हंटर बायडनचा वाचनीय खुलासा

हंटर बायडनचा वाचनीय खुलासा

हंटर बायडन यांच्या आठवणी प्रसिद्ध झाल्या आहेत. हंटर पुस्तक लिहीत आहेत अशी कुणकुण होती. परंतू त्या पुस्तकात साधारणपणे काय असेल याची कल्पना लोकांना ह

‘आरे’तील ६०० एकर जागा वनांसाठी राखीव
‘रस्ते अडवले तर पुन्हा तसेच बोलेन’
आकळण्यापलीकडच्या लीलाताई…

हंटर बायडन यांच्या आठवणी प्रसिद्ध झाल्या आहेत.

हंटर पुस्तक लिहीत आहेत अशी कुणकुण होती. परंतू त्या पुस्तकात साधारणपणे काय असेल याची कल्पना लोकांना होती. हंटर व्यसनी होते हे लोकांच्या कानी होतं. जो बायडन या आपल्या पित्याच्या पदाचा गैरवापर करून ते बुरिस्मा या युक्रेनमधल्या कंपनीच्या संचालकपदावर पोचले, तिथं त्यांनी अफाट पैसे कमवले असा आरोप ट्रंप यांनी केला असल्यानं ते प्रकरणही लोकांना माहित होतं. त्यामुळं या दोन गोष्टींचे खुलासे करून हंटर स्वतःची (व वडिलांची) सुटका करणार अशी लोकांची अपेक्षा होती.

ब्युटिफुल थिंग्ज या हंटर यांच्या पुस्तकातून त्या अपेक्षा पूर्ण झाल्या. हंटर स्वतःचं समर्थन करणार, आपल्या हातून काहीही गैरव्यवहार झालेला नाही असं हंटर लिहितील अशी अपेक्षा होती. त्यामुळं कबुलीसारख्या रुपात लिहिलेल्या या पुस्तकामधे वाचनीयता नसेल असं वाटलं होतं. परंतू अनेक कारणांसाठी पुस्तक अपेक्षीत असूनही वाचनीय आहे.

पुस्तकात हंटरनं आपल्या व्यसनांबद्दल सविस्तर लिहिलं आहे.

शाळेत असतानाच हंटरनं शँपेनपासून सुरवात केली. नंतर कॉलेजमध्ये तो दणादण पिऊ लागला. नंतर त्याला क्रॅक या ड्रगची सवय लागली. नंतर दारू आणि क्रॅक अशा दोन्ही गोष्टी तो करत असे.

वडील जो बायडन यांना हंटरचं व्यसन अगदीच नापसंत होतं. जो बायडन यांना दारूबद्दल एक प्रकारचा तिटकाराच होता. त्यांच्या नातेवाईकांमधे नशेचा अतिरेक झाल्याची उदाहरणं होती. बायडन घरामधे बोलत असताना सतत दारू चांगली नाही, पिऊ नये असं सांगत असत.

मोठा भाऊ बो हाही दारुपासून दूरच रहात असे. हंटरला व्यसनापासून दूर रहाण्याचं सतत सुचवत असे. हंटरचं व्यसन वाढत गेलं तेव्हां दोघंही त्याला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवत, व्यसनाबाबत सल्ला देणाऱ्या डॉक्टरांकडं नेत. पण हंटरवर त्याचा परिणाम झाला नाही.

आपण नशा करत होतो म्हणजे काय करत होतो याचं चित्रमय वर्णन हंटरनं प्रस्तुत पुस्तकात केलं आहे.

दारु पिऊ लागला की अनेक दिवस नुसती दारूच पीत असे. क्रॅक ओढू लागला की दर काही मिनिटांनी क्रॅक ओढत असे. जरा नशा कमी झाली की तो अस्वस्थ होत असे आणि क्रॅक ओढत असे. गंमत म्हणजे या काळात तो वकील म्हणून कामं करत होता, सल्लागारीचं आपलं कामही करत होता. येवढंच नव्हे तर वर्ल्ड फूड या सेवाभावी मोहिमेत तो जगभर फिरत होता. कामाच्या निमित्तानं देशोदेशीच्या नेत्यांचा सहवास त्याला लाभत असे. परंतू या काळातही दर थोड्या काळानं तो सटकत असे, क्रॅक सेवन करत असे.

बैठक चाललेली असे. बैठकीत आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी माणसं असत. तासभर झाला की हंटर म्हणे की जरा बाथरूममधे जाऊन येतो. बाथरूममधे जाऊन तो क्रॅक ओढत असे. दिवसभरात बैठक चालू असताना किती तरी वेळा त्याचं क्रॅक सेवन चालत असे. बैठक आटोपून हॉटेलवर परतला की दारू सुरू.

हंटर पाच पन्नास गावं शहरं फिरला. अनोळखी गाव. पेट्रोल पंपावर जायचं. तिथं चौकस नजरेनं पहायचं. ही नजर व्यसनी माणसाची असते हे संबंधितांना कळतं. बरोब्बर एक माणूस टपकतो. गावातल्या गूढरम्य ठिकाणी नेतो, तिथं क्रॅक देतो. दहा पैकी पाच सहा वेळा हंटर फसतो, पैसे वाया जातात. पण तीन चार वेळा उत्तम क्रॅक मिळतंच. गावातल्या जनरल स्टोअर्समधेही क्रॅक विकणारे घोटाळत असतात.

सामान्य गावातल्या सामान्य गल्ल्यांचं सोडा. खुद्द वॉशिंग्टनमधे, थेट प्रेसिडेंच्या घराच्या आसपास, खुद्द पोलिस प्रमुखाच्या ऑफिसाच्या आसपास क्रॅक विकणारी माणसं घोंघावत असतात. वडील व्हाईस प्रेसिडेंट आणि हा गडी त्यांच्या घराच्या आसपासच क्रॅक मिळवत असे.

एका परीनं हंटरनं अमेरिकेची लाजच काढली आहे. चॉकलेटं, आईसक्रीम जितक्या सहजपणे कुठंही मिळावं तितक्या सहजपणे अमेरिकेत ड्रग मिळतात याचा अर्थ काय? काय करतात पोलीस?

व्यसनी लोकांना भेटणारी माणसंही भारी असतात. ऱ्हिया नावाची एक व्यसनी मैत्रिण हंटरला भेटते. नाव अर्थातच बदललेलं आहे, खरं नाही. दोघं कित्येक महिने एकत्र रहातात. ड्रग हा या स्त्रीचा धंदा असतो. जामच बिनधास्त असते. दोघं दिवसरात्र नशेत धुंद. तिकडं हंटरची पत्नी कुठं तरी असते, त्याच्या मुली तिसऱ्या ठिकाणी असतात.शेवटी पत्नी काडीमोड देते.

पण अशा या वाया गेलेल्या माणसाला अचानकच एक मेलिसा नावाची द.आफ्रिकन स्त्री भेटते आणि त्याला व्यसनातून मुक्त करते.

कादंबरी किंवा चित्रपटात शोभावेत असे प्रसंग आणि माणसं.

हंटर त्यांच्या बुरिस्मा या कंपनीतील कामाबद्दल बोलतात. आपण काहीच गैर केलेलं नाही, सारं काही कायदेशीर होतं असं ते थोडक्यात सांगतात. पण हेही कबूल करतात की त्या कामाबद्दल हंटरला भरपूर म्हणजे भरपूर पैसे मिळाले. एकीकडं या पैशाचा वापर बो या भावावर कॅन्सरच्या उपचारासाठी करता आला आणि अर्थातच व्यसनं करणंही सोपं गेलं. क्रॅकसाठी सतत शंभर डॉलरची नोट लीलया पुढं करणं ही गोष्ट भरमसाठ पैसे असल्याशिवाय कशी शक्य होणार?

तसं हंटरचं आयुष्य म्हणजे दुर्घटनांची एक मालिकाच आहे. दोन वर्षाचा असताना बायडन कुटुंब गाडीतून निघालं होतं, गाडीला अपघात झाला. अपघातात हंटरची धाकटी बहीण जागच्या जागी ठार झाली. हंटरच्या बाजूला बसलेला बो हा भाऊ जबर जखमी झाला, कसाबसा वाचला, कित्येक महिने अंथरूणात होता. बो याला कॅन्सर झाला. एकमेव भाऊ आणि त्याची तरूण वयात ही गत होणं हा हंटरवर मोठा आघात होता.

पण जो बायडन यांचं हंटवर निस्सीम प्रेम होतं आणि आहे. हंटरला व्यसनाबाहेर काढण्यासाठी त्यानी आटोकाट प्रयत्न केले, कधीही त्याला एकटं सोडलं नाही.

कसं असतं पहा. मुलगा जबर व्यसनी असूनही बायडन निवडणुका लढवत राहिले, दोन वेळा उपराष्ट्रपती झाले आणि नंतर राष्ट्रपतीही झाले. भावाची ही स्थिती असूनही बो दोन वेळा राज्याचा कायदे मंत्री झाला आणि गव्हर्नर होण्याच्या बेतात होता.

हंटर पुस्तकात कुठंही आपलं समर्थन करत नाही. पण भावनेनं ओथंबलेला पश्चात्तापही पुस्तकात नाही. आपण किवा कोणीही माणूस व्यसन करतो कारण त्यातून मिळणारी नशा फार आनंददायक असते, म्हणूनच नशा सोडवत नाही असं हंटर बिनधास्त लिहितो.

२०१९ मध्ये हंटरनं पुस्तक लिहायला घेतलं. २०२० च्या डिसेंबरपर्यंत पुस्तक लिहून झालं. व्यसनमुक्ती हा पुस्तकाचा परमोच्च बिंदू आहे. पण पुस्तकाचा शेवट करतानाही उपदेश, अध्यात्म वगैरेची भानगड नाही. मी असं असं व्यसन केलं, आता या घडीला मी व्यसन मुक्त आहे असं सांगून पुस्तक संपतं.

हंटरला लिहायची, चित्र काढायची आवड होती. ती हौस बाजूला राहिली आणि हंटर वकील झाला. परंतू हे पुस्तक लिहितांना त्याच्यातला कलाकार सक्रीय झालेला दिसतोय.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0