तिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला

तिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व गेले दोन महिने असलेल्या लॉकडाऊनमुळे खासगी गुंतवणूक व मागणी अत्यंत कमी झाली असून परिणामी जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ३.१ टक्के इतका खाली आल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने शुक्रवारी दिली. गेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९मध्ये जीडीपी ४.२ टक्के इतका होता. या वर्षीच्या तिमाहीतील जीडीपीतील घसरण गेल्या ११ वर्षांतली अत्यंत निचांकी आहे.

कोरोनाचा संसर्ग देशभर वाढू नये म्हणून देशव्यापी लॉकडाऊन पुकारला असला तरी देशाची अर्थव्यवस्था पूर्वीही मंदीतून जात होती. अनेक महिने खासगी वा परकीय गुंतवणुकीने हात आखडता घेतला होता. छोट्या व मध्यम उद्योगांनाही मागणी घटल्याने मंदीचा मोठा सामना करावा लागत होता.

शुक्रवारी जीडीपी आकडेवारी जाहीर करताना राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने जीडीपी घसरण्यामागे कोरोनाची साथ व लॉकडाऊन या कारणांवरही भर दिला आहे. गेल्या वर्षी यात तिमाहीत जीडीपी ५.७ टक्के इतका होता तो वर्षभर घसरून ४.२ टक्के इतका खाली आला. त्या आधीच्या वर्षी जीडीपी ६.१ टक्का इतका होता.

अर्थअंदाज चुकले

चौथ्या तिमाहीत जीडीपी ३.१ टक्के दिसत असून या आकडेवारीने काही अर्थविश्लेषक संस्थांचे अंदाज चुकवले आहेत. ब्लूमबर्गने १.५ टक्के इतका तर एसबीआय रिसर्चने १.१ टक्के जीडीपी घसरेल असे भाकीत वर्तवले होते पण हा अंदाज चुकला आहे.

काही अर्थतज्ज्ञांनी मार्च महिना हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कठीण काळ असल्याचे भाकीत वर्तवले होते. त्यानुसार मार्च महिन्यात सर्वाधिक दुचाकी विक्री करणार्या बजाज ऑटोची विक्री ३८ टक्क्याने घटली आहे. तर आठ महत्त्वाच्या क्षेत्रातील मागणी मार्चमध्ये ६.५ टक्क्याने घसरली आहे. गेल्या वर्षी या आठ क्षेत्रातील मागणी ५.८ टक्के वधारली होती.

काही अर्थतज्ज्ञ एप्रिल महिनाही अर्थव्यवस्थेला मारक ठरेल असे म्हणत होते.

मूळ बातमी

COMMENTS