जागतिक साथींचा इतिहास – कॉलरा

जागतिक साथींचा इतिहास – कॉलरा

कॅरेबीअन समुद्रातील एक लहानसा गरीब देश म्हणजे हैती. या देशात डिसेंबर २०१० मध्ये अचानक जीवघेण्या अतिसाराची साथ पसरली. काही दिवसांतच हजारो लोक आजारी, तर शेकडो लोक मृत्युमुखी पडले. ती साथ कॉलऱ्याची होती. त्यापूर्वीच्या १०० वर्षांत हैतीमध्ये कॉलऱ्याचा एकही रुग्ण आढळला नव्हता, त्यामुळे तिथले नागरिक या आजाराबद्दल अनभिज्ञच होते.

कॅरेबीअन समुद्रातील एक लहानसा गरीब देश म्हणजे हैती. या देशात डिसेंबर २०१० मध्ये अचानक जीवघेण्या अतिसाराची साथ पसरली. काही दिवसांतच हजारो लोक आजारी, तर शेकडो लोक मृत्युमुखी पडले. ती साथ कॉलऱ्याची होती. त्यापूर्वीच्या १०० वर्षांत हैतीमध्ये कॉलऱ्याचा एकही रुग्ण आढळला नव्हता, त्यामुळे तिथले नागरिक या आजाराबद्दल अनभिज्ञच होते.

जानेवारी २०१० मधील विनाशकारी भूकंपानंतर जगभरातून हैतीला मदतीचा ओघ सुरू झाला. त्यापैकी एक म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेची नेपाळी स्वयंसेवकांची तुकडी. त्यांच्या कॅम्पमधून जमा होणारा मैला जवळच्याच आर्टीबोनाइट नदीत सोडला जाई. नेपाळमध्ये कॉलरा इंडेमिक म्हणजेच त्या भागात वर्षानुवर्षे टिकून राहिलेला आजार आहे. त्या नेपाळी सैनिकांकडून हैतीमध्ये कॉलऱ्याच्या साथीची सुरुवात झाली.

२०१० पासून आजपर्यंत या साथीने हैतीमध्ये जवळपास ९ लाख लोक आजारी पडले तर १० हजार लोक मृत झाले आहेत. विकसित देशांमधून जवळपास हद्दपार झालेला कॉलरा आजही विकसनशील देशांमध्ये गंभीर आणि जीवघेणा ठरत आहे.

इ. स. १८१७ पूर्वी हजारो वर्षे भारतात, विशेषतः गंगेच्या त्रिभुज प्रदेशात – सुंदरबन भागात दरवर्षी कमी तीव्र कॉलऱ्याचे उद्रेक होत असत. कॉलऱ्यासारखी लक्षणे असणाऱ्या आजाराचा ‘विसुचिका’ या नावाने उल्लेख केला आहे. बंगालमध्ये अनेक ठिकाणी ‘ओलाबीबी’ मंदिरे आहेत. बंगाली भाषेत ‘ओला’ हे कॉलऱ्याचे नाव आहे. अशा साथी आल्या की त्या देवीला पूजण्याची परंपरा बंगाली लोकांमध्ये होती. भारतीय उपखंडात हिंदू यात्रेकरूंबरोबर ही साथ गंगेच्या खोऱ्यातून ठिकठिकाणी पसरत असे.

१८१७ नंतरच्या २०० वर्षातील कॉलऱ्याच्या ७ जागतिक महासाथी

१८१७-१८२४ कॉलऱ्याची पहिली साथ

१९ व्या शतकाच्या सुरुवातीला कोलकाता हे ब्रिटिश सत्तेचे प्रमुख केंद्र होते. आपल्या व्यापार आणि साम्राज्यविस्ताराच्या धोरणाने ब्रिटीशांनी आतापर्यंत अस्पर्शीत असलेल्या सुंदरबनच्या अंतर्गत भागात प्रवास आणि विस्तार सुरू केला. त्यामुळे दलदलीच्या भागातुन कॉलऱ्याच्या नवीन स्ट्रेनने मानवी शरीरात प्रवेश केला. कॉलऱ्याच्या पहिल्या जागतिक साथीची सुरुवात झाली. बंगालमधून हळूहळू ती साथ पूर्ण भारतीय उपखंडात पसरली. ब्रिटिश फौजांमार्फत ती नेपाळ अफगाणिस्तानपर्यंत पोचली. तर ब्रिटिश मालवाहू जहाजांनी कॉलरा इंडोनेशिया, जपान, श्रीलंका, आफ्रिकेपर्यंत गेला. १८२४ च्या थंडीमध्ये रशियात या जीवाणूंचा टिकाव लागला नाही व साथ तिथेच थांबली. या साथीमध्ये भारतभरात लाखो लोक बळी पडले.

१८२४-१८३२ कॉलऱ्याची दुसरी साथ

भरतातून १८२४ च्या पावसाळ्यात कॉलऱ्याच्या दुसऱ्या जागतिक साथीची सुरुवात झाली. यावेळी रशिया, पोलंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वीडन मार्गे १८३२ मध्ये ही साथ इंग्लंडमध्ये पोचली. यामध्ये केवळ लंडनमध्ये ६५३६ तर पॅरिसमध्ये २० हजार लोकांचा बळी गेला. एका अंदाजानुसार फ्रान्समध्ये १ लाख लोक मृत्युमुखी पडले.

यादरम्यान रशियात झारच्या कारभाराविरुद्ध कॉलऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी दंगे उसळले. इंग्लंडमध्येही डॉक्टरांच्या विरोधात दंगली झाल्या. लिव्हरपुल शहरात तर २९ मे ते १० जून १८३२ या दिवसात रस्त्यावर आठ दंगली झाल्या. लोकांना असे वाटत होते, की कॉलऱ्याचे रुग्ण दवाखान्यात भरती करून त्यांचे मृतदेह डॉक्टर शवविच्छेदन करण्यासाठी वापरतात.

‘विल्यम ओ’शॉनेसी’ (O’Shaughnessy) या आयर्लंडमधील डॉक्टरने रक्तात पाणी आणि क्षार यांचे द्रावण दिल्यास कॉलऱ्याने होणारे मृत्यू टाळता येतील असे दाखवून दिले. पण ‘मियास्मा थिअरी’ वर विश्वास असणाऱ्या पारंपरिक वैद्यकीय जगताला ते मान्य झाले नाही. पुढील शतकभर कॉलऱ्याने होणारे लाखो मृत्यू चालूच राहिले.

१८४६-१८६३ कॉलऱ्याची तिसरी साथ

ही साथ भारतात सुरू होऊन इजिप्तमधून सागरी मार्गाने युरोप व अमेरिकेत पोचली. यामध्ये केवळ रशियात १० लाख मृत्यू झाले. १८५४ च्या इंग्लंडमधील साथीने २३ हजार, तर एकट्या लंडन शहरात १० हजार बळी घेतले.

१८५४ मध्ये जॉन स्नो या भुलतज्ञ डॉक्टरने लंडनमधील सोहो येथील कॉलऱ्याच्या साथीत हे सर्वप्रथम शोधून काढले, की कॉलरा दूषित पाण्यातून पसरतो. रुग्णांच्या घरोघरी जाऊन माहिती गोळा करून ती नकाशात भरून त्याने सिद्ध केले, की ब्रॉड स्ट्रीटवरील एका हातपंपावरील पाणी पिणाऱ्यांमध्ये कॉलऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ‘स्नो’ने त्या हातपंपाचे हँडल काढून टाकले. त्यांनतर त्या भागातील साथ ओसरली. कॉलरा दूषित पाण्याने पसरतो हे सिद्ध होऊनही लंडन व इतर मोठ्या शहरातील स्वच्छता व पाणीपुरवठा यंत्रणा सुधारण्यास काही दशकांचा वेळ लागला. याच वेळी फिलिपो पॅसिनी या इटलीच्या शास्त्रज्ञाने सूक्ष्मदर्शकाखाली पाहून ‘व्हिब्रिओ कॉलरी’ या जीवाणूंचा शोध लावला.

१८६३-१८७५ कॉलऱ्याची चौथी साथ

कॉलऱ्याची चौथी जागतिक साथ १८६३ मध्ये आशियातूनच सुरू झाली. त्यावर्षीच्या हज यात्रेदरम्यान मक्का येथे जवळपास ३० ते ९० हजार यात्रेकरू कॉलऱ्याने मारले गेले. ही साथ संपुर्ण आशिया, आफ्रिका, युरोप आणि अमेरिका खंडात पसरली. जगभरात तिने लाखो बळी घेतले.

१८८१-१८९६ कॉलऱ्याची पाचवी साथ

ही साथ १८८१ मधील हरिद्वार येथील यात्रेत सुरू झाली. या यात्रेत जवळपास २ लाख लोक कॉलऱ्याला बळी पडले. तिथून ती इजिप्तमार्गे युरोप व अमेरिका खंडात पसरली. इजिप्तमध्ये या साथीमुळे ५८ हजार मृत्यू झाले. १८८४ मध्ये कोलकाता येथे डॉ. रॉबर्ट कुक यांनी कॉलऱ्याच्या जीवाणूंचा पुनर्शोध लावला. पण ३० वर्षानंतरही पेटेनकोफर ( Max Von Petenkoffer) सारख्या पारंपरिक ‘मियास्मा थिअरी’ मानणाऱ्या डॉक्टरांना हे मान्य नव्हते. त्याने ‘कुक’च्या शोधाला जाहीर आव्हान दिले. पेटेनकोफर आणि त्याच्या दोन विद्यार्थ्यांनी ग्लासभर कॉलऱ्याचा जीवाणूने भरलेले पाणी प्याले. सुदैवाने त्यांच्यापैकी कुणालाही कॉलऱ्याची तीव्र लक्षणे दिसली नाहीत. परंतु १८९२मध्ये हॅम्बुर्ग आणि अल्टोना या शेजारी शहरांमध्ये कॉलऱ्याची साथ आली. मैला न मिसळलेले व प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी पुरवणाऱ्या अल्टोनामध्ये साथ आटोक्यात राहिली, तर हे उपाय न केलेल्या हॅम्बुर्गमध्ये तब्बल ८६०० बळी गेले.

त्यानंतर संपूर्ण युरोप आणि अमेरिकेत पाणीपुरवठा व सांडपाणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुधारली. हळुहळु युरोप व अमेरिका खंडात कॉलऱ्याच्या साथिवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

१८९९-१९२३ कॉलऱ्याची सहावी साथ

यांनातरच्या कॉलऱ्याचा जागतिक साथींचा प्रसार गरीब, अविकसित देशांपूरता मर्यादित राहिला. लोक मृत झाले. त्यावेळी भारतात ब्रिटिश प्रशासनाने फक्त इंग्रज अधिकाऱ्यांसाठीच्या स्वच्छता, पाणीपुरवठा इ. सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारल्या होत्या. पण सामान्य भारतीय नागरिकांपैकी १ टक्के लोकांनाही त्याचा लाभ झाला नाही. या साथीत फक्त भारतात जवळपास ८ लाख लोक मृत्युमुखी पडले. रशियात हा आकडा विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दोन दशकात ५ लाख इतका होता.

१९६१- आजपर्यंत कॉलऱ्याची सातवी साथ

ही सगळ्यात जास्त काळ चाललेली साथ आहे. या साथीची सुरुवात इंडोनेशियामध्ये ‘एल टोर’ या कॉलऱ्याच्या नवीन स्ट्रेन मुळे झाली. हळूहळू ही भारत, बांगलादेश, नेपाळ आणि उत्तर आफ्रिकाभर पसरली. या भागातील नियमित होणारे साथीचे उद्रेक सुरूच आहेत. यापैकी सगळ्यात मोठा उद्रेक म्हणजे लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेला हैतीची २०१० पासूनची साथ होय. सध्या येमेन मध्येही २०१६ पासून कॉलऱ्याची साथ सुरू आहे. आत्तापर्यंत जवळपास १२ लाख लोकांना कॉलऱ्याचा संसर्ग झाला आहे, तर २.५ हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत.

कॉलरा

कॉलरा हा ‘व्हीब्रिओ कॉलरी’ या अर्धविरामाच्या आकाराच्या जीवाणूंमुळे होणारा रोग आहे. निसर्गात हा जीवाणू कोपपॉड्स (copepods) या समुद्री पाण्यावर तरंगणाऱ्या छोट्या जीवांवर परोपजीवी पद्धतीने सापडतो. ‘व्हीब्रिओ कॉलरी’ जीवाणू कोपपोड्सच्या शरीरावरील कायटीन (chitin) चे आवरण खाऊन जगतो. त्याचे अनेक स्ट्रेन सापडतात. त्यापैकी ‘व्हीब्रिओ कॉलरी ०१’ आणि ‘०१३९’ मूळे माणसात कॉलरा होतो.

हा जीवाणू दूषित पाण्यातून किंवा अन्नातून शरीरात गेल्यानंतर १/२ ते ५ दिवसात लक्षणे निर्माण करतो.

तांदुळाच्या धुवणासारखे पातळ जुलाब, उलट्या, मळमळ, ही कॉलऱ्याची सुरुवातीची लक्षणे असतात. नंतर तीव्र अतिसारामुळे डोळे खोल जाणे, अशक्तपणा, त्वचा कोरडी, सुरकुतलेली होणे, डोळ्यातून अश्रूसुद्धा न येणे, मूत्रनिर्मिती बंद होणे ही डिहायड्रेशनची गंभीर लक्षणे दिसतात व त्यातच रुग्णाचा मृत्यू होतो. लक्षणे दिसल्यापासून उपचार मिळाले नाहीत, तर १ ते २ दिवसात रुग्णाचा मृत्यू होतो.

कॉलरा जीवाणू मानवी आतड्यांमध्ये गेल्यावर एक प्रकारचे टॉक्सिन निर्माण करतो, त्यामुळे शरीरातील क्षार व पाणी आतड्यामध्ये शोषले जाऊन अतितीव्र असे जुलाब होतात.

कॉलरा होऊ नये म्हणून पिण्याचे स्वच्छ पाणी सगळ्यांना पुरविणे, मैला व सांडपाणी यावर योग्य प्रक्रिया करणे, पाण्याच्या स्रोतापासून सांडपाणी वेगळे ठेवणे, व्यक्तिगत स्वच्छता राखणे, हे उपाय आहेत. कॉलरा प्रतिबंधक लससुद्धा उपलब्ध आहे. ‘ओ आर एस’ ( मीठ साखर पाणी) आणि गरज पडल्यास प्रतिजैविके हे उपचार कॉलऱ्यासाठी केले जातात.

आजच्या संदर्भात कॉलरा

कॉलऱ्यावर प्रतिबंधक उपाय व उपचार इतके सोपे असूनही, जगभरातील ४७ गरीब देशांमध्ये मिळून आजही वर्षभरात जवळपास ३० लाख लोकांना कॉलरा होतो. तर १ लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतातही हे प्रमाण दरवर्षी साधारण ३० हजार इतके आहे.

कॉलरा हा पूर्णपणे टाळता येणारा आजार आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य आणि पाणीपुरवठ्याची व्यवस्था यासाठीची पायाभूत व्यवस्था जगभरातील सर्व देशांमध्ये उभारली पाहिजे. आजही भारतात ५० टक्क्यांपेक्षा कमी घरांमध्ये स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन सुविधा उपलब्ध आहे. खूप लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे विकसित देशांसारखे संपूर्ण कॉलरा नियंत्रण शक्य होत नाही.

आज जगभरातील जवळजवळ ९० टक्के वैद्यकीय संशोधन, हे विकसित देशांच्या प्रथमिकतेनुसार होत आहे. तर संख्येने जास्त असणाऱ्या गरीब देशांच्या गरजांवर फक्त १० टक्के संशोधन होत आहे. यासाठी जागतिक स्तरावर सर्वांनी एकत्र येऊन सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे. तरच ‘सर्वांसाठी आरोग्य’, हे जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकू. अन्यथा ‘कोव्हीड-१९’ सारखेच वेगवेगळे आजार गरीब देशातून आले तरी संपूर्ण मानवजातीला धोका निर्माण करतील आणि कॉलऱ्यासारखे शतकानुशतके रेंगाळत राहतील.

डॉ.तृप्ती प्रभुणे, या डॉक्टर असून, वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक आहेत.

संदर्भ

1) Pandemic: Tracking Contagions, from Cholera to Ebola and Beyond

Book by Sonia Shah

2) Plagues and Peoples

Book by William H. McNeill

3) Indian Cholera : A Myth, Shrabani Sen, Indian journal of history of science, (2012), 345-374

4) https://www.theguardian.com/society/2020/may/01/cholera-and-coronavirus-why-we-must-not-repeat-the-same-mistakes

5) https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/cholera

COMMENTS