चीन, ‘डब्ल्यूएचओ’ आणि तैवान – भाग २

चीन, ‘डब्ल्यूएचओ’ आणि तैवान – भाग २

‘डब्ल्यू एच ओ’ (WHO) खरंच चीनच्या दावणीला बांधली गेली आहे का? चीनचा इतका प्रभाव जागतिक आरोग्य संघटनेमध्ये आहे का? किंवा ‘डब्ल्यू एच ओ’ चे महानिर्देशक डॉ. टेड्रोस घेब्रियेसास यांच्या चीन धार्जिण्या धोरणामुळे ‘डब्ल्यू एच ओ’वर नामुष्की ओढावली आहे का? हे असे अनेक प्रश्न सध्या चर्चेमध्ये आले आहेत.

ऑगस्टमध्ये उत्तराखंडात चीनची घुसखोरी
सैन्य मागे घेण्याबाबत सरकारद्वारे जनतेची दिशाभूल: कर्नल शुक्ल
दक्षिण चीन सागरात संघर्षाच्या ठिणग्या

“आंतरराष्ट्रीय पातळीवर सततचा भेदभाव आणि दुर्लक्ष याचं दुःखं काय असतं हे आम्हालाच ठाऊक. तैवानने आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या भेदभावाचं समर्थन केलेलं नाही आणि करणारही नाही. आम्ही डॉ. टेड्रोस यांना तैवान भेटीचं निमंत्रण देतो. चीनचा दबाव त्यांना झुगारता येत असेल, तर त्यांनी इथं यावं आणि पाहावं, की तैवानची जनता कशाप्रकारे कोरोना विषाणूचा धोका आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं असताना देखील जगाला कशाप्रकारे मदत करत आहे.” अशा शब्दांत  तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वन यांनी ‘डब्ल्यूएचओ’चे  महानिर्देशक डॉ. टेड्रोस घेब्रियेसास यांना आव्हान  दिलेलं आहे.

“माझ्याविरुद्ध वंशद्वेषी टिपण्या होत असून, हा एक प्रकारचा वंशद्वेषी हल्लाच आहे. यातून माझ्या जीवाला देखील धोका निर्माण झाला असून, हे शाब्दिक हल्ले तैवान घडवून आणत आहे,” असा गंभीर आरोप डॉ. टेड्रोस यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. कोणताही ठोस पुरावा नसताना हा आरोप लेक्याचे सांगत तैवानने याविरुद्ध कठोर मोहीम उघडली आहे. डॉ. टेड्रोस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी देखील तैवानीज सरकारने केली आहे. एक जागतिक संस्था आणि एक चिमुकला देश यांच्यात चाललेला हा संघर्ष कुठंवर जातो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

चीनमध्ये संशयास्पद मृत्य झालेल्या डॉ. ली वेनली यांग यांना लॉस- अँजेलिस येथे श्रद्धांजली वाहताना एक महिला.

चीनमध्ये संशयास्पद मृत्य झालेल्या डॉ. ली वेनली यांग यांना लॉस- अँजेलिस येथे श्रद्धांजली वाहताना एक महिला.

गेल्या काही दिवसांपासून डॉ. टेड्रोस यांच्याविरुद्ध इंटरनेट आणि सोशल मीडिया वर टीकेची झोड उठलेली आहे. डॉ. टेड्रोस यांनी महानिर्देशक पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. चेंज डॉट ओआरजी (change.org) या संकेतस्थाळावर यासंदर्भांत अनेक याचिका दाखल झाल्या असून, त्यांना बराच मोठा पाठिंबा मिळत आहे. काही याचिकांनी १० लाखांची स्वाक्षरी मोहीम पूर्ण देखील केली आहे. डॉ टेड्रोस यांनी राजीनामा द्यावा आणि ‘डब्ल्यूएचओ’ मध्ये तैवानचा समावेश करावा या संदर्भातील या याचिका आहेत. खरंतर सुरुवातीच्या काळात ‘डब्ल्यूएचओ’ने कोरोनाच्या बाबतीत दाखवलेला निष्काळजीपणा संपूर्ण जगाला भोगावा लागत आहे. जिथून या विषाणूचा प्रवास सुरु झाला त्या चीनमधल्या वुहान शहरावरचे संकटाचे ढग आता बाजूला सरले असून तिथे जनजीवन पूर्वपदावर आलेलं आहे. जानेवारीमध्ये डॉ. टेड्रोस यांनी कोरोना विषाणूला जागतिक महामारी घोषित करण्याला लाल दिवा दाखवला. याचा परिणाम काय होईल याची जगाला किंचितशी देखील माहिती नव्हती. अमेरिका, कॅनडा, बहुतांश युरोपियन देश, काही पूर्व आशियायी देश अद्यापही कोरोनाशी झटत आहेत. तर चीन मात्र कोरोनाचं ओझं जगावर लादून आता मोकळा झाला आहे.

‘डब्ल्यूएचओ’ने विश्वास गमावला का?

Change.org वर डॉ. टेड्रोस यांच्या राजीनाम्यासाठी चाललेली याचिका.

Change.org वर डॉ. टेड्रोस यांच्या राजीनाम्यासाठी चाललेली याचिका.

तैवानने कोरोनाला दिलेला प्रतिसाद हा खरंच कौतुकास्पद म्हणावा लागेल. आजघडीला केवळ ४९८ रुग्ण इथे सापडले असून, केवळ सहा जण दगावले आहेत. संपूर्ण जगात तैवान सध्या सुरक्षित देश म्हणून गणला जात आहे. शेजारील दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूर यासारख्या देशांपेक्षाही तैवानने दाखविलेली तत्परता वाखाणण्याजोगी आहे. अशा परिस्थितीत आधी ‘डब्ल्यूएचओ’ने देत असलेली माहिती ही चिनी पेनाने लिहिली होती का, असा संशय आता व्यक्त होत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला वुहान मध्ये कोरोनाचे रुग्ण मिळायला सुरुवात झाली, सुरुवातीला हुआ-नान फिश मार्केट मध्ये या विषाणूची सुरुवात झाली असं सांगितलं गेलं, मात्र त्यानंतर जे मार्केटला गेले नव्हते त्यांचे देखील मेडिकल रिपोर्ट्स पॉझिटीव्ह यायला लागले, याचा अर्थ असा होता, की कोरोना व्हायरस हा सांसर्गिक आहे.

ज्यावेळी चीन आपल्याच डॉक्टरांवर माहिती उघड केल्याचा आरोप ठेवत त्यांना शिक्षा फर्मावत होता. त्याचवेळी सगळी माहिती लपवत असल्याचाही चीनवर आरोप झाला. मात्र चीनने अमेरिकेला या विषाणूच्या प्रसारासाठी जबाबदार ठरवलं. हा सगळा सावळा गोंधळ सुरु असताना ‘डब्ल्यूएचओ’ने अर्थात डॉ. टेड्रोस यांनी मात्र “आम्ही चीन घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक करतो आणि चीनच्या उच्च-पदस्थ नेत्यांनी दाखविलेल्या पारदर्शीपणाचा आदर करतो” असलं भंपक वक्त्यव्य करत चीनला एकप्रकारे पाठींबाच दिला. यामुळे सध्या डॉ टेड्रोस संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेतच मात्र यात ‘डब्ल्यूएचओ’ची विश्वासार्हता देखील धोक्यात आली. जगातील बहुतांश देश हे ‘डब्ल्यूएचओ’च्या मार्गसूचीप्रमाणे एखाद्या महामारीला तोंड देत असतात, मात्र मार्गसूचीच गोंधळ वाढविणारी ठरल्याने ‘डब्ल्यूएचओ’वरचा विश्वास उडाल्याचे चित्र समोर आले आहे. डॉ. टेड्रोस यांचं धोरण चीन धार्जिणं असल्याचा आरोप होत आहे.

तैवान आणि डॉ. टेड्रोस वाद कशामुळे?

या सगळ्या कोरोनाष्टकात तैवान कुठून आला, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. खरंतर तैवान अद्याप ‘डब्ल्यूएचओ’चा सदस्य देश नाही. तैवानने अनेकदा विनंती करून देखील त्याला चीनच्या दबावाखाली ‘डब्ल्यूएचओ’मध्ये स्थान नाकारण्यात आलं आहे.

२००३ ला आलेल्या सार्स विषाणूचा चांगला अनुभव असलेल्या तैवानने सुरुवातीलाच कोरोना विरुद्ध कठोर पावले उचलायला सुरुवात केली. एक जबाबदार देश म्हणून तैवानने ‘डब्ल्यूएचओ’ला सुरुवातीलाच सतर्क केलं होतं, त्यासंदर्भात एक ई-मेल देखील ‘डब्ल्यूएचओ’ला पाठविला होता, जो काही दिवसांपूर्वी तैवानचे आरोग्यमंत्री चेन-शिह चुंग यांनी जनतेसमोर ठेवला आहे. मात्र ‘डब्ल्यूएचओ’ने त्या ईमेलला केराची टोपली दाखवली. ज्यावेळी तैवानने हे उघड करून ‘डब्ल्यूएचओ’ला सवाल केले, तेंव्हा साहजिकच डॉ. टेड्रोस यांचा पारा चढला होता.

“चीनने आधी या विषाणूबद्दल ‘डब्ल्यूएचओ’ला सतर्क केलं नव्हतं, मात्र सगळं काही झाकून ठेवण्यात धन्यता मानली होती. आणि सतर्क केलंही असेल तर ‘डब्ल्यूएचओ’ने त्याकडे कानाडोळा केला, असं म्हणावं का?” असा प्रश्न तैवानचे आरोग्यमंत्री चेन शीह चुंग यांनी उपस्थित केला आहे. यामुळे ‘डब्ल्यूएचओ’चा पाय खोलात रुतला असून अमेरिकेने निधी रोखल्याने ‘डब्ल्यूएचओ’ आणि डॉ. टेड्रोस हे पुरते अडचणीत आलेले दिसतात.

गेल्या काही दिवसांपूर्वीच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘डब्ल्यूएचओ’ ला दिला जाणारा मदतनिधी रोखण्याचा इशारा दिला होता. ट्रम्प प्रशासनाने ‘डब्ल्यूएचओ’ आणि चीन या दोघानांही याची किमंत मोजावी लागले असा सूचनावजा इशारा दिला आहे. या मुद्यावर जपानने देखील रोष व्यक्त केला असून ‘डब्ल्यूएचओ’चं नामांतरण चायनीज आरोग्य संघटना (CHO ) झालं पाहिजे असं जपानचे उपपंतप्रधान असो तारो यांनी सुनावलं होतं. ‘डब्ल्यूएचओ’मध्ये तैवानला प्रवेश मिळावा, यासाठी जपानने देखील आता आवाज उठवला आहे. हे सगळं घडत असताना तिकडे आफ्रिकन देश डॉ. टेड्रोस यांची पाठराखण करताना दिसत आहेत आणि यात महत्वाचं म्हणजे चीन देखील सामील आहे. चीनच्या सुरात सूर मिसळून डॉ. टेड्रोस यांनी याआधी कोरोना विषाणूबद्दल काही दाखले दिले होते, जे नंतर चुकीचे निघाले. ज्याचा परिणाम ‘डब्ल्यूएचओ’ला भोगावा लागत आहे.

टेड्रोस चीनची पाठराखण का करत आहेत?

बीजिंग: येथील ग्रेट हॉल ऑफ चायना मध्ये शी-जिनपिंग यांची भेट घेताना डॉ. टेड्रोस

बीजिंग: येथील ग्रेट हॉल ऑफ चायना मध्ये शी-जिनपिंग यांची भेट घेताना डॉ. टेड्रोस

डॉ. टेड्रोस यांची आधीची आणि आताची वक्तव्ये पाहता ते सतत चीनची पाठराखण करत आले आहेत. इथिओपियाचे नागरिक असलेले टेड्रोस यांनी पब्लिक हेल्थ मध्ये त्यांनी पी.एच.डी. केली आहे. खरंतर ‘डब्ल्यूएचओ’ च्या महानिर्देशकपदी निवड झाल्यापासून ते चर्चेत होते. याच कारण असं की निवडणुकीत त्यांना चीन आणि चीनच्या गोटातील देशांनी तसेच आफ्रिकन देशांनी पाठिंबा दिला होता आणि त्याच्या जोरावर त्यांची निवड झाली होती. डॉ टेड्रोस महानिर्देशक पदी निवडून आल्यानंतर लगेच चीनची भाषा बोलू लागले होते. ‘डब्ल्यूएचओ’ “एक चीन” तत्वाचा आदर करेल असं सांगायला देखील ते विसरले नव्हते आणि त्यामुळेच कि काय डॉ. टेड्रोस हे तैवानच्या मुद्द्यावर विरोधात आहेत, अशी आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा आहे. डॉ. टेड्रोस यांच्या चीन- प्रेमामागे चीनची इथिओपियामधील आर्थिक गुंतवणूक देखील असल्याची चर्चा आहे. गेल्या जानेवारीत चिनची

चीनने इथिओपियाची राजधानी आदीस-अबाबा ते जिबूती पर्यंत बांधलेला रेल्वे मार्ग.

चीनने इथिओपियाची राजधानी आदीस-अबाबा ते जिबूती पर्यंत बांधलेला रेल्वे मार्ग.

वृत्तसंस्था ‘शिन्हुआ न्यूज’मध्ये यासंदर्भात माहीत प्रकाशित झाली असून, त्यामध्ये असं म्हटलंय की “इथिओपिया’मधील विदेशी गुंतवणुकीत चीनचा अग्रक्रमांक असून, दोन्ही देशांची आर्थिक आणि व्यावसायिक गाठ न सुटणारी आहे.” चीनने सन २००० ते २०१८ पर्यंत इथिओपियाला तब्बल १३.७ बिलियन डॉलर्सचा कर्जपुरवठा केला आहे. त्याचबरोबर चीनच्या इम्पोर्ट- एक्स्पोर्ट बँकेने २.९ बिलियन खर्चून ‘इथिओपिया’ ते ‘जिबुती’ या दोन देशांना जोडणारा रेल्वे मार्ग निर्माण केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प सध्या तोट्यात चालला आहे. इतके सारे पैसे ओतून चीनने इथिओपिया विकतच घेतल्याची चर्चा होत असते. चीनने इथिओपियामध्ये अवाढव्य अशी गुंतवणूक केली असून चीनशिवाय इथे काहीच शक्य नाही, असं तिथलेच नागरिक बोलत असतात. चीनने डॅम्स, मोठाल्या गगनचुंबी इमारती, ८०० मिलियन डॉलर्स खर्चून देशातला पहिला सहा पदरी महामार्ग, मेट्रो अशा अनेक जम्बो प्रकल्पानी आदीस-आबाबा ही इथिओपियन राजधानी व्यापली आहे. याबदल्यात चीनने  कर्जाचा डोंगर देखील इथिओपियाच्या डोक्यावर ठेवला आहे.

डॉ. टेड्रोस हे नेहमी चीन धार्जिणे राहिल्याचा आरोप त्यांच्यावर होत आला आहे. बीजिंग येथे चिनी सत्ताधीश शी-जिनपिंग यांना भेटल्यानंतरच त्यांनी कोरोनाला जागतिक महामारी घोषित केल्याचीही चर्चा आहे.

रोहन पाष्टे, अकॅडेमिया सिनिका, तैपेई-तैवान. येथे मटेरियल्स सायन्स अँड इंजिनीअरिंग या विषयात पीएचडी करीत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0