सार्स सीओव्ही-2 हा विषाणू हवेतून पसरल्याने कोविड-१९ महासाथ जगभर बळावत असल्याचे ठोस पुरावे सापडल्याचा दावा लॅन्सेट या नियतकालिकात सहा वैज्ञानिकांनी केल
सार्स सीओव्ही-2 हा विषाणू हवेतून पसरल्याने कोविड-१९ महासाथ जगभर बळावत असल्याचे ठोस पुरावे सापडल्याचा दावा लॅन्सेट या नियतकालिकात सहा वैज्ञानिकांनी केला आहे. गेले वर्षभर जगभरात कोरोना महासाथ पसरली आहे. तिच्यावर पूर्णपणे नियंत्रण आणले गेलेले नाही. या महासाथीचा संसर्ग सार्स सीओव्ही-2 या विषाणूमुळे होत असून हा विषाणू हवेतून पसरत असल्याने त्याला मानवजात बळी पडत असल्याचे सबळ पुरावे सापडल्याचे या ६ वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या संशोधनात ब्रिटन, अमेरिका व कॅनडातील ६ वैज्ञानिकांचा समावेश असून कोलॅरॅडो बोल्डर विद्यापीठ व कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन्व्हॉयरमेंटल सायन्समधील औषधतज्ज्ञ होजो लुईस जिमेनेझ सामील आहेत.
जिमनेझ यांनी सांगितले की, कोरोनाची साथ लहानशा थेंबातून पसरते याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत पण ही साथ हवेतून पसरत असल्याचे अनेक पुरावे आढळले आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना व अन्य सार्वजनिक आरोग्य संस्थांनी कोरोनाविरोधातील उपचारपद्धती बदलून ही साथ हवेतून पसरत असल्याने त्या संदर्भातले उपाय सूचवावेत, असे म्हटले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ट्रिश ग्रीनहॉ यांच्या नेतृत्वाखाली हा संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यात कोरोनाचा विषाणू हवेतून पसरत असल्याचे अनेक पुराव्यांसहित उदाहरणे दिली आहेत. कोरोनाचा संसर्ग मोकळ्या जागेपेक्षा बंद खोल्यातून अधिक पसरू शकतो. अशा खोल्यांमध्ये हवा खेळती राहण्याची व्यवस्था असेल तर याचा फैलाव कमी होतो, असे या अहवालात म्हटले आहे.
कोणतेही लक्षण नसलेले वा पूर्व लक्षण असलेल्यांना खोकला व शिंक येत नसल्यातरी असे लोक जगात कोरोनाचा संसर्ग पसरवण्याला ४० टक्के जबाबदार आहेत. हेच लोक जगभर विषाणूचा संसर्ग पसरवत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हवेच्या माध्यमातून जर एखादा विषाणू पसरत असेल तर तो कोविड संक्रमित असलेल्या रुग्णाच्या श्वासोच्छावासातून, ओरडल्याने, गाणे म्हटल्याने, खोकला व शिंकेद्वारे पुन्हा पसरू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत खोलीतील हवा खेळती राहण्यासाठी खोलीतल्या गर्दीवर नियंत्रण असणे गरजेचे आहे, खोलीत मास्क घालणे महत्त्वाचे आहे. मास्कचा दर्जा व त्याचे फिटिंग महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवकांना चांगल्या दर्जाची पीपीई कीट देणे गरजेचे असल्याचे मत या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मूळ बातमी
COMMENTS