वैश्विक लिंगभेद यादीः 156 देशात भारताचे स्थान 140

वैश्विक लिंगभेद यादीः 156 देशात भारताचे स्थान 140

नवी दिल्लीः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 2021च्या वैश्विक लिंगभेद अहवालात 156 देशांच्या यादीत भारताचे स्थान 28 क्रमांकाने घसरून ते 140 वर आले आहे. 2020मध्

महाराष्ट्रात लसीकरण अडचणीत
अंटार्क्टिकातही कोविडचा संसर्ग; वन्यजीवनाला धोका
‘सुल्ली डील्स’अॅप बनवणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक

नवी दिल्लीः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 2021च्या वैश्विक लिंगभेद अहवालात 156 देशांच्या यादीत भारताचे स्थान 28 क्रमांकाने घसरून ते 140 वर आले आहे. 2020मध्ये भारताचे स्थान 112 वे होते. पण आता दक्षिण आशियात सर्वात खराब कामगिरी करणार्या तीन देशांमध्ये  भारताचा समावेश झाला आहे. भारताचे शेजारील देश बांगला देश या यादीत 65 व्या क्रमाकांवर असून नेपाळ 106, पाकिस्तान 153, अफगाणिस्तान 156, भूतान 130 व श्रीलंका 116 व्या स्थानावर आहे.

अर्थव्यवस्थेत महिलांचा आर्थिक सहभाग, आर्थिक संधी, या वर्गातही द. आशियाची कामगिरी अत्यंत खराब दिसून आली असून येथील लिंगभेद 3 टक्क्याने वाढून 32.6 टक्के इतका झाला आहे. तर राजकीय सशक्तीकरणाच्या प्रक्रियेतही द. आशियाची प्रगती अत्यंत खराब दिसून आली आहे. येथे महिला मंत्र्यांची 2019मध्ये टक्केवारी 23.1 टक्के होती ती 2021मध्ये 9.1 टक्के इतकी घसरली आहे.

या अहवालानुसार महिलांचे श्रमातील स्थान 24.8 टक्क्यावरून घसरून 22.3 टक्के झाले आहे. त्याच बरोबर औद्योगिक क्षेत्रातील महिलांचे स्थान 29.2 टक्के इतके झाले आहे. वरिष्ठ व व्यवस्थापन पदावरील महिलांचे स्थानही घसरत चालले असून या पदांवर केवळ 14.6 टक्के महिला आहेत. केवळ 8.9 टक्के कंपन्यांच्या वरिष्ठपदी महिला कार्यरत आहेत.

पुरुषांच्या तुलनेत महिलांचे वेतन व त्यांच्या शिक्षण टक्केवारीतही घसरण दिसून आलेली आहे. भारतात पुरुषांच्या तुलनेत केवळ 20 टक्के महिला कमवत असून त्यामुळे तळातल्या 10 देशांच्या यादीत भारत घसरला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या लिंगभेद अहवालात प्रथा परंपराचे महिलांच्या आर्थिक सहभागावर दुष्परिणाम झालेले दिसून आलेले आहेत. चार पैकी एका महिलेला आपल्या आयुष्यात हिंसेचा सामना करावा लागलेला दिसून आलेला आहे. त्याच बरोबर 34.2 टक्के महिला अशिक्षित असून अशिक्षित पुरुषांची टक्केवारी 17.6 टक्के इतकी आहे.

बांग्लादेशची कामगिरी सर्वोत्तम

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 2021च्या वैश्विक लिंगभेद अहवालात द. आशियात बांगला देशची कामगिरी सर्वोत्तम झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. येथे पुरुष व महिलांमधील अंतर 71.9 टक्क्याने कमी तर भारतात हे प्रमाण 62.5 टक्क्याने कमी झालेले दिसून आलेले आहे.

लिंगभेद सर्वात कमी असलेल्या देशात आइसलँड पहिल्या क्रमांकावर सलग 12 व्यांदा आला आहे. येथे पुरुष व महिला यांच्यातील भागीदारी समसमान आहे. आइसलँड बरोबर फिनलँड, नॉर्वे, न्यूझीलंड, स्वीडन, नामिबिया, रवांडा, लिथुआनिया, आयर्लंड व स्वित्झर्लंड हे देश पहिल्या 10 च्या यादीत आहेत.

तर ब्रिटन 23 व अमेरिका 30 व्या क्रमांकावर आहे.

लैंगिक समानतेबाबत अफगाणिस्तान सर्वात खालच्या क्रमांकावर असून येमेन, पाकिस्तान, सीरिया, काँगो, इराण, माली, चाड, सौदी अरेबिया हे टॉप-10 असमानतावादी देशात समाविष्ट आहेत.

गुरुवारी हा अहवाल प्रसिद्ध झाला तेव्हा भारताच्या घसरलेल्या कामगिरीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानसिकतेमुळे सरकार महिलांचे सबलीकरण करण्यात प्रयत्नशील नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. भारतासाठी हे सर्वात भयंकर असल्याचाही त्यांनी इशारा दिला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: