चीन-भारत तणाव चिघळला, २० जवान शहीद

चीन-भारत तणाव चिघळला, २० जवान शहीद

नवी दिल्लीः लडाखमधील गलवान खोर्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये हाणामारी होऊन भारतीय लष्करातील २० जवान शहीद तर चीनचे ४३ जवान

भारत-चीन सीमाप्रश्न : नवा दृष्टिकोन हवा
मोदींचे मौन सुटले; राहुल गांधीचे ५ प्रश्न
तालिबानकडून पाकिस्तान सीमा बंद, भारताच्या आयातीवर परिणाम

नवी दिल्लीः लडाखमधील गलवान खोर्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये हाणामारी होऊन भारतीय लष्करातील २० जवान शहीद तर चीनचे ४३ जवान मृत वा जखमी झाल्याचे वृत्त आहे.

भारतीय लष्कराने या संदर्भात एक पत्रक जारी करून २० जवान शहीद झाल्याची पुष्टी केली आहे. या खुलाशात १५ जूनची रात्र व १६ जून रोजी भारत-चीनच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत १७ भारतीय जवान जे घटनास्थळी उभे होते ते गंभीर जखमी झाले आणि अत्यंत शीत, शून्य पेक्षा कमी तापमान असलेल्या प्रदेशात ही हाणामारी झाली. या हाणामारीत गंभीर जखमी झाल्याने २० जवानांचा मृत्यू झाला. भारतीय लष्कर देशाची अखंडता व एकतेच्या रक्षणासाठी दृढ व सक्षम असल्याचे म्हटले आहे.

गेल्या ४५ वर्षांत भारत-चीन सीमेवर एवढा मोठ्या संख्येने भारतीय सैनिक शहीद होण्याची ही पहिलीच दुर्दैवी घटना आहे.

दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीत चीनचे ४३ जवान ठार झाले किंवा गंभीर जखमी झाल्याचे म्हटले आहे. चीनची माहिती भारताने इंटरसेप्ट केली असून त्यातून ही माहिती मिळाल्याचे एएनआयचे म्हणणे आहे. पण या माहितीबाबत चीनकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली आहे.

गलवान खोर्यात मंगळवारी दुपारी भारतीय सूत्रांनी एक कर्नल व दोन जवान शहीद झाल्याचे म्हटले होते. त्यावेळी दिलेल्या माहितीत सरकारने भारत-चीन सैन्यामध्ये हाणामारी झाली पण गोळीबार झाला नसल्याचे म्हटले होते. या हाणामारीत दोन्ही बाजूंचे अनेक सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते.

भारत व चीनमध्ये लडाखमधील गलवान खोर्यातल्या प्रदेशावरून गेले कित्येक दिवस तणाव होता. उभय देशांमध्ये गेल्या आठवड्यात चर्चाही झाली होती पण सोमवारी उभय देशांमधील तैनात सैनिकांमध्ये चकमक होऊन भारतीय लष्करातील एक कर्नल व दोन जवान शहीद झाल्याची माहिती उघड झाली होती. या घटनेनंतर उभय देशांमधील मेजर जनरल दर्जाच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्यांकडून तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू झाली होती, असे लष्करी सूत्रांनी सांगितले होते. भारतीय लष्कराकडून मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास पत्रकार परिषद होणार होती पण ती रद्द करण्यात आली होती.

एएनआयने सूत्रांचे नाव न सांगता चीनचे उपपरराष्ट्रमंत्री लुओ झाहोहूई व भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांच्यात बीजिंगमध्ये चर्चा झाल्याचे म्हटले होते.

भारताचे प्रक्षोभक कृत्य : चीनचा आरोप

गलवान खोर्यात तैनात असलेल्या भारतीय सैन्याने चीनची हद्द ओलांडून आगळीक केल्याने हा वाद उफाळल्याचे ग्लोबल टाइम्सचे म्हणणे आहे. भारतीय लष्कराने चीनच्या हद्दीत घुसल्याने तणाव वाढला असून भारतीय लष्कराने आपल्यावर संयम ठेवावा अशी चीनने विनंती केल्याचेही ग्लोबल टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

तर चीनच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल झांग शुईली यांनी १५ जूनला संध्याकाळी भारत-चीनच्या सैनिकांमध्ये शारिरीक झटापट झाली त्यातून अनेक सैनिक ठार झाल्याचे म्हटले.

चीनच्या लष्कराने आपल्या पत्रकात झालेल्या तणावाला भारत जबाबदार असल्याचा आरोप केला. भारताने कमांडर स्तरावर सुरू असलेल्या चर्चेचे नियम भंग करून चीनच्या सीमेत प्रवेश केल्याने परिस्थिती बिघडली असे या पत्रकात म्हटले आहे.

तर मंगळवारी रात्री भारतीय परराष्ट्र खात्याने चीनमुळे परिस्थिती बिघडल्याचा आरोप केला. १५ जूनच्या संध्याकाळी व रात्री चीनने जैसे थे परिस्थिती बिघडवली. त्याने दोन्ही बाजूच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले. हे नुकसान चर्चा सुरू असताना चीनने संयम ठेवला असता टाळता आले असते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आतच भारताच्या हालचाली सुरू होत्या, सीमा व्यवस्थापनाबाबत भारतीय सैन्याने जबाबदारीची भूमिका घेतली आहे तशी भूमिका चीनकडूनही अपेक्षित आहे, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0