उपयोजित तत्त्वज्ञानाचे अंतरंग

उपयोजित तत्त्वज्ञानाचे अंतरंग

बर्ट्रंड रसेल दर्शन भाग १३ : ‘तत्त्वज्ञानाने काळाशी ‘सुसंगत’ असले पाहिजे’, म्हणजे “तत्त्वज्ञानाने रोजमर्रा जिंदगीतले महत्वाचे प्रश्न सोडवले पाहिजेत” असा एक धोशा बिगर-तत्त्वज्ञान वर्गाकडून नेहमीच लावला जातो. वस्तुतः ही मागणीच तत्त्वज्ञानाच्या गैरआकलनातून आलेली असते. कारण तत्त्वज्ञानाची निर्मितीच मूलतः रोजच्या जगण्यातील समस्या, दुखः इत्यादीतून झालेली असते. पण तत्त्ववेत्ते हस्तिदंती मनोऱ्यात बंदिस्त होऊन बसले की रोजमर्रा जिंदगीशी तत्त्वज्ञानाचा ताळमेळ साधण्याचा प्रश्न उग्र होतो. हा प्रश्न प्राचीन भूतकालात जेवढा उग्र झाला होता, त्यापेक्षा विसाव्या शतकात कमाल तीव्रतेने उग्र स्वरुपात वेगवेगळ्या युरोपीय-पाश्चात्य देशात उद्भवला आणि ‘उपयोजित तत्त्वज्ञाना’ चा विचार सुरु झाला.

‘आवश्यक सर्व झाडे कापली’
मुनियाचं घरटं
एकटं असण्यासाठी एकत्र येऊ या!

-१-

“तत्त्वज्ञान आणि रोजमर्रा जिंदगीतील महत्वाच्या प्रश्नांचा संबंध काय?” हा प्रश्न सामान्य भाषेत मांडायचा तर ‘तत्त्वज्ञान/सिद्धांत आणि व्यवहार’ (Philosophy/Theory and Praxis) यांच्यातील संबंध काय? असे म्हणता येईल. वस्तुतः हा प्रश्न अतिप्राचीन आहे. त्याचा माग अॅरिस्टॉटलच्या काळापर्यंत नेता येतो; किंबहुना त्याच्याही आधी सोफिस्ट तत्त्ववेत्त्यांच्या तत्त्वज्ञानापर्यंत नेता येतो. सोफिस्टांनी ‘उपयोगी तत्त्वज्ञान’ दिले. तथापि त्यांनी अशा ‘उपयोगी तत्त्वज्ञानाचा बाजार मांडला व तत्त्वचिंतनाची अधोगती, चिंतनाची अवनती केली’ अशी कडक टीका प्लेटो सॉक्रेटीसच्या तोंडून करतो. प्राचीन काळापासून होत असल्यानेच आज ‘ तत्त्वज्ञानाचा उपयोग की उपयोजन’ हा प्रश्न अतिशय मौलिक ठरतो. हा प्रश्न प्राचीन काळी विचारला गेला असला तरी त्याचे संपूर्ण ताकदीने उत्तर देण्याचा प्रयत्न होण्यास विसावे शतक उजाडले; ह्याचाच अर्थ किमान उत्तर शोधण्यासाठी २५०० वर्षे जावी लागली! प्राप्त झालेली ही उत्तरे समाधानकारक व यथार्थ वाटतीलचं असे नाही. त्यांच्यात तर्कदोष आणि विचारदोष असतीलही, पण ज्या उत्तरांमध्ये दोषांची पातळी किमान राहील, अशी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तत्त्ववेत्ते करीत आहेत.

या प्रस्तुत “तत्त्वज्ञान आणि रोजमर्रा जिंदगीतील महत्त्वाच्या प्रश्नांचा संबंध काय?” प्रश्नाचा विचार सामान्य माणूस आणि विचारवंत किंवा तत्त्ववेत्ते अशा दोन बाजूंनी केला जातो. सामान्य माणसाला तातडीने काहीएक ठोस उत्तर हवे असते की ज्यामुळे तो त्याचा पुढील क्षण तो त्याच्या अपेक्षेनुसार समाधानकारकरीत्या जगू शकेल. अशी उत्तरे भजन, प्रवचन, कीर्तन, संतवचने इत्यादी साहित्यातून-पर्यायाने भक्तिमार्गातून सामान्य माणसाला मिळू शकतात. पण त्या उत्तरांमधून लोकशाही जीवनव्यवस्थेशी सुसंगत असलेला ‘काहीएक धोरणात्मक आराखडा’ रचता येऊ शकेल, अशी ती उत्तरे असतील, याची शाश्वती नसते. म्हणजेच अशी उत्तरे ‘स्व-रूपा’ ने ‘तात्त्विक’ असतील, असे नाही. ती धार्मिक असण्याची शक्यता असते आणि धर्मग्रस्त उपाय वादग्रस्त असतात, हे सिद्ध होत आले आहे, हा मानवजातीचा इतिहास आहे.

चिकित्सेचे युग : युद्धपूर्व आणि युद्धोत्तर

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोप-अमेरिकन तत्त्वचिंतनाच्या विश्वात तत्त्वज्ञानाच्या ‘चिकित्सेचे युग’ जणू सुरू झाले होते. या चिकित्सेचे स्थूलमानाने ‘युद्धपूर्व चिकित्सा’ आणि ‘युद्धोत्तर चिकित्सा’ असे प्रकार करता येतील.

युद्धपूर्व चिकित्सा

युद्धपूर्व काळात प्राथमिक पातळीवर ही चिकित्सा तत्त्वज्ञानाच्या स्वरुपाचीच काटेकोर चिकित्सा करणारी होती. त्या चिकित्सेतून ‘Meta-Philosophy’- अधि-तत्त्वज्ञान ही चळवळ सुरु झाली. Meta-Philosophy ही संकल्पना सर्वप्रथम मॉरिस लाझेरोवित्झ (Morris Lazerowitz) या अमेरिकन तत्त्ववेत्त्याने बनवली. ‘Meta philosophical’ ही संज्ञा सर्वप्रथम मॉरिसने १९४० ला उपयोगात आणली. त्यामागे त्याचा विशिष्ट हेतू होता. विटगेन्स्टाईनने ‘तत्त्वज्ञानाचे वारस’ (“heirs” of philosophy) अशी एक संकल्पना मांडली. तत्त्वज्ञानाचे “वारस” म्हणून विटगेन्स्टाईनला नैसर्गिक विज्ञाने, गणिती विज्ञाने आणि गणिती तर्कशास्त्र ह्या विशेष ज्ञानशाखा अपेक्षित आहेत. असा काहीएक ‘वारस’ देता येणे शक्य व्हावे, त्या वर्णनाला पात्र ठरेल अशा तऱ्हेच्या विशेष संशोधन मांडता यावे आणि त्या संशोधनाचा निर्देश ‘तत्त्वज्ञानाचा वारस’ या शब्दात करता येणे शक्य व्हावे, अशी चिकित्सा करणारे तत्त्वज्ञान मांडावे आणि ती चिकित्सा सर्व ज्ञानशाखांची चिकित्सा करणाऱ्या खुद्द तत्त्वज्ञानाचीच असावी, हा मॉरिसचा हेतू होता. म्हणून त्या चिकित्सेला ‘Meta-Philosophy’ असे नाव देतो.

“अनिर्णीत तात्त्विक दावे आणि त्याविषयीचे युक्तिवाद यांच्या (तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात जाणवणाऱ्या) अभावाचे समाधानकारक स्पष्टीकरण देणे शक्य व्हावे, हा हेतू केंद्रीभूत ठेवून तत्त्वज्ञानाच्या स्वरुपाची काटेकोर चिकित्सा करणे म्हणजे अधि-तत्त्वज्ञान” अशी संकल्पना मॉरिसने मांडली.

तत्त्वज्ञानाकडे नव्याने पाहाण्यास शिकले पाहिजे, तात्त्विक चिंतन आणि त्या चिंतनाचे व्यावहारिकदृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन, तत्त्वज्ञानासंबंधी कोणतेही गैरसमज होणार नाहीत, असे नवे प्रश्न तत्त्वज्ञानाबाबतच उपस्थित केले पाहिजेत, असा मॉरिसचा आग्रह होता. या चिकित्सेने यथावकाश चळवळीचेच रूप धारण केले. त्यांची सविस्तर दखल १९७०ला Metaphilosophy हे नियतकालिक सुरू करून घेण्यात आली. युद्धपूर्व काळात सुरू झालेल्या तत्त्वज्ञानाच्या चिकित्सेचे हे युद्धोत्तर फळ होते.

युद्धोत्तर चिकित्सा : उपयोजित नीतिशास्त्र

तथापि युद्धपूर्व व युद्धोत्तर काळाच्या दरम्यान, म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या मध्यकाळात आणि शीतयुद्ध प्रारंभाच्या संधीकाळात तत्त्वज्ञानाच्या विश्वात एक महत्वाची घटना घडली. या काळात तत्त्वज्ञानाची शाखा असणाऱ्या नीतिशास्त्राच्या क्षेत्रात ‘उपयोजित नीतिशास्त्र’ या नावाने नव्या नीतिशास्त्राचा उदय झाला. या नीतिशास्त्राने ‘उपयोजित’ (applied) ही संकल्पना तत्त्वज्ञानाच्या क्षेत्राने रुजवली, चिंतनाच्या केंद्रभागी आणली. तेथून ‘उपयोग की उपयोजन’ (use or application) हा प्रश्न तात्त्वज्ञानिक ऐरणीवर आला.

‘उपयोजन’ (use or application) संकल्पनेच्या अधिष्ठानावर ‘युद्धोत्तर चिकित्सा’ गतिमान झाली आणि तिने जीवनाला थेट भिडणारे तात्त्विक प्रश्नच उपस्थित केले. ही चळवळ ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ या नावाने सुरू झाली. ते गेल्या चाळीस वर्षात युरोप-अमेरिकेत अतिशय वेगाने व तातडीने विकसित झाले. त्यात ज्ञानशास्त्र, सत्ताशास्त्र, नीतिशास्त्र, या तत्त्वज्ञानाच्या शाखांचा आणि विज्ञानाचे तत्त्वज्ञान, मनाचे तत्त्वज्ञान या उपशाखांचा समावेश करण्यात आला, आणि त्यांना जीवनाच्या महत्वाच्या रोजमर्रा प्रश्नांशी जोडून घेण्यात आले. रोजच्या किंवा नेहमीच्या जगण्याशी निगडीत असणाऱ्या कोणत्याही सामाजिक समस्येची विवेकवादी चर्चा करून तात्त्विक निष्कर्षाला येण्यातून ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ निर्माण होते.

-२-

 उपयोजित तत्त्वज्ञान : उदय

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन तत्त्ववेत्ता हेगेलने ‘निरपेक्ष चिद्वाद’ (Absolute Idealism) मांडला. हेगेलच्या चिद्वादाचे दोन प्रकार करता येतात : ‘एकतत्त्ववाद’ – monism आणि ‘अध्यात्मवाद’ – spiritualism. हेगेलचे वैचारिक अनुयायी ब्रॅडली, मॅक्टगर्ट या तत्त्ववेत्त्यांमुळे जी. ई. मूर व बर्ट्रांड रसेल प्रारंभी हेगेलीय चिद्वादाच्या प्रभावाखाली आले होते. पण मूरच्या विश्लेषणवादामुळे रसेलने हेगेलचे तत्त्वज्ञान झुगारून दिले. चिद्वाद झुगारणे हे खूप मोठे बंड होते !

हेगेलच्या चिद्वादाच्या विरोधात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मूर, रसेल आणि लुडविग विटगेन्स्टाईन यांनी ‘वास्तववाद’ (Realism) मांडला. अर्थात हेगेलचा काही प्रभाव रसेलवर पडला होताच. त्याचाच परिणाम म्हणून की काय पण, ‘तत्त्वज्ञानाने सर्व मानवी व्यवहारांचा सुसंबद्ध आणि पद्धतशीर समन्वय साधून दाखविला पाहिजे, ह्या तत्त्वज्ञानाच्या कार्याबद्दलची (function/business of philosophy) कल्पना रसेलच्या मनात रुजली होतीच.

लुडविग विटगेन्स्टाईन

लुडविग विटगेन्स्टाईन

चिद्वादी तत्त्वज्ञान प्रभावी ठरले पण रोजच्या जगण्याला त्याचा ‘उपयोग’ होतो का? हा प्रश्न उपस्थित झाला. रसेलचा मित्र व काही काळ शिष्य राहिलेला जर्मन तत्त्ववेत्ता लुडविग विटगेन्स्टाईन (Ludwig Josef Johann Wittgenstein, जन्म: २६ एप्रिल १८८९, मृत्यू: २९ एप्रिल १९५१)  कठोर टीका करतो की,

तत्त्वज्ञान जर तर्कशास्त्र इत्यादींमधील जटील डोकेखाऊ प्रश्नांवर सत्याभास देणारी काहीतरी बाष्कळ बडबड करण्याइतपतच तुम्हाला समर्थ करत असेल; आणि रोजमर्रा जगण्याच्या महत्वाच्या प्रश्नांवर विचार करण्याची तुमची क्षमताच उंचावत नसेल, तर तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा ‘उपयोग’ च काय….?”

विटगेन्स्टाईनचा मित्र आणि चरित्रकार एन. माल्कम याने लिहिलेल्या विटगेन्स्टाईनविषयक “A Memoir” ह्या स्मृतिग्रंथात ही आठवण उद्धृत केली आहे.

“चिद्वादी तत्त्वज्ञानाचा किंवा कोणत्याही तत्त्वज्ञानाचा रोजच्या जगण्याला ‘उपयोग’ (use) होतो का?” या प्रश्नाचे रुपांतर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात “ (कोणतेही) तत्त्वज्ञान रोजच्या जगण्याला ‘उपयोजित’ ठरते काय? असे झाले. त्यामुळे “उपयोजित तत्त्वज्ञान म्हणजे काय?’’ हा प्रश्न महत्त्वाचा ठरला. चिद्वाद विरुद्ध वास्तववाद संघर्षाच्या संदर्भात ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ ही कलाटणी देणारी तात्त्विक विचारधारा ठरली.

मला असे आढळते की, हेगेलचा चिद्वाद झुगारल्यानंतर रसेलने जे तत्त्वज्ञान विकसित केले त्यामागे त्याच्या मनात रुजलेली ‘तत्त्वज्ञानाच्या कार्या’ बद्दलची कल्पना काहीशी ‘तत्त्वज्ञानाचे उपयोजन’ या संकल्पनेकडे झुकणारी होती. रसेलचे सामाजिक लेखन एका प्रकारे त्याची ‘तत्त्वज्ञानाचे उपयोजन’ ही संकल्पना स्पष्ट करणारी होती. आणि त्याच्या सामाजिक व राजकीय चळवळींकडे त्या उपयोजनाची प्रात्यक्षिके म्हणूनही पाहाता येईल, असे आज मी म्हणेन. एका व्यापक अर्थाने रसेलचे समग्र तात्त्वज्ञानिक जीवन म्हणजे त्याच्या ‘तत्त्वज्ञानाची उपयोजित प्रयोगशाळा’ असेही वर्णन मी करू इच्छितो.

“उपयोजित तत्त्वज्ञान म्हणजे काय?’’ या प्रश्नाला भिडण्याचा एक मार्ग असा : आपण जेव्हा तत्त्वज्ञानाचे उपयोजन करतो, तेव्हा आपण ते कशाला तरी ‘लावून’ (to apply), ‘उपयोजित’ करून पाहात असतो. उदाहरणार्थ, मी जर असे म्हणालो की मी उपयोजित तत्त्वज्ञानाच्या एका मजकुरावर काम करतो आहे; तर कोणी प्रश्न उपस्थित केला किंवा मीच मला प्रश्न विचारला की “मी नेमके काय करतो आहे? मी तत्त्वज्ञान कशाला उपयोजित करतो आहे?” या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणेन की, “काही नाही, मी उपयोजित तत्त्वज्ञानावर थोडसं लिहितोय”.

पण हे काही समाधानकारक स्पष्टीकरण नाही, हे उघडच जाणवते आहे. मग मला काय केले पाहिजे? किंवा कोणालाही नेमकी कोणत्या स्वरुपाची कृती केली (चं) पाहिजे? तर, ‘उपयोजन’ (to apply) करणे, म्हणजे नेमके कोणती ‘कृती’ करणे, याचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो प्रयत्न  स्टीव्हनसन-रासम्युसन या आधुनिक तत्त्वचिंतकांनी केला आहे.

स्टीव्हनसनरासम्युसन यांचे योगदान

‘उपयोजित तत्त्वज्ञान’ या संकल्पनेची चर्चा अमेरिकन विश्लेषक तत्त्ववेत्ता आणि नीतिशास्त्रज्ञ-सौंदर्यशास्त्रज्ञ लेस्ली स्टीव्हनसन (Charles Leslie Stevenson, जन्म: २७ जून १९०८, मृत्यू: १४ मार्च १९७९) आणि डेन्मार्क येथील राजशास्त्रज्ञ आणि राजकीय व नैतिक तत्त्ववेत्ता कॅस्पर लीपरेट रासम्युसन (Kasper Lippert-Rasmussen जन्म: १६ जानेवारी १९६४, हयात …. ) यांच्या दोन प्रदीर्घ निबंधात केलेली आहे.

स्टीव्हनसनने मूळ संकल्पनेची मांडणी करणारा ‘Applied Philosophy’ निबंध १९७० साली लिहिला त्यावर रासम्युसनने ‘The Nature of Applied Philosophy’ हा टीकात्मक निबंध २०१७ साली लिहिला. या दोन्ही निबंधांतून ‘उपयोजित तत्त्वज्ञाना’ ची संकल्पना समजावून घेता येते.

लेस्ली स्टीव्हनसन   

लेस्ली स्टीव्हनसन

दोघांच्या मांडणीत मुख्य फरक हा आहे की, स्टीव्हनसन ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ ही संकल्पना स्पष्ट करताना दोन मुख्य मुद्द्यांची चर्चा करतो. (१) पहिला असा की, ह्या संकल्पनेची तुलना विद्यापीठीय अभ्यासक्रमात नेमल्या गेलेल्या पारंपरिक तत्त्वज्ञानाशी केली आहे. (२) दुसरा मुद्दा असा की, ह्या उपयोजित तत्त्वज्ञाना’ची निर्मिती करण्याचे उत्तरदायित्व स्वीकारणारा वर्ग कोणता असू शकतो. रासम्युसनने स्टीव्हनसनची ती चर्चा गृहीत धरून स्वतःची सात संकल्पने (Conceptions) विकसित केली.

कॅस्पर लीपरेट रासम्युसन

कॅस्पर लीपरेट रासम्युसन

संकल्पने (Conceptions) आणि संकल्पना (concept)

येथे आपण ‘संकल्पने’ (Conceptions) आणि ‘संकल्पना’ (concept) यातील फरक समजून घेतला पाहिजे. तो फरक फार खोलात न जाता थोडक्यात सांगतो. ‘संकल्पने’ ही एखाद्या विषयावर विचार करत असताना त्या विषयाचा आशय अजून पूर्ण न झालेली पण चालू असलेली वैचारिक प्रक्रिया आहे तर ‘संकल्पना’ ही ती प्रक्रिया पूर्ण होऊन त्या विषयाचा आशयाबाबत काहीएक निश्चित रूपरेषा देणारा विचार असतो.

दोन्ही तत्त्ववेत्त्यांनी मिळून ‘उपयोजित तत्त्वज्ञाना’ची संकल्पना आणि सात संकल्पने स्पष्ट केली आहेत. ते काम करताना अमेरिका, युरोप इत्यादी राष्ट्रांमधील तत्कालिन राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी, विज्ञानाच्या विविध शाखा तसेच चळवळी, आंदोलने, मोर्चे इत्यादींचे संदर्भ व उदाहरणे दिली आहेत.

तथापि दोघा तत्त्ववेत्त्यांनी दिलेले संदर्भ आणि उदाहरणे भारतीय संदर्भात अप्रस्तुत ठरतात. शिवाय ते संदर्भ व उदाहरणे त्या त्या काळातील जुनी असल्याने ती आज कालबाह्यही ठरत आहेत. परिणामी तेथील संदर्भात ती समजून घेणे हा कालापव्यय होईल. म्हणूनच स्टीव्हनसनने मांडलेली ‘उपयोजित तत्त्वज्ञाना’ची संकल्पना आणि रासम्युसनची सात संकल्पने मी त्यांचे संदर्भ न देता भारतीय संदर्भात स्पष्ट करीत आहे.

स्टीव्हनसनने १९७० साली ‘Applied Philosophy’ ही संकल्पना विशद केली तर रासम्युसनने त्याची उपयोजित तत्त्वज्ञानाची सात संकल्पने २०१७ साली चर्चिली आहेत. दोन्हीत ४७ वर्षांचे अंतर आहे. तथापि प्रस्तुत लेखात ती संकल्पना व संकल्पने यांचे स्पष्टीकरण देताना मी त्यांच्या मांडणीचा क्रम उलटा करत आहे. प्रथम मी रासम्युसनची २०१७ साली मांडलेली उपयोजित तत्त्वज्ञानाची संकल्पने (Conceptions) स्पष्ट करेन आणि नंतर स्टीव्हनसनची १९७० साली मांडलेली उपयोजित तत्त्वज्ञानाची संकल्पना (concept) स्पष्ट करेन.

स्पष्टीकरणाचा क्रम उलटा करण्याचे कारण, असे की स्टीव्हनसनची चर्चा बरीचशी विद्यापीठीय चौकटीतील आहे व तिचे समांतर भारतीय संदर्भ व उदाहरणे मिळणे जवळपास अशक्य आहे; उलट रासम्युसनने दिलेल्या संदर्भ व उदाहरणांना समांतर भारतीय संदर्भ व उदाहरणे मिळू शकतात. त्यामुळे भारतीय उदाहरणांसहित ससंदर्भ स्पष्टीकरण देण्याने मूळ ‘उपयोजित संकल्पना’ समजून घेणे सुलभ होईल. ती एकदा आकलनात आली की पहिली स्टीव्हनसनची विद्यापीठीय चर्चा समजणे सोपे होईल. म्हणून आपण प्रथम रासम्युसनने मांडलेली सात संकल्पने पाहू. ती अशी: रासम्युसनची उपयोजित तत्त्वज्ञानाची सात संकल्पने

उपयोजित तत्त्वज्ञानाचे समकाल सुसंबद्ध संकल्पन (Relevance Conception)

स्टीव्हनसनच्या प्राथमिक मांडणी गोळाबेरीज स्वरुपाची आहे. रासम्युसन ती सारी गोळाबेरीज चर्चा काही मुद्द्यांमध्ये विभागतो. त्याचवेळी तो त्या चर्चेच्या संदर्भात त्याच्या स्वतःच्या व्याख्या देतो. त्याची पहिली व्याख्या अशी:      

“रोजमर्रा जगण्याच्या महत्वाच्या प्रश्नांना तत्त्वज्ञान उपयोजित केले तर, आणि तरच, ते तत्त्वज्ञान उपयोजित तत्त्वज्ञान बनते.”  (Philosophy is applied if, and only if, it is applied to everyday life.)

सामान्य भाषेत सांगायचे तर रोजमर्रा जगण्याच्या महत्वाच्या प्रश्नांशी तत्त्वज्ञान जोडले गेले असेल किंवा तत्त्वज्ञान निबद्ध असेल, तर आणि तरच, ते तत्त्वज्ञान उपयोजित तत्त्वज्ञान बनते.” 

येथे चार मुख्य संकल्पना आहेत: (१) रोज (everyday) (२) महत्त्वाचे प्रश्न (३) तत्त्वज्ञान (४) उपयोजित तत्त्वज्ञान. ह्यांचा थोडक्यात आढावा घेऊ. “आढावा घेऊ” असे म्हणण्याचे कारण असे की ह्या संकल्पना निश्चित नाहीत. त्या स्थलकालाशी निगडीत आहेत.

येथे “रोजमर्रा जगण्याचे महत्वाचे प्रश्न” (the important questions of everyday life) संकल्पनेमध्ये ‘मरण वाईट का आहे’ पासून जागतिक तापमानवाढीसाठी आपण काय केले पाहिजे’ पासून हजारो समस्यांचा समावेश होतो.

रोज (everyday) :

येथे ‘रोज’ चा अर्थ स्थलकालविशिष्ट बनतो. याचा अर्थ असा की, ज्या काळात आणि ज्या देशात किंवा ज्या समाजात त्यावेळी जे एकूण प्रश्न असतील त्यांच्यातील महत्वाचा प्रश्न कोणता आहे किंवा कोणते आहेत, हे अधोरेखित करून त्यांना तत्त्वज्ञान उपयोजित करण्यातून त्या देशातील त्या काळातील उपयोजित तत्त्वज्ञान विकसित होते. तज्ञ आणि तत्त्ववेत्ते यांनी एकत्रितपणे मिळून हे ‘रोजचे रोजमर्रा’ प्रश्न शोधून त्यांच्याविषयी ज्ञान, वैचारिक तर्कपद्धती, नीति, सौंदर्य इत्यादी तात्त्विक बाजूने चिंतन करणे आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

महत्वाचे प्रश्न :

आता, कोणते प्रश्न महत्वाचे आहेत अन कोणते महत्वाचे नाहीत, याचा कोणताही सार्वत्रिक निकष लावता येत नाही; प्रश्नाचे महत्व स्थळकाळ आणि जनसमूह यांच्यावर ते अवलंबून ठरते. एकाच कालखंडात एखाच देशातील एका समूहाला काही प्रश्न महत्वाचे वाटतील तर अन्य समूहाला त्याच स्थळकाळात दुसरेच प्रश्न महत्वाचे वाटतील. किंवा दुसऱ्या स्थळातील (देशातील) समूहाला अन्य तिसऱ्या- भविष्यकाळात वेगळेच प्रश्न महत्वाचे वाटू शकतात. प्रश्न कोणत्याही स्थळकाळातील असोत त्या देशातील तत्त्वज्ञानाने अथवा ‘तत्त्वज्ञान’ नावाने परिचित असणाऱ्या ज्ञानसाठ्याने जोडून घेतले पाहिजे, मग तो ज्ञानसाठा कोणत्याही देशातील कोणत्याही काळातील असो. तसे झाले तर आणि तरच ते तत्त्वज्ञान जिवंत, समकालिन राहू शकते; अन्यथा ते मृत- कालबाह्य ठरते.                     

उदाहरणार्थ विद्यमान गेल्या काही दिवसातील रोजमर्रा जिंदगीतील-रोजच ज्यांची चर्चा होते आहे ते प्रश्न घेऊ.

जागतिक उग्र प्रश्न युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध (युद्धाचे नीतिशास्त्र) आणि भारतीय पातळीवर उत्तर भारतीय राज्यातील निवडणुका, महाराष्ट्र पातळीवर सत्ताधिकारी पक्ष व विरोधी पक्षातील भ्रष्टाचारविषयक आरोप (राजकीय तत्त्वज्ञान), शहर पातळीवर स्थानिक पालिकांचे प्रशासन (व्यवस्थापन आणि शहर विकास धोरण व व्यवस्थापन नीति), पोलिस-नागरिक संबंध (पोलिसांचे नीतिशास्त्र व वाहतुकीचे नियम-नागरिकशास्त्र) किंवा सरकारी नोकरशाहीतील भ्रष्टव्यवस्था, नोकरशाहीतील स्त्रियांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग हा स्त्रीवादाचा नवा प्रश्न. ह्या समस्या तातडीच्या मानता येतील. त्याचप्रमाणे भिकाऱ्यांची आणि तृतीयपंथीयांची वाढती संख्या, अनुषंगाने ‘वाढते दारिद्र्य’ हा रोजचा स्थानिक प्रश्न आणि वाढती आर्थिक विषमता व वाढती लोकसंख्या हे राष्ट्रीय प्रश्न तसेच दीर्घकालीन अनिर्णीत राहिलेले अर्थशास्त्रीय नैतिक धोरणात्मक प्रश्न हेही रोजचे महत्वाचे प्रश्न आहेत.

तुम्ही ज्या देशात किंवा ज्या ठिकाणी वास्तव्य करता, काम करता, थोडक्यात तुमचा स्थानिक भूगोल ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, वैश्विक भूगोलापर्यंत ज्या काळात तुमचे प्रश्न आहेत ते प्रश्न म्हणजे ‘कालसुसंबद्ध प्रश्न’ होय. ते सोडवण्यासाठी तत्त्वज्ञानाचे उपयोजन करणे, म्हणजे तत्त्वज्ञानाचे ‘समकाल सुसंबद्ध संकल्पन’ करणे.

हे प्रश्न सोडविण्यासाठी जगातील तत्त्वज्ञान, तुमच्या देशाचे खास एत्तदेशीय तत्त्वज्ञान -प्राचीन आणि आधुनिक- यांचा उपयोग करून जे उपयोजन केले जाईल त्यातून तुमचे ‘स्वतःचे उपयोजित तत्त्वज्ञान’ निर्माण होईल.

तत्त्वज्ञान (Philosophy):

येथे स्टीव्हनसन आणि रासम्युसन या दोघांनी ‘Philosophy’ ही संज्ञा ढोबळमानाने उपयोगात आणली आहे. मराठीत किंवा भारतीय परिभाषेत आपण ‘तत्त्वज्ञान’ शब्द ज्या अर्थाने वापरतो तशी ती नसून ग्रीक-पाश्चात्य, नवयुरोपीय तत्त्वज्ञान समोर ठेवून ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ ही संकल्पना ते रचू पाहात आहेत. त्यानुसारच रासम्युसन ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ च्या साऱ्या व्याख्या देतो आहेउपयोजित तत्त्वज्ञान :

आता, “ते उपयोजित तत्त्वज्ञान म्हणजे नेमके कोणते तत्त्वज्ञान?” हा मूळ प्रश्न उपस्थित होतो. त्याचे साधारण उत्तर असे की “ते उपयोजित तत्त्वज्ञान म्हणजे” = ग्रीक-पाश्चात्य आणि नवयुरोपीय तत्त्वज्ञान अभिप्रेत आहे. या तत्त्वज्ञान साठ्यातील कोणती विचारधारा, मुद्दा अथवा एखादा वाद कोणत्या विषयासाठी उपयोजित करता येईल, असे दोन्ही तत्त्वचिंतकांचे म्हणणे आहे.

पण आपण त्यांची ही संकल्पना अधिक विस्तृत करून तिच्यात चिनी, भारतीय इत्यादी जगातील सारी तत्त्वज्ञाने समाविष्ट करु. भारताच्या संदर्भात भारतीय दर्शनांचाही समावेश करणे अनिवार्य ठरेल. साऱ्या तत्त्वज्ञान साठ्यात त्यांची प्राचीन रूपे आणि आधुनिक रुपे यांचा  समावेश करता येईल. (आधुनिक भारतीय दर्शनांच्या स्वरूपाचा शोध घेण्याचे वेगळे स्वतंत्र काम करावे लागेल.)

ते उपयोजित तत्त्वज्ञान कोणते, याचा शोध घेण्याचे काम सामोरे येते. ते कोणाचे आहे? त्या संशोधकांचे प्रथमदर्शनी दोन गट होतात. तत्त्वज्ञान शोधायचे असल्याने पहिला गट तत्त्ववेत्त्यांचा किंवा व्यावसायिक तत्त्ववेत्त्यांचा आणि दुसरा गट वरील उद्धृत समस्याच उदाहरणार्थ घेतल्या तर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या विषयातील प्राध्यापक (व्यावसायिक विषयतज्ज्ञ) विविध संस्था, संघटना इत्यादी आणि प्रत्यक्ष राजकारणी-कार्यकर्ते, पोलिस, नोकरलोक, भिकारी इत्यादी यांचा. त्या गटात त्या विषयाचे संशोधक विद्यार्थीही असले तर उत्तम राहील.

व्यावसायिक तत्त्ववेत्त्यांच्या अर्थात तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांची निवड करताना ज्यांना अशा सामाजिक प्रश्नात रस असणे, उपयोजित तत्त्वज्ञानात रुचि असणे आणि त्यासाठी वेळ देणे अशा किमान पुरेशा व अनिवार्य (sufficient and necessary conditions) अटी आहेत. हाच नियम इतर  व्यावसायिक विषयतज्ज्ञ प्राध्यापकांच्या बाबतीत लागू करता येईल. दुसऱ्या गटातील लोकांचा सहभाग उत्स्फूर्त आहे, असे गृहीत धरता येऊ शकते.

उपयोजित तत्त्वज्ञानाचे विशिष्टता संकल्पन (The Specificity Conception)

सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी तत्त्वज्ञानाच्या विशिष्ट ज्ञानशाखा, तसेच ‘…चे तत्त्वज्ञान’ ही तत्त्वज्ञानाची विस्तारीत संकल्पना लक्षात घेता या तत्त्वज्ञानाच्या विशिष्ट ज्ञानशाखांमधील विशिष्ट प्रश्नांशी रोजमर्रा जगण्याच्या महत्वाचे प्रश्न जोडून घेणे, हे ‘विशिष्टता संकल्पन’ आहे.

उदाहरणार्थ नीतिशास्त्र ही ज्ञानशाखा ‘नैतिकता’, नीति म्हणजे काय? या विशिष्ट प्रश्नांचा विचार करते. नीति हा वस्तुतः रोजचा दैनंदिन प्रश्न आहे. तत्त्वज्ञानाने ‘नीति’ रोजच्या व्यवहाराशी जोडून घ्यायची आहे, तर नेमके काय करायचे? हा प्रश्न उपस्थित करु. उदाहरणार्थ, उणीदुणी काढणे, चहाडी करणे, अपशब्द वापरणे, शिव्या देणे, अश्लील बोलणे किंवा खोटे बोलणे, इत्यादी.

ह्या साऱ्या भाषिक कृती आहेत. आता, “भाषिक कृती म्हणजे काय? (What is speech act?) हा प्रश्न येतो, तो ‘भाषेचे तत्त्वज्ञान’ या तत्त्वज्ञानाच्या अन्य उपशाखेत येतो. पण “अवमानकारक भाषिक कृती म्हणजे काय? (What is derogatory speech act?) हा प्रश्न जास्त विशिष्ट आहे आणि तो नीतिशास्त्र (Ethics/Moral Philosophy) या शाखेत येतो.

“नैतिक कृती कधी संमतीयोग्य ठरते?” किंवा “कृतीच्या नैतिकतेचे निकष कोणते?” अथवा “नीति म्हणजे काय?” या प्रश्नांची चर्चा सामान्य नीतिशास्त्र करते. उणीदुणी, चहाडी, अपशब्द -शिव्या, अश्लीलता, खोटेपणा बोलणे इत्यादी अवमानकारक भाषिक कृती नैतिकेतेशी जोडल्या जातात. साहजिकच “अवमानकारक भाषिक कृती” हा रोजमर्रा प्रश्न नीतिशास्त्राशी जोडला जातो, म्हणून तो ‘विशिष्ट नैतिक प्रश्न’ बनतो. याचाच अर्थ नैतिक तत्त्वज्ञानाचे येथे उपयोजन होते. अवमानकारक भाषिक कृतीचे ‘तत्त्वज्ञानात्मक विश्लेषण’ करता येणे शक्य होते. मग तत्त्वज्ञान उपयुक्ततेच्या पलिकडे जाऊन थेट उपयोजित बनते.

असेच विश्लेषण सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र इत्यादी इतर ज्ञानशाखांबाबत उपस्थित करता येतो. सत्ता म्हणजे विश्व/ईश्वर/आत्मा अस्तित्वात आहेत की नाहीत, अथवा ज्ञान आणि शिक्षणव्यवस्था यांच्याविषयी सरकारी कल्पना आणि जनसमूहाच्या कल्पना यांचे तार्किक विश्लेषण करणे, म्हणजे त्या ज्ञानशाखा रोजच्या धार्मिक कृती, शिक्षणाशी जोडून घेणे होय. थोडक्यात, तात्त्विक उपकरणे बिगर-तात्त्विक विशिष्ट क्षेत्रातील प्रश्नांची उकल करण्यासाठी उपयोजनात आणणे, ही विशिष्टता असते. तेव्हा, रासम्युसनची दुसरी व्याख्या अशी :

“तत्त्वज्ञान जर आपल्या स्वतःच्या (तत्त्वज्ञानाच्या) सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र किंवा नीतिशास्त्र अशा विशिष्ट ज्ञानशाखांमधील विशिष्ट प्रश्नांशी रोजमर्रा जगण्याच्या महत्वाचे प्रश्न जोडून घेणारे असेल तर आणि तरच ते तत्त्वज्ञान ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ बनते.”  

अर्थात रोजमर्रा जगण्याचा महत्त्वाचा प्रश्नातील ‘सामान्य’ ता आणि ‘विशिष्ट’ ता यांच्यातील सीमारेषा फारच धूसर असते, निश्चित नसते; ती बरेचदा संदर्भांनुसार ठरवावी लागते. साहजिकच कोणता प्रश्न बिगर-उपयोजित तत्त्वज्ञानातून (शुद्ध) उपयोजित तत्त्वज्ञानात येतो किंवा उलट प्रवास करतो, ते सांगता येत नाही. जसे की युक्रेनवर रशियाने बॉम्बफेक करावी का? हा ‘विशिष्ट’ प्रश्न ठरतो तर युद्धात निरपराध नागरिकांना ठार करावे का? किंवा परदेशी नागरिकांना वगळून युद्धखोर शत्रू देशातील नागरिकांनाच टिपून मारावे का? प्रत्येक देशाने आपापले नागरिक आपल्या देशात आणेपर्यंत युद्धविराम द्यावा का? किंवा युद्धविराम देणे नैतिक का आहे? हे असे प्रश्न ‘सामान्य’ असतात, कोणत्याही स्थलकाळातील-म्हणजे देशाचे अथवा अनेक देशांचे प्रश्न बनतात; पण ते ‘युद्ध’ या विशिष्ट घटनेशी जोडले गेलेले असल्याने असे प्रश्न ‘सामान्य’ असले तरी ‘सामान्य नीतिशास्त्रा’ मध्ये येतात की विशेष ज्ञानशाखा असलेल्या ‘युद्धाचे नीतिशास्त्रा’ त येतात की ‘युद्धाचे उपयोजित तत्त्वज्ञाना’ त येतात, हे निश्चित करता नाही. युद्ध ही कधीतरी होणारी घटना असते, पण मृत्यू ही रोजची घटना असते.

काही प्रश्न तर कायमचे उपयोजित असतात; जसे की कर्जावर व्याज का घ्यावे? याचे अर्थशास्त्रीय साधारण उत्तर ‘घ्यावे’ असे असले, तरी ‘दुष्काळग्रस्त कर्जदार-शेतकऱ्याकडून वसुली करावी का? (‘लगान’ चित्रपट) किंवा मित्राला उसने दिलेल्या पैशाचे व्याज घ्यावे का? अथवा गायदानाचे वचन देणारा शेतकरी कर्जबाजारी होऊन महामूर दारिद्र्यात मेला, तरी त्याची एकमेव धन असलेली गाय ओढून न्यावी का? (‘गोदान’ सिनेमा) हा अतिविशिष्ट प्रश्न बनतो.

रोजमर्रा जगण्याचा महत्वाचा प्रश्नातील सामान्यता आणि विशिष्टता यांची सीमारेषा फारच धूसर असल्याचा परिणाम बिगर-उपयोजित (शुद्ध) तत्त्वज्ञान आणि उपयोजित तत्त्वज्ञान यांच्यावरही होतो, त्यांच्याही सीमारेषा आखणे कठीण जाते. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून उपयोजित तत्त्वज्ञानाचे ‘व्यावहारिक संकल्पन’ करण्यात आले.

उपयोजित तत्त्वज्ञानाचे ‘व्यावहारिक संकल्पन’ (The Practical Conception)

रोजमर्रा जगण्याचे प्रश्न व्यावहारिक प्रश्न असतातच, पण ‘तात्त्विक अर्थाने व्यावहारिक प्रश्न’ काहीसे विशिष्ट व्यावहारिक प्रश्न असतात. उदाहरणार्थ, येशूने पावाचे फक्त पाच तुकडे व दोन मासे देवून हजारो लोकांचे पोट भरले अथवा धुवून पुसून स्वच्छ केलेल्या थाळीत चुकून चिकटून राहिलेल्या अन्नकणातून द्रौपदीने श्रीकृष्णाला व त्याच्या सैनिकांना सुग्रास भोजन दिले अथवा कृष्णाने सूर्यच झाकून टाकण्याचा चमत्कार केला, किंवा नवसाने मुले होतात  किंवा सत्य साईबाबाने हवेतून सुवर्णमाळा काढल्या किंवा कुठलाही गोसावी-बुवा-महाराज-ताई इत्यादी दिव्यांगांना पूर्ण बरे करतात, असे समजणे व्यवहार्य आहे का?

‘अशा चमत्कारांविषयी विचार करण्यास आपल्याला काही कारण आहे का?’ हा प्रश्न “चमत्कारांचे अस्तित्व स्वीकारावे का?” या प्रश्नापेक्षा ‘जास्त विशिष्ट’ आणि “आपण काय केलेच पाहिजे” हे स्पष्ट करणारा असल्याने ‘व्यवहार्य’ आहे.

अशा प्रश्नांना उद्देशून “आपण काय केले पाहिजे?” – विश्वास ठेवला पाहिजे की नाही, मग आपण ‘केलीच पाहिजे’ (ought to do) अशी कृती कोणती? याचे सूचन ज्या प्रश्नांबाबत प्राप्त झाले पाहिजे ,त्याच प्रश्नांना ‘व्यावहारिक प्रश्न’ म्हंटले जाऊन अशा प्रश्नांचे उत्तर तत्त्वज्ञानाचे उपयोजन करून देणे, म्हणजे उपयोजित तत्त्वज्ञान निर्माण करणे.

असे प्रश्न शोधणे, उपस्थित करणे इत्यादी तात्त्विक कामे करताना ते व्यावहारिक प्रश्न सापेक्षतः विशिष्ट स्वरूपाचेच असले पाहिजे, ही किमान अट आहे. ती पाळली गेली नाही तर भासमान विशिष्ट प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञान ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ न होता नेहमीचे सैद्धांतिक ‘शुद्ध तत्त्वज्ञान’ (सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र इत्यादी) होईल. परिणामी उपयोजित तत्त्वज्ञान व शुद्ध तत्त्वज्ञान यात फरक करता येणार नाही. प्रश्न व्यावहारिक असावेत, अशी मर्यादा घातली तरी प्रश्नांची विशिष्टता आणि सामान्यता ह्यात पुन्हा फरक होऊ शकतो, कारण काही विशिष्ट प्रश्न असे असू शकतात की ज्यांनी “आपण काय केलेच पाहिजे” हे स्पष्ट करूच शकत नाहीत.

पण काहीवेळेस समकाल सुसंबद्ध संकल्पन आणि व्यावहारिक संकल्पन यांच्यात वेगळा संघर्ष होतो. काही व्यावहारिक प्रश्न बिनमहत्वाचे ठरतात तर काही अव्यवहार्य प्रश्न खूपच कालसंबद्ध ठरतात. उदाहरणार्थ, “मरण्यात (dying) वाईट काय आहे?” हा रोजच्या जगण्यातील अतिशय कालसुसंगत व ‘विशिष्ट’ स्वरूपाचा प्रश्न आहे. त्याचेच रुपांतर झालेला प्रश्न “आत्महत्येत वाईट काय आहे?” हा तसाच कालसुसंगत व ‘विशिष्ट’ स्वरूपाचा प्रश्न आहे. कारण तो कोणत्याही काळात कुणालाही लागू होणारा विशिष्ट प्रश्न आहे. पण तो निर्माण करणे अव्यवहार्य आहे. कारण तो प्रश्न “आपण काय केलेच पाहिजे?” हे स्पष्ट करतो. त्याचे उत्तर असते की, “आपण आत्महत्या करु नये” किंवा “मरणे चांगले नाही” असे ठाम मत बनवणे.  पण काहीवेळेस ‘मरणे वाईट नसते’.  दुर्धर-असाध्य आजार, असह्य वेदनादायक अवस्था, दीर्घकाल कोमातील रुग्ण असेल तर संमती-ऐच्छिक मरण अथवा इच्छामरण (Voluntary or non-Voluntary Euthanasia) (गुजारिश चित्रपट: ऐश्वर्या राय – हृतिक रोशन) आवश्यक होते. ते नैतिक समजले जाते. अशा वेळेस व्यावहारिकता निश्चित करणे अवघड असते, तेच निश्चित करण्यासाठी तात्त्विक दृष्टीची गरज असते. ही दृष्टी व्यक्तिला “आपण काय केलेच पाहिजे” याचे भान देते.

या विस्तृत स्पष्टीकरणानंतर रासम्युसन तिसरी व्याख्या देतो :

“तत्त्वज्ञान जर तुलनेने विशिष्ट प्रश्नांच्या उत्तराचे समर्थन, तो प्रश्न तत्त्वज्ञानाच्या ज्या ज्ञानशाखेशी जोडला गेलेला आहे त्या संबंधित ज्ञानशाखेच्या आधारे देत असेल; आणि “आपण काय केलेच पाहिजे” (ought तो do) हे दाखवून देत असेल, तर आणि तरच ते तत्त्वज्ञान ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ बनते.”  

उपयोजित तत्त्वज्ञानाचे चळवळी संकल्पन (The Activist Conception)

अर्थात रासम्युसनच्या मते, पारंपरिक तत्त्वज्ञानाचा जगावर परिणाम झाला नाही, असे नाही. उलट खूप मोठा परिणाम झाला. प्लेटो, देकार्त, रुसो, हॉब्ज, हेगेल, मार्क्स, मिल्ल पितापुत्र इत्यादींच्या तत्त्वज्ञानाचा व्यापक व खोल परिणाम झाला. तरीही आपण हे अधोरेखित केले पाहिजे की पारंपरिक तत्त्वज्ञान आणि चळवळे संकल्पन तत्त्वज्ञान यातील फरक हा आहे की पारंपरिक तत्त्वज्ञानाचे ध्येय ‘ज्ञान आणि सत्य’ हे ध्येय होते तर चळवळे संकल्पन तत्त्वज्ञानाचे ध्येय जगावर कार्याकारणात्मक परिणाम घडवून आणणे हे होते. जसे की मार्क्सचे तत्त्वज्ञान हे चळवळे तत्त्वज्ञान होते, म्हणून ते ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ ठरले, असा निष्कर्ष काढता येतो, असे मला व्यक्तिशः वाटते. चळवळे संकल्पनमध्ये ‘ज्ञान आणि सत्य’ अंतर्निहितच असते. जगात परिणाम घडवून आणावा, हे काही पारंपरिक तत्त्वज्ञानाचे सुस्पष्ट ध्येय नव्हते, ते अनुषंगिक ध्येय होते. परिणाम झाला , ही त्यांच्या जमेची बाजू झाली. पण  चळवळे तत्त्वज्ञान मात्र परिणामाचे ध्येय राखते, म्हणून ते ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ ठरते.  तत्त्वज्ञान निर्मितीचे बांधिलकी आणि ध्येय यांच्यात बदल झाला निश्चित केलेले ध्येय समजून घेण्यासाठी पद्धतीच बदलते, हेही लक्षात घेतले पाहिजे.

“आपण काय केलेच पाहिजे?” हे स्पष्ट झाले की त्यातूनच पुढचा विकास होतो, तो म्हणजे अशी काही कृती केली पाहिजे किंवा अशा कृतींची साखळी रचली गेली पाहिजे, की त्या कृतीचा अथवा त्या साखळीचा जगावर काहीएक ‘निश्चित परिणाम’ व्हावा, असे ध्येय राखले पाहिजे. अर्थात ‘जग बदलले पाहिजे. तो परिणाम मग जगाला शिक्षित करणे असेल किंवा कोणत्याही चर्चेच्या विषयाचे कमाल सुगम स्पष्टीकरण देणे असेल किंवा नवी ज्ञानरचना निर्माण करणे असेल. ते असे ध्येय  असावे की त्याने जगात बदल शक्य होण्याचा हेतू सिद्ध होईल.

‘स्त्रीवादी ज्ञानशास्त्र’ या नव्या तत्त्वज्ञानाचे उदाहरण पाहू. या तत्त्वज्ञान निर्मितीचे ध्येय कोणते होते? तर समाजातील अतिप्राचीन सामाजिक सत्तासंबंधाने राबवली गेलेली पूर्वरचित पुरुषी सत्ता झुगारून देणे आणि ‘ज्ञान’ या वस्तूकडे स्त्रियांच्या नजरेतून पाहाणे हा ‘स्त्रीवादी ज्ञानशास्त्र’ रचले जात असतानाचा हेतू होता. हे ध्येय गाठताना तत्त्वज्ञानाने अंगिकारलेल्या चिंतन पद्धतीचे ‘यथार्थ उपयोजन’ करून घेणे, ही स्त्रीवादाची पद्धतीशास्त्रीयता होती. स्त्रीवादी तत्त्वज्ञानाची व्याख्याच मूलतः ‘मुक्तिवादी’ ध्येयाचे होते आणि म्हणूनच ते ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ या वर्णनाला पात्र ठरले. ‘स्त्रीवादी ज्ञानशास्त्र’ याचा अर्थ काही विशिष्ट स्वरूपाचा ज्ञानशास्त्रीय सिद्धांत रचणे, असे नाही तर स्त्रीवादी भूमिकेतून ‘नवीन ज्ञानशास्त्र निर्माण करणे’ होते. ही अर्थात एका रात्रीत होणारे परिवर्तन नव्हते, त्यासाठी सतत काम करत राहाणे आवश्यक होते. अनेक देशांमध्ये अनेक चळवळी, आंदोलने, मोर्चे इत्यादींनी भरलेली ती कृतीमालिका होती. ती चळवळ होती. त्यातून ‘उपयोजित तत्त्वज्ञानाचे चळवळे संकल्पन’ निर्माण होते. त्या संकल्पन रासम्युसनची चौथी व्याख्या अशी:

“जगावर निश्चित स्वरूपाचा कार्यकारणभावात्मक परिणाम करण्याच्या ध्येयाने  तत्त्वज्ञान जर प्रेरित असेल तर आणि तरच ते तत्त्वज्ञान ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ बनते.” 

‘निश्चित परिणाम’ हा मुद्दा येथे महत्वाचा आहे. बहुतेक तत्त्ववेत्ते, शुद्ध अभ्यासक्रमीय तत्त्वज्ञान शिकवणारे ‘व्यावसायिक तत्त्ववेत्ते’ (तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक), कोणीही असो किंवा तत्त्वज्ञानाचे गाढे प्रेमिक असो, त्या प्रत्येकाला त्याच्या कामाच्या मार्फत ‘जगावर काहीतरी परिणाम व्हावा’ असे वाटत असतेच. राजकीय-सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, शिक्षणात परिवर्तनाचे स्वप्न पाहणारे शिक्षणप्रेमी, पर्यार्याने समाजप्रेमी व ज्ञानप्रेमिकांना आपले ज्ञान, केलेले काम प्रेरणादायी ठरावे असे मनापासून वाटत असते. मार्क्सची सुप्रसिद्ध तक्रार हीच तर होती की “ तत्त्ववेत्त्यांनी जगाचे आजपर्यंत फक्त वर्णन केले, जगाचा अर्थ लावण्याचा उद्योग केला. पण मुद्दा आहे तो जग बदलण्याचा!” त्यासाठीच त्याने बौद्धिक कष्ट घेतले. पण पुढे जाऊन कार्ल पॉपर यांनी मात्र The Poverty of Historicism (१९५७) हा ग्रंथ मार्क्सवादापासून जगाला वाचवण्यासाठी लिहिला. त्यामागे जगात नवा बदल व्हावा, त्यांच्या विचारांचा परिणाम व्हावा, हाच हेतू होता.

भारतात चार्वाकापासून म. जोतिबा-सावित्रीबाई फुले, महर्षि शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई रानडे, नामदार गोखले, आगरकर, म. गांधी ते शरद पाटील, नरहर कुरुंदकर, आ. ह. साळुंखे  इत्यादी उपयोजित तत्त्ववेत्त्यांनी आणि देवीप्रसाद चट्टोपाध्याय, दयाकृष्ण, लक्ष्मणशास्त्री जोशी, सुरेंद्र बारलिंगे, मे. पुं. रेगे, दि. य. देशपांडे या तत्त्ववेत्त्यांनी भारतीय जगावर निश्चित परिणाम व्हावा, या ध्येयासाठीचच लेखन केले. एवढेच नव्हे तर चळवळी, विचारप्रणाली, परिवर्तने इत्यादींना वाहिलेले साहित्यिक-लेखक आणि प्रकाशने, संस्था अशा ध्येयासाठीच काम करत असतात.

फार काय, उदाहरणार्थ मी श्रीनिवास हेमाडे, व्यावसायिक तत्त्ववेत्ता ही लेखमाला लिहितो, ते महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात काहीएका विशिष्ट बदल व्हावा, या अपेक्षेने आणि ध्येयानेच लिहितो आहे. ही लेखमाला प्रथम ज्या ‘मुक्त-संवाद’ नियतकालिकात प्रसिद्ध होत आहे, त्या नियतकालिकाचे प्रवर्तक रवींद्र प्रधान, संपादक डॉ. विवेक कोरडे, सल्लागार संपादक शेखर देशमुख यांनाही काहीतरी बदलाची अपेक्षा असल्यानेच त्यांनी मला लिहिण्यास प्रोत्साहन दिले आहे म्हणूनच ही लेखमाला लिहिली जात आहे. ही लेखमाला अधिक विस्तृत स्वरुपात प्रसिद्ध करणारे ‘द वायर मराठी’चे संपादक, सहायक संपादक सुजय शास्त्री आणि नितीन ब्रह्मे यांनाही काहीएक निश्चित बदल व्हावा ही अपेक्षा आहे. चळवळ, कार्यकर्ते, विचारशील व संवेदनशील लोकांना तत्त्वज्ञानाचे, प्रस्तुत संदर्भात रसेलच्या तत्त्वज्ञानाचे; त्याच्या सामाजिक लेखनाचे आकलन समृद्ध व्हावे, आणि त्याद्वारे समाजात विधायक बदल साधला जावा’  या ध्येयाने प्रेरित होऊनच मी लिहितो आहे आणि त्याच ध्येयाने प्रेरित होऊन ‘मुक्त-संवाद’ आणि ‘द वायर मराठी’  ही लेखमाला प्रसिद्ध करत आहे. (हा समाज तूर्तास छोटा गट आहे, तो व्यापक व्हावा, ही अपेक्षाही अर्थात आहे.) हा पहिला वर्ग झाला.

‘निश्चित परिणाम’ हे ध्येयच नसलेल्या अनेकांना मात्र ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ अशी संकल्पना निर्माण करण्याचे भानच येत नाही, असा दुसरा वर्गही आढळतो. तत्त्वज्ञानात उच्च पदवी, संशोधन इत्यादी प्रशिक्षण घेतलेल्यांचा हा वर्ग आहे. हा ‘तूप-पोळीवाल्यां’ चा म्हणजेच स. ७.३० ते दु. १२.३० (किंवा आजकालच्या विद्यापीठ अनुदान आयोग, नॅक, विद्यापीठे, महाविद्यालये, मालकसंस्था इत्यादींच्या ‘आदेश’ नुसार स.७.३० ते सायंकाळ…) पद्धतीने काम करणाऱ्या नोकरदार प्राध्यापकांचा आहे. ‘कशासाठी पोटासाठी कामाला जाण्यासाठी’ हेच ‘ध्येयविधान’ असते त्यांचे.  या धबडग्यातूनही ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ जपले जाऊ शकते, याचे दुर्दैवाने भान न येणारा हा वर्ग म्हणता येईल.

उपयोजित तत्त्वज्ञानाचे पद्धतीशास्त्रीय संकल्पन (The Methodology Conception)

उपयोजित तत्त्वज्ञानाचे चळवळे संकल्पन लक्षात घेता कोणतीही चळवळ अथवा कोणतीही परिणामसाधक कृती करण्याची पद्धती निश्चित करावी लागते. कृतीला हेतू असला तरी त्या हेतूचे स्वरूप, त्यात दडलेली भावी कृतीमालिका, तिचेही परिणाम अधोरेखित करणे आवश्यक ठरते. त्याचप्रमाणे कृती पूर्णत्वास नेण्यासाठी सहकारी, सहपाठी, साथीदार अथवा इतर चळवळकर्ते यांचे मिळून संघटन करणे गरजेचे होते. त्यानुसार ‘उपयोजित तत्त्ववेत्त्या’ ची पद्धती निश्चित होते. ही ‘पद्धतीशास्त्रीय बांधिलकी’ असते.

उदाहरणार्थ पाहा की स्त्रीवादी ज्ञानशास्त्र रचित्यांनी सैद्धांतिक पातळीवर विविध परिप्रेक्ष्यांचा परस्परसहयोगी संवाद साधणे, बहुदृष्टीकोनवादाला पाठिंबा देणे, सकारात्मक ‘मतभेदां’ना ऐकण्याची पद्धती ठरविणे, वंचितांच्या मतांचा विकास होईल, अशा संधी निर्माण करणे, त्यांचा ‘आवाज’ प्रतिध्वनित करणे अशी पद्धती स्वीकारली. महत्त्वाच्या रोजमर्रा प्रश्नांचे तात्त्विक उत्तर शोधताना उपयोजित तत्त्वज्ञानाची सुद्धा अशी पद्धती विकसित होते. ती पद्धतीशास्त्रीय संकल्पना होय. ती रासम्युसनची व्याख्या अशी :

“तत्त्वज्ञान जर तात्त्विक समस्यांच्या रूढीवादी चौकटीतून बाहेर पडून वैशिष्ट्यपूर्ण तात्त्विक पद्धतींचा अवलंब करीत असेल तर आणि तरच ते तत्त्वज्ञान ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ बनते.”

ही पद्धतीशास्त्रीयता म्हणजे तात्त्विक विश्लेषण पद्धती होय. जी काहीएक चळवळ अथवा विशिष्ट कृती करण्याचे ध्येय निश्चित केले आहे, त्यात गुंतलेल्या वेगवेगळ्या संकल्पनांचे आणि पूर्वगृहीतकांचे विश्लेषण करणे हे पद्धतीचे स्वरूप असते. ह्या साऱ्या संकल्पना आणि पूर्वगृहीतके ज्या इतर संकल्पनांनी बनल्या असतील त्यांचेही विश्लेषण अपेक्षित असते. विश्लेषित झालेल्या सर्व संकल्पनांचे परस्पर तार्किक संबंध, त्यांची रचना, त्यातून निष्पादित होणारे निष्कर्ष उलगडून दाखवणे आणि त्यातून चळवळ कशी उभी राहू शकेल, याचे वैचारिक आराखडे रचले जाणे, हा हेतू असतो.

मार्क्सने त्याच्या तत्त्वज्ञानाची रचना करताना अशीच पद्धतीशास्त्रीयता अवलंबिली होती, असे लक्षात येईल, म्हणून मार्क्सच्या तत्त्वज्ञानाकडे पद्धतीशास्त्रीय संकल्पनेचे उत्तम उदाहरण पाहाता येईल. त्याने हेगेलची रचना व पद्धती स्वीकारून त्याचा द्वंद्वविकास मांडला.

भारताच्या संदर्भात वर्णजातीलिंगभेदव्यवस्थेचे तत्त्वज्ञान मांडण्याचे काम गेली अनेक शतके होत आले. धर्मग्रंथ, पुराणे, महाकाव्ये, काव्ये, कथा, प्रवचने, आणि सरतेशेवटी दार्शनिक रचना करण्यात आल्या. ‘मनुस्मृती’ ची इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात (अंदाजे) झाली. त्याची वैदिकांनी स्वीकारलेली पद्धती होती ‘ज्ञानबंदी’. त्यानुषंगाने चार वर्ण, चार पुरुषार्थ, चार आश्रम ही पद्धती रचली गेली. ह्या इतक्या सूक्ष्मतेने रचल्या गेल्या की नंतरच्या रचियत्यांना “ बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत हे त्यांना कळत नाहीअसे म्हणावे लागण्याची वेळ येते. उदाहरणार्थ भक्तिपरंपरेने ह्या साऱ्या भेदग्रस्त चौकटी (अपरिहार्यपणे का होईना पण) स्वीकारूनच सामाजिक बदल उर्फ ‘निश्चित परिणाम’ साधण्याचा प्रयत्न केला. तो अर्थात ‘कार्यकारणभावात्मक’ होता का, याची चर्चा व तार्किक विश्लेषण करणे आवश्यक आहे.

वर्णजातीलिंगभेदव्यवस्थेचे तत्त्वज्ञान उलथून पाडण्यासाठी चार्वाक ते म. फुले यांच्यापासून मोठी चळवळ उभी राहिली. फुल्यांनी त्यांची पद्धती (‘म. फुले यांचे तर्कशास्त्र/पद्धतीशास्त्र’) विकसित केली. तथापि आजच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीकडे अशी काही विशिष्ट पद्धतीशास्त्रीयता आहे का, हा मोठा प्रश्न आहे.

उपयोजित तत्त्वज्ञानाचे अनुभवसिद्ध तथ्य संकल्पन (The Empirical Facts Conception)

इंद्रियसंवेदना किंवा इंद्रियानुभव (Sense Experience) आणि बुद्धी (Reason) ही माणसाची दोन प्रमुख ज्ञानाची साधने आहेत किंवा मार्ग आहेत, असा सिद्धांत तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मानला जातो. इंद्रियांना प्राप्त होणारा अनुभव म्हणजेच ‘इंद्रियानुभव हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे’, असा सिद्धान्त मांडणारी तत्त्वज्ञानातील विचारसरणी म्हणजे अनुभववाद (Empiricism).. तिच्या विरुद्ध ‘बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे’, असा सिद्धान्त मांडणारी विचारसरणी म्हणजे बुद्धिवाद (Rationalism). जे अनुभववाद स्वीकारतात ते अनुभववादी (Empiricist) आणि जे बुद्धिवाद स्वीकारतात ते बुद्धिवादी (Rationalist).

अनुभववाद आणि बुद्धिवाद ही दोन्ही ‘शुद्ध तत्त्वज्ञाने’ आहेत आणि शुद्ध तत्त्वज्ञानात संकल्पनांची स्पष्टीकरणे, विश्लेषण, चिकित्सा इत्यादी असते, जे बुद्धिच्या साह्याने करावे लागते. अनुभववादाची मांडणी देखील बुद्धिच्याच साह्याने करावी लागते, हा विरोधाभास आहे खरा. पण निसर्ग विज्ञाने व सामाजिक विज्ञाने, मानव्य विज्ञाने, इत्यादी ज्ञानाला आधारभूत असलेले समग्र सामान्य स्वरूपाचे विज्ञान व तंत्रज्ञान देखील मांडले जात असताना त्यांची ‘अनुभवपूर्व’ (a priori) च मांडणी करणे भाग पडते. याचा अर्थ शुद्ध तत्त्वज्ञान ‘अनुभवपूर्व’ (a priori) आहे.

उपयोजित तत्त्वज्ञान मात्र ‘अनुभवोत्तर’ (a posterior) असते. याचा अर्थ अनुभवावर आधारलेले पुरावे हाच उपयोजित तत्त्वज्ञानाचा मुख्य आधार असला पाहिजे. ती रासम्युसनची सहावी व्याख्या अशी :

“तत्त्वज्ञान जर अनुभवजन्य पुराव्याची अर्थपूर्ण माहिती आणि भक्कम अधिष्ठान उभे करीत असेल तर; विशेषतः ते पुरावे अनुभवजन्य विज्ञानाने पुरवले असतील, तर आणि तरच ते तत्त्वज्ञान ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ बनते” . 

उदाहरणार्थ, अनेकांच्या मते, जगात (मानवी वर्तनात) चांगले-वाईट असे काही नसते, तुम्ही कसे पाहाता यावर ते अवलंबून असते’ या धारणेला ‘नैतिक वास्तववादाचा सत्यापलाप’ म्हणता येईल. सत्यापलाप काहीही अनुभवपूर्व नसतो, तो नेहमी अनुभवावरच अवलंबून असतो. जसे की,  शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ मधील “There is nothing either good or bad but thinking makes it so” (Hamlet, Act II, Scene 2, Page 11) हे वाक्य प्रसिद्ध आहे. ज्याला जगाचा जसा अनुभव येईल तसे जग असेल/दिसेल/भासेल, हा अनुभव आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण असंतुलनाचे सर्व दावे व त्यातील नैतिकता-मानवी जबाबदारी, पुढील पिढीबद्दलचे उत्तरदायित्व इत्यादींचा निर्णय नेहमी अनुभवावरच अवलंबून राहाणार. त्यांच्या बऱ्या-वाईटाचे निर्णय करण्याचे काम करणे याचा अर्थ ‘उपयोजित तत्त्वज्ञानाचे ‘अनुभवसिद्ध तथ्य संकल्पन’ करणे असते.

ज्याने अक्षरशः जग ‘बंद’ पाडले त्या कोरोनाचा उदय चीनमध्ये झाला, पण हा जीवाणू नैसर्गिकरीत्या उद्भवला की ‘चीनने तो ‘जंतुयुद्धा’चा नमुना म्हणून कृत्रिमरीत्या तयार केला’ हा ‘कटकारस्थान सिद्धांत’ पुढे केला जातो. पण तो तसा वास्तवात आहे का? तसेच नुकतीच झालेली उत्तर भारतातील विधानसभा निवडणूक हा असाच भाजपचे ‘कटकारस्थान’ आहे किंवा काय? राजकारणी मंडळींचे परस्परांवर होणारे आरोप-प्रत्यारोप हे आजचे ‘रोजमर्रा जगण्याचे राजकीय व सामाजिक प्रश्न’ उपयोजित तत्त्वज्ञानाच्या ‘अनुभवसिद्ध तथ्य संकल्पन’चा भाग बनू शकतात. ज्यांचा अनुभव घेता येईल, पडताळा घेता येईल, असे सत्य व युक्त (true and valid) पुरावे  आणि तथ्ये गोळा करता आली ते ‘संबंधित तत्त्वज्ञान उपयोजित तत्त्वज्ञान’ म्हणता येईल.

वरीलप्रमाणे प्रत्येक उदाहरण अथवा जीवनविषयक सत्ये अथवा दावे अनुभवावर आधारलेल्या, गोळा करण्यात आलेल्या तथ्यांच्या विश्लेषणाच्या व तार्किक निष्कर्षाच्या आधारेच पडताळून घेता येतात. हे काम  उपयोजित तत्त्वज्ञानाच्या ‘अनुभवसिद्ध तथ्य संकल्पन’ मध्ये येते.

उपयोजित तत्त्वज्ञानाचे प्रेक्षक-श्रोता संकल्पन (The Audience conception)

उपयोजित तत्त्वज्ञान मुख्यतः बिगर-तत्त्वज्ञान (non-philosophers) वर्गासाठी असते. बिगर-तत्त्वज्ञान वर्ग याचा अर्थ समाजातील असे निवडक लोक की ‘तत्त्वज्ञान करणे’ (doing philosophy) हे त्यांचे काम नाही. हे लोक तत्त्वज्ञानाचे पदवीधर, उच्च पदवीधर अथवा तत्त्वज्ञानात प्रशिक्षित नाहीत. पण हा वर्ग तात्त्विक चिंतनात आणि चर्चेत रुचि घेणारा असतो. अशा बिगर-तत्त्वज्ञान पण सुजाण लोकांना उद्देशून जे तत्त्वज्ञान उपयोजित केले जाते, ते ‘प्रेक्षक-श्रोता संकल्पन उपयोजित तत्त्वज्ञान’ असते.

बिगर-तत्त्वज्ञान (non-philosophers) वर्ग हा समाजातील लक्षणीय हिस्सा असतो. जनविवेकवादी, सामाजिक व राजकीय धोरणकर्ते, बिगर-सरकारी संस्था, अभ्यासगट, समिती यांचा तसेच विद्यापीठीय-महाविद्यालयीन अध्यापक-संशोधक आणि समाजातील साहित्यिक-कवी-लेखक-समीक्षक व रसिकजनांचा बिगर-तत्त्वज्ञानाचा वर्गात समावेश होतो. त्यांना तत्त्वज्ञानात रुचि असते, पण तत्त्वज्ञानाच्या रुक्ष, किचकट, पारिभाषिक तात्त्विक चर्चेत मात्र रुचि नसते. त्यामुळे अशा संवेदनशील समूहगटांसाठी जे उपयोजित तत्त्वज्ञानाचे संकल्पन करावे लागेल, ते ‘उपयोजित तत्त्वज्ञानाचे प्रेक्षक-श्रोता संकल्पन’ म्हणता येते. म्हणून रासम्युसनची सातवी व्याख्या अशी:

“तत्त्वज्ञानाचा अपेक्षित प्रेक्षक-श्रोतावर्ग जर बिगर-तत्त्वज्ञानाचा असेल तर आणि तरच ते तत्त्वज्ञान ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ बनते”   

तत्त्ववेत्ता अथवा तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक जो विषय मांडत आहे, त्या विषयावर ज्याने आधी काही अनुभवाधारित वाचन-मनन-अध्ययन केले आहे, ज्याला काहीशी वैज्ञानिक बैठक आहे आणि तार्किक पद्धतीने विचार करण्याची इच्छा आहे असा हा बिगर-तत्त्वज्ञान प्रेक्षक-श्रोतावर्ग असणे अपेक्षित आहे. विशेषतः तत्त्वज्ञानातील आंतरविद्याशाखीय विषय चर्चेसाठी निवडला गेला असताना त्या विषयाचे मनन-अध्ययनाचे अधिष्ठान या वर्गाकडे असेल तर त्या वर्गाची तात्त्विक पात्रता उंचावते. हा वर्ग तत्त्वज्ञान उपयोजित करण्यास अधिक योग्य वर्ग ठरतो.

इथे दोन गोष्टी आहेत. एक अशी की, समजा एखाद्या तत्त्ववेत्त्याने शुद्ध तत्त्वज्ञानातील एखादा किचकट विषय बिगर-तत्त्वज्ञान वर्गासाठी लिहायचा ठरवला, उदाहरणार्थ विज्ञानाचे तत्त्वज्ञान किंवा तात्त्विक तर्कशास्त्र, कामसंबंधाचे नीतिशास्त्र व सौंदर्यशास्त्र अथवा बौद्ध दर्शनातील ‘अपोह’ सिद्धांत, युद्धाचे नीतिशास्त्र, ‘इच्छामरणातील कायदेशीरता’ इत्यादी; तर ते विषय शुद्ध तत्त्वज्ञानाशी संबंध जोडणारे पण ‘उपयोजित तत्त्वज्ञाना’ त समाविष्ट होऊ शकणारे म्हणून गणले जाईल. अशा वेळी तो विषय अथवा ते तत्त्वज्ञान ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ बनण्याची शक्यता असते. कारण, ‘जगावर परिणाम करणे-जगात बदल करवून आणणे-चळवळ उभी करणे’ असे तात्त्विक हेतू त्यामागे असतात. जग बदलणे हा ‘व्यावहारिक परिणाम’ अशा लेखनामागे असतो.

पण समजा, दुसरी गोष्ट अशी की, ‘निवडणुकीची नैतिकता’ (निवडणूक आयोगाची नव्हे)/ निवडणूक अधिकाऱ्याची नैतिकता किंवा सैनिकांची/पोलिसांची नीति, ‘आयुष्यावर बोलू काही’ छाप किंवा आधीच्या पिढीतील व. पु. काळे, वि. स.खांडेकर इत्यादी फेम काहीतरी लिहिणं ही साधारणपणे तात्त्विकतेचा ‘मुलामावाली’ निव्वळ जाहिरात बनते. ते ‘शुद्ध तत्त्वज्ञान’ तर नसेलच पण उपयोजित तत्त्वज्ञानही नसेल.

तत्त्ववेत्ता जेव्हा बिगर-तत्त्ववेत्ता पण बुद्धिमान, सुजाण व तार्किकता जगणाऱ्या आणि जगात बदल करण्याची इच्छा बाळगणाऱ्या, बदलासाठी निश्चित कृती करणाऱ्या संवेदनशील वर्गासाठी लिहितो, तेव्हा त्या तत्त्ववेत्त्याचे लेखन ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ दर्जाला पोहोचू शकण्याच्या पात्रतेचे असते. तत्त्वचिंतनाच्या मूलभूत अटींच्या अधीन राहूनच ते लेखन केलेले असते.

 – ४ –

 उपयोजित तत्त्वज्ञानाची चळवळ युरोप-अमेरिकेत १९५० नंतर झाली. तथापि ‘रोजमर्रा जिंदगी’ ची संकल्पना त्याआधी मांडली गेली. फ्रेंच मार्क्सवादी तत्त्ववेत्ता, समाजशास्त्रज्ञ, ‘सामाजिक अवकाश’ (Social Space) ह्या तात्त्विक संकल्पनेचा जनक हेन्री ला फेव्र (Henri Lefebvre, जन्म: १६ जून १९०१, मृत्यू: २९ जून १९९१) याने ‘रोजमर्रा जिंदगी’ ची उकल करून दाखविली आहे. त्याची थोडक्यात का होईना पण दखल घेणे अनिवार्य ठरते.

भांडवलशाहीने सामान्य माणसाचे जीवन यंत्रवत करून टाकले होते. त्याचे पडसाद साहित्य, संगीत, कला, धर्म, चित्रपट इत्यादी क्षेत्रात उमटले होते. चार्ली चाप्लिनचे सारेच चित्रपट माणसाचे यंत्र कसे बनते, त्याचा जीवनरस कसा शोषला जातो याचे भेदक दर्शन घडवतात. त्याच्या १९३६ सालच्या Modern Times मध्ये माणसाचे यांत्रिकीकरण दाखवले आहे.

रोजमर्रा जिंदगी’ चा टीकाकार :  हेन्री ला फेव्र

हेन्री ला फेव्रने ‘रोजमर्रा जिंदगी’ आणि ‘अधि-तत्त्वज्ञान’ या दोन संकल्पना वेगळ्या अर्थाने वापरात आणल्या. त्याने दोन्हींवर अतिशय मार्मिक टीका केली आहे. त्याने त्यासाठी Critique of Everyday Life हा त्रिखंडात्मक ग्रंथ लिहिला. (हे संपूर्ण पुस्तक येथे उपलब्ध आहे.)

हेन्री ला फेव्र

हेन्री ला फेव्र

फेव्रने ‘रोजमर्रा जिंदगी’ ची संकल्पना १९३०च्या दरम्यान मांडली. तो द्वंद्वविकासात्मक परिभाषेत जिंदगीची व्याख्या करतो. त्याच्या मते, “भ्रम आणि सत्य, सत्ता आणि असहाय्यता या दोन आंतरक्षेत्रातील द्वंद्व; माणूस ज्यावर नियंत्रण मिळवू शकतो आणि मिळवू शकत नाही, अशा दोन आंतरक्षेत्रातील द्वंद्व म्हणजे रोजमर्रा जिंदगी! ही अशी क्षेत्रे आहेत की जिथे एकमेकांहून पूर्ण भिन्न स्वरूपाच्या विशिष्ट लयींमध्ये सातत्याने परिवर्तनशील संघर्ष घडत असतो. फेव्रच्या मते, मानवी शरीर ही विविध लयींचा जणू सागर आहे.

‘रोजमर्रा जिंदगी’

‘रोजमर्रा जिंदगी’

फेव्रच्या मते, शरीर म्हणजे हजारो नैसर्गिक लयींचा एकसुरी गठ्ठा असतो. त्यात शरीरशास्त्रीय (नैसर्गिक) लयी- इच्छा, वासना, विकार, विचार इत्यादी असतात. शरीराबाहेर कुटुंब, समाज, कायदा, रीती, संकेत, नियम, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, मूल्यव्यवस्था, शिक्षणव्यवस्था इत्यादी हजारो सामाजिक लयी असतात. शारीरिक लयींमध्ये या विविध लयींची मिसळण होते. मानवी अस्तित्व अशा लयींनी बनलेले असते. अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण पण परस्परांहून भिन्नता दर्शवणाऱ्या विविध लयींमध्ये सतत संघर्ष घडत असतो. हा संघर्ष द्वंद्वविकासाचे स्वरूप स्वीकारतो, त्यातून ‘नंतर’ चे परिवर्तन घडत जाते.

फेव्रच्या मते, ‘तंत्रज्ञान आणि उत्पादन’ यांच्याशी तुलना करता रोजमर्रा जिंदगी’ हे एक अविकसित क्षेत्र आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि त्यांच्या साह्याने होणारे उत्पादन यांची सामान्य माणसाच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी कोणतीही मदत होत नाहीच, उलट त्यांची रोजीरोटी दयनीय झाली आहे.

व्यक्तीचा आपला वर्ग अथवा तिची व्यक्तिवैशिष्ट्यता काहीही असली तरी तिचे जीवन नीरस झाले आहे. तिच्या प्रत्येक दिवसाचे जगले जाणारे वास्तव जणूकाही चिकित्सा करण्याच्या पात्रतेचे नाही, असा समज पसरला आहे. तिला आत्माविष्काराकरता मुक्त वेळेचे आणि आरामदायीपणाची सामाजिक आश्वासने दिली जातात; पण तसे घडत नाही. पण ह्याच ‘आपल्या भीषण नीरस वास्तवा’चे भान सामान्य माणसाला आले की ते त्यांचे रोजचे कंटाळवाणे जीवन क्रांती करण्यास प्रवृत्त करते. या रोजमर्रापणाच्या (नीरस, कंटाळवाण्या) क्षेत्रातच भांडवलशाही जिवंत राहाते, याच क्षेत्रातून भांडवलशाही तिचा स्वतःचा जीवनरस शोषून घेत असते आणि ती त्याच त्या तिला पूरक असणाऱ्या जीवनाची पुनर्निर्मिती करत राहाते. क्रांती न करता भांडवलशाही जीवनाचा दर्जा खालावते आणि आत्माविष्कार दडपून टाकते. अशा जिंदगीचे परीक्षण अतिआवश्यक ऐरणीवर येते, कारण मानवी जीवनाच्या विविध अवस्थांच्या विकासामार्फतच तर मानव एका भरीव आदर्श जीवनाकडे पोहोचू शकतो.

१९३० साली मांडलेल्या या सिद्धांतात फेव्र म्हणतो की विसावे शतक जसे पुढे सरकेल तसे भांडवलशाही अधिक शोषक बनेल. आणि आज आपण पाहातो की त्याचे हे कथन सत्य ठरले आहे. १९५० नंतर भांडवलशाहीने असे काही विक्राळ स्वरूप धारण केले की त्यामुळे सामान्य माणसाच्या ‘रोजमर्रा जिंदगी’ चे ‘वसाहतीकरण’ झाले, – ती फक्त चंगळवादी क्षेत्रात परिवर्तीत झाली. माणसाचा वर्ग कोणताही असला तरी तो केवळ उपभोगवादी व चंगळवादी बनला. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे तो इतरांच्या शोषणात सहभागी झाला.

थोडक्यात, ‘रोजमर्रा जिंदगी’ ही जिथे सारे जीवन घडते, आणि जिच्यामध्ये सर्व विखुरलेल्या कृती घडत असतात, असा एक ‘सामाजिक अवकाश’ (social space) आहे. त्या अवकाशाचे स्वरूप कसे आहे ? तर ‘जगताना सारे जीवन आपल्या मनासारखे किंवा मनाविरुद्ध वापरले जाते. ते तसे वापरले जाऊन काहीएक जागा ‘उरते’; ती ‘उरलेली जागा’ म्हणजे ‘सामाजिक अवकाश’ होय. ते आपले खासगी जीवन हिरावून घेते. म्हणून माणसापुढील आव्हान हे आहे की त्याने आपला ‘खासगी अवकाश’ आपल्याला कसा निर्माण करता येईल, याचा विचार करावा. तो अवकाश माणूस मिळवू शकला तर त्याचे ‘स्वतःचे जग’ जे सौंदर्यपूर्ण असेल, ते निर्माण होईल.

बर्ट्रांड रसेलचे उपयोजित लेखन

‘उपयोजित तत्त्वज्ञानाचे हे स्वरूप पाहाता बर्ट्रांड रसेलचे लेखन ‘शुद्ध तत्त्वज्ञाना’तील आहेच; पण त्याचे तत्त्वज्ञानेतर सामाजिक, राजकीय लेखन ‘उपयोजित तत्त्वज्ञानप्रिय’ या सुजाण वर्गासाठी केलेले आहे, असे लक्षात येईल. रसेल हयात असताना ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ ही संकल्पना चर्चाविश्वात उपलब्ध नव्हती. पण तत्त्वज्ञान व्यावहारिकच असते, हे गृहीतक रसेलच्या कौटुंबिक व तात्त्विक जीवनामागे होते. म्हणूनच त्याचे जीवन हीच एक मोठी चळवळ बनली होती.

(मुक्तसंवाद’, ०१ एप्रिल२०२२ च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा पुनर्लिखित विस्तृत आणि संपादित लेख.)

श्रीनिवास हेमाडे, तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि  व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0