आखाती देशांतील दूतावासांचे दुही न पेरण्याचे आवाहन

आखाती देशांतील दूतावासांचे दुही न पेरण्याचे आवाहन

संयुक्त अरब अमिरात (यूएई) तील भारतीय राजदूताने निवेदन जारी केल्यानंतर आखाती देशातील अनेक भारतीय वकिलातींनीही धार्मिक विद्वेषाची बीजे पेरणाऱ्यांपासून द

तबलिगी आणि कोरोना उद्रेक- काही अनुत्तरित प्रश्न
‘जय श्रीराम’ची घोषणा पाकिस्तानात करायची का ? – शहा
धर्मांतराचा आरोपः युवकाची २०० किमीची ‘न्याय्य पदयात्रा’

संयुक्त अरब अमिरात (यूएई) तील भारतीय राजदूताने निवेदन जारी केल्यानंतर आखाती देशातील अनेक भारतीय वकिलातींनीही धार्मिक विद्वेषाची बीजे पेरणाऱ्यांपासून दक्ष राहण्याचे आवाहन भारतीय समुदायांना केले आहे. काही भारतीयांनी सोशल मीडियावर इस्लामविरोधी कमेंट्स केल्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

अरब राष्ट्रांतील अनेक विचारवंत, राजकीय विश्लेषक, बुद्धिवंतांच्या नजरेस या कमेंट्स पडल्या होत्या आणि त्यांनी त्यावर प्रकाश टाकून खरमरीत टीका केली होती.

कतारमधील भारतीय दूतावासाने मंगळवारी दोन ट्विटर अकाउंट्सचे स्क्रीनशॉट्स पोस्ट केले. ही दोन्ही अकाउंट्स वेगवेगळ्या नावांनी होते पण त्यांवरील फोटो सारखेच होते. दोन्ही ट्विटर अकाउंट्सधारकांचा दावा ते आखाती राष्ट्रांमध्ये राहतात असा होता. दोन्ही अकाउंट्सवरून कोरोनाविषाणूच्या प्रसाराचा संबंध इस्लामशी जोडणाऱ्या पोस्ट्स प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

‘बनावट’ ट्विटर अकाउंट्सचा वापर ‘समाजात दुही निर्माण करण्यासाठी’ होत असल्यावर जोर देत दोहा येथील भारतीय दूतावासाने पुढील मजकूर पोस्ट केला: कृपया वास्तव समजून घ्या आणि दुही पेरण्याच्या दुष्ट प्रयत्नांना बळी पडू नका. आज आपण केवळ कोविड१९वर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.”

त्याचप्रमाणे ओमानमधील भारतीय दूतावासानेही बुधवारी ट्विटरवर पोस्ट करून, कोरोनाविषाणूची साथ रोखण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. सोशल मीडियावर दुष्ट हेतूने पोस्ट झालेल्या खोट्या बातम्यांच्या जाळ्यात अडकू नका, असे आवाहनही दूतावासातर्फे करण्यात आले.

भारत आणि ओमान यांच्यातील नातेसंबंध “सहिष्णुता व बहुलतवादाच्या सामाईक मूल्यांवर” आधारित आहे, असे दूतावासाच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहे. “या कठीण काळात आपण सर्वांनी एकात्मता व सामाजिक सौहार्द राखण्याची बांधिलकी मानली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे या कठीण काळात आपण सर्व बरोबर आहोत.”

अरब देशांत राहणाऱ्या भारतीयांनी (आणि तसा दावा करणाऱ्या अनेकांनी)केलेल्या इस्लामविरोधी कमेंट्समुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी यापूर्वी २० एप्रिल रोजी भारताचे संयुक्त अरब अमिरातीतील भारताचे राजदूत पवन कपूर यांनीही ट्विटरच्या माध्यमातून प्रयत्न केला होता.

भारत आणि यूएई दोन्ही देश कोणत्याही परिस्थितीत समानतेचे मूल्य मानणारे आहेत. “भेदभाव हा नैतिकता आणि कायद्याचे नियम दोहोंच्या विरोधात आहे. यूएईतील भारतीय नागरिकांनी हे कायम लक्षात ठेवले पाहिजे,” असे त्यांनी सोमवारी ट्विट केले.

यूएईमधील काही भारतीय नागरिकांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट्समधून हा वाद सुरू झाला. मुस्लिमांनी भारतात हेतूत: कोरोना विषाणूचा प्रसार केला असा दावा या पोस्ट्समध्ये करण्यात आला होता. दिल्लीतील तबिलगी जमात संमेलनानंतरच भारतात कोरोना पसरला असा सूर या पोस्ट्समध्ये होता.

यूएईतील कायदे कडक आहेत. इंटरनेटचा वापर करून कोणत्याही धर्माची नालस्ती करणे, धार्मिक तेढ वाढवणे किंवा समाजातील शांतता व सुव्यवस्थेला धोका पोहोचवणे यांसाठी शिक्षा व दंडाची तरतूद आहे.

काही भारतीयांना सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या पोस्ट्समुळे आखाती देशांत नोकऱ्या गमावाव्या लागल्या. त्यानंतर अशा रितीने बडतर्फ झालेल्यांना पाठिंबा देण्यासाठी ट्विटरवर मोहीम चालवण्यात आले.

यादरम्यान, काही मुस्लिमविरोधी पोस्ट्सचे स्क्रीनशॉट्स संयुक्त अरब एमिरातीतील प्रभावी व्यक्तींच्या तसेच कुवैतसह अन्य काही आखाती देशांतील बुद्धिवंतांच्या नजरेस पडले. यात एका भारतीय खासदाराने पूर्वी केलेल्या ट्विटचाही समावेश होता. याचा परिणाम म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या रविवारी कोविड-१९ची लागण वंश, धर्म, वर्ण, जात, समूह, भाषा किंवा राष्ट्रांच्या सीमा बघून होत नाही, असे ट्विट करावे लागले. त्यानंतर यूएईतील भारताच्या राजदूतांनीही अमिरातीतील भारतीय समुदायाला उद्देशून पोस्ट प्रसिद्ध केली. काही भारतीय नागरिकांनी केलेल्या द्वेषपूर्ण कमेंट्समुळे भारताच्या प्रतिमेला धोका पोहोचत असल्याची चिंता माजी भारतीय राजदूतांनीही व्यक्त केली.

यूएईतील भारताचे माजी राजदूत नवदीप सुरी ‘द वायर’शी झालेल्या संवादादरम्यान म्हणाले की, दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध दृढ आहेत. कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर भारताने मलेरियाचा नायनाट करणाऱ्या हायड्रोक्झिक्लोरोक्विन (एचसीक्यू) या औषधाच्या ५.५ दशलक्ष टॅब्लेट्स यूएईला निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी निर्यातीवरील निर्बंध भारताने शिथिल केले आहेत.

“खरे पाहता आम्हाला अगदी सामान्य माणसाकडून तसेच उच्चभ्रू अरबांकडून उत्तम वागणूक मिळत आहे. २०१७ मध्ये यूएईच्या युवराजांना भारतात प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून निमंत्रित केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये परस्परांबद्दल सौहार्द आहे. तरीही या संबंधांतील दृढता कुठेतरी कमी होत आहे असे मला वाटत आहे. ”

सहिष्णुतेला बळ देण्यासाठी यूएईने कायमच सक्रिय पुढाकार घेतला आहे. यासाठी यूएईमध्ये खास एक मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सुरी म्हणाले. काही समुदायांनी आक्षेप घेऊनही यूएई सरकारने हिंदू मंदिराच्या बांधकामाला परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर येथे राहणाऱ्या भारतीयांनी मुस्लिमविरोधी पोस्ट्स प्रसिद्ध करणे घृणास्पद आहे, असे सुरी म्हणाले.

२००७ ते २०१० या काळात यूएईमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेले निवृत्त सनदी अधिकारी तलमीझ अहमद यांनीही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध उत्तम आहेत, असे नमूद केले. “भारत-यूएई संबंध गेल्या अनेक दशकांपासून खूपच दृढ आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ते आणखी घट्ट झाले आहेत. पंतप्रधानांनी यूएईच्या नेतृत्वासोबत संबंध दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत आणि त्यांना यूएईकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.”

यूएईमधील धर्मनालस्तीसंदर्भातील कायद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा धर्माधारित भेदभाव नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ इस्लामी वेबसाइट्स बघणाऱ्या लोकांना यूएईने भारतात परत पाठवून दिल्याची उदाहरणे आहेत, असेही अहमद म्हणाले.

यूएईत बाहेरच्या देशांतून आलेल्यांमध्ये भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांच्या लोकसंख्येमध्ये ६० टक्के भारतीय आहेत. यावरूनच भारतीयांना या देशात किती सन्मानपूर्वक वागवले जाते हे लक्षात येईल. मुर्खासारख्या पोस्ट्स करणारे काही अपवाद आहेत. अर्थात धर्माची नालस्ती करण्याबद्दलचा कायदा भेदविरहित आहे आणि तो पूर्ण बळाने वापरला जाईल, असे अहमद म्हणाले.

भारतीयांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट्समुळे संपूर्ण भारताची प्रतिमा डागाळली जाईल या चिंतेतूनच आखाती देशांतील सर्व भारतीय दूतावास-वकिलातींनी निवेदने जारी केली आहेत, असे समजते. विशेषत: हा मुद्दा आता स्थानिक प्रसार माध्यमांत चर्चिला जात आहे.  मात्र, यात काहींचे ‘हितसंबंध गुंतलेले’ आहेत अशीही भारतीय दूतावासांची धारणा आहे. विशेषत: भूतकाळातील ट्विट्स गेल्या काही दिवसांत उकरली जात आहेत त्यावरून अशी शंका घेण्यास जागा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0