तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू ठेवावेत – ठाकरे

तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू ठेवावेत – ठाकरे

मुंबई दिनांक ७ : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील  मोठ्या उद्योपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्ट

पूरग्रस्तांसाठी ६ हजार कोटींची मागणी
टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही – मुख्यमंत्री
जलसंपदा प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री

मुंबई दिनांक ७ : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील  मोठ्या उद्योपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे, ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे तिथे त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून  कामगारांची तिथे राहण्याची (फिल्ड रेसिडन्स)  व्यवस्था करावी, त्यादृष्टीने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेले सहकार्य करावे, अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सचे पदाधिकारी, बाल टास्कफोर्सचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या दोन लाटेमधील हा काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊन आपण काहीप्रमाणात आर्थिक व्यवहार सुरु करत असलो तरी अतिशय सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योग आणि आर्थिक चळवळ सुरु राहण्यासाठी  कामगारांचे येणे जाणे हे त्यांच्या कामाचे ठिकाण आणि घर इथपर्यंतच मर्यादित राहणे गरजेचे आहे.

नियमांचे काटेकोरपणे पालन करा

अजून कोरोनाची दुसरी लाट पूर्णत्वाने ओसरलेली नाही. परंतू याही स्थितीत कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन आपण हळुवारपणे काही आर्थिक उपक्रम सुरु करत आहोत. हे करतांना सावधगिरीची पाऊले म्हणून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, ते कागदावर राहणार नाहीत, ते काटेकोरपणे अंमलात येतील, कुठेही गर्दी होणार नाही, सभा समारंभ होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

गर्दी टाळा

आता पावसाळा आहे, या काळात साथीचे इतर आजार उद्भवतात त्यात कोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव आहे. याच काळात आपले सण समारंभही सुरु होतात. ही सगळी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय ऑक्सीजनच्या तयारीचाही आढावा घेतला त्यांनी ऑक्सीजन निर्मिती, ऑक्सीजन साठा आणि रुग्णसंख्या वाढल्यास करावयाची पूर्वतयारी यासर्वच प्रक्रियेतील वेग देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी जनजागृती करा

आशा- अंगणवाडीसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गावागावात जनजागृती करून कोराना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले सर्वजण दुसरा डोस वेळेत घेतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे  अशी सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की,  लसीचे दोन्ही डोस घेऊन कोराना बाधित होणाऱ्यांची संख्या, त्याची स्थिती आणि कारणे याचे टास्कफोर्सने विश्लेषण करावे, ही माहिती संकलित करतांना ती अनुभवजन्य राहील (लसीचा पहिला डोस घेतला होता की दोन्ही) याची काळजी घ्यावी.

पारनेर तालुक्यात जिनोम सिक्वेन्सी

पॉझिटिव्हीटी दर जास्त असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यात केलेल्या  उपाययोजनांनंतरच्या स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर तुलनेने कमी होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले तसेच हा दर आणखी कमी करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची संख्या वाढवणे, गृह विलगीकरण कमी करून संस्थात्मक उपचाराला गती, लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जनुकिय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करून घेण्याचे निर्देश ही आरोग्य विभागाला दिले. होमगार्ड नियुक्त्या, फिरती चाचणी केंद्रे आणि इतर आरोग्य सुविधांविषयक मागणीचा ज्या जिल्ह्यांनी उल्लेख केला त्यांच्या मागणीची दखल घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

जिद्द कायम ठेवा

कोरानामुक्त गावांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचांची बैठक घेऊन गाव कोरोनामुक्त होईल याची दक्षता घ्यावी, वस्ती केंद्रीत करून गाव कोरोना मुक्त करावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या बैठकीत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सांगितल्या तसेच तिसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी केलेली तयारीही सांगितली तेव्हा  कोरोनाला हरवण्याची तुमची जिद्द कौतूकास्पद आहे ती कायम ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0