केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ‘कोरोना’वरून सुप्त संघर्ष

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ‘कोरोना’वरून सुप्त संघर्ष

कोरोना लसीकरण जरी सुरू असले तरी दुसऱ्या लाटेचा धोका अद्यापही कायम आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडून त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो. याकडे केंद्राने

पीएम केअर्स : लपवाछपवी व टोलवाटोलवी
कोरोनाचा पुनःसंक्रमणाचा धोकाः आयसीएमआर
टोक्यो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलले

कोरोना लसीकरण जरी सुरू असले तरी दुसऱ्या लाटेचा धोका अद्यापही कायम आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडून त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो. याकडे केंद्राने त्वरित लक्ष देऊन मुंबईप्रमाणे देशातील सर्व विमानतळावरील अशा प्रवाशांना विलगीकरण आणि चाचणी करून मगच घरी सोडावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विशेष म्हणजे ही मागणी दीड महिन्यापूर्वीही ठाकरे यांनी केंद्राकडे केली होती पण त्याला अपेक्षित प्रतिसाद देण्यात आलेला नव्हता.

ब्रिटन, आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये कोरोनाचा नवा घातक स्ट्रेन  निर्माण झाल्याने तेथे हाहाकार झाला आहे. या आणि अन्य देशातून दररोज हजारो प्रवाशी भारतात येतात. देशातील सर्वात महत्त्वाचे आणि मोठे विमानतळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना कोरोना चाचणी आणि सक्तीचे ७ किंवा १४ दिवसांचे विलगीकरण केले जाते. पण देशातील अन्य राज्यातील कोणत्याही विमानतळावर असे काहीही केले जात नाही. विलगीकरण आणि कोरोना चाचणी टाळण्यासाठी अनेक प्रवासी मुंबई वगळता अन्य शहरातील विमानतळाचा पर्याय शोधून पळवाट काढत आहेत. यामध्ये महाराष्ट्रमधील अनेक प्रवासी आहेत. गेल्या वेळी जी चूक झाली त्यामुळे मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी काटेकोरपणे हे नियम लावले आहेत. पण अन्य राज्यात मात्र आओ जावो घर तुम्हारा.. अशी स्थिती आहे.

संभाव्य धोका टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर महिन्यात केंद्राकडे सर्व विमानतळावर कोरोना चाचणी आणि विलगीकरण अनिवार्य करण्याची मागणी केली होती. पण त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. आता पुन्हा दोन महिन्यांनी ठाकरे यांनी पुन्हा हीच मागणी केंद्राकडे केली आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे जगभरातून लोक येत असतात. पण कठोर नियमामुळे हे प्रवाशी देशातील अन्य राज्यातील विमानतळावर उतरून कोणत्याही चाचणी विना मग रस्ते अथवा देशांतर्गत विमानाने मुंबई आणि महाराष्ट्रमध्ये दररोज येत आहेत. या प्रवाशांची कोणतीही कोरोना चाचणी होत नसल्याने त्यांच्यापासून कोरोना पुन्हा पसरू शकतो. त्यामुळे ठाकरे यांनी केलेली ही मागणी केंद्र गांभीर्याने घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या राज्यात कोरोना रुग्ण वाढ आकडा कमी होत असला तरी दुसरी लाट डोक्यावर आहे. सामूहिक प्रतिकारशक्ती जरी वाढीस लागली असली तरी पुन्हा कोरोना होऊ शकतो हे सर्वानी लक्षात ठेवावे असे वन रुपी क्लिनिकचे मुख्य डॉ. राहुल घुले यांनी सांगितले. ब्रिटन, अमेरिकेत  सुद्धा सुरुवातीला सामूहिक प्रतिकारशक्ती तयार होऊनही तेथे  कोरोनाची दुसरी लाट आली. आपल्याकडेही असे होऊ शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे रुग्ण दररोज मिळत असून त्याकडे यंत्रणा लक्ष ठेवून असल्याचे व्यास म्हणाले.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0