यूएईत धार्मिक विद्वेष : तीन भारतीयांचे नोकरीतून निलंबन

यूएईत धार्मिक विद्वेष : तीन भारतीयांचे नोकरीतून निलंबन

नवी दिल्ली : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात इस्लाम धर्माविषयी विद्वेष पसरवणार्या पोस्ट लिहिणार्या ३ भारतीय नागरिकांना संयुक्त अरब अमिरातस्थित

शाहीन बागमध्ये हवेत फायरिंग, युवकास अटक
हो, हे हिंदू राष्ट्रच आहे!
‘आज तक’चा अयोध्या निकालावरील कार्यक्रम भडकाऊ

नवी दिल्ली : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात इस्लाम धर्माविषयी विद्वेष पसरवणार्या पोस्ट लिहिणार्या ३ भारतीय नागरिकांना संयुक्त अरब अमिरातस्थित कंपन्यांनी निलंबित केल्याचे वृत्त गल्फ न्यूजने दिले आहे. या अगोदर अशा प्रकरणात ७ भारतीयांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.

दुबईमधील इयाटली रेस्तराँमधील मुख्य शेफ रोहीत रावत यांनी सोशल मीडियात इस्लामवर टीका करणारी पोस्ट लिहिल्याने त्यांच्यावर कंपनीने शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

दुसर्या घटनेत न्यूमिक्स ऑटोमेशन या कंपनीने सचिन किन्नीगोली या स्टोअर किपरवर कामावर येऊ नका असे बजावले आहे. सचिन किन्नीगोली यांनीही सोशल मीडियात इस्लामविरोधात द्वेषपूर्ण लिहिल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. आमच्या कंपनीत कोणत्याही धर्मावर विषारी टीका केलेली खपवून घेतली जात नसल्याने या प्रकरणाचा तपास होईपर्यंत सचिन यांचा पगारही दिला जाणार नाही व त्यांनी कामावरही येऊ नये अशी कंपनी व्यवस्थापनाने नोटीस बजावली आहे.

तिसरी घटना ट्रान्सगार्ड ग्रुपमधील एका भारतीय कर्मचार्यासंदर्भात घडली आहे. या कर्मचार्याने विशाल ठाकूर असे खोटे फेसबुक अकाउंट काढून रमझानच्या दिवशी धार्मिक तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकली होती. पण कंपनी व्यवस्थापनाला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचार्याला निलंबित केले. तर दुबई पोलिसांनी विशाल ठाकूर याला अटक केली आहे.

संयुक्त अरब अमिरातमध्ये कामानिमित्त राहणार्या काही भारतीय नागरिकांकडून इस्लाम धर्माविषयी द्वेष, मत्सर व गैरसमज पसरवणार्या पोस्ट सोशल मीडियात होत असल्याच्या कारणाने अरब जगतातील विचारवंतांनी मध्यंतरी चिंता व्यक्त केली होती, त्यानंतर शारजाह, दुबई, अबुधाबी येथे काम करणार्या काही भारतीय नागरिकांना आपली नोकरीही गमवावी लागली होती. या घटना सातत्याने वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर संयुक्त अरब अमिरातमधील भारतीय राजदूत पवन कपूर यांनी एक पत्रक काढून या देशात धर्माच्या, वंशाच्या कारणामुळे कोणताही भेदभाव केला जात नाही, येथे सेक्युलॅरिझम मूल्य शासन व्यवस्थेकडून पालन केले जात असल्याचे नमूद केले होते. तरीही काही भारतीय नागरिकांकडून अशी आगळीक केली जात होती.

महत्त्वाचे म्हणजे २०१५मध्ये संयुक्त अरब अमिरातीने धर्म, वंश, वर्ग यावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही असा एक कायदा करत कोणत्याही धर्माविषयी द्वेष, मत्सर, विखार, अवमान पसरवणार्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल अशीही भूमिका घेतली होती.

तरीही काही कंपन्यांतील भारतीय कर्मचार्यांकडून इस्लामविषयी द्वेष पसरवल्या जात असल्याच्या घटना उघडकीस आल्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0