आठवड्यात १५ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण

आठवड्यात १५ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण

बंगळुरूः देशात या आठवड्यात १५ लाखाहून अधिक नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी संध्याकाळची ही आकडेवारी आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना लसीक

शिक्षक, शिक्षकेतरांचे लसीकरण आवश्यक
६ दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण कोरोनामुक्त
संकट काळात भारतीय स्टार क्रिकेटर आहेत कुठे?

बंगळुरूः देशात या आठवड्यात १५ लाखाहून अधिक नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी संध्याकाळची ही आकडेवारी आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना लसीकरणाचा वेग मात्र कमी होताना दिसत आहे.

संपूर्ण देशाला कोविड-१९च्या दुसर्या लाटेचा तडाखा बसला आहे. या तडाख्यात भारतातील शहरी भागच नव्हे तर ग्रामीण भागही भरडून जात आहे. भारतात आजपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण नागरिकांची संख्या २ कोटी १० लाख ४९ हजाराच्या वर गेली आहे.

शुक्रवारी ४ लाख १४ हजार १८८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ३,९१५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. अशा रितीने कोरोनाने मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २ लाख ३४ हजार ८३ इतकी नोंदली गेली आहे.

काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते भारतात कोविड बाधितांचा आकडा सांगितल्या जात असलेल्या सरकारी अधिकृत आकडेवारीपेक्षा ५ ते १० पट असू शकतो.

देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने आल्याने व देशातील सर्व आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. मोदी सरकारने कोरोनाच्या दुसर्या लाटेत कुंभ मेळा व पाच राज्यातल्या निवडणुका धुमधडाक्यात घेतल्या होत्या. हे निर्णय दुसर्या लाटेला घातक ठरल्याचे आरोप होत आहेत.

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना देशव्यापी लसीकरण मोहिमेचा वेग मात्र मंदावला आहे. एप्रिल महिन्यात लसीच्या टंचाईवरून मोठा गदारोळ उद्भवला होता. अद्याप मे महिन्यात अनेक राज्यांमध्ये लस पोहचलेली नाही. काही दिवसांपूर्वी प्रतिदिन ४० लाख लसी दिल्या जात असायचा, तो आकडा आता प्रतिदिन २५ लाखांवर आला आहे. सरकार प्रतिदिन ५० लाख लसी वाटप करण्याच्या प्रयत्नात आहे. पण ही संख्याही अत्यंत कमी असल्याने या वेगाने लसीकरण केल्यास संपूर्ण देशाला लस देण्यात एक वर्ष लागेल असे ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक अमर्त्य लाहिरी यांचे म्हणणे आहे.

दक्षिण भारतातही कोरोना वाढतोय

कोरोना रुग्णांची संख्या पूर्वी उत्तर भारत व प. भारतात अधिक दिसायची. पण आता दक्षिणेकडील राज्यात कोरोनाची लाट पसरत असल्याचे दिसून येत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दक्षिणेकडील राज्यांतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत २८ ते ३३ टक्क्याने रोज वाढ होत असून चेन्नई व बंगळुरू या महत्त्वाच्या शहरांमध्ये आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. चेन्नईमध्ये गुरुवारी १०० ऑक्सिजन पुरवठा बेडपैकी केवळ एक बेड रिकामा होता तर १००आयसीयू बेडपैकी दोन बेड रिकामे असल्याचे सरकारी आकडेवारीनुसार कळते.

बंगळुरूत आयसीयूतील ५९० बेडपैकी २३ बेड रिक्त होते तर व्हेटिलेटरची सोय असलेल्या ५० बेडपैकी एक बेड रिक्त होता.

राजधानी नवी दिल्लीतही परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. येथे अनेक रिक्शा रुग्णवाहिकेचे काम करत आहेत. राज्याला होणार्या ऑक्सिजन टंचाईवरून केजरीवाल सरकार व केंद्र सरकारमध्ये अजूनही वाद सुरू आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राविरोधात कडक पवित्रा घेतलेला आहे. पण न्यायालयाने केंद्र सरकारला ऑक्सिजनच्या टंचाईविषयी अनेक सज्जड दम देऊनही परिस्थितीमध्ये काही फरक आलेला दिसत नाही.

दरम्यान भारतातील कोविडची परिस्थिती पाहून परदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शुक्रवारी पोलंड, नेदरलँड, स्वित्झर्लंडकडून मदत पोहचली आहे.

मूळ बातमी   

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0