ओबडधोबड गुणवत्तेचे अविश्वसनीय यश

ओबडधोबड गुणवत्तेचे अविश्वसनीय यश

एकाच मालिकेत ३६ धावांचा कसोटी निचांक आणि त्यानंतरच्या कसोटीत मालिक जिंकणारा भारतीय संघ हा एकमेवद्वितीयच.

इंग्लंडचा भारत दौरा: भारताची सव्याज परतफेड..
संकट काळात भारतीय स्टार क्रिकेटर आहेत कुठे?
जामीनावरील प्रज्ञा ठाकूरांच्या हातात क्रिकेटची बॅट

१९ डिसेंबर २०२० ते १९ जानेवारी २०२१ या महिन्याच्या कालावधीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये अविश्वसनीय रंग दाखवले. २० सामान्य भारतीयांनी असामान्य कामगिरी केली. भारताच्या विविधतेतील एकता, ताकद, जिद्द कांगारुंच्या देशात अवतरली. एडिलेडमधील अपयशी कसोटीत खेळलेल्या संघातील अवघे तिघे जणच ब्रिस्बेन कसोटीच्या संघांपर्यंत टिकले. ज्यांनी आपल्या रणजी संघासाठी प्रथम नवा चेंडू टाकला नाही ते ऑस्ट्रेलियन फलंदाजांना लिली-थॉम्सन यांच्यापेक्षा भेदक वाटले. काल परवाचा कसोटी क्रिकेट खेळायला सुरूवात केलेला शुभमन गिल दादासारखा फलंदाजी करत होता. चेतेश्वर पुजारा-अजिंक्य रहाणे हे आपले सध्याचे कसोटी क्रिकेटमधील फलंदाजीचे भक्कम, बुलंद बुरुज. पण जेव्हा शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर यांच्यासारख्यांनी खेळपट्टीवर पाय रोवले, तेही ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर सर्वोत्तम गोलंदाजी करणार्या आक्रमणासमोर, त्यावेळीच क्रिकेटच्या नव्या इतिहासाची चाहुल लागली. प्रत्येक कसोटीगणिक जायबंदी खेळाडूंची यादी वाढत असताना भारतीय संघाने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.

विद्यमान कप्तान विराट कोहलीपेक्षा कसोटीमध्ये नेतृत्वात अजिंक्य रहाणे सरस आहे हे आता वारंवार सिद्ध झाले आहे. जेव्हा अजिंक्यचे हे नेतृत्वगुण प्रकर्षाने पुढे आले त्या वेळी त्याला मागे खेचण्याची जाहिरात, पुरस्कर्ते यांच्या एजंटांची कटकारस्थाने सुरू झाली. भारतातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील यशानंतर अजिंक्यची ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांमधून गच्छंती झाली. ऑस्ट्रेलियातील त्याच्या यशामुळे त्याच्यापुढे काय वाढून ठेवले आहे, हे लक्षात येण्यासारखे आहे.

काल परवाच बीसीसीआयने त्याची झलक दाखवून दिली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध खेळणार्या संघांची घोषणा त्यांनी करूनही टाकली. त्यातही आश्चर्य असे की, जो नटराजन ऑस्ट्रेलियातील यशाचा महत्त्वाचा शिलेदार होता, त्याला संघातून वगळण्यात आले.

तिजोरी पडून असलेल्या पैशातील पाच-दहा कोटी रु.ची खेळाडूंवर बक्षिसी उधळली की आपले काम झाले असे बीसीसीआय आणि त्यांच्या पदाधिकार्यांना वाटते. यावेळीही त्यापेक्षा वेगळे असे काहीही केले गेले नाही. देशाचे आणि पर्यायाने आपापल्या समाजाचे नाव रोशन करणार्यांना बीसीसीआय पैसे देते त्या बक्षिसीपेक्षा आयपीएलसारख्या लिग त्यांना अधिक पैसे देतात, हे कटू सत्य आहे. बीसीसीआयने यापेक्षा अधिक आणि काहीतरी वेगळे करावे.

संघ जिंकला की अभिनंदनाचे संदेश राजकीय नेत्यांकडून केले जातात. त्यातून हे नेते स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याची संधी सोडत नाही. पंतप्रधानांना खरोखरच या संघाच्या यशाबाबत काही वाटत असेल तर त्यांनी येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी किंवा परेडमध्ये या असामान्य कामगिरी करणार्या सामान्य २० भारतीय क्रिकेटपटूंना सामावून घ्यावे. पुरस्कारांच्या यादीत त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली जावी. जी तत्परता अभिनंदनाचे संदेश पाठवताना दाखवली जाते तीच कृती करण्याची वेळ आता आली आहे. नाहीतर प्रथेप्रमाणे या पैकी काही खेळाडूंना काही वर्षांनी मानाचे पुरस्कार मिळतील. पण तोपर्यंत ऑस्ट्रेलियातील यशाची चव आठवणींच्या ओठावरून कधीची विरलेली असेल.

१९ ड़िसेंबर २०२०ला भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडिलेड कसोटीत ३६ धावांचा निचांक नोंदवला. कसोटी क्रिकेटचा तळ गाठला.

१९ जानेवारी २०२१मध्ये त्यानंतरच्या कसोटींमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारून भारतीय क्रिकेट संघ कसोटी क्रिकेटच्या अव्वल स्थानावर होता.

आकडेवारी बाजूला ठेवा. कोणत्याही ऑस्ट्रेलियन संघाला ऑस्ट्रेलियात हरवणे कठीण आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाजीचा मारा पूर्ण भरात होता. तमाम क्रिकेट पंडितांनी, माजी कसोटीपटूंनी भारताचा ४-० असा पराभव सांगितला होता. त्या प्रत्येक क्रिकेट तज्ज्ञांचे दात भारतीय क्रिकेट संघाने घशात घातले.

भारतीय संघ अगदीच कच्चा, अननुभवी, त्यात संघाचा सेनानी विराट शस्त्रे टाकून पळालेला, प्रत्येक सामन्यागणिक आणि डावागणिक बिनीचे सारे मोहरे जायबंदी होत जाणारा होता. शेवटच्या कसोटीत तर ११ जणांनी संख्या तरी पूर्ण भरते की नाही शंका वाटावी अशी परिस्थिती संघापुढे आलेली.

कोहलीने सोडलेली जबाबदारी अजिंक्य रहाणेने स्वीकारली. महंमद शमी नंतर जसप्रीत बुमराही जायबंदी झाला आणि आपापल्या रणजी संघातर्फे खेळतानाही नवा चेंडू प्रथम न हाताळण्याची संधी मिळणार्या सिराज, नटराजन, शार्दुल ठाकूर यांच्यावर वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणाची जबाबदारी आली. रवींद्र जाडेजा जायबंदी झाल्यानंतर अष्टपैलू खेळाडूही संघाकडे राहिला नाही. अशा परिस्थितीत वॉशिंग्टन-ठाकूर यांची शतकी भागीदारी संघाला वेगळाच आत्मविश्वास देऊन गेली.

विजयासाठी सव्वातीनशे धावसंख्येचे लक्ष्य गाठताना पुजाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचे आपटीबार तंत्राचे आक्रमण आपल्या खडूस वृत्तीने आणि शरीराने थोपवले. त्यानंतरच भारतीय क्रिकेटच्या ऐतिहासिक मालिकेच्या विजयाची पायाभरणी खर्या अर्थाने झाली.

कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा ऋषभ पंत आणि रहाणेच्या कप्तानपदाखाली खेळणारा पंत हे दोघे वेगळे फलंदाज होते. त्याच्यातला आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. त्यात ऑस्ट्रेलियन संघ वाहून गेला.

३२ वर्षांनी ऑस्ट्रेलियन संघ ब्रिस्बेनच्या आपल्या बालेकिल्ल्यात पराभूत झाला. आतापर्यंत फक्त इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज याच संघांना ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करता आले होते. भारत त्या पंक्तीत बसताना तसा पराक्रम करणारा पहिला आशियाई व आफ्रिकन खंडातला संघ ठरला. एकाच मालिकेत ३६ धावांचा कसोटी निचांक आणि त्यानंतरच्या कसोटीत मालिक जिंकणारा भारतीय संघ हा एकमेवद्वितीयच.

भारतीय संघाच्या या यशाबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू आणि विद्यमान संघाचा प्रशिक्षक जस्टीन लँगरने दिलेली प्रतिक्रिया किती बोलकी आहे, पाहा. लँगर म्हणतो, जगातल्या तमाम क्रिकेट संघानो सावधान. भारतीय संघाशी खेळताना कोणत्याही ११ खेळाडूंच्या संघाला, संचाला कमी लेखू नका, कारण ते ११ खेळाडू कोणतेही असूद्या, त्यांना अनुभव नसेना का, त्यांचे नावदेखील चर्चेत नसेलही, परंतु ते दीडशे कोटींमधील किंवा त्यामधून निवडलेले सर्वोत्तम खेळाडू आहेत, हे विसरू नका.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीनंतर भारतीय संघाला कमी लेखल्याबद्दल लँगरने टीका केली आहे. क्रिकेट विश्वाला सावध करताना लँगरने, इशारा दिला आहे की, चुकूनही भारतीय संघाला कमी लेखू नका, संघातील खेळाडू कोणीही असोत.

ज्यांच्या गाठी एकही कसोटी नाही किंवा ज्यांनी एखाद-दुसरा कसोटी सामना खेळला आहे, असे खेळाडू संकटसमयी धीरोदत्त कसे बनले? याचे श्रेय जाते राहुल द्रविडला. जो भारताच्या ज्युनियर संघाच्या प्रशिक्षणाकडे लक्ष देत आहे. शुभमन गिलपासून मयांक अगरवाल, शार्दुल, पंतपर्यंतची मुले द्रविडच्या छत्रछायेखाली प्रशिक्षित झाली. क्रिकेटचा खडूसपणा त्यांच्या नसानसात भिनला. आयपीएलसाठीची निवड हा कधीही निकष किंवा ध्येय मानू नका. तुम्ही सर्वोत्तम असाल तर तुमची निवड होणे अटळ आहे.

द्रविड आधीच्या प्रशिक्षकांना खेळाडूंना हेच सांगता आले नाही. मला आठवतंय, १९ वर्षांखालील क्रिकेट संघ उपांत्य फेरीचा सामना परदेशात खेळत होता. त्याचवेळी भारताचा आयपीएल लिलाव सुरू होता. उपांत्य सामन्यासाठी सराव सुरू होता. पण कुणाचेही लक्ष सरावावर नव्हते. आपल्या नावाची बोली लागली का? कुणी कुणाला किती कोटी रु.त विकत घेतले? याचीच चर्चा होती. दुसर्या दिवशी अपेक्षित घडले. आपण संभाव्य विजेते होतो पण उपांत्य फेरीतच हरलो. हा हव्यास, ही वृत्ती द्रविडने आधीपासूनचा खेळाडूंच्या मनातून खोडून काढली.

द्रविडच्या तालमीत तयार झालेली ही मुले कमी अनुभवाच्या बळावर देखील ऑस्ट्रेलियाला टक्कर देऊ शकली. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवू शकली. या मुलांच्या यशापाठी द्रविडचे योगदान आहे. त्याग आहे. द्रविडने पैशासाठी हे केले नाही, किंवा केलेल्या कामाच्या प्रसिद्धीसाठीही तो कधीही पुढे आला नाही. एक मिशन मानून तो गेली काही वर्षे हे कार्य करत आहे. क्रिकेटच्या रांगड्या, गावरान, ओबडधोबड गुणवत्तेला आकार देत आहे. अप्रकाशित हिर्यांना पैलू पाडत आहे. भारतीय क्रिकेटचा पाया भक्कम करत आहे. म्हणूनच द्रविडने सीनियर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद नाकारले होते. रेडिमेड गुणवत्ता घेऊन मैदानावर उतरणारे यशाचे श्रेय मात्र उपटताना दिसत आहेत.

विनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0