इंडियन स्टोरी ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर

इंडियन स्टोरी ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर

‘द वायर’मध्ये ब्युरो चीफ म्हणून कार्यरत असणाऱ्या ‘रघू कर्नाड’ यांना नुकताच अतिशय प्रतिष्ठेचा 'विंडहॅम-कॅम्पबेल पुरस्कार २०१९' जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रघू कर्नाड यांना 'फार्देस्ट फिल्ड: अॅन इंडियन स्टोरी ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर' या २०१६ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकासाठी जाहीर झाला. या अतिशय प्रतिष्ठेच्या पुरस्कारामध्ये एक लाख पासष्ठ हजार डॉलर्स (साधारण रु.१,१४,४१,५१२/-) रकमेचा समावेश आहे.

असहमतीचे आवाज
राजीव गांधींचा खून का झाला?
राजकीय करिष्मा : निर्मिती आणि परिणाम
पानांमधून पुस्तके, वाचन संस्कृती यांविषयी विचारप्रवृत्त करणारे सदर

पानांमधून
पुस्तके, वाचन संस्कृती यांविषयी विचारसमृद्ध करणारे सदर

दुसऱ्या महायुद्धातील हिंदुस्तानी सैन्याच्या योगदानाची अज्ञात कहाणी रघु कर्नाड यांनी अतिशय रोचक पद्धतीने सांगितली आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘पळभरही नाही हाय हाय…’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. ‘द वायर मराठी’च्या वाचकांसाठी पुस्तकातील काही वेचे.
…..
या पुस्तकात मुख्यत्वे तीन व्यक्तिरेखांच्या आयुष्याशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे निगडित असे प्रसंग नमूद केले आहेत. विषयसूत्राच्या परिघाबाहेरच्या घटना मी अंतर्भूत केलेल्या नाहीत. तसेच सर्वश्रुत, बहुपरिचित घटना तर मी आवर्जून वगळल्या आहेत. एकूणच युद्धांमुळे होणारी वाताहत हा सदर पुस्तकाचा विषय नाही. युद्धामुळे आपल्याला कल्पनाही नसते अशा दूरदूरच्या प्रदेशांतील छोट्या-छोट्या माणसांच्या व्यक्तिगत आयुष्यात कशी मन्वंतरे येतात, हे या पुस्तकात दाखवून दिले आहे. ते करताना गोळा केलेल्या दस्तऐवजांच्या काही मर्यादा लक्षात येतील. या मर्यादांचा अर्थ असा की चरित्रनायकांच्या खाजगी आयुष्यातील अनेक तपशील उपलब्धच होऊ शकले नाहीत. हे पुस्तक म्हणजे ना इकडे-ना तिकडे अशा अधांतरी अवस्थेत अस्तित्व गमावून बसण्याची कहाणी आहे. ती अशीच असणार असे आपण म्हणू शकतो, कारण या कहाणीचे तिन्ही नायक मध्यमवर्गीय होते. हा वर्ग निम्नस्तरीयांपेक्षा राजकीयदृष्ट्या अधिक सक्रिय आणि बहुश्रुत होता. स्वातंत्र्य चळवळीमध्ये याच वर्गाने मोठ्या प्रमाणात नेतृत्व पुरवले होते. इंडियन सिव्हिल सर्विसेसमध्ये याच वर्गाचा भरणा होता. या वर्गाची कहाणी ही एकजूट आणि उदात्त निष्ठांची कहाणी नाही. ती संदिग्धतेची, फुटीरतेची कहाणी आहे. युद्ध जसजसे पुढे सरकले, तसतशी या वर्गातील संभ्रमावस्था आणि दुही वाढतच गेली.
खरेतर मी वास्तव कथा लिहिण्याऐवजी कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करू शकलो असतो. पण मला जाणीव होती, की ज्या तिघांविषयी मला लिहायचे होते त्यांची अल्पायुषी परंतु वास्तव जीवनकहाणीच अधिक उत्कंठावर्धक असणार. मी कल्पकतेने रचलेल्या कहाणीला वास्तवाची सर येणार नाही. म्हणून हाती घेतलेल्या या उपक्रमाचे स्वरूप “न्यायवैद्यकशास्त्रीय वास्तवकथा” (forensic non-fiction) असे ठेवले. सुरुवात माझ्या परिवारातील तीन मृत व्यक्तींपासून केली. ते कोण होते? ते

'फार्देस्ट फिल्ड: अॅन इंडियन स्टोरी ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर' या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘पळभरही नाही हाय हाय…’

‘फार्देस्ट फिल्ड: अॅन इंडियन स्टोरी ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘पळभरही नाही हाय हाय…’

कुठे आणि का मरण पावले? मुळात त्यांनी लष्करात भरती होण्याचा निर्णय का घेतला? या तिघांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्याचापण मी निर्धार केला होता. अर्धे कच्चे पुरावे, लोकांनी दिलेली निवेदने यांच्या आधारे त्या तिघांची भावविश्व, श्रद्धा आणि विचार रेखाटण्याचा प्रयत्न केला. ही खरे तर एक तडजोड होती.
युद्धात सहभागी झालेल्या हिंदुस्तानी सैनिकांबरोबर प्रत्यक्षात झालेल्या चर्चांमधूनच माझे याविषयीचे चित्र सर्वाधिक सुस्पष्ट झाले आहे. पण त्या बहुतेकांनी नव्वदी ओलांडली होती. त्यातील अनेकांना त्यांचे तरुणपणीचे दिवस अगदी स्पष्ट आठवत होते.
इतस्ततः विखुरलेली हाडे एकत्र करून सांगाडा तयार करावा आणि त्याला जिवंत कातडीची झूल चढवावी तसे काहीसे माझ्या कहाणीचे स्वरूप आहे. पण त्यातील मूठभरांची कहाणी इतर अनेकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकू शकेल.
….
दुस-या महायुद्धाचे ढग जमू लागताच जगभर सैन्याची प्रचंड प्रमाणात जुळवाजुळव सुरू झाली. ज्या भूप्रदेशांना शस्त्रास्त्रे कशाशी खातात हे सुद्धा माहीत नव्हते, अशा ठिकाणांतून सैनिक नामक पिकाची उगवाई सुरू झाली. हे म्हणजे भाताच्या खाचरांतून गव्हाचे पीक घेण्यासारखेच होते.
महायुद्ध भरात आले तसा हिंदुस्तानातील लष्कर-भरतीलासुद्धा वेग आला. युद्धात अगदी सुरुवातीस उतरलेले हिंदुस्तानी सैन्य म्हणजे पोटार्थी सैनिकांचा कुपोषित जथ्था होता. पण युद्ध संपले तेव्हा त्यात लाखो प्रशिक्षित, उच्चशिक्षित आणि सक्षम हिंदुस्तानी महत्त्वाच्या पदांवर काम करत होते.
१९४०च्या सुमारास अख्ख्या हिंदुस्तानात संभ्रमांचा कल्लोळ माजला होता : राजनिष्ठा की स्वातंत्र्याची मागणी? आज्ञापालन की कायदेभंग? द्विराष्ट्रवाद की अखंड हिंदुस्तान? ब्रिटिशांच्या वतीने लढायचे, त्यांच्या विरोधात लढायचे, की जपान्यांशी हातमिळवणी करून हिंदुस्तान्यांच्याच विरोधात उभे ठाकायचे?
दुसरे महायुद्ध जेव्हा संपले, तेव्हा त्यात सहभागी झालेल्या हिंदुस्तानी सैन्यातील वीस लाखांच्या वर स्त्री-पुरुषांना लख्ख जाणीव झाली की जवळजवळ सहा वर्षे ते इतिहासाच्या दृष्टीने चुकीच्या बाजूने लढत होते. दुस-या महायुद्धानंतर स्वतंत्र भारतासाठी लढणे हे मोठेच श्रेयस होते. त्याच्या जोरावर कुठल्याही सैनिकास राष्ट्रीय स्मारकाचा धनी होणे शक्य होते. दुस-या महायुद्धात जे वाचले, त्यांना हे श्रेयस प्राप्त करण्याची संधी होती. अनेकांनी ती घेतलीसुद्धा. कारण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेच भारत अनेक लढायांमध्ये ओढला गेला. पण जे दुस-या महायुद्धातच जीव गमावून बसले, त्यांच्या नशिबी निर्जन कबरस्तानात चिरनिद्रा घेणे आले. त्यांच्या मृत्युशिळेवर लिहिलेल्या ‘यांचे नाव अजरामर राहील’ या शब्दांचे कुणालाच महत्त्व नव्हते. त्यांचे चेहरे फक्त कुणाच्या तरी व्यक्तिगत आठवणींमध्येच उजळले आणि जेव्हा त्या आठवणीपण क्षीण झाल्या, तेव्हा त्यांबरोबर त्यांचे चेहरेपण विस्मृतीच्या पडद्याआड गुडूप झाले.
माणसाला दोनदा मृत्यू येतो. पहिला त्याचा श्वास थांबतो आणि आत्मा पार्थिव शरीर सोडून जातो तेव्हा! दुसरा मृत्यू येतो, जेव्हा त्याच्या आठवणी काढणारेच हे जग सोडून जातात तेव्हा! स्मृती जतन करणारेच कालवश झाले की माणसाचे या जगातले अस्तित्व पूर्णतया संपते.
युद्धामध्ये हे दोन्ही मृत्यू अगदी जवळजवळ येतात. याचे कारण युद्धात वेचून वेचून कोवळे तरुण मारले जातात. पंचविसाव्या वर्षी धारातिर्थी पडलेल्या सैनिकाच्या प्रियजनांपुढे खूप मोठे आयुष्य जगायला उरलेले असते. पण हातात त्या सैनिकाच्या आठवणी मात्र मोजक्याच असतात. खरे तर जगायला नीटशी सुरुवात करण्याआधीच तो हे जग सोडून गेलेला असतो. त्यामुळे मागे राहिलेल्या प्रियजनांजवळ तो केवळ तसबिरीच्या रूपात उरतो. त्याचे नाव मात्र फारसे घेतले जात नाही. कुटुंबीयांचे आयुष्य जसे पुढे सरकेल, तसे गतवर्षांच्या थरांखाली त्याची तसबीरपण गाडली जाते. अशा माणसाच्या नशिबी दोनदा दफनविधी येतो.
कुठलेही राष्ट्र धारातीर्थी पडलेल्या त्याच्या आणि शत्रूच्या सैनिकांच्या आठवणी जिवंत ठेवते. बहुतांश वेळा युद्धात वीरमरण आलेल्यांना जितक्या सहजी ठार मारलेले असते, तेवढ्या सहजी विसरले जात नाही. पण कधी कधी राष्ट्रांनाच त्यांनी लढलेली युद्धे विसरायची असतात. अशा युद्धात मारल्या गेलेल्यांचे दुसरे, म्हणजे विस्मरणाचे मरणही तत्काळ उद्भवते.
१९४७ साली नव्याने उदयास आलेल्या भारत या राष्ट्रास स्वत:ची आत्मकथा लिहिताना दुस-या महायुद्धात लढलेल्या हिंदुस्तान्यांची आठवण नकोशी वाटली. कारण ज्या साम्राज्याच्या ‘विरोधात’ लढून त्याने स्वातंत्र्य मिळवले, त्याच साम्राज्याच्या ‘बाजूने’ लढणा-या देशबांधवांचे नक्की काय करायचे, हे त्याला कळले नाही.
‘मरण’ या युद्धभूमीवरून कुणीच परत येत नाही. पण मृत व्यक्तीसाठी तिचे विस्मरण ही तिच्यासाठी सर्वांत दूरची युद्धभूमी, दुसरे मरण असते. दुस-या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या हिंदुस्तानी सैनिकांच्या नशिबी मरण आणि विस्मरण हे दोन्ही मृत्यू एका पाठोपाठ आले. त्यांच्यासाठी कुणी पळभरही हाय हाय म्हटले नाही.

या पुस्तकाचा अनुवाद करुणा गोखले यांनी केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0