हैदराबादेत महिला डॉक्टरवर बलात्कार करून जिवंत जाळले

हैदराबादेत महिला डॉक्टरवर बलात्कार करून जिवंत जाळले

हैदराबाद : शहरापासून दूर असलेल्या एका भागात बुधवारी एका २७ वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४ जणांना अटक केली असून या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे.

ही महिला बुधवारी रात्री ड्युटीवरून घरी परतत असताना एका टोलनाक्यावर तिने पार्क केलेली स्कुटी पंक्चर झालेली दिसली. त्यानंतर या महिलेने आपल्या बहिणीला फोन करून झालेली घटना सांगितली. बहिणीने तिला कॅबने घरी येण्यास सांगितले. दरम्यान दोन युवक तिच्याजवळ आले आणि त्यांनी स्कुटी दुरुस्त करून देऊ असे तिला सांगितले.

त्या महिलेने आपल्या बहिणीला फोन करून स्कुटी दुरुस्त करण्यासाठी काही तरुण मदत करत असल्याचे सांगितले. पण नंतर काही काळानंतर तिचा फोन बंद झाला. अखेर फोन लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांनी तपास सुरू केला असता गुरुवारी सकाळी त्यांना एका बांधकाम सुरू असलेल्या फ्लायओव्हरनजीक अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. या मृतदेहावर असलेला स्कार्फ व कपड्यांवरून महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी तिची ओळख पटवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन युवकांच्या मदतीवर महिला डॉक्टरने विश्वास ठेवला आणि ती वाट पाहात बसली. या दरम्यान टोलनाक्याच्या रस्त्यावर एकेक करून ट्रक येऊन थांबत होते. या ट्रकचा आसरा घेत त्या युवकांनी महिला डॉक्टरला झाडीत फरफटत नेले आणि तिच्यावर सामूहीक बलात्कार केला. नंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह काही किमी अंतरावर नेऊन जाळला. पोलिसांना घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर त्या महिलेची अंत:वस्त्रे मिळाली, त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे.

पोलिस टोलनाक्यावर उभ्या असलेल्या सर्व ट्रक चालकांचीही चौकशी करत आहेत.

झारखंडमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार, १२ जणांना अटक

रांची : कायद्याच्या शाखेत शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीवर सामूहीक बलात्कार झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली असून त्यामध्ये दोन आरोपी अल्पवयीन आहे. ही घटना २६ नोव्हेंबर झाली असे पोलिसांचे म्हणणे आहे.

ही तरुणी आपल्या मित्रासोबत बस स्टॉपवर उभी असताना मोटार सायकलवरून दोन तरुण तिथे आले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून त्या तरुणीचे अपहरण केले.

काही अंतर पार केल्यानंतर त्यांच्या मोटार सायकलमधील पेट्रोल संपले. त्यामुळे त्या दोन तरुणांनी आपल्या काही साथीदारांना तिथे बोलावले व नंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन त्या तरुणीवर बलात्कार केला. या आरोपींनी नंतर आणखी काही मित्रांना बोलावले व त्या तरुणीवर पुन्हा बलात्कार करण्यात आला. रात्री १० च्या सुमारास या आरोपींनी त्या तरुणीला मोटार सायकलवरून संग्रामपूर येथे सोडून दिले.

या सर्व घटना घडत असताना त्या मुलीच्या मित्राला आरोपींकडून धमकावले जात होते व त्याला ठार मारण्याची धमकी दिली जात होती. या सर्व झटापटीत एका आरोपीचा मोबाइल क्रमांक तरुणीच्या मित्राला मिळाला. त्याने पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर सर्व घटनेचा उलगडा झाला.

पीडित तरुणीने बुधवारी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची त्वरित दखल घेत १२ जणांना ताब्यात घेण्यात आले. या १२ जणांनी आपला गुन्हा कबूल केला असून त्यांच्याकडील बंदुकही ताब्यात घेतली आहे. या तरुणांवर यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS