मी आणि गांधीजी – ५

मी आणि गांधीजी – ५

गांधी समजून घेताना - महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांच्या जन्माला १५० वर्ष होत आहेत. काळाचा मोठा फरक असला तरी गांधीमुल्य कायम आहेत का? काळाच्या कसोटीवर गांधींचे विचार कसे उतरतात? एका तरुणाचा महात्मा गांधी यांच्याशी निरंतर संवाद सुरु आहे. खरेतर गांधींच्या बरोबर, हा संवाद कोणाचाही होऊ शकतो.

मी आणि गांधीजी – ८
‘मोदींचे वर्तन पंतप्रधानपदाला साजेसे नाही’
मी आणि गांधीजी – ४

२८

मी : बकवास!

गांधीजी : काय झालं रे?

मी : मला काही नाही झालं. याला होत असतात.

गांधीजी : काय?

मी : कविता.

गांधीजी : हं.

मी : म्हणजे माणूस चांगला आहे. पण कविता करतो.

गांधीजी : हं.

मी : कविता ही एक गंभीर गोष्ट आहे.

गांधीजी : अच्छा.

मी : आधी भरपूर वाचा, मनन करा…अनुभूतींना भिडायला शिका. खरेखुरे अस्वस्थ झालात, आतून असे ढवळून निघालात, जगणं आणि जाणिवा तावून-सुलाखून निघाल्या तरच चांगली कविता लिहिली जाईल. उगा आपलं मीपण, मीपण म्हणून र ला ट जुळवून कविता कशाला पाडायच्या? सर्दी झाली म्हणून हॉस्पिटलाइज होतं का कुणी?

गांधीजी : हं.

मी : आपण आपल्या कवितांची समीक्षा करायला नको?

गांधीजी : हं.

मी : संपादक ही संस्था जवळजवळ नामशेष झाल्यापासून प्रॉब्लेम झालाय सगळा.

गांधीजी : ‘बोटी बंद झाल्यापासून हा त्रास आहे’च्या चालीवर म्हणता येतंय हे…

मी : म्हैस?? तुम्हीसुद्धा?

गांधीजी : तू ऐकताना ऐकली आहे.

मी : ओके.

गांधीजी : पण काय रे?

मी : काय?

गांधीजी : तू इतकी चिडचिड कशाला करतोस?

मी : म्हणजे काय? अहो कवितेवर प्रेम आहे माझं.

गांधीजी : तेच तर. प्रेम आहे तर इतका त्रागा का?

मी : जेन्युइन प्रेमाचं लक्षण आहे ते. प्रेमाच्या गोष्टीची वाट लागताना दिसली की त्रागा होतोच.

गांधीजी : अच्छा! मला कवितेतलं काही कळत नाही. पण एक गोष्ट कळतेय.

मी : कुठली?

गांधीजी : तुझा कॉन्फिडन्स…

मी :मग! या बाबतीत मी ऐकणार नाही कुणाचं…

गांधीजी : हो. आणि त्याचीच मला काळजी वाटते.

२९

मी : आज काय फ्लेक्स-बिक्स लावायचे की नाही?

गांधीजी : कशाबद्दल?

मी : अहो आज वाढदिवस तुमचा…

गांधीजी : हं.

मी : काय झालं हो?

गांधीजी : कुठे काय?

मी : मूड डाऊन दिसतोय…

गांधीजी : छे! अजिबात नाही

मी : ठीक आहे. पण आज वाढदिवस आहे तर जरा एन्जॉयमेंटच्या विशेष मूडमध्ये शिफ्ट व्हा की. जगाची काळजी नंतर करा…

गांधीजी : जगाची काळजी करणारा मी कोण?

मी : एवढं ढीगभर लिहून ठेवलंय ते कशाकरता मग?

गांधीजी : अंतःप्रेरणा.

मी : आणि व्याख्यानं, उपोषणं, चळवळ वगैरे?

गांधीजी : तीही अंतःप्रेरणाच.

मी : तसं तर मग सगळंच अंतःप्रेरणेने होतं.

गांधीजी : करेक्ट…

मी : पण त्याचे ट्रिगर पॉईंट्स बाहेर असतात ना…

गांधीजी : असू देत की. पण कर्ता कोण? तर अंतःप्रेरणा.

मी : तुमचं ना, दर वेळी वेगवेगळंच रियलाझेशन असतं.

गांधीजी : करेक्ट! आणि तेच माझं सेलिब्रेशन आहे…जवळजवळ रोजचं…

मी : मग वाढदिवसाला वेगळं कशाला असंच ना?

गांधीजी : अरे वा! शिकलास की…

मी : ऑप्शन नाहीये.

गांधीजी : ही तारीफ आहे की टोमणा आहे?

मी : माझं रियलायझेशन आहे.

गांधीजी : अच्छा है…बहोत अच्छा!

मी : तुम्हीही शिकलात की!

गांधीजी : मलाही ऑप्शन नाहीये.

मी : ही तारीफ आहे की टोमणा आहे?

गांधीजी : टोमणा आहे.

३०

गांधीजी : हे काय रे बघत असतोस?
मी : अरे, तुम्ही आलात होय.
गांधीजी : हो…अरे, चष्म्याचं दुकान बंदच होतं. म्हणून लगेच आलो.
मी : ओके.
गांधीजी : तर मुद्दा असा की हे काय भयंकर बघतोयस?
मी : हां…सिनेमा व्हायोलंट आहे. पण पोएटिक व्हायोलंस आहे.
गांधीजी : पोएटिक व्हायोलंस? म्हणजे काय आता?
मी : पोएटिक व्हायोलंस म्हणजे व्हायोलंसच…पण पोएटिक. म्हणजे लय व्हायोलंस म्हणा ना…
गांधीजी : तुला लै व्हायोलंस म्हणायचंय का?
मी : नाही हो. ते लै वेगळं…म्हणजे लैच वेगळं. ही लय…ऱ्हिदम.
गांधीजी : असो. तुझं हे पोएटिक व्हायोलंस प्रकरण मला कळेल असं वाटत नाही.
मी : तुम्ही ना अ‍ॅक्चुअली सुखी आहात…
गांधीजी : का बरं?
मी : कारण तुमचं एकूण जगणं सिम्प्लिफाइड आहे. तुम्हाला आर्टिस्टिक कॉम्प्लेक्सिटीज फारशा प्रभावित करत नाहीत.
गांधीजी : आर्टिस्टिक कॉम्प्लेक्सिटीज…हं…
मी : ‘हं’ म्हणजे?
गांधीजी : म्हणजे काही नाही..
मी : नाही. त्या ‘हं’ मध्ये तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं वाटत होतं.
गांधीजी : काही नाही रे…मला असं वाटलं एकदम की आपण आर्टला कधी भिडलो नसल्याने आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत. पण मग जाणवलं की आपण जगण्याला भिडलो आहोत…असा तो एक जाणिवेचा कॉम्प्लेक्स ‘हं’ होता…मला पोएटिक व्हायोलंस कळणार नाही आणि तुला बहुधा व्हायोलंस कळणार नाही.
मी : का बरं?
गांधीजी : कारण तू सिनेमे पाहिले आहेस, पण नौखाली पाहिलेली नाहीस.

३१

गांधीजी : शाम-ए-गम की कसम? शेप ऑफ यू वरून शाम-ए-गम की कसम?
मी : पोस्ट मॉडर्न प्लेलिस्ट आहे ही.
गांधीजी : काय?
मी : काही नाही.
गांधीजी : काय? झालंय काय? तुझ्यात तो जोश म्हणतात तो दिसत नाही. व्हेअर इज द जोश? गाण्याने मूड घडवायच्या ऐवजी बिघडवलेला दिसतोय.
मी : सिंगल पुरूषाची लक्षणे जागी झाली हो गाण्यामुळे…
गांधीजी : अरे! मागे तुझी एक मैत्रीण यायची ती? मला वाटलं की…
मी : काय वाटलं?
गांधीजी : की देअर इज मोअर दॅन फ्रेंडशिप…
मी : झालं…
गांधीजी : आता काय?
मी : विशिष्ट वेळी विशिष्ट विषयावर इंग्लिशमध्ये बोलण्याची सवय तुम्हालाही जडतेय.
गांधीजी : हं…पण ते सोड. त्या मैत्रिणीचं काय?
मी : काय नाय हो. मला लिव्ह इन नको होतं.
गांधीजी : आणि तिला?
मी : तिला हवं होतं.
गांधीजी : अच्छा. मग सप्तपदी वगैरे घ्यायच्या इच्छेने घात केला का तुझा?
मी : अरे! मला वाटलं तुम्ही लग्नाच्या बाजूने आहात.
गांधीजी : हो. पण आता पर्याय उभा आहे तर विचार करायला काय हरकत आहे?
मी : इंटरेस्टिंग. पण का कुणास ठाऊक, फॉर सम अननोन रीझन मला लग्नच करावंसं वाटलं हो…डेंजर ना?
गांधीजी : अरे ते कल्चरल बॅगेज आहे. ते असू शकतं.
मी : पण तिला नाहीये…
गांधीजी : वेल, शी वुड हॅव हर रीझन्स. यू शुड टॉक टू हर.
मी : आपण मराठीत बोलूया का?
गांधीजी : बरं.
मी : बोलू म्हणता तिच्याशी?
गांधीजी : हो.
मी : बरं. बोलतो. पण वाटाघाटी फिसकटल्या तर?
गांधीजी : तर तू आणि तुझी सिंगलता आहेच की…तुझी ओरिजिनल प्रेयसी! लव्ह दाय सिंगलता.
मी : आणि वाटाघाटी यशस्वी झाल्या तर?
गांधीजी : मग काय? चौघे आनंदात राहा.
मी : चौघे?
गांधीजी : तू, ती आणि दोघांच्या सिंगलता.

३२

मी : तुम्हाला कधी कुणाच्या कानफटात द्यावी असं वाटलंय का हो?
गांधीजी : कायतरी गडबड आहे. भांडलास काय कुणाशी?
मी : नाही तर. मी हायपोथेटिकल प्रश्न विचारू शकत नाही का? प्रत्येक वेळी काहीतरी घडल्याने मी दुःखी-कष्टी होतो आणि मग त्याला धरून तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतो असं जे तुम्ही समजता ना ते मला अजिबात आवडत नाही!
गांधीजी : ओह…माय मिस्टेक. सॉरी… एकदम मनापासून…
मी : ओके. आता प्रश्नाचं उत्तर…
गांधीजी : ओके. राग आलेला आहे. पण मारावंसं वगैरे नाही वाटलेलं. खरंच.
मी : राग किती आलाय?
गांधीजी : आता हे मोजायचं कसं?
मी : मन अशांत राहिलं खूप काळ तर राग जास्त आलाय असं समजायचं.
गांधीजी : जास्त काळाची व्याख्या?
मी : व्यक्तिसापेक्ष आणि ‘रागाचं-कारण-सापेक्ष’ आहे. पण आपण साधारण एक-दोन दिवस धरू.
गांधीजी : छे! एक दिवसही नाही. असलाच तर एखादा तास…
मी : आणि नंतर?
गांधीजी : नंतर काय?
मी : म्हणजे नंतर त्या माणसाबद्दल कोणती भावना असायची?
गांधीजी : प्रेमाची. कारण तो मानवी नात्यांचा पाया आहे. किमान असला पाहिजे.
मी : हं…
गांधीजी : काय झालं? ‘हं’ एकदम डिप्रेसिंग होता…आयडियलिस्टिक भंकस वाटलं का माझं बोलणं?
मी : अरे…तुम्ही शब्द जबराट शिकताय.
गांधीजी : थँक्स..
मी : नाही…अगदी भंकस असं नाही म्हणणार मी.
गांधीजी : पण ‘प्रॅक्टिकल’ नाहीये वगैरे…
मी : समथिंग लाइक दॅट.
गांधीजी : तुला एक सांगू का?
मी : काय?
गांधीजी : हे जे ‘प्रॅक्टिकल’ प्रकरण आहे ना हे बरेचदा आडवं येतं.
मी : कशाच्या?
गांधीजी : नवीन ‘प्रॅक्टिकल’ निर्माण करण्याच्या.
मी : तसं नाही अहो…होतं काय की थिअरीमध्ये गोष्टी चांगल्याच वाटतात.
गांधीजी : बरोबर… आणि म्हणूनच ‘प्रॅक्टिकल नाहीये’ ही थिअरी बहुतेकांना चांगली वाटते.

उत्पल व. बा., हे लेखक आणि संपादक आहेत.

क्रमशः

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0