परकेपण लादलेल्या समूहाचा सम्यक वेध

परकेपण लादलेल्या समूहाचा सम्यक वेध

भारतातला अल्पसंख्य मुस्लिम समाज आज सर्वार्थाने परकेपणाची वेदना भोगत आहे. सगळ्यात वेदनादायी बाब ही आहे की, शासनसत्ता आणि बहुसंख्यांकांनी जणू संगनमताने या समाजाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांना प्रसंगी नोकरशाहीचीही साथ मिळत आली आहे. जिथे आपल्या कितीतरी पिढ्या वाढल्या त्या देशात परकेपणाचे जिणे वाट्याला येणे म्हणजे काय असते, हे जिणे का लादले जाते, समज-गैरसमजांचा डोंगर समाजाला कसा चिरडून टाकतो, त्यामागे कोणत्या शक्ती कार्यरत असतात, या साऱ्यांचा ऊहापोह फरीद खानलिखित ‘अपनों के बीच अजनबी’ हे प्रस्तुत पुस्तक करते…

गोव्याचा चित्तथरारक वाङ्मयीन इतिहास
असहमतीचे आवाज
मुस्लीम जगाचा शोध

एखाद्या राष्ट्रात शेकडो वर्षांपासून रहिवास करणाऱ्या समाजाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात, तेव्हा त्याविरुद्ध त्या समाजाच्या उठणाऱ्या प्रतिक्रिया या नेहमीच ज्वलंत रूप धारण करीत असतात, भलेही त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करीत असो. पॅलेस्टाइनमधील अरब लोक हे याचे उत्तम उदाहरण. ज्यावेळी एखाद्या समाजावर सतत मर्यादा लादल्या जातात आणि त्यांच्या आचार-विचारावर जाचक बंधन घातली जातात, तेव्हा त्यातून निर्माण होणारे प्रश्न हे सामाजिक शांतता बिघडवून टाकीत असतात. पण अशाही वेळी महत्त्वाचे असते, दमनकारी शासनसत्तेला प्रश्न विचारणे, सामाजिक शांतता दूषित करणाऱ्या तत्त्वाविरुद्ध आवाज उठवणे. त्याबाबत तार्किक स्वरुपाचा संवाद निर्माण करणे. शेवटी हीच तार्किकता सामाजिक दुभंगाला आव्हान देत अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यास उपयोगी ठरत असते. हाच आशावाद जागवत हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन सृष्टीतले पटकथालेखक, कवी आणि सामाजिक-राजकीय प्रश्नांचे अभ्यासक फरीद खान यांचे ‘अपनो के बीच अजनबी’ हे पुस्तक, सध्या देशात सुरू असलेल्या मुस्लिम द्वेषाविरोधात आवाज उठविते. वाचकांना तार्किकतेकडे नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करते. म्हणूनही या पुस्तकाची दखल घेणे आवश्यक ठरते.  

मुस्लिमद्वेषाचा माग

प्रस्तुत पुस्तकात २००१ या वर्षापासून सुरू झालेल्या जागतिक पातळीवरच्या मुस्लिमविरोधाचे पडसाद टिपण्यात आले आहेत. ९/११ रोजीच्या न्यू यॉर्क ट्विन टॉवर्सवरील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाचा मुस्लिमांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. किंबहुना, कलुषित केला असे म्हणणेच अधिक योग्य ठरावे. परिणामी, प्रत्येक मुसलमान म्हणजे माथेफिरू, दहशतवादी आणि प्रत्येक मुस्लिम राष्ट्र म्हणजे दहशतवाद्यांचे अड्डे, अशा वस्तुस्थितीचा विपर्यास करणाऱ्या प्रतिमा जनसामान्यांच्या मनात निर्माण झाल्या किंवा निर्माण करण्यात आल्या.

आजच्या आशिया खंडातल्याच नव्हे, तर सर्व जगभरात पसरलेल्या मुस्लिमद्वेषाची पाळेमुळे या ९/११ च्या घटनेत आहेत. यामध्ये फरक एवढाच दिसला की, २०१४ पासून भारतात वर्षापासून ‘राज्य’ नावाच्या संस्थेने मुस्लिमविरोधी कट्टरपंथी तत्त्वांना कधी थेट तर कधी आडून पाठिंबा द्यायला सुरुवात केली.

कारण, २०१४ पासून संविधानापुढे नतमस्तक होऊन भारतात सत्तेवर आलेला पक्ष वसुधैव कुटुंबकमचा नारा देत असला तरीही, प्रत्यक्षात या संस्थेच्या वृत्ती-प्रवृत्ती अधिकारशाही-हुकुमशाहीचा अवलंब करणाऱ्या होत्या. तसेही  हुकुमशाही प्रवृत्तीच्या सरकारांना नेहमीच एक आभासी शत्रू लागतो आणि आधीच बदनाम झालेला मुस्लिम समाज त्यांचे आयते खाद्य बनला. यातून मग ट्रिपल तलाक, गोहत्या, आंतरधर्मीय विवाह (लव जिहाद) हे मुद्दे तापवायला सुरुवात झाली. कारण आर्थिक सुनियोजनचा कार्यक्रम नसल्यास हुकुमशाही तत्परतेने धर्माचा हात धरते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. लेखक फरीद खान आपल्या पुस्तकात या सर्व गोष्टींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतात. 

साचेबंध नजरेचा विखार

भारतीय मुस्लिमांना नेहमीच एका साचेबंद नजरेने पहिले गेले आहे. त्यांच्या वस्त्या ‘मिनी पाकिस्तान’ असतात. ते मांसाहारी असतात. त्यांना चार-पाच बायका आणि डझनभर मुले असतात. त्यातून ते आपल्या धर्माची लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे नेहमी ‘पाकिस्तानवर ‘ प्रेम असते. ही काही साचेबंद स्वरूपाची उदाहरणे. लेखक या प्रश्नांना तार्किकतेच्या कसोट्यांवर उचलून धरण्याचा प्रयत्न करतो. मुसलमान घेट्टो करून राहतात, कारण इतर धर्मीय लोक त्यांना आपल्या वस्तात, घरात स्थान देण्यास तयार नसतात. वस्तीबाहेरच्या मुस्लिमांना कट्टरपंथी लोक लक्ष्य करीत राहतात, त्यातून असुरक्षिततेची भावना तयार होते, याचाही परिणाम सारे मुस्लिम एकाच वस्तीत एकवटण्यात होतो. मागे एकदा एका मुलाखतीत विद्यार्थी नेता आणि सध्या युएपीए कायद्यांतर्गत तुरुंगात असलेल्या उमर खालीदला हाच प्रश्न मुलाखतकर्त्याने विचारला होता. त्यावर उमर खालीदचे म्हणणे होते, की तो सध्या ज्या जामिया भागात राहतो, तिथे ८० च्या दशकात जेमतेम ५-१० मुस्लिमांची घरे होती, पण जसजसे राममंदिर आंदोलन आक्रमक होत गेले, तसतसे मुस्लिमांना लक्ष्य करण्याची एक प्रथा पडत गेली. देशभरात दंगली घडत गेल्या, त्याचाही दुष्परिणाम शहरात विखुरलेल्या मुस्लिमांवर होऊ लागला. असुरक्षितता वाढत गेली, त्याच असुरक्षिततेच्या भावनेतून शहरात विखुरलेले मुस्लिम जामिया भागात एकवटत गेले. लोक याला आता मुल्लिम घेट्टो म्हणतात, पण तो आकारास येण्यामागची कारणे तपासत नाहीत. उमर खालीदचे हे म्हणणे दुर्लक्षिण्यासारखे नक्कीच नाही.

मुस्लिमांना वस्तीत-घरात स्थान न देण्याचे आणखी एक कारण म्हणजे, मुस्लिम सतत मांसाहार करतात असा लोकांचा गैरसमज. लेखकाने आपल्या मित्रांचा यासंबंधातला अप्रिय अनुभव प्रस्तुत पुस्तकात सांगितला आहे. त्यामुळे मुस्लिम वस्त्या करून राहत असल्यास त्यांना काय म्हणून दोष देणार? शेवटी तसे का राहतात हा लेखकाचा प्रश्न महत्त्वाचा.  मुस्लिम वस्त्या गलिच्छ असतात कारण, स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामगार दुजाभाव दाखवतात, मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन नियमत आणि प्रामाणिकपणे सफाई करत नाहीत.  

गैरसमजांचा डोंगर

जे मुस्लिम आपले दोन वेळेचं जेवण कमावून खातात त्यांना चार चार बायका कशा परवडणार? हाही खरेतर विचार करण्यासारखा मुद्दा आहे, पण यावरही कोणाला गांभीर्याने लक्ष पुरवायचे नाही. आज पुराव्यानिशी सिद्ध झालेली गोष्ट म्हणजे जेथे शिक्षण आणि आरोग्य सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, तिथे कुटुंबनियोजन चांगले असते. सरकारने यासंबंधाने शिक्षणात आणि आरोग्य व्यवस्थेवर आजवर किती पैसै खर्च केले? हा प्रश्नसुद्धा पडायला पाहिजे, याकडेही लेखक वाचकांचे या पुस्तकाद्वारे लक्ष वेधून घेतो. या वरील गोष्टीचा सारांश असा की, मुख्य सामाजिक – आर्थिक प्रश्नांना बगल देण्यासाठी नेहमीच एका समाजगटाला लक्ष्य केले जाते, सर्व मागासलेपणाचा भार आणि दोष त्यांच्यावर टाकला जातो. ही बुरसटलेली मनोवृत्ती नेहमीच हुकुमशाही राजवटीला उपायकारक असते.

प्रस्तुत पुस्तकाच्या निमित्ताने मला जसोन स्टॅन्ली यांच्या पुस्तकाचा संदर्भ देणे महत्त्वाचे वाटते. स्टॅन्ली यांनी आपल्या ‘हाऊ दी फॅसिझम वर्क’ पुस्तकात फॅसिझमला कशा प्रकारे आभासी शत्रूची गरज असते आणि त्या शत्रूचा आधार घेऊन कशा प्रकारे बहुसंख्यांकांची माथी भडकवली जातात, याचे उत्तम विश्लेषण केले आहे. हे विश्लेषण मोठ्या प्रमाणात भारतीय बहुसंख्याकवादाच्या समर्थकांना लागू पडते. या बहुसंख्याकांची माथी भडकवण्यासाठी मग इतिहासाचा आधार घेतला जातो. त्यांनी आपल्या देशावर ७००वर्षे राज्य केले… या संपत्तीची लूट केली…असे सांगितले-पसरविले जाते. वस्तुतः  इतिहासचे मूल्यांकन निःपक्ष पद्धतीने व्हावयास पाहिजे. पण बहुसंख्याकवाद इतिहासाचा वापर लोकांची डोके फोडण्यासाठी करतो.

लादलेले परकेपण

एकीकडे, ते-म्हणजे मुस्लिम आपल्या-म्हणजे हिंदुंच्या मुलींना पळवून नेवून लग्न करतात आणि त्यांच्या धर्मात भर घालतात, असा अपप्रचार गेली कित्येक वर्ष भारतात आपला दुष्प्रभाव राखून आहे. ‘लव्ह जिहाद’ संकल्पनेचा उगम असा ‘ते’ आणि ‘आम्ही’ अशा प्रकारच्या भेदात असतो, हे समजून घेतल्याशिवाय या बहुसंख्याकवादाचे गणित नीट समजत नाही. आमिर खान किंवा नसिरुद्दीन शाह जेव्हा सरकारवर टीका करतात, तेव्हा त्यांना थेट खुनाच्या धमक्या का मिळतात, याचे उत्तरसुद्धा या बहुसंख्याकवादात सापडते.

फरीद खान यांचे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यापुढे तीन प्रश्न उभे राहिले. पहिला प्रश्न भारतात हिंदू – मुस्लिम द्वेष एवढ्या प्रचंड प्रमाणात का निर्माण झाला? दुसरा, या द्वेषाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा का मिळतोय? तिसरा, यावर उपाय काय आहेत? लेखकाने या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असे मी म्हणणार नाही, मात्र लेखकाने या प्रश्नांवरही सविस्तरपणे लिहायला हवे होते. एरवी, लेखकाकडून या तीन प्रश्नांची मिळणारी उत्तरे अशी आहेत- मुस्लिमद्वेष वाढला याचे कारण खुद्द सरकारांचा याला उघड पाठिंबा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या द्वेषभावनेला पाठिंबा मिळतोय कारण, माध्यमांनी सरकारपुढे सध्या मान तुकवली आहे आणि उपाय काय आहेत, तर माध्यमांनी आणि बुद्धिमंतानी याविरुद्ध सातत्याने आवाज उठवला पाहिजे, ज्याचा सध्या आपल्या देशात दुष्काळ पडला आहे. 

सापत्न वागणुकीचे बळी

शेवटी, एका समाजाला इतरापेक्षा सापत्न वागणूक मिळत असते तेव्हा त्याचे त्या समाजावर पडणारे सामाजिक आणि मानसिक परिणाम हे स्वास्थ बिघडवित असतात. विलगतेची भावना नेहमीच मूलतत्त्ववादाला खतपाणी घालत असते. प्रस्तुत पुस्तकात विलगतेच्या भावनेचे ठळक प्रतिबिंब उमटल्याचे दिसते. शेवटी, या भेदाने सत्ता तर मिळते, पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण जे सामजिक स्वास्थ्य राखण्याचा प्रयत्न केला, तो आपण मागील काही वर्षात सोडून तर दिला नाही ना, याचा विचार बहुसंख्याकांनी केला पाहिजे.

कुठल्याही काळात सत्तेला प्रश्न विचारणे महत्त्वपूर्ण असते. भलेही त्याची किंमत काहीही असो. फरीद खान हे प्रश्न विचारण्याचे धाडस करतात, ते करताना लोकशाही चौकटीला बळकटी देणाऱ्या समतावादी, धर्मनिरपेक्ष आणि विज्ञानवादी मूल्यांचा आपला आग्रह ते सोडत नाहीत. आजच्या काळातली या गुणवैशिष्ट्यांची वानवा पाहता, हे पुस्तक आणि यातली मांडणी महत्त्वाची आहे. या पुस्तकात सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि जनविचारक म्हणून प्रसिद्ध असलेल्या नसिरुद्दीन शहा यांनी याविषयासंबंधातली आपली भूमिका स्पष्ट करून पुस्तकाच्या आशयात मोलाची भर घातली आहे. म्हणूनही आत्मचिंतनास प्रवृत्त करणाऱ्या या पुस्तकाचे स्वागत होणे आवश्यक ठरते.

लेखक पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत.

अपनों के बीच अजनबी
फरीद खान
लेफ्ट वर्ड
मूल्यः२२५ रुपये

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0