते भारतीय इतिहासकारांच्या पहिल्या काही पिढ्यांमधले एक होते, ज्यांनी स्वतंत्र भारतात इतिहासलेखनाचे कार्य हाती घेतले होते. विविध ठिकाणच्या राजघराण्यांनी लढलेली युद्धे आणि अनेक वारसाहक्कांचे झगडे यांच्या पलिकडे भारताच्या इतिहासाचा अर्थ लावण्यासाठी ते भारतीयांना मदत करत होते.

भारतातील इतिहासाच्या सामाजिक-आर्थिक विश्लेषणाची सुरुवात करणाऱ्या मोजक्या इतिहासकारांपैकी एक असलेले सुप्रसिद्ध इतिहासकार आर. एस. शर्मा यांचे विद्यार्थी असलेल्या झा यांनीही तोपर्यंत भारतीय इतिहासाची असलेली समज नाकारली आणि भारतातील इतिहास संशोधनामध्ये नवीन मार्ग चोखाळणाऱ्या इतर अनेकांच्या बरोबर सामील झाले.

The Myth of the Holy Cow हा त्यांचा निबंध खूपच गाजला ज्यामध्ये त्यांनी प्राचीन भारतातील आहारसवयींमध्ये गोमांसभक्षण मोठ्या प्रमाणात प्रचलित असल्याचे निर्णायकरित्या सिद्ध केले. मात्र प्राचीन भारतातील अनेक पदरी सामाजिक-आर्थिक पैलूंना प्रदर्शित करणारे त्यांचे इतर काम हे त्यांचे त्याहून महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी भारताच्या प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास करून भौतिक संस्कृती आणि उत्क्रांत होत जाणारे तंत्रज्ञान हे प्राचीन भारतामध्ये सामाजिक संरचना आणि शासनव्यवस्थांना कसे संचालित करत होते याचे स्पष्ट चित्रण करणारे ग्रंथ प्रकाशित केले.

त्या दृष्टीने पाहिले तर ते एक खरे वसाहतविरोधी राष्ट्रवादी होते. पण त्यांच्या ज्ञानपिपासेमागे ती एकमेव भावना नव्हती. तरुण वयात मार्क्सवादाने प्रभावित झालेल्या झा यांनी मुख्यतः युद्धे, व्यक्ती, लोककथा, राजघराणी आणि प्रशासनकौशल्य यांच्यावर केंद्रित असलेल्या इतिहासलेखनाच्या “नॅशनॅलिस्ट स्कूल”पासून फारकत घेतली, पण तरीही भारताच्या समृद्ध आणि विविधतापूर्ण इतिहासाची एक व्यामिश्र समज विकसित करण्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या नॅशनॅलिस्ट स्कूलमधील सहकाऱ्यांप्रमाणे तेही भारतीय उपखंडाबद्दल साम्राज्यवादी इतिहासकारांनी तयार केलेल्या गृहीतकांना उघड आव्हान देणाऱ्या इतिहासकारांपैकी एक बनले.

ते काँग्रेस पक्ष आणि त्याच्या राजवटींचे टीकाकार होते. पण तरीही त्यांच्यावर मार्क्सवादाप्रमाणेच नेहरूवादी विश्वदृष्टीचाही प्रभाव होता. याच वैश्विकतेमुळे ते त्या भारतीय इतिहासकारांच्या गटाचा अविभाज्य भाग होते, ज्यांनी स्वातंत्र्यानंतर भारताच्या राष्ट्रबांधणीच्या प्रकल्पामध्ये व्यावसायिक इतिहास लेखन मूलभूत आहे असे मानले.

ते मूळ बिहारचे होते, सुरुवातीचे शिक्षण त्यांनी पाटणा विद्यापीठात तसेच कलकत्ता विद्यापीठाच्या प्रेसिडन्सी कॉलेज येथे घेतले. त्यांनी त्यांची व्यावसायिक कारकीर्द दिल्ली विद्यापीठात आरंभ केली, जिथे त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शिकवले. त्यांनी अनेक विषयांवर विद्वत्तापूर्ण पुस्तके लिहिली तशीच Ancient India: In Historical Outline किंवा Early India: A Concise History यासारखी प्राचीन भारताबद्दलची पुस्तकेही तेवढ्याच मेहनतीने लिहिली. इतिहास विषयामध्ये तज्ज्ञता मिळवण्यासाठी अपेक्षित असलेल्या मेहनतीबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अशा पुस्तकांचा खूपच उपयोग होऊ लागला.

त्यांनी एनसीईआरटीकरिता इतिहासाची अनेक पाठ्यपुस्तकेही लिहिली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारताच्या भूतकाळाबाबत एक विवेकपूर्ण समज निर्माण करण्यासाठी ही फार मोलाची होती.

त्यांच्याकरिता, इतिहास संशोधन आणि लोकांनी इतिहासाबद्दलचे ठोस ज्ञान विकसित करावे व ते स्वीकारावे यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या होत्या.

भारतीय सरंजामशाही, प्राचीन भारतातील अर्थव्यवस्था आणि समाज, नव्याने उदयाला येणाऱ्या धार्मिक अस्मिता आणि कल्पनाप्रणाली या विषयांमध्ये त्यांना रुची होती. या विषयांमुळे भारतीय इतिहासात एक आजपर्यंत अंधारात असलेला विभाग खुला झाला. अलिकडच्या व्यावसायिक इतिहासकारांपैकी अनेकांना त्यांची काही प्रमेये मान्य होणार नाहीत, पण इतिहासकारांना नवनवीन विषय संशोधनाकरिता घेता यावेत आणि भारतीय इतिहासलेखनाचा अधिक अत्याधुनिक पद्धतींनी अभ्यास करावा यासाठीचा व्यावसायिक अवकाश खुला करण्यामध्ये त्यांची भूमिका कुणीच नाकारू शकत नाही.

भारतीय इतिहासकारांपैकी एक अग्रेसर नाव काळाच्या पडद्याआड गेले आहे. भारतीय प्रस्थापनेकडून प्रत्येक पातळीवर झा यांना अत्यंत प्रिय असलेली मूल्ये तुडवली जात असल्याच्या काळात झा यांचा मृत्यू झाला आहे. सर्व प्रकारच्या धर्मांधतेचे कट्टर टीकाकार असलेल्या झा यांना मागच्या काही दशकांमध्ये हिंदू राष्ट्रवादी कल्पनाप्रणालीचा झालेला उदय वेदनादायी होता.

‘द वायर’ला त्यांनी दिलेल्या शेवटच्या मुलाखतीत ते म्हणाले होते, अयोध्या वाद हा श्रद्धा आणि विवेक यांच्यातील लढाई आहे. खरे तर, त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य, व्यावसायिक योगदान आणि त्यांचे सामाजिक संबंध हे विरोधकांचा आणि विभाजनवादी राजकीय गटांचा रोष पत्करूनही विवेकासाठीच्या लढाईतच खर्ची घातले.

मूळ लेख

COMMENTS