आयआयटी मद्रासमध्ये १०० विद्यार्थ्यांना कोरोना

आयआयटी मद्रासमध्ये १०० विद्यार्थ्यांना कोरोना

चेन्नईः आयआयटी मद्रास येथे १०० हून अधिक विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने हा पूर्ण कँपस आता बंद करण्यात आला आहे.
गेली काही दिवस आयआयटी मद्रास येथे अध्यापनाचे काम कमीत कमी विद्यार्थी संख्येत सुरू करण्यात आले होते. तसेच वसतिगृहात १० टक्के विद्यार्थ्यांना वास्तव्यास परवानगी देण्यात आली होती. पण काही दिवसापासूनच येथे कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला. कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव पाहून येथील सुमारे ७०० जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये प्राध्यापक, विद्यार्थी तसेच काही कर्मचारी यांचा समावेश होता. या चाचणीत १०० हून अधिक जण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले.

याबाबत इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार १०० जण कोरोनाचे बाधित असल्याचा आकडा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आल्याने अखेर आयआयटी प्रशासनाने प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

जे १० टक्के विद्यार्थी सध्या वसतिगृहात आहेत त्यांना तूर्तास वसतिगृह बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना हवाबंद डब्यातून जेवण आणि इतर गोष्टी देण्यात येत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आयआयटी मद्रासने काही प्रमाणात कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला अनेक जणांनी विरोध केला होता. पण अखेर इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने आता हा कॅम्पस बंद करून येथे लॉक डॉउन लावण्यात आला आहे.

COMMENTS