मी आणि गांधीजी – ४

मी आणि गांधीजी – ४

गांधी समजून घेताना - महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांच्या जन्माला १५० वर्ष होत आहेत. काळाचा मोठा फरक असला तरी गांधीमुल्य कायम आहेत का? काळाच्या कसोटीवर गांधींचे विचार कसे उतरतात? एका तरुणाचा महात्मा गांधी यांच्याशी निरंतर संवाद सुरु आहे. खरेतर गांधींच्या बरोबर, हा संवाद कोणाचाही होऊ शकतो.

मी आणि गांधीजी – ३
बीडीडी चाळींचे ठाकरे, पवार, गांधी असे नामकरण
गांधी, थोरो आणि सविनय प्रतिकार

२२

मी : तुकडा सॉंग आहे हे…तुकडा! ऐकताना अंगात बळच संचारतं एकदम…
गांधीजी : खरं आहे. शब्द फार ताकदीचे आहेत.
मी : येस! अमिताभ भट्टाचार्य…
गांधीजी : कशातलं गाणं आहे हे?
मी : ‘दंगल’ नावाचा एक सिनेमा येऊन गेला मागच्या वर्षी. त्याचं टायटल सॉंग आहे…
गांधीजी : हां, हां… तो कुस्तीवरचा ना..
मी : अरे! तुम्हाला माहितीय?
गांधीजी : हो, चर्चा वाचली त्यावरची..
मी : बरं. चांगला सिनेमा आहे. मुलींना ट्रेनिंग देऊन रेसलिंग शिकवणारा बाप. थोडा कठोर होतो पण शेवटी मुलींचं भलं होतं.
गांधीजी : हो. त्या मेडल जिकंतात.
मी : हो. फार मस्त उलगडते स्टोरी.
गांधीजी : अच्छा
मी : सगळ्यांचा अभिनय कडक झालाय…
गांधीजी : कडक म्हणजे चांगला…बरोबर ना?
मी : हो हो.. चांगला.
गांधीजी : पण काय रे…
मी : काय?
गांधीजी : समजा त्याला पहिला मुलगा झाला असता आणि नंतर मुलगी… तर त्याने मुलीला रेसलिंग शिकवलं असतं का?
मी : तुम्ही सिनेमे बघत नाही तेच बरंय…

२३

गांधीजी : काय, बोअर होतंय वाटतं?
मी : का? असं का विचारलंत?
गांधीजी : मोबाइल, आजचं वर्तमानपत्र आणि नेटफ्लिक्स या तीन गोष्टी गेल्या पंधरा मिनिटात आळीपाळीने हाताळल्यास म्हणून विचारलं.
मी : हं, सूक्ष्म निरीक्षण आहे तुमचं.
गांधीजी : सूक्ष्म कसलं? तू इतक्या स्थूलमानाने हालचाली करतोयस…लक्षात येणारच.
मी : हा चांगला होता.
गांधीजी : पण बोअर होतंय की नाही?
मी : निर्णय होत नाहीये.
गांधीजी : कसला?
मी : आयुष्यात काय करावं याचा…
गांधीजी : मी काय म्हणतो…तू पाच एक किलोमीटर चालयचं किंवा पळायचं ठरवून पाच एक किलोमीटर चालत किंवा पळत का नाहीस?
मी : कशाला?
गांधीजी : अरे, आयुष्यातला एक तरी निर्णय होईल ना म्हणजे…
मी : करा, मस्करी करा. पण मी जो विचार करतोय ना त्याला एक्झिस्टेन्शियल क्रायसिस म्हणतात.
गांधीजी : अच्छा, म्हणजे यात मरणाचं बोअर होतं का?
मी : नाही हो…म्हणजे होतं, पण काही मूलभूत प्रश्न पडल्याने तसं होतं.
गांधीजी : मूलभूत म्हणजे आपल्या अस्तित्वाचं प्रयोजन वगैरे. आपण काय करायला हवं इ. बरोबर ना?
मी : अरे, माहितीय की तुम्हाला! तुम्हाला आहे का असा अनुभव?
गांधीजी : क्वचित केव्हातरी. पण कामंच एवढी असायची…
मी : हं. तुमच्या वेळेला डिस्ट्रॅक्शन्स नव्हती हे बरं होतं.
गांधीजी : डिस्ट्रॅक्शन्स असतातच अरे. मलाही होती.
मी : मग?
गांधीजी : मग काय? माझ्याकडे इंटेग्रिटी होती.
मी : हं. आमच्याकडे तीच तर नाही ना…
गांधीजी : आहे.
मी : मग प्रॉब्लेम काय आहे?
गांधीजी : ती डाउनलोड होत नाहीये.

२४

गांधीजी : लिहिणं चाललंय वाटतं?
मी : हो
गांधीजी : कशावर?
मी : धर्म आणि धर्मनिरपेक्षता.
गांधीजी : बरं बरं.
मी : बाय द वे, तुम्हांला या मुद्यावर बरेचदा टारगेट केलं जातं.
गांधीजी : मला बऱ्याच मुद्द्यांवर टारगेट केलं जातं.
मी : मग, काय वाटतं तुम्हाला?
गांधीजी : वेगवेगळे दृष्टीकोन असतात आणि दृष्टीकोन तयार झाला की एकीकडे टारगेट आपोआप तयार होतंच. पॉझिटिव्ह-निगेटिव्ह दोन्ही अर्थाने. त्यामुळे हे चालायचंच.
मी : पण लोकांना नीट माहितीही नसते बरेचदा आणि असते ती चुकीची असते.
गांधीजी : हो. यावरून आठवलं. एकदा काय झालं… मी एकाकडे कापड रंगवायला दिलं होतं. त्याला सांगितलं की रंग एकदम पक्का लाव. जायला नको. तो म्हणाला किती पक्का? मी म्हटलं गैरसमजाइतका!
मी : करेक्ट आहे…हा किस्सा वाचलाय मी.
गांधीजी : तूही लक्षात ठेव म्हणजे झालं.
मी : हो. पण मला ही विशेष सूचना का?
गांधीजी : काही नाही. समजूतदार वगैरे आहेस म्हणून.

२५

गांधीजी : अरे, हे काय रे?
मी : काय झालं?
गांधीजी : लोकांनी मोर्चा काढला.
मी : कुठे?
गांधीजी : नालासोपारा.
मी : हां, हां…ते होय. ते काही तेवढं महत्त्वाचं नाही.
गांधीजी : अरे, पण दहशतवादी कृत्य करू पाहणाऱ्याचं समर्थन करणं हे तुला चिंताजनक नाही वाटत?
मी : दहशतवादी वगैरे काही नाही हो.
गांधीजी : अरे, पण त्याच्याकडे बॉम्ब सापडले की.
मी : ते ठीक आहे. पण दहशतवादी म्हणू नका हो.
गांधीजी : का बरं?
मी : कारण तसं शास्त्र आहे.

२६

गांधीजी : अरे वा! आज तू चक्क प्रार्थनेला?

मी : हो….यावंसं वाटलं.

गांधीजी : काही विशेष? नेट डाऊन आहे का?

मी : नाही, चालू आहे. आणि तुम्ही असं टोचून बोलू नका.

गांधीजी : सॉरी, सॉरी… प्रकरण गंभीर आहे असं म्हणायला हरकत नाही.

मी : हं.

गांधीजी : एक्झिस्टेन्शियल क्रायसिस?

मी : नाही.

गांधीजी : मग काय? प्रेमात बिमात पडलास का परत?

मी : नाही…नाही…

गांधीजी : मग?

मी : राजकारण.

गांधीजी : राजकारणाचं काय आता?

मी : वातावरण फार बिघडलं हो.

गांधीजी : हं. कशामुळे?

मी : एक तर सोशल मीडियामुळे.

गांधीजी : म्हणजे माणसांमुळे नाही?

मी : माणसांमुळेच. पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला ना.

गांधीजी : बरं. पण मग तू काय करणार आहेस?

मी : तेच तर कळत नाही.

गांधीजी : शाब्बास!

मी : कशाबद्दल?

गांधीजी : तुला मूळ प्रॉब्लेम कळला त्याबद्दल.

२७

मी : इकडून टर्न घ्या आता. उजवीकडे.

गांधीजी : बरं.

मी : जमतंय ना? ब्रेकवरचा पाय काढू नका.

गांधीजी : जमतंय, जमतंय.

मी : बाइक जड आहे खूप. पण मनूव्हरिंग सोपं आहे.

गांधीजी : हो. मॉडेल कुठलं हे?

मी : थंडरबर्ड.

गांधीजी : ओके. अरे, पोचलो की आपण.

मी : येस.

गांधीजी : वा! मजा आली हां.

मी : मग, करताय का बुक?

गांधीजी : नाही रे. मी आपला बसने किंवा चालतच जातो सगळीकडे. मला तेच सूट होतं.

मी : अहो, ठीक आहे. रॉयल एनफिल्ड भारतीय कंपनी आहे.

गांधीजी : ते झालं रे. कंपनी भारतीय असण्या-नसण्याचा मुद्दा नाही. मुद्दा इंटेंशनचा आहे.

मी : म्हणजे?

गांधीजी : म्हणजे…. मला सांग युनिलिव्हर, डाबर किंवा प्रॉक्टर अँड गॅम्बल वगैरे कंपन्या साबण-तेल-पावडर आणि इतर अनेक उत्पादनं विकतात. बरोबर?

मी : हो. मग?

गांधीजी : मग मुद्दा हा की साबण आणि तेलाच्या असंख्य व्हरायटीज असणं गरजेचं आहे का? आपल्या देशाची ती गरज आहे का?

मी : गरजेची व्याख्या करता येत नाही ना.

गांधीजी : तिथेच तर गफलत आहे.

मी : म्हणजे?

गांधीजी : गरजेची व्याख्या करता येते.

मी : कशी काय?

गांधीजी : आता हे मी तुला सांगावं म्हणजे कमाल आहे. मार्केटिंगचं मूलतत्त्व काय?

मी : काय?

गांधीजी : काय काय काय? जाहिराती लिहितोस ना शुंभा…

मी : हो, पण ते आपलं लिहिता येतं म्हणून.

गांधीजी : मार्केटिंग म्हणजे गरजेला नाही तर इच्छेला प्रभावित करणं. केसांचं आरोग्य ही झाली गरज. त्यासाठी बाजारातलं तयार तेलच मी विकत घेतलं पाहिजे ही झाली इच्छा. तेल निर्माण करून खरेदीचे पर्याय निर्माण करणं हा झाला व्यवसाय. त्यात आपल्या तेलाचा खप व्हावा म्हणून आपल्या तेलाकडे लोकांच्या इच्छेला वळवणं हे झालं मार्केटिंग.

मी : हां, हां. बरोबर.

गांधीजी : मला केस नाहीत ते सोड आता.

मी : बरं, सोडलं.

गांधीजी : थट्टा करतोस माझी?

मी : अहो, नाही. खरंच नाही.

गांधीजी : बरं…तर तेल सोड. तुझी थंडरबर्ड घे. तुझी गरज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं ही आहे. थंडरबर्ड नाही. थंडरबर्ड ही तुझी इच्छा आहे.

मी : बरोबर, बरोबर.

गांधीजी : माझा शोध गरजेचं नियमन बाजाराशिवाय करता येईल का हा आहे. माझी गरज इच्छेपर्यंत जायच्या आधी मला काही करता येईल का हे मी बघत असतो.

मी : अहो, पण थंडरबर्डचं डिझाइन कातिल आहे.

गांधीजी : आहेच की. मी ते नाकारत नाही. तो माझ्या चिंतेचा विषयही नाही.

मी : मग तुम्हाला चिंता कसली वाटते?

गांधीजी : कातिल गोष्टींमुळे तुझी कत्तल होत राहते आणि तुला ते कळतही नाही याची.

उत्पल व. बा., हे लेखक आणि संपादक आहेत.

क्रमशः

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1