भारताचा मिल्खा ‘फ्लाइंग सिख’

भारताचा मिल्खा ‘फ्लाइंग सिख’

१८ जूनला मिल्खा सिंग या धावपटूच्या झुंजीची, जिद्दीची, जिगरीची गाथा संपली. एक पर्व संपले. एका संघर्षमय यशस्वी जीवनाचा प्रवास संपला.

विस्तारवादाचे युग संपलेयः मोदींचा चीनला इशारा
व्होडाफोन प्रकरणः एक फसलेली खेळी
नेमक्या समालोचनाचा व निष्पाप मूल्यांचा वारसा

अथलेटिक्स क्षेत्रात जेव्हा भारताचे नावही कुणाला ठावूक नव्हतं त्या काळात तो धावला. उराशी संपूर्ण कुटुंबाच्या झालेल्या कत्तलीचे दुःख घेऊन धावला. डोक्यातील जी आग त्याने सतत धगधगत ठेवली त्याच आगीचे रुपांतर धावण्याच्या ट्रॅकवर एका झंझावातात झाले. त्याच्या पहिल्या वहिल्या कॉमनवेल्थ सुवर्ण पदकाने भारताला जगाच्या अथलेटिक्सच्या नकाशावर आणले. १९६०च्या दशकात क्रीडा क्षेत्राला ‘भारत’ या देशाच्या अथलेटिक्स ट्रॅकवरील आगमनाची चाहूल लागली.

पाकिस्तानचा धावपटू अब्दुल खालिक याला मागे टाकताना मिल्खा सिंग

पाकिस्तानचा धावपटू अब्दुल खालिक याला मागे टाकताना मिल्खा सिंग.

मिल्खा सिंगला पाहायला जगातले दर्दी प्रेक्षक यायला लागले. रोम ऑलिम्पिकमध्ये अवघ्या एक दशांश सेंकदाने त्याचे ऑलिम्पिक पदक हुकले. परंतु त्यावेळी मिल्खासिंग यांनी बरेच साध्य केले. भारतीयांसाठी अथलेटिक्स क्षेत्र नवे दालन खुले झाले. युवक धावण्याच्या शर्यतीकडे आत्कृष्ट झाले. भारतासाठी तो क्रांतीचा क्षण ठरला. क्रीडा क्षेत्रात जग ६०चे दशक भारत म्हणजे मिल्खा सिंग व मिल्खा सिंग म्हणजे भारत असे समजू लागले. ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारे जगातील सर्वोत्तम धावपटू असतात, त्यामध्ये मिल्खा सिंग होते. नावावर ऑलिम्पिक पदक नव्हते पण त्या पेक्षाही मोठी प्रतिमा या धावपटूने निर्माण केली. भारतीय अथलेटिक्स क्षेत्रासाठी ते प्रेरणास्थान ठरले. त्यांची कीर्ती आणि प्रभाव पाहून त्याकाळच्या युवकांना अथलेटिक्सच्या मैदानावर जावेसे वाटायला लागले. भारतीय अथलेटिक्स क्षेत्रासाठी ते आदर्श पुरुष ठरले.

सुवर्ण पदक, एशियन गेम १९६२ जकार्ता

सुवर्ण पदक, एशियन गेम १९६२ जकार्ता.

फाळणीत ज्या पाकिस्तानात त्याचे कुटुंबिय मारले गेले त्याच पाकिस्तानचे चॅम्पियन धावपटू अब्दुल खालिकविरुद्ध यांच्या बरोबर शर्यत लावण्यासाठी ते राजी नव्हते. तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी मिल्खा सिंग यांना प्रोत्साहित केले. तुझ्यासाठी संपूर्ण भारताचे प्रेम उभे आहे आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत, असा नेहरुंनी विश्वास व्यक्त केल्यानंतर मिल्खा सिंग पाकिस्तानात जाऊन धावले. वाघा सीमेवर त्यांच्यावर पाकिस्तानी चाहत्यांनी फुलांचा वर्षाव केला. त्या पाकळ्यांनी त्यांच्यावर झालेल्या जखमांचे घाव भरून निघाले नाहीत. मात्र मिल्खा सिंग यांची ती धाव दोन देशांमधील कटुता कमी करणारी ठरली.

पाकचा धावपटू अब्दुल खालिक हाच जिंकणार असा सर्वांचा अंदाज होता. ‘खलिफा बनाम मिल्खा’ आणि ‘पाकिस्तान बनाम हिंदुस्तान’ अशा हेडलाइन त्यावेळच्या होत्या.

शर्यतीच्या दिवशी लाहोर स्टेडियमवर सुमारे ६० हजार प्रेक्षक उपस्थित होते. त्यामध्ये तब्बल २० हजार महिला प्रेक्षक होत्या हे विशेष. शर्यत सुरू होण्याआधी पाकिस्तानच्या खालिकसाठी मौलवींनी येऊन तेथे यशासाठी दुवा मागितली. मिल्खा सिंग यांच्यासाठी हे आशीर्वाद देण्यासाठी कुणीच धर्मगुरु नव्हता. ते मौलवी परतत असताना मिल्खा सिंग म्हणाले, ‘मै भी खुदा का बंदा हूँ’. ते वाक्य ऐकताच ते मौलवी क्षणभर थबकले. त्यांनी मिल्खा सिंग यांच्यासाठीही दुवा मागितली.. ‘या अल्लाह इसे भी जीत बक्शे!’

त्या क्षणी दोन्ही देशातील धर्माच्या भिंती कोसळल्या. खालिक १०० मीटर शर्यतीचा चॅम्पियन होता पण मिल्खा सिंग ‘लंबी रेस’चा घोडा होते. १०० मीटर अंतरावर मिल्खा पाठी होते पण नंतर त्यांनी खालिकला गाठले. पुढे १५० मीटरचे अंतर पार करायचे होते. मिल्खा यांनी ४०० मीटरची ती शर्यत २०.७ सेकंद या विक्रमी वेळेत पूर्ण केली. मौलवीचा आशीर्वाद मिल्खांसाठी लाभदायी ठरला.

६० हजार पाकिस्तानी प्रेक्षक आणि त्यांचे अध्यक्ष जनरल अयूब खान ‘मायूस’ झाले. त्यावेळी अयूब खान यांच्या तोंडातून शब्द उमटले, ‘मिल्खा तू धावला नाहीस तर तू उडालास.’

त्या क्षणापासून तमाम विश्वाने मिल्खा सिंग याला ‘फ्लाइंग सिख’ असे म्हणायला सुरूवात केली. ज्या पाकिस्तानने त्याचे आई-वडिल व अन्य कुटुंबिय हिसकावले त्यांनीच मिल्खा सिंगला प्रचंड प्रेम दिले आणि ‘फ्लाइंग सिख’ बनवले.

या शर्यती बाबत मिल्खा सिंग म्हणतात,

“History resulted in partition of India and Pakistan but I am Milkha Singh. Whose childhood was spent in Pakistan and youth was spent in India. Childhood taught me to fight poverty and youth taught me how to win. Wherever I ran, India and Pakistan both ran with me. Abdul Khaliq too was my shadow and sometimes shadows fall behind and sometimes come forward.”

भारत मातेचा हाच सुपुत्र शुक्रवारी रात्री १८ जूनला हा इहलोक सोडून गेला. वयाच्या ९१ वर्षाच्या या धावपटूच्या झुंजीची, जिद्दीची, जिगरीची गाथा संपली. एक आधारच संपला. एका संघर्षमय यशस्वी जीवनाचा प्रवास संपला.

जो प्रवास पाकिस्तानातून जीव वाचवण्यासाठी सुरू झाला होता. नजरेसमोर कुटुंबिय कायमचे गेले.

पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर मिल्खा सिंग.

पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर मिल्खा सिंग.

ते दुःख मनाशी बाळगत हा झुंजार खेळाडू धावत, पडत, धडपडत एकटा कसाबसा भारतात पोहोचला. दिल्लीच्या निर्वासित कॅम्पमध्ये राहायला लागला. त्यावेळी काम मात्र काहीही मिळत नव्हते. त्यांच्या डोक्यात दरोडेखोर बनवण्याचे विचार घोळत होते. वडील बंधुंच्या संगतीमुळे त्या विचारांना खतपाणी मिळाले नाही. उलट १९५१मध्ये भारतीय सैन्यामध्ये सामील होण्याचा निर्णय मिल्खा सिंग यांनी घेतला.

भारताच्या या महान धावपटूने रोम ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर शर्यतीत त्या काळातील सर्व आघाडीच्या धावपटूंना पहिल्या २५० मीटर अंतरापर्यंत मागे टाकण्याची चूक केली. कारण त्यानंतर त्यांच्या धावण्याचा वेग मंदावला आणि अंतिम रेषेवर ते चौथा आले. आघाडीवर असताना त्यांनी आजूबाजूच्या धावपटूंचा अंदाज घेण्यासाठी किंचित मान वळवली. तो बेसावध क्षणही त्यांना पदकापासून दूर नेणारा ठरला. फोटो फिनिशमध्ये ते चौथा आले.

१९६२च्या जाकार्ता एशियाडमध्ये त्यांनी ४०० मीटर व ४ बाय ४०० मीटर रिलेचे सुवर्णपदक पटकावले. त्या आधी १९५८च्या टोक्यो एशियाडमध्ये त्यांनी २०० व ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते. परंतु १९५८च्या कार्डिक (वेल्स) येथील राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांना आणि भारताला खर्या अर्थाने अथलेटिक्सच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ओळख मिळाली.

तोच कालखंड मिल्खा सिंग यांच्यासाठी सर्वोच्च कामगिरीचा ठरला. कारण त्यानंतर त्यांना ती उंची कधीच गाठता आली नाही. १९६४च्या टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये ४०० मीटर व ४ बाय १०० मीटर शर्यतीत ते  धावलेच नाहीत त्यामुळे भारतीय रिले चमू प्राथमिक फेरीतच गारद झाला.

भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाची कप्तान निर्मल सैनी यांच्याशी १९६२मध्ये मिल्खा सिंग विवाहबद्ध झाले आणि या क्रीडापटूच्या संसाराला सुरूवात झाली. त्यांना ३ मुली होत्या. त्यांचा एकमेव पुत्र जीव मिल्खा सिंग याला त्यांनी धावपटू न करता गोल्फपटू का केले हे एक कोडंच आहे.

मिल्खा सिंग यांना १९५८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तरुण क्रीडापटूंना प्रोत्साहित करण्यासाठी अर्जुन पुरस्कार देण्यावर ते ठाम होते. पण अलिकडे पुरस्कारांची प्रसादासारखी खिरापत वाटली जाते, असं ते म्हणायचे. पद्मश्री मिळाल्यानंतर अर्जुन पुरस्कार देणे म्हणजे मास्टर्स डिग्रीनंतर एसएससी डिग्री देण्यासारखे आहे, असं ते म्हणायचे.

जर्मनीचा धावपटू कार्ल कौफमॅन यांच्याबरोबर १९६०.

जर्मनीचा धावपटू कार्ल कौफमॅन यांच्याबरोबर १९६०.

मिल्खा सिंग यांनी आपल्या कारकिर्दीतील सारी पदके देशाला दान केली. दिल्लीच्या जवाहरलाल स्टेडियममध्ये ती ठेवण्यात आली होती. नंतर ती पदके पतियाळाच्या स्पोर्ट् स म्युझियममध्ये हलवण्यात आली. मिल्खा सिंग यांनी आपले बूट व अन्य गोष्टीही लिलावासाठी दिल्या होत्या.

काही दिवसांपूर्वीच १३ जून २०२१ रोजी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्या नंतर अवघ्या ५ दिवसांनी मिल्खा सिंग यांनीही या जगाचा निरोप घेतला. ‘फ्लाइंग सिख’ नव्या प्रवासावर निघून गेला.

जगात तेथे मिल्खा सिंग जायचा तेथे शीख समुदाय मोठ्या संख्येने त्याला प्रोत्साहन देण्यासाठी जायचा. तो फ्लाइंग सिख एका नव्या प्रवासाला निघून गेला. भारतातील क्रीडा क्षेत्रासाठी एक प्रेरणास्थान बनून राहिला.

विनायक दळवी हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0