नवी दिल्लीः २०१७मध्ये सिक्कीमनजीक डोकलाम पठारावर भारत व चीनचे सैन्य एकमेकांना भिडले होते. त्या भागात ९ किमी अंतरावर चीनने एक गाव पूर्णपणे वसवले असून या गावातल्या प्रत्येक घरासमोर कार दिसून येत आहे. हा खुलासा एनडीटीव्हीला मिळालेल्या उपग्रह छायाचित्रामुळे मिळाला आहे. या गावाला चीनने पांगडा असे नाव देण्यात आले असून हे गाव भूतानच्या प्रदेशात येत आहे.
२०२१मध्ये एनडीटीव्हीने एक वृत्त दिले होते. त्यात चीनने डोकलाम पठारानजीक भूतानच्या प्रदेशात २ किमी अंतरावर एक गाव वसवले असून भारतीय सीमेवर पोहचण्यासाठी ९ किमी लांबीचा पक्का रस्ता बनवल्याची माहिती होती.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार पांगडा गावातल्या रस्त्यावरून कोणत्याही ऋतूत वाहतूक व वर्दळ चालू राहते. भूतानचा काही भूभाग चीनने बळकावला आहे. भूतानमधून वाहणारी अमो चू नदीपासून पांगडा गाव १० किमी अंतरावर आहे.
अमो चू नदीलगत रस्ता तयार केल्याने चीनचे सैन्य सहजपणे डोकलाम पठारावरील सर्वात उंच ठिकाणी झांपेरी येथे पोहचू शकते. तेथून हे सैन्य भारतीय हद्दीतील सिलिगुडी कॉरिडोरवर नजर ठेवू शकते. हा कॉरिडोर ईशान्य भारतातील राज्यांना जोडणारा आहे व तो अत्यंत संवेदनशील असा मानला जातो.
२०१७मध्ये भारतीय सैनिकांनी चीनच्या मजुरांना झांपेरी येथे जाण्यापासून रोखले होते. आता चीनने पर्यायी रस्ता तयार केल्याने ते पश्चिमेकडून डोकलाम पठारावर जाऊ शकतात.
दरम्यान भूतानच्या प्रदेशात चीनकडून वसवल्या गेलेल्या गावाबद्दल भूतान सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच भारताच्या परराष्ट्र खात्यानेही या संदर्भात खुलासा केलेला नाही.
सविस्तर वृत्त
COMMENTS