‘इंडिया’ने लॉक डाऊन उठवला नाही, तर ‘भारतीय’ रस्त्यावर येतील…

‘इंडिया’ने लॉक डाऊन उठवला नाही, तर ‘भारतीय’ रस्त्यावर येतील…

लॉकडाऊनमुळे उभ्या आडव्या भारतात अस्वस्थता, अनिश्चितता आणि निराशेची एक लाट पसरलीय. या लाटेला वेळीच वाट करून दिली नाही तर देशाची वाट लागेल.

त्या रेल्वे रुळात सांडलेल्या चपात्या डोळ्यांसमोरून हलता हलत नाहीत. तिथे सोळा सतरा मजुरांचं रक्तही सांडलय. पण ते आता दृष्टीआड झालंय. रक्त सांडण्याची आम्हाला सवय आहे. आता भाकर चपाती सांडण्याची पण सवय करून घ्यायची का ? कोण्या बिअर बार मध्ये गाणं म्हणणारी ती बाई डोळ्यातले अश्रू सांडू न देता टीव्हीवर सांगत होती, आम्ही आता दिवसभरात एकदाच जेवतो. जेवतो म्हणजे दोन मुठी भाताच्या पातेलं भर गंजीत मीठ कालवून आठजण खातो. तर तो घोडेवाला सांगत होता, लग्न सराई आलीच नाही तर घोड्याची सरबराई कशी करू? नंदीबैलवाले म्हणाले, तुम्ही दिलेल्या भाकरीच्या दानावर आमचं एकवेळ भागतं. पण या महानगरीत बैलाला चारा कुठून शोधू ? तर तिकडे मुबलक चारा ज्याच्यापाशी आहे तो शेतकरी म्हणाला, मालाला उठाव नाही तर उभं पीक जाळू नाहीतर काय करू?

गावाकडून शेरात पोट जाळाया आलेल्या तिने आणि त्यानं मोठ्या आशेनं गावची वाट धरलीय. मात्र गावा गावाच्या वेशीवर काट्या कुंपणांनी परतीच्या वाटा रोखल्या गेल्यात हे त्यांना सांगूनही पटत नाही.

काहींनी तर देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या हायवेची पायवाटच करून टाकायचं ठरवलंय जणू. माथ्यावर आग ओकणारा सूर्य, ४०-४५ डिग्रीचा चटका, फाटक्या तुटक्या चपला, पोटात भुकेचा जाळ, तिच्या सोबतीला तो आणि त्याच्या सोबतीला ती, हातात एखादं तान्हुलं आणि डोक्यावर बोचकं. कुठे तो एकटा तर कुठे ती. कुठे तांडेच्या तांडे तर कुठे एकाकी तो किंवा ती. पण प्रत्येकाची नजर लागलेय दूरवरच्या आपल्या झोपडीवर. त्यातल्या एकाने सांगून टाकलं, जितने पहुचेंगे उतने !

इंडिया आपल्या कॅमेऱ्यातून हे सगळं बघतोय. प्रत्येक भारतीयावर त्याची नजर आहे. पण तरीही सांगतो, अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या इंडियाला दिसत नाहीत. आता हेच बघा ना, मध्यम वर्गातल्या पण मध्यम समजल्या जाणाऱ्या वर्गाच्या घरातलं रेशन संपलंय. पगार तर केव्हाच संपलाय आणि पुढचा पगार मिळण्याची आशा पण संपलीय. इंडियाला दिसतंय का हे ? इंडियाला तर आता हे पण दिसेनासं झालंय की टाळ्या आणि थाळ्या वाजवणारे हात आता कोणापुढे कसे पसरायचे म्हणून संकोचू लागलेत. शिलकीचे हिशेब बोटावर होऊ लागलेत. पुढचा महिना की महिने कसे जातील म्हणून रातभर डोळ्याला डोळा लागेनासा झालाय. दिवे चालू बंद करण्याचा देशप्रेमी खेळ आठवून मनातला अंधार अधिकच गडद होऊ लागलाय. कुठे काही बोलायची सोय राहिली नाही.पावसाळा तोंडावर आलाय. जमीन तशीच पडलेय. घरावर छप्पर टाकायचं हाय. पोरांची वह्या पुस्तकं, दप्तर आणायचंय. शाळेची फी, एसटीचा पास, लाईट बिल, वाण्याची उधारी सगळं बाकी हाय. काय करायचं आणि काय नाय? महानगरामधल्या झोपड्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत, घरकाम करणाऱ्या बायांपासून घरं बांधणाऱ्या मजुरांपर्यंत, घराघरातल्या बेरोजगारापासून गावकुसाबाहेरच्या भटक्यांपर्यंत, शेतकऱ्यांपासून भूमिहीनांपर्यंत, कॉन्ट्रॅक्ट कामगारापासून प्रायव्हेट कामगारांपर्यंत, रिक्षा, टॅक्सी, बस चालकापासून ते चतुर्थ श्रेणी कामगार, आरोग्य कर्मचारी, पोलिसांपर्यंत अशा सगळ्या उभ्या आडव्या भारतात अस्वस्थता, अनिश्चितता आणि निराशेची एक लाट पसरलीय. या लाटेला वेळीच वाट करून दिली नाही तर देशाची वाट लागेल.

पण इंडियाचं सगळं कसं बैजवार चाललंय. दर १५-२० दिवसांनी लॉक डाऊन वाढवतात. सिक्युरिटी टाईट करतात. घरातले घरात आणि रस्त्यावरचे रस्त्यात. नित्यनेमाने कोरोना बाधितांचे आकडे सांगतात. मदतीचे आकडे फुगवतात. टीव्ही वर चर्चा करतात. कधी पंतप्रधान, कधी मुख्यमंत्री तर कधी आरोग्यमंत्री येतात आणि आमच्या आरोग्याची काळजी वाहून जातात. मग टीव्हीवाले २४ तास तोच रतीब घालतात. पेपरवाले तेच छापतात. आणि भेदरलेले भारतीय पुन्हा गपगुमान घरात जाऊन बसतात. नाही म्हणायला नवे नवे अधिकारी येऊन आमची करमणूक करतात. रोज नवे नवे नियम सांगतात. भारतीयांसाठी कधीतरी एक गाडी सोडतात. तसंच फॉरेनमध्ये अडकलेल्याना जहाजाने, विमानाने देशात आणायचं म्हणतात.
इंडियाचं सगळंच अजब. काळा पैसा शोधायचा तर देशातला सगळाच पैसा बाद करतात. बांगलादेशी घुसखोरांना शोधायचं म्हणून सगळ्या देशालाच नागरिकत्वाचे पुरावे द्यायला सांगतात. आणि आता कोरोना पेशंट हुडकायचे म्हणून करोडोना घरात डांबतात.

पण आता बस्स झाले तुमचे हे धंदे!  बेगडी देशप्रेमाचे, हिंदू -मुसलमान वादाचे, इंडिया-पाकिस्तान नाहीतर चायना-इंडियाचे. प्रश्न भाकरीचा आहे, पोटापाण्याचा आहे. माणूस जगण्या मरण्याचा आहे. बंद करा तुमचे धंदे भीती पसरवण्याचे. दुटप्पी वागण्याचे, साळसूदपणाचे.
तुमचे सगळे डॉक्टर्स, तज्ज्ञ सांगू लागलेत की कोरोना हा इतर कोणत्याही आजारासारखा एक आजार आहे. दोन तीन टक्के गंभीर रोगी सोडले तर उरलेल्यांना त्याचा फार काही धोका नाही. तीन तीन महिने झाले तरी तुमच्याकडे खात्रीलायक माहिती नाही, उपचार नाही आणि लसही नाही. सगळंच अनिश्चित ! कोरोनाचा फैलाव आणि लॉक डाऊनही ! तुम्हाला सांगतो या अनिश्चिततेनेच लोकांचे अधिक बळी जाऊ लागलेत. कोरोना कधी संपणार, माहीत नाही. लस कधी येणार, माहीत नाही. लॉक डाऊन कधी संपणार, माहीत नाही. मग लोकांनी जगायचं तरी कसं?
आणि आता तर खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनीच जाहीर कबुली दिलेय, आपल्याला कोरोनाला सोबत घेऊनच पुढची वाटचाल करावी लागणार. जशी आपण इतर हजारो जीव जंतूंसोबत राहून करतो आहोत. आरोग्य मंत्र्यांच्या या स्पष्ट निवेदनानंतरही कसली वाट बघत बसलाय…ये मेरा इंडिया ?
तुम्ही जनता कर्फ्यू लावला, जनता गप्प बसली. तुम्ही देश लॉकडाऊन केला, जनतेनं सहन केला. तुम्ही लॉक डाऊन वाढवला. जनतेनं संयम पाळला. मात्र तुम्ही पुन्हा लॉक डाऊन वाढवला, लोकांचा संयम संपला. लोकं रस्त्यावर उतरून चालू लागली. वाट फुटेल तिकडे लोंढे धावू लागले. बहुतेक हा इशारा आहे…इंडियाने लॉक डाऊन उठवला नाही तर भारतीय रस्त्यावर येतील.
समझनेवाले को इशारा काफी है !

COMMENTS